तक्रारदारांतर्फे - अॅड.श्रीमती. म्हारोळकर जाबदारांतर्फे - अॅड.श्री. माहेश्वरी
*****************************************************************
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 10/07/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदारांनी त्यांच्या ट्रॅक्टरच्या नुकसानीबद्दलच्या क्लेमची रक्कम जाबदारांनी दिली नाही म्हणून सदरील तक्रार जाबदारांविरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
(1) तक्रारदार हे मयत आदित्य किरण रगडे याचे पालक आहेत. मयत आदित्य रगडे याच्या मालकीचा ट्रॅक्टर होता. मयत आदित्य याचा दि. 4/2/2011 रोजी तो ट्रॅक्टर चालवत असताना अपघात झाला व त्यामुळे ट्रॅक्टरचे भरपूर नुकसान झाले. मयत आदित्य याने जाबदारांकडून दि. 30/3/2010 ते दि. 29/3/2011 पर्यंत ट्रॅक्टरची विमा पॉलिसी घेतली होती. त्या पॉलिसीमध्ये गाडीच्या मालकाचे वैयक्तिक विमा संरक्षण अंतर्भूत होते.
तक्रारदारांनी त्यांच्या मयत मुलाच्या अपघाती मृत्यूच्या पॉलिसीची रक्कम मागणीसाठी जाबदारांनी विरोध दर्शविल्यामुळे तक्रारदारांनी दि. 13/12/2011 रोजी तक्रार अर्ज क्रमांक एपीडीएफ/2011/266 अन्वये या मंचात तक्रार दाखल केली होती, त्यामध्ये मंचाने दि. 10/5/2012 रोजी निकाल देऊन, तक्रारदारास ट्रॅक्टरच्या क्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व्याजाने देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास ही रक्कम दिली आहे.
त्याचवेळेस तक्रारदारांनी मुलाच्या अपघाताच्या विम्याची रक्कम तसेच ट्रॅक्टरच्या नुकसानीविषयी वेगळी रक्कम जाबदारांकडे मागितली होती. परंतु दि. 12/12/2011 रोजी जाबदारांनी कुठलेही उत्तर दिले नाही म्हणून तक्रारदारांनी दि. 28/6/2012 रोजी नोटीस पाठविली, त्याचे उत्तर दि. 12/7/2012 रोजी जाबदारांनी दिले आणि काही कागदपत्रांविषयीची पूर्तता करण्याविषयीची मागणी केली. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जाबदारांचे निरंक या तारखेचे दि. 28/8/2012 रोजीचे पोस्ट केलेले पत्र तक्रारदारास प्राप्त झाले. त्या पत्राद्वारे जाबदारांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला. सदरचे ट्रॅक्टर हे विमाधारकाच्या नावाने रजिस्टर केले नव्हते या कारणावरुन क्लेम नामंजूर केला. तक्रारदारांनी दि. 12/9/2012 रोजीच्या पत्राने जाबदारांना असे कळविले की, पॉलिसीमध्ये अशी कुठलीही अट नाही की विमाधारकाच्या नावाने गाडीच्या रजिस्ट्रेशनची नोंदणी करावी लागते. वास्तविक मालकी हक्काची सर्व कागदपत्रे त्यांनी जाबदारांकडे पाठविली होती. जाबदारांनी या नोटीशीस कुठलेही उत्तर दिले नाही म्हणून सदरील तक्रार.
तक्रारदार, जाबदारांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवली यासाठी त्यांना जबाबदार धरावे आणि क्लेमची रक्कम रु. 3,15,858/- 15% व्याजाने दयावे, रक्कम रु. 25,000/- नुकसानभरपाई आणि तक्रारीचा खर्च दयावा अशी मागणी करतात.
तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
(2) जाबदारांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मयत आदित्य याने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या नोंदणी प्रमाणपत्रावर पूर्वीचे मालक श्री. डोके यांचे नाव आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या ट्रॅक्टरला अपघात झाला, त्यामध्ये गाडीचे नुकसान झाले. इन्श्युरन्स पॉलिसी जरी मयत आदित्य याचे नावावर असली तरी, नोंदणी प्रमाणपत्रावर मयत आदित्यने नाव ट्रान्सफर करुन घेतले नसल्यामुळे त्यांचा क्लेम नामंजूर करण्यात आला. योग्य त्या कारणावरुनच क्लेमची रककम दिली नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदार करतात. जाबदारांनी शपथपत्र आणि वरिष्ठ न्यायालयाच निवाडे दाखल केले आहेत.
(3) दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांच्या मुलाचा ट्रॅक्टरच्या अपघातामुळे मृत्यू झाला आणि त्या अपघातामध्ये ट्रॅक्टरचे नुकसान झाले त्यासाठी क्लेम केला असता, जाबदारांनी तो नामंजूर केला. नामंजूरीचे कारण तक्रारदाराच्या मुलाच्या नावावर अपघाताच्या वेळेस ट्रॅक्टरची नोंदणी केलेली नव्हती. मंचाने सर्व कागदपत्रांची पाहणी केली. ट्रॅक्टरचा मुळ मालक श्री. गणेश जनार्दन डोके यांनी तक्रारदाराचा मुलगा आदित्य किरण रगडे यांना ट्रॅक्टरची व ट्रॉलीची विक्री केल्याबद्दलची पावती दि. 3/1/2010 रोजी दिलेली आहे त्या पावतीवर श्री. गणेश जनार्दन डोके यांची सही दिसून येत नाही. मुळातच ट्रॅक्टर ट्रान्सफर केल्याबद्दलचे आर.सी.टी.सी. बुक किंवा रजिस्ट्रेशन नोंदणी आदित्य किरण रगडे याच्या नावावर झालेली नाही त्यामुळे तो ग्राहक ठरत नाही. पर्यायाने त्याचे आई-वडिल ग्राहक ठरत नाहीत असे मंचाचे मत आहे. ज्याप्रमाणे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, इन्श्युरन्स पॉलिसी वेळेत ट्रान्सफर झाली नाही तर अपघात विम्याची रक्कम देता येत नाही त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन न झालेल्या गाडीच्या नुकसानीबद्दलची रक्कम देता येणार नाही. वास्तविक विमा कंपनीने मयत आदित्य किरण रगडे याच्या नावावर गाडी ट्रान्सफर झालेली नसताना विमा पॉलिसी दयावयास नको होती. तरीसुध्दा पॉलिसी दिली तसेच त्या पॉलिसीच्या वैयक्तिक अपघात विम्याची रक्कम सुध्दा तक्रारदारास दिली होती. मंचाच्या मते तक्रारदारांनी तक्रारदाराच्या मुलाच्या नावाने ट्रॅक्टरची नोंदणी ट्रान्सफर करुन घेतली नव्हती म्हणून तक्रारदार ट्रॅक्टरच्या नुकसानीची रक्कम मागू शकत नाहीत कारण ते ग्राहक होऊ शकत नाही.
वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2 खर्चाबद्दल काहीही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.