निकालपत्र :- (दि.12/08/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 व 2 त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार क्र.1 यांचे पती तक्रारदार क्र. 2 व 3 यांचे जनक वडील सर्जेराव महादेव नाईक हे हंगाम2005/06मध्ये सामनेवाला क्र.2 साखर कारखान्याकडे ऊस तोडणी कामगार म्हणून कार्यरत होते. नमुद कारखान्याने सामनेवाला क्र.1 यांचेकडे ऊस तोडणी मजूरांसाठी ऊस तोडणी मजूरीतून विमा हप्त्याच्या रक्कमेची कपात करुन त्या पैशातून सन 2005-06 मध्ये विमा पॉलीसी नं.160500/47/05/9900000464 व्दारे अपघाती विमा उतरविला होता. विमा पॉलीसी अंतर्गत विमा धारक तक्रारदाराचे मयत पती अपघात झाले दिवशी नमुद विम्या खाली संरक्षीत होते. नमुदचा अपघात हा दि.16/11/2005रोजी सामनेवाला क्र.2 साखर कारखान्याकरिता मौजे बहिरेश्वर ता.करवीर येथे शिवाजी चव्हाण ट्रॅक्टर मालक यांचे शेतामध्ये ऊस तोडणी करुन तोडलेला ऊस नमुद ट्रॅक्टरमध्ये भरत असता ऊस भरणेसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला लावलेल्या फळीवरुन तोल जाऊन डोक्यावर पडले व डोक्याला गंभीर दुखापत झालेमुळे त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सी.पी.आर.हॉस्पिटल येथे दाखल केले असता सदर दिवशी ते मयत झाले. तक्रारदार क्र.1 ते 3 हे पत्नी व मुले या नात्याने एकमेव सरळ वारस आहेत. तक्रारदाराने त्यांचे पतीचा अपघाती मृत्यू झालेमुळे योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन मृत्यू दावा विमा रक्कम व अनुषंगीक अन्य आर्थिक लाभ यांची मागणी केली असता सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना दि.08/01/2007 रोजी विमाधारक मयत सर्जेराव हे अती मद्य प्राशनामुळे मयत झालेमुळे क्लेम नामंजूर केलेचे कळवले. तक्रारदाराचा मृत्यू हा डोक्यास गंभीर दुखापतीमुळे झालेची बाब वैद्यकीय अधिका-यांच्या अहवालामध्ये स्पष्ट असतानाही वर नमुद कारणास्तव क्लेम नाकारुन सामनेवालांनी क्लेम नाकारलेमुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणेत आली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करून विमा पॉलीसीची रक्कम रु.80,000/-व सदर रक्कमेवर 12 टक्के प्रमाणे व्याज देणेचा सामनेवाला यांना आदेश व्हावा अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ कारखान्याने पाठवलेली विमा नामंजूर झालेबाबतची नोटीस, सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना विमा नामंजूर झालेबाबतची पाठवलेली नोटीस, मयताचा मृत्यूचा दाखला, बोनाफाईट प्रमाणपत्र, अश्विनी सर्जेराव नाईक यांचा जन्म नोंदणीचा दाखला, कुटूंबियांचे रेशनकार्ड, सोमनाथ सर्जेराव नाईक यांचा जन्म दाखला, रहिवाशी दाखला, लग्नाचा दाखला, पॉलीसीचा क्लेम फॉर्म इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. (4) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने दिलेला विलंब माफीचा अर्ज मंजूर होऊन लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सदर म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे.सामनेवाला कारखान्याने मजूरांचा विमा उतरविलेची बाब मान्य केलेली आहे व सदर पॉलीसीचा नं.160500/47/05/9900000464 असून विमा कालावधी दि.12/11/2005ते 11/05/2006 असा असून विमा रक्कम देणेची जबाबदारी ही पॉलीसीच्या अटी व शर्ती व अनेक्शर, एक्सेप्शन, एक्सक्लूजन यास अधीन राहून असते. तक्रारदाराने सामनेवालांकडे योग्य त्या कागदपत्रांसहीत क्लेमची मागणी केली असता सामनेवाला यांनी अड.पोतनीस यांची इनव्हेस्टीगेटर म्हणून नेमणूक केली व त्यांनी आपले अहवालामध्ये सी.पी.आर. हॉस्पिटल मधील केसपेपर वरुन तक्रारदाराचे पतीने आदल्या रात्री अल्कोहोल इन्टॉक्सीकेशन केलेमुळे पहाटे चहा घेतलेपासून बेशुध्द अवस्थेत असलेने दाखल केलेले आहे व मद्य प्राशन ही बाब पॉलीसी अंतर्गत समाविष्ट नसलेने दावा नाकारला आहे व तो योग्य आहे. तक्रारदाराचा अपघातामध्ये डोक्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यू झालेला नसून तो अति मद्य प्राशनाने झालेने दि.08/01/2007 रोजी विमा दावा नाकारलेला आहे व तो योग्य कारणास्तव नाकारलेमुळे सामनेवाला क्र.1 यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर व्हावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ विमा पॉलीसी व क्लेम फॉर्मची सत्यप्रत, मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र व शविच्छेदन अहवाल, तसेच सी.पी.आर. हॉस्पिटलचे केसपेपर्स इत्यादी कागदपत्र दाखल केलेली आहे. (6) सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराने तक्रार अर्जात त्यांचेविरुध्द कोणतीही दाद मागितली नाही. फक्त तांत्रिक अडचण राहू नये म्हणून पक्षकार केलेले आहे. तसेच तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होत नाहीत. कोणताही मोबदला घेऊन सेवा पुरविलेली नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्दची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विंनती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1:- तक्रारदाराचे पतीचे नांवे विमा पॉलीसी असलेचे सामनेवाला क्र.1 यांनी मान्य केलेले आहे. दाखल पॉलीसीच्या सत्यप्रतीवरुन पॉलीसीचा नं.160500/47/05/ 9900000464 असून विमा कालावधी दि.12/11/2005 ते 11/05/2006 असा असून प्रत्येक मजूरामागे रु.1,00,000/-, झोपडीसाठी रु.5,000/-, बैल व बैलगाडीसाठी रु.26,000/- अशाप्रकारे विमा उतरविलेचे दिसून येते. तक्रारदारचे पतीचा दि.16/11/2005 रोजी अपघात झालेने त्यास सी.पी.आर.हॉस्पिटल येथे दाखल केलेले होते. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये पोलीस कॉन्स्टेबल क्र.1060 यांनी दाखल केलेचे नमुद केलेले आहे. सबब प्रस्तुतचे प्रकरणात पोलीस केस झालेली आहे व एमएलसी नं.10032आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत विमाधारक मयत सर्जेराव नाईक यांचा मृत्यू दि.16/11/2005रोजी सामनेवाला क्र.2 साखर कारखान्याकरिता मौजे बहिरेश्वर ता.करवीर येथे शिवाजी चव्हाण ट्रॅक्टर मालक यांचे शेतामध्ये ऊस तोडणी करुन तोडलेला ऊस नमुद ट्रॅक्टरमध्ये भरत असता ऊस भरणेसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला लावलेल्या फळीवरुन तोल जाऊन डोक्यावर पडले व डोक्याला गंभीर दुखापत झालेमुळे त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सी.पी.आर.हॉस्पिटल येथे दाखल केले असता सदर दिवशी ते मयत झाले. सबब सदरचा मृत्यू हा अपघाती आहे.तक्रारदाराने दाखल केलेल्या क्लेमफॉर्मच्या मागील बाजूस नमुद सी.पी.आर. हॉस्पिटलचे डॉक्टर प्रविण नाईक, वैद्यकीय अधिकारी यांनी PM Report(Head Injury) Viscera Preserved Opinion reserved आपले सहीशिक्क्यानिशी नमुद केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या क्लेम फॉर्मचे सत्यप्रतीवर Head Injury Expired Befor Treatment Death has occured व मृत्यूची तारीख16/11/2005 अशी नमुद केलेली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या क्लेम फॉर्मवर दि.03/03/2006 नमुद असून सामनेवाला यांनी दाखल केलेल्या क्लेमफॉर्मवर दि.05/04/2006नमुद आहे. तसेच तक्रारदाराचा क्लेमफॉर्म हा इंग्लिश-हिंदीत असून सामनेवाला यांनी दाखल केलेला क्लेमफॉर्म हा इंग्लीश-मराठीत आहे. मृत्यूच्या कारणाचा दाखल्यामध्ये Provisional Cause of death Viscera Preserved Opinion reserved म्हणून नोंद केलेली आहे. तसेच पी.एम.रिपोर्टवरही तशाच नोंदी केलेल्या आहेत. तसेच डोकीच्या दुखापतीबाबत L F/p Small Brain Haimarag ची नोंद दिसून येते. तसेच 1) लहान आतडयाचा काही भाग 2) यकृत, प्लीहा व किडनी यांचा तुकडा व 3) रक्त तपासणीसाठी पाठवलेले होते. प्रस्तुतचा रिपोर्ट तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. सदर रिपोर्टनुसार अनुक्रमे 1 व 2 यांचेमध्ये अनुक्रमे 120 व 110 मिलीग्रॅम प्रती 100 ग्रॅम इतके इथेल अल्कोहोलचे प्रमाण नोंद असून रक्तामध्ये 92 मिलीग्रॅम प्रती 100 मिलीलिटर इथेल अल्कोहोलचे प्रमाण असलेबाबतचे नमुद केलेले दिसून येते. 1 ग्रॅम बरोबर 10 मिलीग्रॅम सबब 100 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम याचा विचार करता 120 व 110 म्हणजे 1.2 % व 1.1 % इथेल अल्कोहोलचे प्रमाण दिसून येते. तसेच रुग्णप्रत्रिकेवर दि.16/11/2005 रोजी 12.45पी.एम.मिनिटांनी रुग्ण दाखल झाला. तर मृत्यूची वेळ ही 3.15पी.एम. मिनटांची दिसून येते तसेच त्याचखाली 5.40 पी.एम.दिसून येते.तर नमुना अनुपत्रावर5.40पी. एम. वाजता मृत्यू घोषीत केला व शव विच्छेदनासाठी नमुद केले आहे. मेडिकल ज्युरिस्पुडन्स नुसार 5 तास उलटून गेले असतील तर 100 मिलीग्रॅम प्रती मिलीलिटरमागे प्रमाण दर्शवते. सबब वरील बाबींचा विचार करता मृत्यूची वेळ ही 3.15पी.एम. आहे तर मृत्यू घोषणेची वेळ 5.40 आहे. सबब शव विच्छेदन करेपर्यंत 5 तासाचा कालावधी उलटून गेलेला आहे. त्यामुळे 92 मिलीग्रॅम प्रती 100 मिलीलिटर प्रमाण दिसून येते. नमुद कागदपत्रांमध्ये काही संदिग्धपणा आढळलेने तक्रारदाराने दि.17/02/2009 रोजी नमुद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रविण नाईक यांना साक्षीसमन्स काढणेबाबत अर्ज दिलेला होता. त्यावर सामनेवाला यांनी म्हणणे दयावे म्हणून आदेश पारीत केलेला होता. त्यावर सामनेवाला क्र.1 यांनी प्रस्तुत अर्ज नामंजूर करावा म्हणून म्हणणे दिलेले होते व सदर मंचाने दि.11/11/2009 रोजी तक्रारदार गैरहजर व सामनेवाला वकीलांचा युक्तीवाद ऐकूण साक्षीस बोलवण्यास कोणतेही संयुक्तिक कारण दिसून न आलेने सदरचा अर्ज नामंजूर केलेला आहे. तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणी कोणताही संदिग्धपणा राहू नये म्हणून क्लेमफॉर्मवरील व पी.एम.वरील नोंदी या डॉक्टर प्रवीण नाईक यांनीच केलेली असल्यामुळे त्यांना साक्षीसमन्ससाठी बोलवणे गरजेचे होते. मात्र सामनेवाला क्र.1 यांनी प्रस्तुत अर्जास हरकत घेतलेली आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी नेमणूक केलेले अड. पोतनीस यांनी केसपेपरवरील काही नोंदीच्या आधारे दिलेल्या निष्कर्षावरुन सामनेवाला यांनी अति मद्य प्राशनाने मृत्यू म्हणून क्लेम नाकारलेला आहे. त्यास कोणताही वैद्यकीय सबळ पुरावा दाखल केलेला नाही. इन्व्हेस्टीगेटरचे शपथपत्रही दाखल केलेले नाही. साक्षीसमन्ससाठी डॉक्टर प्रविण नाईक यांना साक्षीसमन्स काढणेस हरकत घेतलेली आहे. इत्यादी बाबींचा विचार करता तसेच क्लेम फॉर्मवर डॉ.नाईक यांनी हेड इनज्युरी मुळे मृत्यू झालेचे नमुद केले आहे. तसेच पी.एम.रिपोर्टमध्येसुध्दा मेंदूस मार लागलेबाबतीच नोंद आहे. यावरुन मयत सर्जेराव नाईक यांचा मृत्यू हा अपघातामुळे डोक्यास गंभीर दुखापत झाली असलेने झालेला आहे व अति मद्य प्राशनामुळे झालेला नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ऊस तोडणी करणा-या मजूरांचे उतरविलेल्या पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता इनव्हेस्टीगेटरच्या निष्कर्षावर तक्रारदाराचा न्याय व योग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 यांची कोणतीही सेवात्रुटी दिसून न आलेने त्यांचेविरुध्द तक्रार फेटाळणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मु्द्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदार हे नमुद विमा पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. मु्द्दा क्र3 :- तक्रारदार हया विधवा निराधार महिला असून तिच्या तिच्या मुलांची जबाबदारी आहे. सामनेवाला यांनी पॉलीसीचा मूळ हेतू लक्षात न घेता निव्वळ तांत्रिक कारणास्तव प्रस्तुतचा क्लेम नाकारलेमुळे तिला प्रस्तुतची तक्रार दाखल करावी. सबब तक्रारदार तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारांना विमा पॉलीसीची रक्कम रु.1,00,000/- दयावेत. सदर रक्कमेवर दि.08/01/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |