तक्रारदारातर्फे अॅड. श्री. ढोकले हजर.
जाबदेणारांतर्फे अॅड. श्री. माहेश्वरी हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(24/04/2014)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार विमा कंपनीविरुद्ध सेवेतील त्रुटीसंदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. त्यातील कथने खालीलप्रमाणे.
1] तक्रारदार हे चाकण, खेड येथील रहीवासी असून जाबदेणार ही विमा कंपनी आहे व लक्ष्मीरोड, पुणे येथे त्यांचे कार्यालय आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडे दि. 19/02/2010 ते 18/02/2011 या कालावधीकरीता अपघात विमा पॉलिसी घेतली होती. तक्रारदार यांचा दि. 5/2/2011 रोजी पुणे-नाशीक रोड येथे अपघात झाला व त्यामध्ये त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या. तक्रारदार यांनी चाकण येथील ‘ओमसाई’ हॉस्पिटल येथे औषधोपचार घेतले व त्यामध्ये त्यांना एकुण रक्कम रु.35,854/- खर्च आला. सदरचा विमा हा तक्रारदार यांच्या सोसायटीने त्यांच्या सदस्यांसाठी ग्रुप विमा पॉलिसीअंतर्गत घेतलेला होता, त्यामुळे सोसायटीने विमा कंपनीस पत्र देवून तक्रारदार यांचा विम्याचा दावा स्विकारण्याबाबत कळविले होते. विमा कंपनीने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पुर्तता तक्रारदार यांनी केली. परंतु, जाबदेणार यांनी हॉस्पिटलचे रेकॉर्ड तोंडी आहे, बील्स सह्या केलेल्या नाहीत, कायदेशिर रेकॉर्ड नाही या कारणांवरुन तक्रारदार यांचा क्लेम नाकारला, त्यामुळे जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, असे कथन तक्रारदार यांनी केलेले आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून हॉस्पिटलायझेशनच्या व औषधाच्या बीलाची रक्कम रु.35,824/- व्याजासह, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- मागणी केलेली आहे.
2] प्रस्तुत प्रकरणी जाबदेणार यांनी हजर होवून त्यांची लेखी कैफियत दाखल केली व तक्रारीतील कथने नाकारली आहेत. जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याची बाब स्पष्टपणे नाकारली आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांनी दाखल केलेले हॉस्पिटलचे बिल हे अवास्तव असून ग्रामाण भागातील हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी येवढा खर्च येत नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी मानसिक व शारीरिक त्रासापोटी मागितलेली रक्कमही तक्रारदार यांनी नाकारलेली आहे व प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार यांनी केलेली आहे.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे, लेखी कथने आणि तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या पद्धतीने नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केले आहे का? | होय |
2. | अंतिम आदेश काय ? | तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे
4] या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंना मान्य असणारी बाब म्हणजे, तक्रारदारांचा जाबदेणारांकडे अपघात विमा होता व त्याचा कालावधी दि. 19/02/2010 ते 18/02/2011 असा होता. तक्रारदार यांचा अपघात झाल्याची बाब जाबदेणार यांनी नाकारलेली नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी खबरी जबाब, पंचनामा, अपघात विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरचा क्लेम दाखल केल्यानंतर जाबदेणार यांनी सर्व्हेअरची नेमणुक करुन त्यांच्याकडून अहवाल मागविलेला होता. सर्व्हेअरच्या अहवालानुसार सदरच्या हॉस्पिटलने अवाजवी स्वरुपाचे बिल दिलेले आहे. प्रस्तुत प्रकरणात सर्व्हेअरचा अहवाल दाखल केलेला आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांचा अपघात झाल्याबाबत कोणताही वाद नाही, परंतु तक्रारदार यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, त्या ठिकाणची परिस्थिती ही खेदजनक होती. त्यामध्ये स्पेशल रुम ही केवळ पडद्याचा वापर करुन केलेली होती व त्याठिकाणी अस्वच्छता होती. अशा परिस्थितीत, तक्रारदार यांनी दाखल केलेले बिल अवास्तव आहे, असे आढळून येते. तक्रारदार यांनी हॉस्पिटलचे बिल रक्कम रु. 32,830/- व औषधांचे बिल रक्कम रु. 3,024/-, एकुण रक्कम रु. 35,824/- इतक्या रकमेची मागणी केलेली आहे. सदरचे बिल हे अवास्तव आहे. तक्रारदार यांना जास्तीत जास्त रक्कम रु. 25,000/- देणे योग्य होईल, असे मंचाचे मत आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा संपूर्ण क्लेम नाकारुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, त्यामुळे तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 5,000/- व या प्रकरणाचा खर्च म्हणून रक्कम रु. 5,000/- मंजूर करणे योग्य होईल, असे मंचाचे मत आहे. वरील चर्चेनुसार व उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा संपूर्ण क्लेम
नाकारुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे
जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना एकुण रक्कम
रु. 35,000/- (रु. पस्तीस हजार फक्त) या
आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत द्यावी.
4. सदरची रक्कम जाबदेणार यांनी जर सहा
आठवड्यांच्या आंत दिली नाही तर त्यावर तक्रार
दाखल दिनांकापासून पूर्ण रक्कम वसुल होईपर्यंत
द.सा.द.शे. 9% व्याज आकारण्याचा अधिकार
तक्रारदार यांना राहील.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
6. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी
आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या
आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन
जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 24/एप्रिल/2014