तक्रार अर्ज क्र. 37/2014.
तक्रार दाखल दि.15-03-2014.
तक्रार निकाली दि.26-11-2015.
श्री. माधव नाना बाबर,
रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
शाखाधिकारी,
युनायटेड इंडिया इन्श्यूरन्स कं.लि.,
कोरेगांव शाखा, सोहम शांतीनगर,
रहिमतपूर रोड, कोरेगांव. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.एम.आर.काळे.
जाबदार तर्फे – अँड.आर.एन.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे डिस्कळ, ता.खटाव, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदार यांनी मौजे डिस्कळ, ता. खटाव, जि.सातारा येथील बँक ऑफ इंडिया यांचेकडून रक्कम रु.30,000/- कर्ज घेवून दुध उत्पादनासाठी म्हैस खरेदी केली होती. सदरची म्हैस वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती, वडूज यांचेमार्फत विक्रेता श्री. अविनाश अशोक जंगम, रा. डिस्कळ, ता.खटाव,जि.सातारा यांचेकडून ता.24/10/2010 रोजी खरेदी केली. प्रस्तुत म्हैशीचा रंग काळा, शेपूट गोंडा पांढरा, पाठशिंगी, गाभण, देशी म्हैस अशा वर्णनाची म्हैस तक्रारदाराने खरेदी केली होती. तक्रारदाराने प्रस्तुत म्हैशीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता व आहे. सदरचा विमा उतरविलेनंतर जाबदार विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. वाघ यांनी स्वतः म्हैशीच्या कानामध्ये बिल्ला क्र. यु.इं.इं.एस.टी.आर. 15061 नंबरचा बसवला/ठोकला होता. तदनंतर म्हैशीचे कानातील सदरचा बिल्ला पडलेने त्याबाबतची माहिती तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना दिली. प्रस्तुत माहिती जाबदार विमा कंपनीस मिळाल्यानंतर विमा प्रतिनिधी यांनी सदर म्हैशीच्या कानात नविन बिल्ला क्रमांक यु.इं.इं.एस.टी.आर.14873 या नंबरचा दुसरा नवीन बिल्ला ठोकला व त्याबाबतची माहिती विमा प्रतिनिधी यांनी बँक ऑफ इंडिया शाखा डिस्कळ व जाबदार यांना कळविली होती. त्याप्रमाणे विम्याचे हप्ते जाबदारांकडे नियमीतपणे जमा होत होते. तक्रारदाराची सदरची म्हैस ता. 9/8/2012 रोजी आजारी पडल्याने त्यांनी डिस्कळ ता. खटाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खरात यांचेकडून म्हैशैची तपासणी करुन घेतली व त्यांचे मार्गदर्शनाखाली म्हैशीवर औषधोपचार चालू ठेवले. परंतू सदरची म्हैस दि. 15/08/2012 रोजी मयत झाली. सदर म्हैशीचे शवविच्छेदन त्याच दिवशी पुसेगांव येथील पशुधन विकास अधिकारी, श्री लोखंडे यांनी केले होते. सदर शवविच्छेदनाचा पंचांसमक्ष पंचनामा करुन रा. मौजे डिस्कळ येथील सिटी सर्व्हे नंबर 415 मधील खड्डयात पुरण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराने प्रस्तुत म्हैशीचा विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी विमा प्रस्ताव जाबदार विमा कंपनीकडे पाठविला. परंतू जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव चूकीची कारणे देऊन नाकारला आहे. व त्यामुळे तक्रारदाराला विनाकारण कर्जाचे हप्ते व्याजासहीत भरावे लागेत आहेत व तक्रारदाराला मानसीक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. अशाप्रकारे जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचे मयत म्हैशीचा विमा क्लेम जाणीवपूर्वक फेटाळलेने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब जाबदारकडून विमा क्लेमची रक्कम वसून होऊन मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम रु.30,000/- (रुपये तीस हजार मात्र) वसूल होऊन मिळावेत, तक्रार अर्जाचा संपूर्ण खर्च जाबदारांकडून मिळावा, वर नमूद रक्कम तक्रारदाराचे हाती मिळेपर्यंत जाबदार यांचेकडून व्याज मिळावे अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/14 कडे अनुक्रमे विमा कंपनीचे पत्र, जाबदाराने बँक ऑफ इंडिया या बँकेस दिलेले पत्र, विमा कंपनीने तक्रारदाराला दि.16/8/2012 रोजी पाठवलेले पत्र, पशुविम्याचे दावा पत्र, जाबदार विमा कंपनीचे पशुविम्याचे दाव्याचे प्रमाणपत्र, म्हैशीची शवविच्छेदन पत्र, शवविच्छेदन फॉर्म, शेतीची पावती, सरपंच ग्रामपंचायत, डिस्कळ यांचा दाखला, ज्योतीर्लिंग दूध संकलन केंद्र यांचा दाखला, शवविच्छेदन पंचनामा, पशुधन वैद्यकीय अधिकारी यांचे म्हैस तपासणीचे प्रमाणपत्र, विमा कंपनीचे दि. 15/10/2015 चे पत्र, म्हैशीचे शवविच्छेनांचे फोटोग्राप्स, नि. 21 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 22 कडे पुरावा संपलेची पुरसीस, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि. 16 कडे म्हणणे/कैफीयत, नि. 17 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 23 कडे म्हणणे व म्हणण्याचे अँफीडेव्हट हेच पुराव्याचे शपथपत्र समजणेत यावे म्हणून पुरसीस, नि. 15 चे कागदयादीसोबत नि.15/1 ते नि.15/5 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे म्हैशीची विमा पॉलीसी, तक्रारदाराने जाबदार यांना म्हैशीचा बिल्ला हरवलेबाबत दिलेला अर्ज, पशुधन विकास अधिकारी यांनी बिल्ला पुन्हा लावताना दिलेले प्रमाणपत्र (म्हैशीच्या फोटोसह), तक्रारदाराने जाबदाराकडे दिलेले पत्र, बँक ऑफ इंडिया शाखा डिस्कळ यांचेकडून जाबदार यांना आलेले पत्र वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केले आहेत.
जाबदाराने त्याचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
i तक्रारदाराला तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
ii तक्रारदाराने बँक ऑफ इंडिया शाखा डिस्कळ यांचेमार्फत कर्ज घेऊन रक्कम रु.30,000/- ची एक म्हैस खरेदी केली होती व प्रस्तुत म्हैशीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे पॉलीसी क्र. 161307/47/11/01/00000476 ने उतरविला होता. प्रस्तुत विमा दि. 26/10/2011 ते दि.25/10/2012 या कालावधीसाठी होता. प्रस्तुत पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदाराने सदर विमाकृत म्हैशीचे वर्णन प्रस्तुत विमा पॉलीसीत नमूद केले आहे. प्रस्तुत म्हैस तक्रारदाराने दि.26/10/2010 ते दि. 25/10/2011 या कालावधीसाठीसुध्दा जाबदारांकडे विमाकृत केली होती. प्रस्तुत म्हैशीचे वर्णन तपासून डॉ. एस.एन.कदम यांनी दि. 25/10/2010 चे प्रमाणपत्र दिले होते. प्रस्तुत विमाकृत म्हैशीचे कानात जाबदाराने बिल्ला नं. 15061 हा मारलेला होता. तदनंतर तक्रारदाराने प्रस्तुत विमाकृत म्हैशीचे कानातील बिल्ला पडलेचा बचाव केला व तसे दि.13/8/2012 रोजी जाबदार विमा कंपनीस पत्र दिले व नवीन टॅग/बिल्ला बसवून देणेची विनंती केली. त्यावेळी तक्रारदारावर विश्वास ठेवून जाबदार विमा कंपनीने नवीन बिल्ला/टॅग नं.14873 हा मंजूर केला व तक्रारदाराला दिला. तथापी, तक्रारदाराने प्रस्तुत नवीन बिल्ला विमाकृत म्हैशीवर न लावता तो तक्रारदाराचे मयत म्हैशीवर लावला व तक्रारदाराची मयत झालेली म्हैस विमाकृत असलेचा आभास तक्रारदाराने निर्माण केला व इतरांशी संगनमत करुन मयत म्हैशीचा विमा क्लेम जाबदाराकडे दाखल केला. परंतू जाबदार विमा कंपनीने केलेल्या चौकशी दरम्यान सदरची गोष्ट जाबदार विमा कंपनीचे लक्षात आली. त्यामुळे तक्रारदाराची मयत म्हैस ही प्रस्तुत विमा पॉलीसीने विमाकृत केलेली नव्हती व नाही म्हणूनच जाबदाराने तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळला आहे. तक्रारदाराचे मयत म्हैशीचे व विमाकृत म्हैशीचे वर्णन जुळत नव्हते व नाही. असे असतानाही विमा कंपनीकडून मयत म्हैशीचे विम्याची रक्कम उकळता यावी या उद्देशाने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे. जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही तरी तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने याकामी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने त्यांचे म्हैशीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे प्रथम दि.26/10/2010 ते दि. 25/10/2011 या कालावधीसाठी व तदनंतर दि.26/10/2011 ते दि.25/10/2012 या कालावधीकरीता पॉलीसी क्र. 161307/47/11/01/00000476 ने रक्कम रु.30,000/- साठी उतरविला होता व आहे. ही बाब जाबदाराने मान्य व कबूल केली आहे. सबब तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार होते व आहेत ही बाब सिध्द होते. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे..
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराचे म्हैशीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता व आहे. तसेच तक्रारदाराची म्हैस दि. 15/8/2012 रोजी मयत झाली असून त्यावेळी प्रस्तुत विमा चालू होता. तक्रारदाराने म्हैस मयत झालेनंतर जाबदार विमा कंपनीकडे विमा मिळणेसाठी योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा प्रस्ताव सादर केला. परंतू जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचे मयत म्हैशीचे व विमाकृत म्हैशीचे वर्णन जुळत नाही, तक्रारदाराची विमाकृत केलेली म्हैस मत झालेली नाही तर तक्रारदाराने तसा आभास निर्माण केला असे म्हणून तक्रारदाराचा विमाक्लेम फेटाळला आहे. परंतू याकामी जाबदाराने प्रस्तुत बाब सिध्द करणेसाठी कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. सदर तक्रारदाराने त्याचे विमाकृत म्हैशीचा जुना टॅग/बिल्ला नं.15061 हा पडला असून नवीन टॅग/बिल्ला मारुन द्यावा अशी जाबदारांकडे मागणी केली होती. त्यावेळी जाबदाराने खरोखरच विमाकृत म्हैशीच्या कानातील बिल्ला/टॅग पडला आहे का ? याची शहानिशा करुनच तक्रारदाराचे म्हैशीला दुसरा टॅग मंजूर करणे आवश्यक होते. परंतू जाबदाराने अशाप्रकारे कोणतीही चौकशी/शहानिशा न करताच सदर तक्रारदाराचे म्हैशीस नवीन टॅग/बिल्ला नं.14873 हा मंजूर केला व एवढेच नाही तर जाबदारने प्रत्यक्ष जाऊन विमाकृत म्हैशीचे कानात सदर टॅग मारणे आवश्यक असतानाही जाबदाराने तसे न करता तक्रारदाराचे हाती सदरचा टॅग सोपविला. तक्रारदाराने सदरचा टॅग विमाकृत म्हैशीचे कानात मारलेला आहे किंवा दुस-या म्हैशीचे कानात मारला आहे याची बिलकुल शहानिशा जाबदार विमा कंपनीने केलेली नाही आणि आता तक्रारदाराची विमाकृत म्हैस मयत झालेवर तक्रारदाराने विमा क्लेम सादर केलेनंतर असा बचाव जाबदार विमा कंपनी घेत आहे. असे असले तरीही जाबदाराने त्यांचा बचाव शाबीत करणेसाठी कोणताही लेखी व तोंडी पुरावा मे मंचात सादर केलेला नाही. सबब जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचे म्हैशीचा विमा क्लेम फेटाळून तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे व प्रस्तुत विमा क्लेमची रक्कम व्याजासह जाबदारांकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत
असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता जाबदार विमा कंपनीकडून तक्रारदार यांना विमाकृत म्हैशीचे विमा क्लेमची रक्कम रु.30,000/- व नुकसानभरपाई व खर्चाची रक्कम मिळणे न्यायोचीत होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना त्याचे विमाकृत म्हैशीचा विमा
क्लेमची रक्कम रु.30,000/- (रुपये तीस हजार मात्र) विमा क्लेम फेटाळले
तारखेपासून रक्कम तक्रारदाराचे प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के
व्याजाने अदा करावी.
3. जाबदार यांनी तक्रारदार यांना नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचे खर्चापोटी
रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) अदा करावी.
4. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदारानी आदेश पारीत झाले तारखेपासून 45
दिवसात करावी.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार यांना
जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 26-11-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.