द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांचे मयत वडील दल्ला हरुन हाजी नुरमोहम्मद यांनी सामनेवाला यांचेकडून व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसी घेतली होती आणि त्यामध्ये तक्रारदारांचे नांव प्रतिनिधी (Assignee)म्हणून नमूद करण्यात आले. सामनेवाला क्र.2 यांना या कामी तक्रारदारांनी फॉर्मल व आवश्यक पक्षकार म्हणून सामील केले असून सामनेवाला क्र.2 यांच्याविरुध्द कोणतीही मागणी केली नाही.
2) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सन् 1999/2000 च्या दरम्यान सामनेवाला क्र.2हे तक्रारदारांच्या वडिलांना भेटले व सामनेवाला क्र.1 यांच्या वेगवेगळया पॉलिसींची माहिती सांगितली. तक्रारदारांच्या वडिलांनी सामनेवाला क्र.2 यांचेवर विश्वास ठेवून सामनेवाला क्र.1 यांचेकडून मेडिक्लेम पॉलिसी नं.020600/48/05/00530 आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी नं.020600/42/05/00257 घेतली व त्यासाठी आवश्यक तो प्रिमियम दिला. तक्रारदारांच्या वडिलांनी वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतली त्यामध्ये आश्वासित रक्कम रु.5,00,000/- देण्यात आली असून सदर पॉलिसीचे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आले. शेवटचे नुतनीकरण दि.08/09/2005 रोजी करण्यात आले. त्यासाठी आवश्यक असणारा प्रिमियम तक्रारदारांचे वडिलांनी सामनेवाला यांना दिला. शेवटी नुतनीकरण करण्यात आलेली पॉलिसी ही 29/09/05 ते 28/09/06 या कालावधीसाठी होती.
3) वरील पॉलिसीच्या कालावधीत तक्रारदारांच्या वडिलांना दि.08/11/05 रोजीच्या दरम्यान अपघात झाला. ते घरात घसरुन पडले व त्यांचे माकड हाड फ्रॅक्चर झाले. त्यांना दिनांक 14/11/2005 रोजी जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल केले. जसलोक हॉस्पीटलमध्ये त्यांचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तक्रारदारांच्या वडिलांना वरील अपघातात फ्रॅक्चरशिवाय इतर अंतर्गत जखमा झाल्या होत्या. शस्त्रक्रिया केल्यानंतर तक्रारदारांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जसलोक हॉस्पीटलमधील आय.सी.यु.मध्ये दिनांक 16/11/2005 रोजी ठेवावे लागले. दिनांक 22/11/2005 रोजी तक्रारदारांच्या वडिलांना जसलोक हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
4) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या वडिलांना दि.26/11/05 रोजी रक्ताच्या उलटया झाल्या व त्यामुळे त्यांना ताबडतोब सैफी हॉस्पीटलमधील आय.सी.यु.मध्ये ठेवण्यात आले. नंतर त्यांना दि.26/11/05 पासून 02/12/05 पर्यंत/रोजी सदर हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
5) तक्रारदारांच्या वडिलांनी त्यानंतर मेडिक्लेम पॉलिसीखाली सामनेवाला यांचेकडे वैद्यकीय उपचारापोटी झालेल्या खर्चाची परिपूर्ती व्हावी म्हणून क्लेम दाखल केला व जसलोक हॉस्पीटल व सैफी हॉस्पीटलमधील आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. सामनेवाला क्र.1 कंपनीने आपसात तडजोडीने मेडिक्लेम पॉलिसीअंर्गत तक्रारदारांच्या वडिलांच्या क्लेमपोटी रक्कम रु.1,25,500/- धनादेशाने दिले.
6) तक्रारदारांच्या वडिलांचे निधन दि.18/12/05 रोजी झाले. त्यानंतर तक्रारदारांनी त्याच्या वडिलांच्या व्यक्तीगत विमा पॉलिसीखाली प्रतिनिधी (Assignee)म्हणून दि.17/01/06 मध्ये सामनेवाला यांचेकडे क्लेम फॉर्म भरुन दिला व त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे दिली. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांकडे आणखी कागदपत्रांची मागणी केल्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या प्रतिनिधीसोबत सदरचे कागदपत्र सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठविली. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी सदर कागदपत्र घेण्याचे नाकारले. दिनांक 07/02/06 तक्रारदारांनी पत्रासोबत आणखी कागदपत्रे सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठविली. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांच्या क्लेमबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. दि.10/05/06 च्या पत्राने तक्रारारांनी सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या क्लेमसंबधी निर्णय घ्यावा अशी विनंती केली. सदर पत्रास सामनेवाला क्र.1 यांनी उत्तर सुध्दा पाठविले नाही. तक्रारदार स्वतः सामनेवाला क्र.1 यांचे अधिकारी श्री.मुर्ती यांना भेटले असता तक्रारदारांचा क्लेम विचाराधीन आहे असे त्यांना सांगितले. परंतु सामनेवाला 1 यांनी मुद्दामहून तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी निर्णय घेण्यास टाळाटाळ केली.
7) तक्रारदार हे त्यांचे वडिलांचे व्यक्तीगत विमा पॉलिसीचे प्रतिनिधी (Assignee)असल्यामुळे त्यांना सामनेवाला यांचेकडून सदर पॉलिसीमध्ये दिलेल्या आश्वासित रक्कम रु.5 लाख त्यावर व्याज व क्युम्युलेटीव्ह बोनसची रक्कम रु.1,25,000/- मिळणे आवश्यक आहे. वरील पॉलिसीतील तरतुदीनुसार तक्रारदारांच्या वडिलांना 1 टक्का तात्पुरते अपंगत्व म्हणून दर आठवडयाला रक्कम रु.5,000/- मिळणे आवश्यक होते. तक्रारदारांनी वरील पॉलिसी अंतर्गत प्रतिनिधी (Assignee) म्हणून रक्कम रु.21,000/- त्यावर 24 टक्के दराने व्याज त्यांच्या वडिलांच्या तात्पुरत्या अपंगत्वाच्या काळात म्हणजेच 7 आठवडयासाठी मिळणे आवश्यक होते, तसेच तक्रारदारांना त्यांच्या वडिलांचे शव एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी झालेला खर्च रक्कम रु.2,500/- सामनेवाला यांचेकडून मिळणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी सामनेवाला यांचेकडून नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5 लाख व त्यावर 24 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे, तसेच या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.25,000/- मिळणे आवश्यक आहे. सदरचा तक्रारअर्ज प्रलंबित असताना तक्रारदारांनी केलेली मागणी विचारात घेता सामनेवाला यांनी सदर रक्कमेचा जामीन या मंचासमोर द्यावा असे सामनेवाला क्र.1 यांना आदेश करावा अशी तक्रारदारांची विनंती आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांची विनंतीस प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे.
8) तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून व्यक्तीगत विमा पॉलिसीखाली देण्यात आलेली आश्वासित रक्कम रु.5 लाख व त्यावर जमा झालेली क्युमिलेटिव्ह बोनसची रक्कम रु.1,25,000/- सामनेवाला क्र.1 यांनी द्यावेत व त्यावर दि.17/01/07 पासून 24 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदारांच्या वडिलांना जे तात्पुरते अपगत्व आले त्या काळात नुकसानभरपाई म्हणून 21,000/- त्यावर 24 टक्के दराने दि.17/01/06 पासून व्याज, वडिलांचे शव एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी झालेला खर्च रक्कम रु.2,500/- झाला, तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5 लाख त्यावर 24 टक्के दराने व्याज व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.25,000/- सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना द्यावेत असा आदेश करावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
9) तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्र दाखल केली आहेत.
10) सामनेवाला क्र.1 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. तक्रारअर्जात केलेले आरोप खोट व बिनबुडाचे असून तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून निव्वळ पैसे उकळण्यासाठी खोटा अर्ज केलेला आहे व तो विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार खर्चासहित रद्द होणेस पात्र आहे.
11) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे दि.08/11/05 रोजी तक्रारदारांचे वडील घरात पडल्यामुळे त्यांना अपघात झाला. अपघात घडल्यानंतर त्यांना सहा दिवसांनी म्हणजेच दि.14/11/05 रोजी जसलोक हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. जसलोक हॉस्पीटलमध्ये तपासणी केल्यानंतर तक्रारदारांच्या वडिलांना माकड हाडाचे फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले व त्यांचेवर त्याच दिवशी म्हणजे दि.14/11/05 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. तक्रारदारांच्या वडिलांना दि.22/11/05 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज कार्डमध्ये तक्रारदारांच्या वडिलांना इतर काही जखमा झाल्या होत्या असा काहीही उल्लेख नाही. तक्रारदारांच्या वडिलांच्या वैद्यकीय खर्चाबाबत दाखल केलेला क्लेमसंबंधात उभयपक्षकारांनी आपसात विचार विनिमय करुन धनादेशाद्वारे रु.1,26,500/- तक्रारदारांच्या वडिलांना दिले.
12) तक्रारदारांचे वडिलांना मेडिक्लेम पॉलिसीपोटी वरीलप्रमाणे रक्कम मिळूनसुध्दा तक्रारदारांनी Third Party Claimची मागणी केली.कायदयाप्रमाणे अशी Third Party Claimची मागणी तक्रारदारांना करता येत नाही. हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तक्रारदारांचे वडील त्यांच्याच घरात होते. त्यानंतर दि.26/11/05 रोजी तक्रारदारांच्या वडिलांना सैफी हॉस्पीटलमध्ये दुस-या आजारावर उपचारासाठी दाखल केले होते. त्या ठिकाणी तक्रारदारांच्या वडिलांचे दि.26/11/05 रोजी “Upper GI Scopy” ची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पूर्वी झालेल्या माकड हाडाच्या फ्रॅक्चरशी कोणताही संबंध नव्हता. तक्रारदारांच्या वडिलांचा मृत्यु “Duodenal Ulcer” मुळे झाला आहे. विमा पॉलिसीखाली काही ठराविक अपघातासाठी/आजारासाठी विमा संरक्षण देण्यात आले होते. तक्रारदारांनी तक्रारअर्जात सामनेवाला क्र.1 यांना फसवणूकीच्या उद्देशाने मुद्दामहून खोटी विधाने केली आहेत. तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले सर्व आरोप सामनेवाला यांनी नाकारलेले असून तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे म्हटले आहे.
13) तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन त्यासोबत कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत. सामनेवाला यांचेतर्फे श्री.ए.आर.दास, डिव्हीजनल मॅनेजर यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले असून त्यासोबत कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला.
14) तक्रारअर्जाची नोटीस सामनेवाला क्र.2 यांना बजावून सुध्दा सामनेवाला क्र.2 हे या मंचासमोर हजर राहिले नाहीत. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द दि.06/06/07 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. तक्रारअर्जात तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 विरुध्द कसलीही दाद मागितलेली नाही. तक्रारदारतर्फे वकील श्री.अभिजीत गोंडवाल व सामनेवालातर्फे वकील श्री.कृष्णा शर्मा यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
15) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे व्यक्तीगत अपघात विमा योजनेखाली रक्कम रु.5,00,000/-, त्यावर व्याज व
क्युमिलेटिव्ह बोनसची रक्कम रु.1,25,000/- तसेच या अर्जाचा खर्च रु.5,000/- व इतर नुकसानभरपाई सामनेवाला यांचेकडून वसुल
करता येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - तक्रारदारांचे मयत वडील दल्ला हरुन हाजी नुरमोहम्मद यांनी सामनेवाला यांचेकडून व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसी नं.020600/42/05/00257 घेतली होती. सदर पॉलिसीची छायांकित प्रत तक्रारअर्जासोबत नि.'ब' ला दाखल असून त्यामध्ये प्रतिनिधी (Assignee)म्हणून विमाधारकाचा मुलगा दल्ला इजाझत हरुन हाजी (सध्याचे तक्रारदार) यांचे नांव नमूद केले आहे. सदरची व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसी दि.29/09/08 ते 28/09/06 या कालावधीसाठी असून त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आश्वासित रक्कम (कॅपीटल सम ऍश्युअर्ड) रु.3,50,000/- नमूद केल्याचे दिसते. तक्रारदारांचे वडील दल्ला हरुन हाजी नुरमोहम्मद यांनी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडून मेडिक्लेम पॉलिसी नं.020600/48/05/00530 घेतली होती. तक्रारदार यांच्या मयत वडिलांनी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडून वरील दोन विमा पॉलिसी घेतल्या होत्या ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.08/11/2005 रोजी त्यांचे वडील घरातील बाथरुमध्ये घसरुन पडले व त्यांना इजा झाली. दि.14/11/2005 तक्रारदारांनी त्याचे वडिलांना उपचारासाठी जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल केले त्यावेळी तक्रारदारांच्या वडिलांना (Hip Fracture) माकड हाडाचे फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारदारांच्या वडिलांवर जसलोक हॉस्पीटलमध्ये ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर काही गुंतागुत निर्माण झाल्यामुळे त्यांना सदर हॉस्पीटलमधील आय.सी.यु.मध्ये दि.16/11/2005 रोजी ठेवण्यात आले. दि.22/11/2005 रोजी तक्रारदारांच्या वडिलांना जसलोक हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. जसलोक हॉस्पीटलमधून तक्रारदारांच्या वडिलांना घरी नेण्यात आले. दि.25/11/2005 रोजी तक्रारदारांच्या वडिलांना रक्ताच्या उलटया झाल्या व त्यामुळे तक्रारदारांनी ताबडतोब त्यांचे वडिलांना सैफी हॉस्पीटलमध्येदाखल केले. सदर हॉस्पीटलमधील आय.सी.यु.मध्ये तक्रारदारांच्या वडिलांना ठेवण्यात आले व त्यांचेवर उपचार करण्यात आले. सैफी हॉस्पीटलमध्ये तक्रारदारांचे वडीलांना दि.02/12/2005 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. सामनेवाला यांनी तक्रारदारांचे वडिलांचे जसलोक हॉस्पीटलमधील, तसेच सैफी हॉस्पीटलमधील डिस्चार्ज कार्डच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत. सैफी हॉस्पीटलच्या डिस्चार्ज कार्डमधील मजकूरावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी विनंती केल्यामुळे तक्रारदारांच्या वडिलांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. तक्रारदारांचे वडीलांना त्यांच्या घरी पडल्यामुळे अपघात झाला व नंतर त्यांना जसलोक हॉस्पीटलमध्ये व सैफी हॉस्पीटलमध्ये डिस्चार्ज कार्डमध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांचेवर उपचार करण्यात आले ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदारांनी त्यांचे वडिलांना जसलोक हॉस्पीटलमध्ये व सैफी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी झालेल्या खर्चाची मागणी मेडिक्लेम पॉलिसीच्या अंतर्गत सामनेवाला क्र.1 यांचेकडे केली होती व उभयपक्षरांनी आपसात विचार विनिमय करुन तक्रारदारांना वैद्यकीय खर्चापोटी एकूण रक्कम रु.1,26,500/- दिले. ही बाब उभपक्षकारांना मान्य आहे. तक्रारदारांनी सेटलमेंट व्हाऊचरची छायांकित प्रत तक्रारअर्जासोबत नि.'इ' ला दाखल केली आहे.
या तक्रारअर्जात तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे त्यांच्या वडिलांचा अपघाती मृत्यु झाला आहे असे म्हणून वैक्तीगत अपघात विमा पॉलिसीतील आश्वासित रक्कम क्युमुलेटीव्ह बोनस व त्यावर 24 टक्के दराने व्याज, तसेच वडिलांच्या तात्पुरत्या अपगत्वासाठी नुकसानभरपाई म्हणून रु.21,000/- व त्यावर व्याज, तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून र.5,00,000/- व त्यावर 24 टक्के दराने व्याज व या अर्जाच्या खर्चाची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांची मागणी अमान्य केली असून तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून पैसे उकळण्यासाठी मुद्दामहून खोटा अर्ज दाखल केला आहे असे म्हटले आहे.
तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या वडिलांना दि.08/11/05 रोजी घरात बाथरुममध्ये पडल्यामुळे माकड हाडाचे फ्रॅक्चर झाले. तक्रारदारांच्या वडिलांना झालेल्या अपघातामुळे कराव्या लागलेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना Duodenal Ulcer चा त्रास झाला म्हणून त्यांना सैफी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. सैफी हॉस्पीटलमध्ये उपचार करुनसुध्दा त्यांच्या वडिलांचा Duodenal Ulcer मुळे मृत्यु झाला. तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांच्या वडिलांना दिनांक 08/11/05 रोजी झालेल्या माकड हाडाच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया करावी लागली व त्याचा परिणाम म्हणून Duodenal Ulcer चा त्रास होवून त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळ सामनेवाला क्र.1 यांचेकडून व्यक्तीगत अपघात विमा योजनेच्या अटी व शर्तींनुसार तक्रारदारांनी तक्रारअर्जात मागितलेली नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहेत.
सामनेवाला यांच्या वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे व्यक्तीगत अपघात विमा योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे “the Company will pay to the Insured if at any time during the currency of this policy the Insured shall sustain any bodily injury resulting solely and directely from the accident caused by external violent and visible means.” तक्रारदारांचा क्लेम व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसीच्या अटींमध्ये बसत नसल्यामुळे तो नाकारला आहे त्यामुळे ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. या कामी तक्रारदारांचे वडिलांना त्यांचे घरातच बाथरुममध्ये घसरुन पडल्यामुळे त्यांना दि.08/11/2005 रोजी इजा झाली असे तक्रारदारांचेच म्हणणे आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार वरील अपघातानंतर दि.14/11/05 रोजी प्रथमतः त्यांनी वडिलांना जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले व सदर हॉस्पीटलमध्ये तक्रारदारांचे वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तक्रारदारांच्या वडिलांना जसलोक हॉस्पीटलमधून दि.22/11/2005 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांचे वडील घरी असताना त्यांना दि.25/11/05 रोजी रक्ताच्या उलटया झाल्या व त्यांना सैफी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. सैफी हॉस्पीटलच्या डिस्चार्ज कार्डवरुन तक्रारदारांच्या वडिलांना Duodenal Ulcerच्या उपचारासाठी सैफी हॉस्पीटलमध्य दाखल केले होते असे दिसून येते. Duodenal Ulcer हा वेगळा आजार असून वैद्यकीय शास्त्राप्रमाणे Duodenal Ulcer होण्याचे प्रमुख कारण म्हणजे “stomatch infection bacteria called Helicobacter pylori” हे असते. Duodenal Ulcerचा तक्रारदारांच्या वडिलांना झालेल्या अपघाताशी कसलाही संबंध नाही. तक्रारदारांच्या वडिलांचा मृत्यु Duodenal Ulcer मुळे झाला असल्यामुळे व्यक्तीगत अपघात विमा योजनेखाली नुकसानभरपाई देण्यास सामनेवाला क्र.1 जबाबदार नाहीत. त्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांच्यावतीने सांगण्यात आले. तक्रारदारांच्या मयत वडिलांना दि.08/11/2005 रोजी बाथरुममध्ये पडल्यामुळे इजा झाली व दि.14/11/05 रोजी त्यांना जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावर Hip Fracture साठी शस्त्रक्रिया करण्यात आली असे दिसते. तक्रारदारांच्या वडिलांचा मृत्यु दि.18/12/2005 रोजी त्यांच्या घरी झाला असे मृत्यु दाखल्यावरुन दिसून येते. तक्रारदारांच्या वडिलांना दि.08/11/2005 रोजी अपघात झाल्यानंतर त्यांचा मृत्यु 40 दिवसांच्या कालावधीनंतर झाला असे दिसते त्यापूर्वी त्यांचेवर दोन हॉस्पीटलमध्ये वेगवेगळया कारणासाठी उपचार केला असे दिसून येते. या कामी तक्रारदार व सामनेवाला यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारअर्ज निकालावर ठेवण्यात आला. त्यानंतर दि.09/12/2010 रोजी तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज बोर्डावर घेवून डॉ.डी.एफ.सोनावाला, आर्थोपेडीक सर्जन यांचे सर्टिफीकेट दाखल केले आहे. वरील सर्टिफीकेटमध्ये तक्रारदारांच्या वडिलांना झालेल्या Duodenal Ulcer हा त्यांचेवर जसलोक हॉस्पीटलमध्ये करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुंत झाल्यामुळे झाला असा अभिप्राय दिला आहे. डॉ.सोनावाला यांनी यांचे शपथपत्र या अभिप्रायासोबत दाखल केलेले नाही. या अभिप्रायाबद्दल म्हणणे दाखल करण्याची संधी सामनेवाला क्र.1 यांना मिळाली नाही. जसलोक हॉस्पीटलच्या डिस्चार्ज समरीमध्ये डॉ.डी.एफ.सोनावाला यांनी तक्रारदारांच्या वडिलांवर उपचार केले होते असे नमूद केले आहे. तथापि, जसलोक हॉस्पीटलच्या डिस्चार्ज कार्डमध्ये तक्रारदारांच्या वडिलांना Peptic Ulcer किंवा Duodenal Ulcerझाल्याचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. जसलोक हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉ.सोनावाला यांनी तक्रारदारांच्या वडिलांना तपासले होतेअसा काहीही पुरावा उपलब्ध नाही. डॉ.सोनावाला यांनी अभिप्राय कशाचे आधारे दिला आहे याचा उल्लेख सुध्दा केलेला नाही. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे गंभीर स्वरुपाचा Duodenal Ulcer होणेसाठी बरेच दिवसांचा कालावधी लागतो. वरील कारणास्तव डॉ.सोनावाला यांनी दि.02/12/2010 च्या पत्रामध्ये दिलेला अभिप्राय विश्वासार्ह मानता येणार नाही. व्यक्तीगत अपघात विमा योजनेतील अटी व शर्ती पाहता, तसेच या प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारदारांच्या वडिलांचा मृत्यु अपघातामुळे झाला असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदारांना सामनेवाला क्र.1 यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करता आले नाही असे म्हणावे लागते त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.2 - वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना त्यांच्या वडिलांचा मृत्यु अपघातामुळे झाला हे सबळ पुराव्यानिशी सिध्द करता आले नाही त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून व्यक्तीगत अपघात विमा योजनेखाली कसलीही नुकसानभरपाई अगर अन्य दाद सामनेवाला यांचेकडून मागता येणार नाही. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब वर नमूद केलेल्या कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे.
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 11/2007 रद्द करणेत येत आहे.
2.खर्चाबद्दल आदेश नाही.
3.सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.