::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 06.02.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
2. अर्जदाराची पत्नी सौ. मंजुळा नामदेव वरखडे ही दि. 20/7/10 रोजी विज पडल्याने मृत्यु झाला. अर्जदाराची पत्नी रामपुरी तह. ब्रम्हपुरी येथील राहणारी मयत धोंडूबाई कन्नाके यांची मुलगी असुन आईचे मृत्युनंतर सौ.मंजुळा नामदेव वरखडे हीचे नाव मौजा रामपुरी तह. ब्रम्हपुरी येथील सर्वे क्र. 149 आराजी 0.56 हे.आर शेतजमीनीवर नोंदविण्यात आले. तसेच अर्जदारासह स्वतःहा शेती करीत होती त्यामुळे ती शेतकरी होती. 3. अर्जदाराने शेतकरी जनता अपघात विमा योजना असलेली पॉलीसी क्र. 230200/47/10/99/00000067 अन्वये पत्नीचा विज पडल्याने झालेल्या मृत्युकरीता विमाचे रक्कमेवर दावा केला. अर्जदाराच्या पत्नीचा नैसर्गिक अपघातामुळे मृत्यु झालेला असल्याने दावा मंजुर होण्यास पाञ आहे. 4. अर्जदार अशिक्षित असल्याने कागदपञ गोळा करण्यास उशीर झाला. तसेच तब्बेत ठिक नसतांना कसेबसे कागदपञ गोळा करुन दावा अर्ज दि.31/12/10 रोजी तालुका कृषि अधिकारी तालुका नागभिड यांच्याकडे सादर केला. अर्जदारास मुदतीनंतर 1 महिना 17 दिवस उशिर झाला. उशिर होण्याचें मागे असलेली परिस्थिती अर्जदाराचे आवाक्याबाहेर होते. गै.अ. ने अर्जदाराचे दाव्याकडें व सादर केलेल्या दस्तऐवजाकडे मुद्दाम दुर्लक्ष करुन खोटया सबबी पुढे करुन दावा खारीज केला. अर्जदाराने त्याचे वकील सुनिल एस.कामडी याचे मार्फत दि. 3/5/11 रोजी नोटीस पाठवून योजनेनुसार रु.1,00,000/- मागणी केली. गै.अ. यांनी दि. 8/4/11 रोजी बेकायदेशीररित्या दावा खारीज केला. गै.अ. चे सदर कृत्य अनुचित व्यापार पध्दती असुन न्युनतापूर्ण सेवा सुध्दा आहे. त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन योजने नुसार रु. 1,00,000/- मानसीक व शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी 10,000/- गै.अ. यांनी अर्जदारास देण्याचे निर्देश दयावे अशी मागणी केली आहे. तसेच अर्जदाराला सर्व रकमेवर 12 टक्के द.सा.द.शे. व्याज विम्याच्या रकमेची मागणी केल्यापासुन, रक्कम मिळेपर्यंत देण्याचे गै.अ.यास निर्देश दयावे अशी प्रार्थना केली आहे.
5. अर्जदाराने तक्रारीसोबत नि. 4 नुसार 7 झेरॉक्स दस्तऐवज दाखल केले. तक्रार स्विकृत करुन गै.अ. यास नोटीस काढण्यात आले. गै.अ. हजर होऊन नि. 9 नुसार प्राथमिक आक्षेपासह लेखीबयान दाखल केला.
6. गै.अ. यांनी प्राथमिक आक्षेप घेतला आहे की, सादर केलेली ही तक्रार सकृत दर्शनी खारीज होण्यास पाञ आहे कारण की, ञिसदस्यीस विमा योजना पॉलीसी अंतर्गत महाराष्ट्र शासनाने कृषि आयुक्त पुणे, कमाल इंन्सुरंस व युनायटेड इंन्शुरंस यांचे मध्ये करार होवून शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविली असुन तक्रारीत आवश्यक त्या गै.अ. विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली नाही. 7. गै.अ. यांनी माहीती अभावी हे नाकबुल व अमान्य केले आहे की, अर्जदाराची पत्नी सौ मंजुळा नामदेव वरखडे हीचा दि. 20/7/10 रोजी विज पडून मृत्यु झाला तसेच ती शेतकरी होती. हे म्हणणे असत्य व पूर्णता खोटे असल्यामुळे नाकबूल व अमान्य की, अर्जदाराची तब्बेत ठिक नव्हती व त्यामुळे कागदपञ गोळा करण्यास उशिर झाला. अर्जदाराचे तक्रारीतील 2 ते 9 मधील संपूर्ण मजकुर असत्य व खोटा आहे. 8. गै.अ. यांनी लेखीबयानातील विशेष कथनात कथन केले की, ञिसदस्यीय शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत काढण्यात आलेल्या विमा करारानुसार नुकसान भरपाई मागण्यासाठी आवश्यक कागदपञासह क्लेम विमा कंपनीकडे तालुका कृषि अधिकार यांचे मार्फत तसेच कबाल इंन्सुरन्स मार्फत पाठविणे आवश्यक आहे. सदरहू केस मध्ये सौ.मंजुळा हिचा मृत्यु दि.20/7/10 रोजी झाला असुन 31/12/10 रोजी तालुका कृषि अधिकारी नागभिड यांच्याकडे क्लेम सादर केला आहे. पॉलीसीच्या शर्ती व अटी तसेच करारातील नमुद बाबीचा विचार करुनच पॉलीसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत क्लेम, विमा कंपनीकडे, क्लेम आला नसल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी नियमाचे अधिन राहून फेटाळण्यात आले आहे. विमा कंपनीने दि. 8/4/11 रोजी पंजीकृत डाकेने दावा मंजुर करता येत नाही असे कळविले आहे. पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार यांचे आधिन दावा नामंजुर करण्यात आला आहे. याअर्थी तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे व खारीज करण्यात यावी. अर्जदाराने सादर केलेला नुकसान भरपाईचा दावा मुदत बाहय असल्यामुळे खारीज करण्यात यावा अशी विनंती केली आहे. 9. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ सरतपासणी शपथपञ दाखल केला. गै.अ.यांनी पुरावा शपथपञ दाखल करायचे नाही तर शपथपञावर लेखीबयान दाखल केलेला आहे तोच पुरावा शपथपञ समजावा अशी पुरसीस नि. 12 नुसार दाखल केली आहे. गै.अ. यांनी नि. 13 नुसार लेखीयुक्तीवाद दाखल केला अर्जदारातर्फं तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदार यांनी दाखल केलेला दस्तऐवज शपथपञ आणि गै.अ. यांनी दाखल केलेल्या लेखीबयानावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 10. अर्जदार यांनी दि. 20/7/10 रोजी विज पडून पत्नी सौ. मंजुळा नामदेव वरखडे हिचा मृत्यु झाल्याने शासनाच्या योजनेनुसार शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरीता क्लेम सादर केला. परंतु गै.अ. यांनी दि.8/4/11 रोजी पंजीकृत पञ पाठवून क्लेम देता येणार नाही असे कळविले असल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. 11. गै.अ.यानी लेखीउत्तरात प्राथिमक आक्षेप घेतला आहे की, अर्जदार यानी तक्रार आवश्यक त्या गै.अ. विरुध्द दाखल करण्यात आली नाही. शेतकरी जनता अपघात विमा योजना ही ञिसदस्यीय विमा योजना पॉलीसी आहे. त्यामूळे तालुका कृषि अधिकारी आणि कबाल इंन्सुरन्स यांना गै.अ. केले नाही. म्हणून तक्रार खारीज करण्यात यावी. गै.अ. यांनी घेतलेला प्राथमिक आक्षेप संयुक्तिक नाही. गै.अ.यांनी लेखीउत्तरात हे मान्य केले आहे की, दि.31/12/10 रोजी तालुका कृषि अधिकारी नागभिड यांच्या कडे विमा दावा मिळण्यासंदर्भात, क्लेम फॉर्म सादर केला. सदर क्लेम फॉर्म विमा कंपनीला प्राप्त झाला असुन, गै.अ. विमा कंपनीने दि 8/4/11 रोजी पञ पाठवून विमा क्लेम फार्म सादर करण्यास 90 दिवसापेक्षा जास्त दिवस विलंब झाल्यामुळे नुकसान भरपाई मंजुर करता येणार नाही असे कळविले. यावरुन गै.अ. यांनी विमा क्लेम नाकारला असल्याने तालुका कृषि अधिकारी नागभिड व कबाल इंन्सुरन्स यांना गै.अ. जोडले नाही. या कारणावरुन तक्रार खारीज होण्यास पाञ नाही. गै.अ. यांनी विमा क्लेम प्राप्त झाला नाही असे म्हणणे असते तर, त्यांना गै.अ. म्हणून न जोडण्याचा मुद्दा उचित होता. परंतु गै.अ. यास विमा क्लेम फॉर्म मिळालेला असल्याने, आवश्यक गै.अ. विरुध्द तक्रार दाखल केले नाही हा गै.अ. चा मुद्दा ग्राहय धरण्यास पाञ नाही या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 12. गै.अ. यांनी अर्जदाराने सादर केलेला क्लेम 8/4/11 च्या पञान्वये नामंजुर केला आहे. अर्जदार यांनी पॉलिसीच्या करारानुसार पॉलीसी मुदत संपल्यानंतर 90 दिवसाचे आत क्लेम फॉर्म सोबत आवश्यक कागदपञ सादर केले नाही त्यामुळे क्लेम देता येणार नाही असे म्हणणे आहे. अर्जदार यांनी झालेल्या विलंबा बद्दल स्पष्टीकरण असे सादर केले की, अर्जदाराची प्रकृती चांगली नसल्यामुळे कागदपञाची जुळवाजुळव वेळेत करु शकला नाही. तसेच अर्जदार अशिक्षित असल्यामुळे कागदपञ गोळा करण्यास उशिर झाला. महाराष्ट्र शासनाने गोरगरीब शेतक-याच्या हिताच्या दृष्टिने तसेच कुटूंबातील कर्ता शेतकरी याचा नैसर्गिक आपत्तीने उदा. पूर, भुस्खलन, विज पडून, इत्यादी कारणाने मृत्यु झाल्यास रस्ते अपघात, खून, नक्षल हत्या, सर्पदंश, झाडावरुन पडून इत्यादी कारणाने अपघाती मृत्यु झाल्यास त्यांचे कुटूंबातील सदस्यांना आर्थिक लाभ व्हावा या उदात्य हेतुने योजना राबविण्यात येत आहे. ही योजना वरिष्ठ अधिका-यांपासुन गावपातळीवरील तलाठी यांना राबवायची आहे. परंतु त्याचे योग्य उहपोह केल्या जात नाही. त्यामुळे सामान्य जनतेला याबद्दल अज्ञानता असते. वास्तविक प्रस्तुत प्रकरणात नैसर्गिक आपत्तीने सौ. मंजुळा वरखडे हीचा व त्यासोबत सुनिता तुळशिराम नान्हे यांचे अंगावर विज पडून मृत्यु पावल्या ही नैसर्गिक आपत्ती तलाठी, तहसीलदार व कृषि अधिकारी यांनीच पुढाकार घेऊन कागदपञाची पूर्तता करुन देणे, आणि आर्थिक लाभ संबंधातील कुटूंबाला मिळवून देणे ही जबाबदारी होती व आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदार याने पत्नीचे मृत्युनंतर तलाठी यांचे कडून फेरफार करुन घेऊन व कागदपञ गोळा करुन दि.31/12/10 ला सादर केला. अर्जदारास प्रस्ताव सादर करण्यास 1 महिना 17 दिवसाचा विलंब झाला हा विलंब आदेशात्मक नियम (Mandatory Rule) नाही. विमा अधिनियमा नुसार नुकसान भरपाई मिळण्याकरीता प्रस्ताव व कागदपञ सादर करण्यास 12 महीन्याचा कालावधी दिलेला आहे. उलट या योजनेत अगदी अल्प कालावधी दिलेला आहे कारण की लवकरात लवकर मृतक शेतक-याच्या कुटूंबाला लाभ मिळण्या पासुन वंचीत ठेवण्याचा हेतु नाही. यामुळे अर्जदाराने विमा क्लेम प्रस्ताव सादर करण्यास विलंब केला या कारणावरुन गै.अ. यांनी विमा दावा नाकारुन सेवा देण्यात न्युनता करुन बेकायदेशीरपणे विमा दावा नाकारला आहे या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्सुरंस कं. लि. विरुध्द श्रीमती सिंधुबाई खंडेराव खैरनार 2008(2) All MR (Journal) 13 या प्रकरणातील न्यायनिवाडयात पॅरा 9 मध्ये दिलेले मत या प्रकरणाला लागु पडते. त्यातील काही महत्वाचा भाग येणे प्रमाणे. Insurance company rejected the claim on the hyper technical ground. The widow cannot be blamed for belated submission of claim. As per the procedure laid down by the Govt.of Maharashtra, Village Revenue Officer and Tahsildar are mainly responsible for submission of claim to the insurance company. Immediately after the accidental death necessary information was given to the Village Revenue Officer. Therefore, the time should commence to run from the date of intimation of accidental death to the Village Revenue Officer. Moreover, the clause with regard to time limit prescribed for the submission of the claim is not mandatory. In case of serious accident if, death occurs of bread winner of the family and if, immediate financial assistance is not received in time, the entire family comes on the street. Therefore, time limit for the submission of the claim is prescribed. Provision with regard to time limit made in this behalf cannot be used to defeat the genuine. In this particular case, claim submitted by the Tahsildar was very much genuine. The insurance company should have acted promptly and should have credited the insurance amount in the bank account of the widow. वरील न्यायनिवाडयातील मतावरुन अर्जदाराने विमा क्लेम दाखल करण्यास विलंब केल्याच्या कारणावरुन गै.अ. यांनी दावा नाकारुन सेवा देण्यात न्युनता केली या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे 13 गै.अ. वकीलांनी लेखीयुक्तरवरसोबत मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली यांनी सुदेश गुप्ता विरुध्द आयसीआयसीआय प्रोडेंशीयल लाईफ इंन्सुरंन्स कं. लि. 2011(3) CPR 148 (NC) या प्रकरणाचा दाखला दिला सदर न्यायनिवाडयातील बाब या बाबींशी भिन्न आहे. त्यामुळे त्या न्यायनिवाडयातील रेषो या प्रकरणाला लागु पडत नाही. 14. अर्जदाराची पत्नी हिचे नावाने मौजा रामपुरी साजा क्र. 19 भूमापन क्र. 149 आराजी 0.56 हेक्टर आर शेतजमीन होती. सदर शेतजमीन ही मृतक मंजुळा हिची आई घिनाबाई हिचा मृत्यु झाल्यानंतर तिचे नाव चढले व तसे राजस्व रेकॉर्डला, तलाठी यांनी नोंद घेतली. मृतक मंजुळा नामदेव वरखडे हिचा दि. 20/7/10 ला विज पडून मृत्यु झाल्यानंतर तिचे वारसदाराचे नावाने फेरफार 30/9/10 ला घेण्यात आले त्याचे पूर्वी फेरफार घेण्याकरीता तलाठी यास 8/9/10 रोजी माहीती देण्यात आली असे दाखल फेरफार पञक दस्तऐवजावरुन दिसुन येतो. मृतक मंजुळाबाई वरखडे हिच्या नावाने शेती होती व तिचे नाव 7/12 वर नमुद आहे. मृतक मंजुळाबाई हिचा मृत्यु 14 ऑगस्ट 2010 चे पूर्वी झालेला असुन विमा पॉलिसीनुसार लाभधारक म्हणून गै.अ. यांनी जोखीम स्विकारली होती व आहे. त्यामुळे अर्जदार विमा क्लेम ची रक्कम रु. 1,00,000/- मिळण्यास पाञ आहे. असा या न्यायमंचाचा निष्कर्ष आहे. 15. मृतक मंजुळाबाई वरखडे हिचा नैसर्गिक आपत्तीने विज पडून शेतात मृत्यु झाला. पोलीस स्टेशन नागभिड यांनी अकस्मात मृत्यु खबरी क्र. 24/2010 कलम 174 जा.फौ.दि.20/07/10 नुसार नोंद करुन घटनास्थळ पंचनामा तयार केला तसेच इनक्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये मृत्यु विज पडल्यानेच झालेला आहे असा निष्कर्ष निघालेला आहे. अर्जदाराने असा दस्तऐवज दाखल केलेला आहे. एकंदरीत अर्जदाराची पत्नी ही शेतकरी होती. व तिचा नैसर्गिक आपत्तीने मृत्यु झाला असल्याने शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पाञ आहे असे या न्यायमंचाचे ठाम मत असल्याने तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे. 16. वरील कारणे व निष्कर्षावरुन अर्जदार शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत मृतक मंजुळा नामदेव वरखडे हीचा अपघाती मृत्यु विमा दावा रु. 1,00,000/- दि. 8/4/11 पासुन मिळण्यास पाञ आहे या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार अंशतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अशंतः मंजुर. (2) गै.अ. यांनी मृतक मंजुळा नामदेव वरखडे हीच्या अपघाती मृत्यु झाल्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत रु. 1,00,000/- दि.08/04/2011 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने अर्जदारास आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाच्या आत दयावे. (3) गै.अ. ने अर्जदारास मानसीक शारीरीक ञासापोटी रु.4,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 1,000/- आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाच्या आत दयावे. (4) उभयपक्षाना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 06/02/2012. |