जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक : 02/12/2010. तक्रार आदेश दिनांक : 02/05/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 647/2010. सौ. शारदाबाई नामदेव म्हेत्रे, वय 50 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 647/2010. सौ. शुभांगी महादेव चव्हाण, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रा. जनता शॉपींग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : विद्या रा. कटकधोंड आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत दोन्ही तक्रारींचे स्वरुप, विषय, विरुध्द पक्ष व त्यांचे म्हणणे इ. मध्ये साम्य असल्यामुळे त्यांचा निर्णय एकत्रितरित्या देण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारीत नमूद विवाद थोडक्यात असा आहे की, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांनी केंद्र शासन पुरस्कृत पशुधन विमा योजना सन 2007-08 राबविली आहे. सदर योजनेंतर्गत विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे तक्रारदार यांच्या घरगुती होस्टर्न जातीच्या गाईंचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आलेला असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ग्राहक तक्रार क्रमांक | विमा पॉलिसी क्रमांक | टॅग क्रमांक | विमा रक्कम (रुपयामध्ये) | जनावराचा मृत्यू दिनांक | 647/2010 | 161205/47/08/01/465 | UII/161205-11134 | 28,700/- | 8/11/2009 | 648/2010 | 161205/47/08/01/465 | UII/161205-11147 | 26,700/- | 10/11/2009 |
3. तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि उपचारादरम्यान त्यांचा वरीलप्रमाणे नमूद तारखेस मृत्यू झालेला आहे. त्यानंतर पोस्टमार्टेम करण्यात येऊन विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. क्लेम सादर केल्यानंतर पाठपुरावा करुनही विमा कंपनीने त्यांना क्लेमबाबत काहीच न कळविता क्लेम प्रलंबीत ठेवला आणि त्यानंतर क्लेम नाकारण्यात आला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 4. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विमा उतरविताना गाईच्या कानामध्ये बसविण्यासाठी त्यांनी टॅग दिला होता. त्यांनी तक्रारदार यांच्या क्लेमबाबत चौकशी केली असता, कागदपत्रांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या. तसेच तक्रारदार यांना संधी देऊनही त्यांनी संपूर्ण कागदपत्रे दाखल केली नाहीत. विमा संरक्षीत गाईचे फोटो हे मयत गाईच्या फोटोशी जुळत नव्हते. तसेच गाईचे पॉलिसीतील वर्णन व मयत गाईचे वर्णनामध्ये तफावत आहे. तसेच तक्रारदार यांनी गाईचा टॅग दाखल केला नाही आणि ‘नो टॅग नो क्लेम’ तत्वानुसार क्लेम नाकारण्यात आला. त्यांच्य सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या गाईचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा क्लेम दाखल केल्याविषयी विवाद नाही. तसेच विमा कंपनीने क्लेम नाकारल्याविषयी विवाद नाही. 7. प्रामुख्याने, विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्या क्लेमबाबत चौकशी केली असता, कागदपत्रांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आणि गाईचे फोटो हे मयत गाईच्या फोटोशी जुळत नव्हते. तसेच गाईचे पॉलिसीतील वर्णन व मयत गाईचे वर्णनामध्ये तफावत होती आणि तक्रारदार यांनी गाईचा टॅग दाखल केला नाही आणि ‘नो टॅग नो क्लेम’ तत्वानुसार क्लेम नाकारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 8. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर क्लेम फॉर्म, वेटर्नरी सर्टिफिकेट, पोस्टमार्टेम व व्हॅल्युएशन रिपोर्ट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, ग्रामपंचायत व दुध संस्थेचा दाखला, पंचनामा इ. कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता, विमा पॉलिसीमध्ये नमूद असणा-या टॅग क्रमांकाची गाय मृत्यू पावल्याचे निदर्शनास येते. 9. आमच्या मते, तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अयोग्य व अनुचित कारणास्तव नाकारुन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे गाईंच्या विम्याची रक्कम तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. ग्राहक तक्रार क्रमांक 647/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.28,700/- दि.2/12/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. ग्राहक तक्रार क्रमांक 648/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.26,700/- दि.2/12/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 3. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 4. विरुध्द पक्ष विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/29411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |