जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 111/2012 तक्रार दाखल तारीख – 01/08/2012
निकाल तारीख - 14/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 09 म. 13 दिवस.
श्रीमती सुकुमारबाई मनोहरराव बनसोडे,
वय – 52 वर्षे, धंदा – शेती,
रा.मु.पो.किल्लारी भाग क्र. 2,
ता. औसा, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि.,
मंडळ कार्यालय क्र. 2,
ग्राउंड फ्लोअर, अंबीका हाऊस,
शंकरनगर चौक,
नागपुर-440010.
- विभागीय व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि.,
‘सुमित्रा’हॉटेल अंजनीच्या पुढे,
चौधरी मेडीकलच्यावर, अंबाजोगाई रोड,
लातुर.
- कबाल इंन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि.,
विनीत आठल्ले भास्करायन,
एच.डी.एफ.सी.लोन बिल्डींग,
प्लॉट नं. 7, टाऊन सेंटर, सेक्टर ई,
सिडको, औरंगाबाद.
- तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
भादा रोड, औसा,
ता. औसा, जि. लातुर.
- जिल्हा कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय,
जिल्हा परिषद, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिल. क.जवळकर.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे :- अॅड.एस.व्ही.तापडीया.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 5 तर्फे :- स्वत:
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार ही मौजे किल्लारीवाडी येथील रहिवाशी असून तिच्या कुटुंबात मौजे किल्लारीवाडी येथे गट क्र. 31 मध्ये 1 हेक्टर 1 आर एवढी शेतजमीन आहे. दि. 11/07/2010 रोजी अर्जदाराचे पती सकाळी 8.30 ते 9.00 वाजता सुमारास डेअरीला दुध घालण्यासाठी सायकलवरुन किल्लारी – तळणी रोडवरुन जात होते. अर्जदाराचे पतीस मोटारसायकल क्र.एम.एच. 24-टी-6636 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने निष्काळजीपणाने चालवून मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे अर्जदाराचे पती सायकलवरुन खाली पडले व त्यांच्या डोक्यास जबर मार लागला त्यामुळे अर्जदाराने व तिच्या नातेवाईकाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार तिथे योग्य नसल्यामुळे त्यास पुढील उपचारासाठी लातूर येथील अॅपेक्स हॉस्पीटल मध्ये शरिक केले. दि. 16/07/2010 रोजी अर्जदाराचे पतीचा उपचार चालू असतानाच सकाळी 9.00 वाजता अपघाती मृत्यू झाला. अर्जदाराचे पतीच्या मृत्यूनंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याप्रमाणे वाहन चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. अर्जदाराचे पतीचा सर्व कागदोपत्री पुरावा गोळा करुन अर्जदाराने दि. 12/12/2010 रोजी सदर कागदपत्रे तीन प्रतीत गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांच्याकडे पाठवला. गैरअर्जदार क्र. 4 यांच्याकडुन सदरचा प्रस्ताव जावक क्र. 1132/ दि. 27/06/2011 रोजी पाठवून दिला. गैरअर्जदार क्र.5 ने जा.क्र. 3030 नुसार गैरअर्जदार क्र. 1 यांना पाठवून दिला. अर्जदाराचे पतीचा मृत्यू दि. 15/04/2012 रोजी मिळाला. अर्जदाराचे पतीचा अपघात हा दि. 16/07/2010 रोजी झालेला आहे. अपघाताची प्रथम सुचना पॉलिसी संपल्यापासुन दि. 14/08/11 रोजी पासुन 90 दिवसाचे आत न दिल्यामुळे किंवा प्रथम सुचना तालुका कृषी अधिकारी यांना केव्हा दिली. याचा पुरावा नसल्यामुळे विमा दावा देवू शकत नाही. अर्जदाराचे पतीचा मृत्यू हा दि. 16/07/2010 रोजी झालेला आहे. अर्जदाराने संपुर्ण कागदपत्रे दि. 12/10/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 4 म्हणजेच तालुका कृषी अधिकारी यांना देवून पोहोच घेतली होती. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी अर्जदारास सेवा देण्यास त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 1,00,000/- 15 टक्के व्याज अपघाती मृत्यू झालेल्या तारखेपासुन म्हणजेच दि. 16/07/2010 पासुन संपुर्ण रक्कम अर्जदाराचे पदरीपडेपर्यंत देण्याचा आदेश व्हावा. तसेच अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 15,000/- व दाव्याचा खर्च रु. 10,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म, तलाठी प्रमाणपत्र, 8 ‘अ’, फेरफार नक्कल, ग्राम पंचायत कार्यालय किल्लारी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ओळखपत्र, ओळखपत्र, एफ.आय.आर, मृत्यू प्रमाणपत्र, राशन कार्ड, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपार्ट, ड्रायव्हींग लायसन, आर.सी.बुक, युनायटेड इंडिया इन्श्युरेन्स कंपनी लि. चे पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या मतानुसार तालुका कृषी अधिका-याने सदरचा प्रस्ताव मुदतीत पाठवून दिला होता तो प्रस्ताव अपुरा असल्यामुळे व वेळेत कागदपत्रांची पुर्तता न झाल्याने विमा कंपनीने तो प्रस्ताव बंद केला आहे.
कबाल इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार मनोहर लक्ष्मण बनसोडे मौजे किल्लारी ता. औसा जि; लातुर याचा अपघात दि. 16/07/2010 रोजी झालेला आहे. त्यांना प्रस्ताव दि. 11/07/2011 रोजी प्राप्त झाला आहे. सदर पॉलीसाचा कालावधी दि. 15/08/2009 ते दि. 14/08/2010 असा आहे. सदरचा प्रस्ताव हा मुदतीच्या 90 दिवस संपल्यानंतर आल्यामुळे सदरचा प्रस्ताव हा बंद करण्यात येतो. गैरअर्जदार विमा कंपनीने देखील सदरचा प्रस्ताव हा 90 दिवसानंतर आल्यामुळे फेटाळलेला आहे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराची मौजे किल्लारीवाडी येथे गट क्र. 31 मध्ये 1 हेक्टर 1 आर एवढी शेतजमीन आहे. म्हणून अर्जदार हा मृत्यूच्या वेळी शेतकरी होता. म्हणून तो सदर विमा घेण्यास पात्र आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असुन, अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दि. 11/07/2010 रोजी सकाळी 8.30 ते 9.00 वाजण्याच्या सुमारास डेअरीला दुध घालण्यासाठी सायकलवरुन किल्लारी-तळणी रोडवरुन जात होते. अर्जदाराचे पतीस मोटार सायकल क्र. एम.एच. क्र. 24 टी- 6636 च्या चालकाने हयगयीने व निष्काळजीपणामुळे अर्जदाराच्या सायकलला मागून धडक दिली व अर्जदार हा जागीच खाली पडला. त्यास नंतर दवाखान्यात नेण्यात आले. त्याचा मृत्यू दि. 16/07/2010 रोजी झाला. व त्यानंतर प्रथमत: अर्जदाराने पुर्ण प्रस्तावाची कागदपत्रे तयार करुन दि. 12/12/2010 रोजी गैरअर्जदाराकडे पाठवला. परंतु त्यात काही कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्यामुळे तो प्रस्ताव अर्जदाराने पुर्ण करुन विमा कंपनीस तो दि. 15/04/2012 रोजी मिळाला 90 दिवसात सदरचा प्रस्ताव मिळाला नसल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा अर्ज फेटाळलेला दिसुन येतो. मात्र यात अर्जदाराची काहीही चुकी नाही. त्यांनी प्रथमत: हा प्रस्ताव दि. 12/12/2010 रोजी पाठवला होता. म्हणजेच सदरचा प्रस्ताव हा मुदतीमध्ये होता मात्र कंपनीच्या अटी व शर्तीनुसार तो प्रस्ताव कालावधी संपल्यानंतर आला म्हणून तो बंद करण्यात येतो ही बाब हे न्यायमंच स्वीकारु शकत नाही. कारण पहिली वर्दी Firstly intimated हे काम सदरच्या प्रस्तावा बाबत पहिल्या 90 दिवसात झालेले असल्यामुळे व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात तसे नमुद केलेले आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज हे न्यायमंच मंजुर करत आहे. अर्जदारास रु. 1,00,000/- मंजुर करत आहोत. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावेत.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु.
1,00,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन
30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.