(घोषित दि. 19.10.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचे वाहन सुमो जिप करीता गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 23.12.2010 ते 22.12.2011 या कालावधीची विमा पालीसी घेतली आहे. दिनांक 29.05.2011 रोजी सदर वाहनाला अपघात झाला. तक्रारदारांचे नातेवाईकांना घेवून जालना मंठा रोडवर ट्रक चालकाने समोरुन दूभाजक ओलांडून रॉग साईडने जीपला धडक दिली. सदर जीपमध्ये बसलेली माणसे अपघातात गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर जिप चालक गजानन कळकुंबे यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जावून फिर्याद दिली ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल झाला. घटनास्थळ पंचनामा, वाहन चालकाचा परवाना, फिर्याद सदर प्रकरणात दाखल आहे.
तक्रारदारांच्या गाडीचे रक्कम रुपये 1,72,893/- एवढे नूकसान झाल्याबाबत सर्वेअर अहवाल दिनांक 22.08.2011 रोजी श्री.अरुण नाईक यांनी गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला. तक्रारदारांनी सर्वेअर अहवालानूसार नूकसान भरपाईच्या रकमेची मागणी केली. परंतू गैरअर्जदार यांनी दिनांक 22.12.2011 रोजी विमा प्रस्ताव अयोग्य कारणास्तव नामंजूर केला.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झाले असून लेखी म्हणणे दिनांक 25.06.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार अपघाताचे वेळी जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. टाटा सुमो जिप मध्ये फक्त 10 प्रवासी (1+9) ड्रायव्हरसहीत प्रवास करु शकतात. अपघाताचे वेळी जिपमध्ये 14 प्रवासी असल्याबाबत फिर्यादीमध्ये (एफ.आय.आर) नमूद केले आहे. तसेच जिपमध्ये लग्नाला जाणारे प्रवासी होते. यावरुन तक्रारदारांनी पॉलीसीच्या अट नं.3 (b) चे उल्लंघन केले आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. पी.पी.लाखे पाटील यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून वाहनाकरीता घेतलेल्या विमा पॉलीसीच्या कालावधीत सदर अपघात झालेला असुन त्यावेळी वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असून वाहनाचा उपयोग लग्नाच्या प्रवाश्याकरीता केला या कारणास्तव गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा विमा प्रवास नामंजूर केला आहे.
तक्रारीतील कागदपत्रे म्हणजेच गाडीचे चालक गजानन कळकुंबे यांनी दिलेल्या जबाबानूसार अपघाताचेवेळी 14 प्रवासी असल्याबाबत नमूद केल्याचे दिसून येते. तसेच घटनास्थळ पंचनाम्यामध्ये 12 प्रवासी असल्याबाबत नमूद केले आहे.
तक्रारदारांच्या गाडीत अपघाताचे वेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे हे अपघात घडण्याचे कारण नाही. सदरचा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणाने झालेला असल्याचे घटनास्थळ पंचानाम्यावरुन दिसून येते. सर्वोच्च न्यायालयाच्या नागार्जुन विरुध्द ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी (AIR 1996 SC 2054) न्यायनिवाडा सदर प्रकरणात लागू होतो. असे न्यायमंच नम्रपणे नमूद करत आहे.
वरील न्यायनिवाडयानूसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामूळे अपघात झालेला नाही. त्यामुळे विमा पॉलीसीचे मुख्यत:(Fundamental breach) उल्लंघन झालेले नाही. अशा परिस्थितीत इन्शूरन्स कंपनीला जबाबदारी पुर्णत: टाळता येणार नाही.
त्याच प्रमाणे तक्रारदारांनी गाडीचा वापर (Limitation) पॉलीसीतील अटी व शर्तीनूसार केलेला नसल्याबाबतचा कोणताही पूरावा न्यायमंचासमोर नाही. त्यामुळे गैरअर्जदार कंपनीने अयोग्यरित्या तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर केल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे, अशा परिस्थीतीत गैरअर्जदार यांनी सर्वेअर अहवालानूसार गाडीच्या नूकसान भरपाईची रक्कम दुरुस्तीचे बेसीसवर रुपये 1,54,000/- देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1. गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना गाडीच्या नूकसान भरपाईची रक्कम रुपये 1,54,000/- (रुपये एक लाख चोपन्न हजार फक्त) आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावी.
2. विहित मुदतीत अदा न केल्यास संपूर्ण रक्कम अदा होई पर्यंत द.सा.द.शे 9 टक्के व्याज दारासहीत द्यावी.