निकालपत्र :- (दि.28/09/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- यातील तक्रारदार हे उस्मानाबाद येथील असून त्यांचे मयत पती भास्कर किसनराव ढेंगळे हे तेथील जिल्हा व सत्रन्यायालयात वकीली व्यवसाय करीत होते. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे ते मेंबर होते व त्या संस्थेने सामनेवाला विमा कंपनीकडून वकीलांसाठी ग्रुप वैयक्तिक पॉलीसीच्या स्कीमप्रमाणे आपल्या मेंबर्सचे विमा उतरवण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे मयत वकील श्री ढेंगळे यांनी रितसर पॉलीसीचा हप्ता भरुन रु.10,00,000/- ची पॉलीसी विकत घेतली होती. सदर पॉलीसीचा नं.160500/42/04/00256/3675 असा असून त्याचा कालावधी दि.24/02/2005 ते 23/02/2010 असा आहे. वरील पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार जर पॉलीसीच्या काळात अपघाती मृत्यू झाला तर मयत वकीलांचे वारस रक्कम रु.10,00,000/-(रु.दहा लाख फक्त) मिळण्यास पात्र राहतील. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांचे पती वकील भास्कर किसनराव ढेंगळे हे दि.16/12/2006 रोजी सायंकाळी 5 ते 5.30 चे सुमारास आपले निवासस्थानातून बार्शी रोडला नित्यनियमानुसार पायी फिरत जात होते. तक्रारदाराचे पती रस्त्याच्या डाव्या बाजूने उस्मानाबाद बार्शी रोडने पायी जात असताना पाठीमागून एम.एच.-25-एम-1ही कार अतिशय वेगात आली कारचा ड्रायव्हर कार निष्काळजी- पणाने चालवत असल्याने तक्रारदाराचे पतीस पाठीमागून कारचा धक्का दिला त्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडले. कारचा ड्रायव्हर कार घेऊन निघून गेला घटनास्थळावरील लोकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.तक्रादाराचे पतीचा सदरचे मोटर अपघातामध्ये मृत्यू झाला. सदरचा अपघात हा कार ड्रायव्हरचे निष्काळजीपणामुळे झालेला असलेने चौकशी अंती कार चालकाविरुध्द उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.342/2006 कलम 304(अ)279 भा.द.वि.अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मयत वकील श्री ढेंगळे हे घरातील एकमेव कर्ते पुरुष होते. सदरचे दुर्घटनेनंतर तक्रारदारांना फार मोठा मानसिक धक्का बसला. आपल्या मयत पतीने सामनेवाला विमा कंपनीकडून विमा पॉलीसी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर दि.13/07/2007 रोजी तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीला लेखी कळवून FIR ची नक्कल विमा पॉलीसी, मृत्यू दाखला इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपला क्लेम दाखल करुन विमा रक्कमेची मागणी केली. त्यानंतर सामनेवाला विमा कंपनीने दि.16/07/2007 रोजी तक्रारदारास पत्र पाठवून परत क्लेमफॉर्म व कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले. तक्रारदाराचे घरामध्ये दुसरा कोणताही कर्ता माणूस नसल्याने सामनेवाला यांनी मागणी केलेली कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत. त्यानंतर दि.05/12/2008 रोजी रितसर क्लेमफॉर्म भरुन त्यासोबत FIR ची नक्कल, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मयत व्यक्तीचे जन्मतारखेचा पुरावा, मतदान ओळखपत्र, मूळ पॉलीसी, बार कौन्सील महाराष्ट्र व गोवा यांनी दिलेले ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र व तक्रारदार नॉमिनीचे शपथपत्र इत्यादी सर्व आवश्यक सामनेवाला कंपनीकडे सादर केली. त्यानंतर दि.19/06/2009 रोजीचे पत्रानुसार आणखी काही कागदपत्रे सादर करण्यास कळविले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.14/07/2009 रोजी प्रत्यक्षदर्शीचे जबाबाच्या नक्कला सामनेवाला कंपनीकडे सादर केल्या. परंतु सामनेवाला कंपनीने दि.01/08/2009 रोजी अपघाती मृत्यूनंतर एक महिन्याच्या आत अपघाती मृत्यूची खबर दिली नाही असे कारण दर्शवून क्लेम नामंजूर केल्याचे कळवले. तक्रारदार ही पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार अपघात विमा योजनेची रक्कम मिळण्यास पात्र असूनही आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करुनही विमा कंपनीने विम्याची रक्कम देण्यास दि.01/08/2009 रोजी इन्कार केला. कुठलेही सबळ व संयुक्तिक कारण नसताना सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा न्याययोग्य विमा क्लेम बेजबाबदारपणे नामंजूर केला आहे. ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून तक्रारदाराने सामनेवालांविरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती सदर मंचास केली आहे. सामनेवाला विमा कंपनीकडून तक्रारदारास विम्याची रक्कम रु.10,00,000/- देण्याचा आदेश व्हावा तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत पॉलीसी सर्टीफिकेट, पोलीस निरिक्षक उस्मानाबाद यांना दिलेला तक्रार अर्ज, गु.र.नं.342/06 पो.स्टे. उस्मानाबादची प्रत, मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, मयताचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार चंद्रजीत जाधवचा जबाब, विजय अभिमन्यू वाकरे यांचा जबाब, मयताच्या पन्ती पल्लवी यांचा जबाब, मयताच्या मुलाचा जबाब, सामनेवाला यांची पत्रे एकूण 4, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेले पत्र व त्याच्या पोच पावत्या, मयताचे बार कौन्सीलचे ओळखपत्र, मयताचे मृत्यूचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदारच्या मयत पतीची ग्रुप इन्शुरन्स पॉलीसी क्र.160500/42/04/05/00000256-3675 मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या कथनात पुढे असे म्हणतात की, विमाधारक श्री ढेंगळे यांचा मृत्यू अपघाताने झाला नसून चक्कर येऊन पडल्यामुळे झाला आहे. प्रस्तुत तक्रारदारांना सदर पॉलीसीची माहिती नव्हती व माहिती मिळाल्यावर व शॉकमधून बाहेर आल्यावर तक्रारदारांना जेव्हा महिती मिळाली तेव्हा म्हणजे दि.13/07/2007रोजी तक्रारदाराने मृत्यू दाखला व पोलीस FIR रिपोर्टसह सामनेवालांकडे क्लेम दाखल केला हे तक्रारदाराचे म्हणणे सामनेवाला यांनी फेटाळून टाकले आहे. क्लेम पेपर्स मागणी करुनही वेळेत न मिळाल्याने अखेर सामनेवालाने दि.12/09/2008 रोजी योग्य कारणाने व पूर्ण जबाबदारीने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला व त्याप्रमाणे तक्रारदारांना कळवले. मयत विमाधारकांच्या दि.16/12/2006रोजी झालेल्या तथाकथीत अपघाती मृत्युबद्दल तक्रारदाराने सामनेवालांकडे दि.13/07/2007 पर्यंत कुठलीही माहिती दिली नव्हती. सामनेवालाने वरचेवर पत्राने कळवूनही तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे सामनेवालांकडे दाखल केले नाहीत. विमा पॉलीसीच्या अटी व नियमाप्रमाणे अपघाताची घटना घडल्यानंतर 1 महिन्याच्या अवधीत सर्व आवश्यक कागदपत्रासंह सामनेवाला विमा कंपनीस कळवणे आवश्यक असते. परंतु तक्रारदाराने त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्र दाखल केली नाहीत. (5) सामनेवाला कंपनी आपल्या कथनात पुढे असे सांगतात, विमाधारकाच्या मृत्यूदाखल्यात मृत्यूचे कारण नोंद केले नाही तसेच व्हिसेराही राखून ठेवला आहे. त्यामुळे विमाधारक अडव्होकेट ढेंगळे हे अपघाताने मरण पावले असे सिध्द होत नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुण पूर्ण जबाबदारीनेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालांच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी मागणी सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (6) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठविलेले पत्र, सदर पत्राच्या पोच पावत्या, पर्सनल अक्सीडेंट इन्शुरन्स सर्टीफिकेट, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, तक्रारदाराने दि.13/07/007 रोजी सामनेवाला यांना दिलेले इन्टीमेशन पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (7) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रेही तपासले. सामनेवाला यांनी तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. आता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवालांच्या सेवेत त्रुटी आहे काय ? --- होय. 2. सामनेवाला तक्रारदाराला नुकसानभरपाई देय आहे का ? --- होय. 3. काय आदेश ? --- पुढीलप्रमाणे (8) तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे क्लेम दाखल केल्यानंतर त्या क्लेमबाबत निर्णय घेताना सामनेवाला यांनी असा आक्षेप घेतला आहे की, मयत वकील ढेंगळे हे अपघाताने मृत्यू पावले नसून त्यांचा मृत्यू चक्कर येऊन खाली पडल्यामुळे(फिट्स मुळे) झाला आहे. परंतु याबाबतीत सामनेवालाने मयत वकील ढेंगळे यांना पूर्वीपासून अशा त-हेचा कुठला विकार असल्याबद्दल कुठलाही पुरावा दाखल केला नाही. पायी चालणा-या माणसाला एखादया वाहनाने पाठीमागून ठोकरले तर घाबरुन चक्कर येऊन पडणे ही अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. केवळ तेवढयावरुन मयत विमाधारकाचा मृत्यू अपघाताने झाला नाही असे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न सामनेवाला विमा कंपनीने करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याबाबतीत कुठलाही पुरावा नसल्यामुळे हे मंच सामनेवालांचे त्याबाबतीतील कथन ग्राहय धरु शकत नाही. (9) सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारायचे कारण आपल्या दि.12/09/2008 चे पत्रात तक्रारदाराने क्लेमपेपर्स व इतर आवश्यक कागदपत्रे वेळेवर दाखल केले नाहीत असे दिले आहे. याबाबतीत तक्रारदाराने आपल्या कथनात मयत वकील ढेंगळे यांच्या विमा पॉलीसीबाबत माहिती कळल्यावर तक्रारदाराने दि.13/07/2007 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेमपेपर्स तसेच FIR विमा पॉलीसी, मृत्यू दाखला इत्यादी सर्व कागदपत्रांसह पाठवले. ते पोचल्यावर सामनेवालाने तक्रारदारांना दि.16/07/2007 रोजी पत्र पाठवून आणखी काही कागदपत्रांची मागणी केली. ती सर्व कागदपत्रेही तक्रारदाराने दि.05/12/2008 रोजी सामनेवालांकडे पाठवली आहेत व ती सामनेवालांकडे पोचल्याची पोचही कामात दाखल केली आहे.त्यानंतर सामनेवालाने परत दि.19/06/2009 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून-1) पोलीसांनी घेतलेले घटनास्थळावरील व फायनल JMFC रिपोर्ट, 2) डॉक्टरांनी केलेल्या उपचाराचे पेपर्स, मृत्यूचे कारण दाखवणारे रिपोर्ट व व्हिसेरा पृथ:करणाबाबतचा अंतिम अहवाल,3)वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण इत्यादी कागदपत्रांची मागणी केली. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.13/07/2009 रोजी पत्र लिहून वकील ढेंगळे हे घटनास्थळीच व हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू पावले असल्यामुळे डॉक्टरांच्या उपचाराचे कागदपत्र हजर करु शकत नसल्याचे कळवले. तसेच सदर बातमी वर्तमानपत्रात आली नसल्यामुळे तेही हजर करु शकत नसल्याबद्दल कळवले. सामनेवालाच्या सूचनेप्रमाणे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींचे जबाब सदर पत्राबरोबर हजर करीत असल्याचे तक्रारदाराने सामनेवाला यांना कळवले आहे. (10) उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता असे दिसून येते की पतीच्या आकस्मिक मृत्यूचा जबर आघात झाला असला तरीही तक्रारदाराने सामनेवालांच्या सुचनेप्रमाणे सर्व कागदपत्रे वेळेत दाखल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तक्रारदार या अशिक्षीत असून घरी दुसरा कोणीही कर्ता पुरुष नसल्याने व मानसिक धक्क्याने व दोन लहान मुलांच्या जबाबदारीच्या कल्पनेने सैरभैर मानसिक अवस्थेत होत्या. अपघाताची घटना घडल्यानंतर 1 कॅलेंडर महिन्याच्या आत विमाधारकाच्या नॉमिनीने सर्व कागदपत्रांसह विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला पाहिजे ही पॉलीसीत अट ही मार्गदर्शक स्वरुपाची असून अत्यावश्यक स्वरुपाची नाही. विमा पॉलीसीबद्दल वाद नाही. अपघाती मृत्यूची घटना सर्व पुराव्यानिशी शाबीत झाली आहे असे असताही केवळ विलंबाने तांत्रिक कारण पुढे करुन सामनेवाला विमा कंपनी तक्रारदाराचा न्याय्य क्लेम नामंजूर करणे म्हणजे विमा कराराचा पायाभूत उद्देशच (main putpose) नजरेआड करण्यासारखे आहे. विलंबाबाबत विमा कराराची तत्वे ही अनिवार्य स्वरुपाची नसून मार्गदर्शक स्वरुपाची आहेत. याबाबतीत हे मंच छत्तीसगढ स्टेट कमिशन यांचा श्रीमती रामायणवती विरुध्द ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी या निकालाचा पूर्वाधार घेत आहे. त्यामध्ये असे नमुद केले आहे की, “ Repudiation of Claim under policy of delay, the ground of delay in filing complaint petition was held unsustainable where complaint an illiterate lady was unaware of existence of policy and she made no delay preferring claim as soon as she came to know about the existence of policy.” अशा त-हेने केवळ तांत्रिक कारण दाखवून तक्रारदाराचा योग्य व न्याय्य क्लेम नामंजूर करणे ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे अशा स्पष्ट निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमचे रु.10,00,000/-(रु.दहा लाख फक्त) दि.19/06/2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह दयावेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |