(द्वारा- श्री.डी.एस.देशमुख, अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तिचे पती सय्यद युनूस पिता सय्यद छोटू यांनी गैरअर्जदार क्र.2 ए.डी.सी.सी.बँक व गैरअर्जदार क्र.3 को-ऑपरेटिव्ह रुरल बँक यांच्याकडून शेतीसाठी कर्ज घेतले होते. गैरअर्जदार क्र.2 रुरल बँकेच्या सभासदांचा गैरअर्जदार क्र.1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे जनता अपघात पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला होता. तिचे पती सय्यद युनूस यांचे दि.23.02.2007 रोजी अपघाती निधन झाले. त्यामुळे तिने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. परंतु विमा कंपनीने मयताच्या नावात चुक असल्याच्या कारणावरुन तिचा विमा दावा नामंजूर केला. विमा कंपनीने त्यांच्याकडे सय्यद युनूस सय्यद छोटू या नावाच्या व्यक्तीचा विमा उतरविलेला नसल्याचे सांगून विमा दावा फेटाळला. विमा कंपनीने चुकीच्या कारणावरुन विमा दावा फेटाळून त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदारांकडून जनता अपघात विमा पॉलीसी नुसार रु.1,00,000/- व्याजासह देण्यात यावेत. गैरअर्जदार क्र.1 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे पती सय्यद युनूस पिता सय्यद छोटू यांच्या विषयी त्यांना काहीही माहिती नाही. तक्रारदाराने तिच्या पतीच्या अपघाती मृत्यू संदर्भात कोणतेही कागदपत्र दाखल केले नव्हते. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी तक्रारदाराचे पती युनूस छोटूभाई सय्यद यांचा जनता अपघात विमा पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला नव्हता. त्यामुळे तक्रारदाराला विमा रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या विमा दाव्यासोबत जे कागदपत्र होते त्यांची छाननी केली असता असे निदर्शनास आले की, गट जनता विमा पॉलीसीसोबत जोडलेल्या यादीमध्ये मयताचे नाव नव्हते. म्हणून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आलेला असुन सदर निर्णय योग्य असुन तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळावी, अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. (3) त.क्र.801/09 गैरअर्जदार क्र.2 ए.डी.सी.सी. बँकेने लेखी निवेदन दाखल केले. बँकेचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार अथवा तिच्या पतीने त्यांच्याकडून कर्ज घेतलेले नाही. तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत बँकेची कोणतीही भुमिका नाही. जनता अपघात पॉलीसी गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने दिलेली असुन तक्रारदार गैरअर्जदार क्र.3 ची सभासद आहे. त्यामुळे बँकेचा तक्रारदाराच्या विमा दाव्याशी काहीही संबंध नाही व तक्रारदाराने त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवलेले असल्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी बँकेने केली आहे. गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव को-ऑपरेटिव्ह रुरल बँक/सोसायटीने लेखी निवेदन दाखल केले. रुरल बँकेचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे पती मयत युनूस छोटूभाई सय्यद हे शेतकरी होते, त्यांनी कर्ज घेतले होते. मयताचा रुरल बँकेने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे जनता अपघात विमा योजनेत विमा उतरविला होता. रुरल बँकेने गैरअर्जदार क्र.2 बँकेकडे कर्जदार सभासदांची यादी पाठविली होती. त्या यादीमध्ये त्यांच्याकडून मयताचे नाव युनूस छोटूभाई सय्यद असे नाव छापण्याऐवजी/ लिहिण्याऐवजी नजरचुकीने युनूस यासीन सय्यद असे नाव लिहिल्या गेले. सदर चुक नजरचुकीने झालेली आहे. युनूस यासीन सय्यद या नावाची कोणीही व्यक्ती त्यांचा सभासद नाही. मयताच्या नावातील चुकीबददल सोसायटीचे चेअरमन व सचिव यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र बरोबर आहे. गैरअर्जदार क्र.2 औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे मयत सभासदाचा विमा मिळणेबाबत प्रस्ताव दिलेला आहे. मयताचे मुळ नाव युनूस आहे, परंतु त्यांच्या वडीलांचे नाव छोटूभाई ऐवजी यासीन असे झाले. ही चुक लक्षात घेता विमा कंपनी तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास बांधील आहे. गैरअर्जदार क्र.3 रुरल बँक/सोसायटीने मयत खातेदार युनूस छोटूभाई सय्यद/ सय्यद युनूस सय्यद छोटू या नावाने कर्ज दिले आहे व त्याची जनता अपघात विमा पॉलीसी घेतली आहे. मयताचे अपघाती निधन झाल्यानंतर विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला परंतु वडिलांचे नावाऐवजी भावाचे नाव सभासदाच्या पुढे लागले गेले, एवढया किरकोळ चुकीमुळे विमा दावा नामंजूर करणे योग्य नाही. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुददे उपस्थित होतात. मुददे उत्तर 1) गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही. (4) त.क्र.801/09 2) गैरअर्जदार क्र.2 ए.डी.सी.सी. बँकेच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही. 3) गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव रुरल को.ऑपरेटिव्ह बँक/सोसायटीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय. 4) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुददा क्रमांकः-1 ते 3 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराचे पती मयत सय्यद युनूस छोटूभाई हे गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सहकारी ग्रामीण बँक/सोसायटीचे सभासद होते या विषयी वाद नाही. तसेच सदर धोंदलगाव सोसायटीने तक्रारदाराचे पती सय्यद युनूस छोटूभाई याना वर्ष 1999 मध्ये कर्ज दिले त्यावेळी धोंदलगाव सोसायटीने त्यांच्या कर्ज खात्यावर बँकेत हप्त्याची रक्कम नावे टाकलेली होती. धोंदलगाव सोसायटीने त्यांच्या सर्व सभासदांचा गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे जनता अपघात पॉलीसी अंतर्गत विमा उतरविण्यासंदर्भात प्रस्ताव दिलेला होता आणि त्या प्रस्तावासोबत सभासदांच्या नावाची यादी दिलेली होती, त्यानुसार विमा कंपनीने धोंदलगाव सोसायटीच्या सभासदांची जनता अपघात विमा पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला होता. तक्रारदाराचे पती मयत सय्यद युनूस सय्यद छोटूभाई यांचे दि.23.02.2007 रोजी अपघाती निधन झाल्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटी मार्फत जनता अपघात विमा पॉलीसीनुसार विमा रक्कम मिळावी म्हणून गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला होता, परंतु विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा त्यांच्या पतीचे नाव गट विमा पॉलीसीसोबत जोडलेल्या यादीमध्ये नसल्याच्या कारणावरुन फेटाळले. या संदर्भात धोंदलगाव सोसायटीचे म्हणणे असे आहे की, त्यांनी विमा प्रस्तावासोबत विमा कंपनीकडे जी यादी पाठविली होती, त्यामध्ये तक्रारदाराचे पती मयत सय्यद युनूस छोटूभाई यांचे नाव चुकून युनूस यासीन सय्यद असे लिहिल्या गेले होते. सदर चुक नजरचुकीने झालेली होती. वास्तविक युनूस यासीन सय्यद या नावाचे कोणीही सभासद नसुन मयताच्या नावासमोर त्यांच्या वडिलांचे नाव लावण्याऐवजी त्याच्या भावाचे नाव लागले गेले. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने सभासदांचा विमा उतरविण्याबाबत जी यादी पाठविली होती, त्या यादीमध्ये तक्रारदाराचे (5) त.क्र.801/09 पती मयत सय्यद युनूस छोटूभाई यांचे नाव नव्हते ही बाब धोंदलगाव सोसायटीनेच मान्य केलेली आहे. कारण त्या यादीमधील तक्रारदाराच्या पतीचे नाव युनूस छोटूभाई सय्यद असे छापण्याऐवजी नजरचुकीने युनूस यासीन सय्यद असे लिहिल्या गेले होते, असे धोंदलगाव सोसायटीचे सचिव सोमीनाथ सोनवणे यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने विमा कंपनीकडे पाठविलेल्या यादीमध्ये तक्रारदाराचे पती युनूस छोटूभाई सय्यद यांचे नाव नव्हते, त्यामुळे विमा कंपनीने तक्रारदाराला त्यांच्या पतीच्या अपघाती मृत्युबददल विमा रक्कम देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे सभासदांचा विमा उतरविण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने वर्ष 1999 मध्ये जी यादी पाठविली, त्या यादीमध्ये तक्रारदाराच्या पतीचे नाव चुकीचे लिहिल्या गेले होते, ही बाब धोंदलगाव सोसायटीने मान्य केली असून, विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यासाठी विमा कंपनी अथवा गैरअर्जदार क्र.2 औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे जबाबदार नसुन त्यासाठी केवळ धोंदलगाव सोसायटी जबाबदार आहे. गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने जर तक्रारदाराच्या पतीच्या खात्यावर जनता अपघात विमा पॉलीसी बददल विमा हप्त्याची रक्कम नावे टाकलेली असेल तर विमा कंपनीकडे विमा उतरविण्यासंदर्भात पाठवावयाच्या यादीमध्ये धोंदलगाव सोसायटीने तक्रारदाराच्या पतीचे नाव व्यवस्थित नमुद करणे आवश्यक होते. परंतु गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने तक्रारदाराच्या पतीचे नाव चुकीचे नमूद केल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला यासाठी पुर्णतः धोंदलगाव सोसायटीचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने त्यांचे लेखी म्हणणे दाखल करतांना विमा कंपनीकडे जी यादी पाठविली होती, त्या यादीमधील तक्रारदाराच्या पतीचे नाव नजरचुकीने चुकीचे लिहिल्या गेले होते असे नमुद केलेले असताना आमच्या समोर संपुर्ण युक्तीवाद झाल्यानंतर एक यादी दाखल केलेली असुन, त्यांचे म्हणणे असे आहे की, विमा कंपनीकडे पाठविलेल्या यादीमध्ये तक्रारदाराच्या पतीचे नाव युनूस छोटूभाई सय्यद असेच लिहिले होते व ते नाव योग्य होते. गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने सादर केलेली यादी त्यांच्या वतीने, त्यांच्या सचिवाने शपथपत्राद्वारे केलेल्या निवेदनाशी विसंगत असुन धोंदलगाव सोसायटीने सदर यादी केवळ स्वतःवर जबाबदारी येऊ नये, या उददेशाने बनावट तयार करुन दाखल केल्याचे दिसून येते. (6) त.क्र.801/09 तक्रारदाराच्या पतीच्या अपघाती मृत्यु संदर्भातील विमा दावा गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने तिच्या पतीचे नाव गट अपघात विमा पॉलीसी सोबत जोडलेल्या यादीमध्ये नसल्याच्या कारणावरुन फेटाळून कोणतीही चुक केलेली नाही. परंतु गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सोसायटीने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे त्यांच्या सभासदांचा गट अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविण्यासंदर्भात दिलेल्या प्रस्तावासोबत जोडलेल्या यादीमध्ये तक्रारदाराच्या पतीचे नाव चुकीचे नमुद केले. त्यामुळे विमा कंपनीने तक्रारदाराच्या पतीचे नाव यादीमध्ये नसल्याच्या कारणावरुन तिचा विमा दावा फेटाळला. यासाठी पुर्णतः गैरअर्जदार क्र.3 जबाबदार असुन, गैरअर्जदार क्र.3 नेच तक्रारदाराच्या पतीचे नाव निष्काळजीपणे पॉलीसी संदर्भातील यादीमध्ये नमुद केले होते. सदर बाब गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सहकारी ग्रामीण बँक/सोसायटी यांच्या सेवेतील त्रुटी आहे. म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.3 यांच्याविरुध्द मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सहकारी ग्रामीण बँक/सोसायटी यांनी तक्रारदाराला जनता अपघात विमा पॉलीसीमधील तरतुदीनुसार तिच्या पतीच्या अपघाती मृत्यूबददल रक्कम रु. 1,00,000/- दिनांक 29.07.2008 पासून पुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजदराने निकाल कळाल्यापासुन एक महिन्याचे आत द्यावेत. 3) गैरअर्जदार क्र.3 धोंदलगाव सहकारी ग्रामीण बँक/सोसायटी यांनी तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.2,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |