न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदारांनी त्यांचे मालकीचे वाहन ट्रक नं. एमएच 43-ई-141 या वाहनाकरिता वि.प. कंपनीकडे जी.व्ही.सी. पब्लीक कॅरिअर अदर दॅन 3 व्हीलर पॅकेज पॉलिसी घेतली आहे. सदर पॉलिसीचा क्र. 1605823117P104195830 असा असून कालावधी दि. 20/06/2017 ते 19/06/2018 असा आहे. सदर वाहनावर श्री संजय दिगंबर पवार हे चालक म्हणून काम करीत हेाते. सदर ट्रकचा वापर हा इंडो काऊंट कंपनी, कागल या कंपनीतील हानीकारक कचरा उचलून टाकणेकरिता केला जात होता. दि. 07/09/2017 रोजी तक्रारदाराचे वाहन हानीकारक कचरा टाकून आल्यानंतर रात्री 10 वाजणेचे दरम्यान तक्रारदार यांचे चालक यांनी त्यांचे गावी म्हणजेच उंब्रज ता. कराड येथील शुभम पेट्रोल पंपाजवळील रस्त्याचे बाजूस व्यवस्थित लावला होता. त्यानंतर दुसर दिवशी म्हणजे दि. 08/09/2017 रोजी तक्रारदाराचे चालक वाहन नेणेसाठी आले असता त्याठिकाणी ट्रक आढळून आला नाही. म्हणून तक्रारदाराचे चालकाने इतरत्र ट्रकची शोधाशोध केली परंतु सदरचा ट्रक त्यास आढळून आला नाही. म्हणून सदर ट्रकचे चोरीबाबतची फिर्याद उंब्रज पोलिस ठाणेत दि. 26/09/2017 रोजी देण्यात आली. तदनंतर दि. 30/10/2017 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांना ट्रकच्या चोरीची माहिती दिली. परंतु वि.प. यांनी कोणतीही चौकशी न करता, तक्रारदाराने वाहनाच्या नुकसानी व हरवलेबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य ती काळजी न घेतलेने तक्रारदाराने विमा पॉलिसीचे अट क्र.5 चा भंग केल्याचे खोटे कारण सांगत तक्रारदाराचा दावा दि. 14/11/2019 रोजीचे पत्राने फेटाळला आहे. सबब, वि.प. यांनी सेवात्रुटी केली असलेने तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 7 कडे अनुक्रमे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, वाहन चोरी बाबत वि.प. यांना दिलेले पत्र, क्लेम फॉर्म, एफ.आय.आर., वाहनाचे चोरीबाबतची तपास यादी, वि.प. यांचे क्लेम नाकारलेचे पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत, क्लेम नामंजूरीचे पत्र, तक्रारदार यांचे पत्र, तक्रारदार यांनी दिलेली फिर्याद तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प.यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदार यांच्या मते तथाकथित चोरी ही दि. 07/09/2017 चे रात्री ते दि. 08/09/207 रोजीचे सकाळ दरम्यान झालेली आहे. पण तक्रारदार यांनी पोलिसांना दि. 28/09/2017 रोजी वाहन चोरीस गेलेचे कळलेचे सांगितले आहे. म्हणजेच दि. 7/09/2017 ते 28/09/2017 पर्यंत तक्रारदाराचे वाहन 21 दिवस पार्कींग जागा नसलेल्या ठिकाणी unsafe parked and unattended होते. वाहनाकडे कोणी गेले नाही अथवा वाहन सुरक्षित आहे किंवा नाही याची काळजी सुध्दा घेतली गेली नाही. वाहन चोरी ही फक्त तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे व यास तक्रारदार हे सर्वस्वी जबाबदार आहेत.
iv) तक्रारदारांनी चोरीबाबत वि.प. यांना दि. 30/10/2017 रोजी म्हणजे जवळजवळ दोन महिन्यांनंतर कळविले आहे. तक्रारदार यांनी चोरीची फिर्याद पोलीस स्टेशनला व वि.प. यांना ताबडतोब कळविणे अनिवार्य असताना देखील कळविलेले नाही हे विमा पॉलिसीच्या अट क्र.5 चे उल्लंघन आहे.
v) ट्रक चालकाने ट्रक हा त्यांचे गावी शुभम पेट्रोल पंपाजवळील रस्त्याचे बाजूस लावला होता व चोरीवेळी ट्रकमध्ये कोणीही नव्हते म्हणजेच ट्रक unattended होता. तक्रारदार यांनी स्वतःच्या ट्रकचे सुरक्षिततेची काळजी घेतलेली नव्हती. सबब, तथाकथित चोरी ही तक्रारदार यांचे निष्काळजीपणामुळे झाली आहे. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदारांनी त्यांचे मालकीचे वाहन ट्रक नं. एमएच 43-ई-141 या वाहनाकरिता वि.प. कंपनीकडे जी.व्ही.सी. पब्लीक कॅरिअर अदर दॅन 3 व्हीलर पॅकेज पॉलिसी घेतली आहे. सदर पॉलिसीचा क्र. 1605823117P104195830 असा असून कालावधी दि. 20/06/2017 ते 19/06/2018 असा आहे. सदरचे पॉलिसीची प्रत याकामी दाखल आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांचे म्हणणेचे अवलोकन करता, तक्रारदार यांच्या मते तथाकथित चोरी ही दि. 07/09/2017 चे रात्री ते दि. 08/09/207 रोजीचे सकाळ दरम्यान झालेली आहे. पण तक्रारदार यांनी पोलिसांना दि. 28/09/2017 रोजी वाहन चोरीस गेलेचे कळलेचे सांगितले आहे. म्हणजेच दि. 7/09/2017 ते 28/09/2017 पर्यंत तक्रारदाराचे वाहन 21 दिवस पार्कींग जागा नसलेल्या ठिकाणी unsafe parked and unattended होते. वाहनाकडे कोणी गेले नाही अथवा वाहन सुरक्षित आहे किंवा नाही याची काळजी सुध्दा घेतली गेली नाही. तक्रारदारांनी चोरीबाबत वि.प. यांना दि. 30/10/2017 रोजी म्हणजे जवळजवळ दोन महिन्यांनंतर कळविले आहे. तक्रारदार यांनी चोरीची फिर्याद पोलीस स्टेशनला व वि.प. यांना ताबडतोब कळविणे अनिवार्य असताना देखील कळविलेले नाही हे विमा पॉलिसीच्या अट क्र.5 चे उल्लंघन आहे. वाहन चोरी ही फक्त तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे व यास तक्रारदार हे सर्वस्वी जबाबदार आहेत, सबब तक्रारदाराचा क्लेम योग्य कारणास्तव नाकारल्याचे वि.प. यांचे कथन आहे. परंतु वि.प. यांनी केलेली सदरची कथने ही केवळ मोघम कथने आहेत. वि.प. यांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी त्यांचे वाहनाची योग्य ती काळजी घेतली नाही हे दर्शविण्याकरिता वि.प. यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, वि.प. यांचे कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. वि.प. यांनी आपली कथने पुराव्यानिशी शाबीत केलेली नाहीत. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवे त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, याकामी विमा पॉलिसीचे अवलोकन करता वाहनाची आय.डी.व्ही. रक्कम रु. 3,95,000/- इतकी आहे. परंतु तक्रारदारांनी सदरचे वाहन हे रक्कम रु.2,00,000/- या रकमेस खरेदी केले आहे. तसेच तक्रारदारांनी प्रस्तुतकामी रक्कम रु.2,00,000/- या रकमेची मागणी केली आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु.2,00,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने व्याज वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.