(मंचाचे आदेशान्वये – अड. आश्लेखा दिघाडे सदस्या)
- आदेश --
पारित दि. 16 जुलै, 2005)
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार हा सेवानिवृत्त वृध्द व्यक्ती आहे. त्याने गैरअर्जदार नं. 1 यांचेकडून रु.10,000/- ची मेडिक्लेम पॉलिसी घेतली. सदर पॉलिसीचा क्रं. 190502/48/03/609 असा आहे. गैरअर्जदार नं. 1 यांचेकडे सदर पॉलिसीचा क्रमांक अनुक्रमे युएचआयडी-एफ.एच.बीयु00000006243 असा नोंदविल्या गेला आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दिनांक 1.3.2003 ते 28.02.2004 असा होता. गैरअर्जदार नं. 2 हा गैरअर्जदार नं. 1 यांचा प्रतिनिधी आहे.
अर्जदाराला उजव्या डोळयात त्रास जाणवत असल्यामुळे त्याने नागपूरला आवून डॉ. मुकादम व डॉ. बावणकुळे यांचेकडून डोळे तपासून घेतले. तेव्हा डॉक्टरांनी अर्जदाराला पुढील तपासणीकरिता एल.बी.प्रसाद हॉस्पीटल, हैद्राबाद येथे जाण्यास सांगितले. म्हणून अर्जदार हैद्राबाद येथे एल.बी. प्रसाद, हॉस्पीटलमध्ये गेला तेव्हा या हॉस्पीटलमधील डॉ. दास यांनी अर्जदाराला “Trasnspupillay Thermo Therapy Treatment”. घेण्याचा सलला दिला. म्हणून अर्जदाराने सदर उपचार दिनांक 12.08.2003 रोजी करवून घेतला. यानंतर अर्जदाराने गोंदिया इथे वापस आल्यानंतर त्याला आलेल्या उपचाराच्या खर्चाचे रुपये 4,600/- चे देयक पत्रासोबत रजीस्टर्ड पोस्टाने दि. 28.03.03 रोजी गैरअर्जदार नं. 1 यांचेकडे पाठविले. परंतु गैरअर्जदार नं.1 यांनी या पत्राची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. यानंतर सुध्दा दिनांक 23.12.2003 आणि दिनांक 18.02.2004 ला रजिस्टर्ड पोस्टाने अर्जदाराने स्मरणपत्र गैरअर्जदार नं.1 यांचेकडे पाठविले. परंतु यावर सुध्दा गैरअर्जदार नं. 1 यांनी कुठलीही दखल घेतली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार नं. 2 यांना दिनांक 9.3.2004 रोजी रजीस्टर्ड पोस्टाने दावा निकाली काढण्याबाबत पत्र पाठविले. गैरअर्जदार नं. 2 यांनी सुध्दा कोणतेही उत्तर दिले नाही. तेव्हा अर्जदाराने दिनांक 24.09.2004 रोजी वकिलाद्वारे कायदेशीर नोटीस पाठविली परंतु गैरअर्जदारांनी कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून अर्जदाराने त्याला उपचाराकरिता आलेला खर्च रु.6,966/- गैरअर्जदाराकडून मिळण्याकरिता सदरची तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत निशानी क्रं. 3 वर एकूण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये पॉलिसीची प्रत, उपचाराकरिता झालेल्या खर्चाचे देयक, गैरअर्जदारांसोबत केलेला पत्रव्यवहार, डोळयावरील उपचारासंबंधी कागदपत्रे यांचा समावेश आहे. तसेच निशाणी क्रं. 8 वर शपथपत्र जोडले आहे.
अर्जदाराच्याच्या तक्रारीची नोंद घेवून गैरअर्जदारां विरुध्द नोटीस काढण्यात आलेण् गैरअर्जदारांना नोटीस मिळूनही गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले नाहीत. गैरअर्जदारांना ब-याच संधी देवूनही गैरअर्जदारांनी मंचाच्या नोटीसची कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून दिनांक 30.05.2005 रोजी मंचाने गैरअर्जदारां विरुध्द दावा एकतर्फा चालविण्याचा निर्णय घेतला व तसा आदेश पारित केला.
अर्जदाराच्या तक्रार अर्जाचे व दाखल केलेल्या कागदपत्रांचे वाचन केले असता, तसेच अर्जदाराच्या वकिलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर खालील मुद्दे विचारार्थ येतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1 | अर्जदाराची तक्रार व तक्रारीचे कारण मंचाच्या कार्यक्षेत्रात येतात काय ? | होय |
2 | अर्जदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? | अंशतः |
3 | या तक्रारीचा अंतिम आदेश काय ? | कारणमिमांसेनुसार |
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराने गैरअर्जदार नं. 2यांचेद्वारे गैरअर्जदार नं. 1 यांचेकडून मेडिक्लेम पॉलिसी घेतली आहे. गैरअर्जदार नं. 2 हे गैरअर्जदार नं. 1 यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. सदर पॉलिसी गोंदिया विभागा अंतर्गत गैरअर्जदार नं. 1 यांनी अर्जदाराला दिलेली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत जोडलेले गैरअर्जदार नं. 1 यांनी दिलेल्या क्रमांक 1264 पॉलिसी प्रमाणपत्रावरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराला त्याच्या डोळयाला गोंदिया येथे रहात असतांनाच पहिल्यांदा त्रास जाणवला. त्यामुळे तक्रारीचे कारण काही प्रमाणात गोंदिया इथे घडले असल्यामुळे सदर तक्रार गोंदिया मंचाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे दावा चालविण्याचा गोंदिया मंचाला पूर्णपणे अधिकार आहे. याकरिता 1999 (1) सीपीआर पान नं. 284 (तामिलनाडू राज्य ग्राहक आयोग) व 2000 (3) सीपीजे (राज्य ग्राहक आयोग उत्तरप्रदेश) या न्यायनिवाडयाचा आधार घेता येईल.
मुद्दा क्रमांक 2 अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे वाचन केले असता असे लक्षात येते की, गैरअर्जदार नं. 1 च्या पॉलिसीतील डी या चार क्रमांकाच्या अटीप्रमाणे अर्जदाराने त्याला दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर लगेच 7 दिवसांच्या आतमध्येच गैरअर्जदार नं 1 यांचेकडे उपचारा संबंधीची कागदपत्रे व देयक पाठविले आहे. परंतु गैरअर्जदार नं. 1 यांनी सदर पत्रव्यवहाराची कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. तसेच अर्जदाराला त्याच्या दाव्यासंबंधी कोणताही पत्रव्यवहार केलेला दिसून येत नाही. अर्जदाराचा विमादावा निकाली न काढणे तसेच त्यासंबंधी अर्जदाराच्या पत्रव्यवहाराला कोणतेही उत्तर न देणे म्हणजेच गैरअर्जदार नं. 1 यांची सेवेतील त्रुटी आहे.
अर्जदाराने गैरअर्जदार नं. 2 यांचेकडून पॉलिसी घेतली आहे. तेव्हा गैरअर्जदार नं. 2 यांनी अर्जदाराला उपचाराकरिता आलेला खर्च मिळवून देण्याकरिता मदत करणे त्यांचे कर्तव्य होते. परंतु अर्जदाराने गैरअर्जदार नं. 2 यांचे सोबत पत्रव्यवहार केल्यानंतर सुध्दा अर्जदाराच्या पत्राला उत्तर न देणे व अर्जदाराला विमादाव्याची रक्कम मिळण्याकरिता मदत न करणे म्हणजेच गैरअर्जदार नं. 2 यांची सेवेतील त्रुटी आहे.
अर्जदाराने मंचासमोर तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर मंचाने गैरअर्जदार नं. 1 व 2 यांना पाठविलेल्या नोटीसची, नोटीस प्राप्त होऊनही दखल न घेता मंचासमोर हजर न राहणे यावरुन गैरअर्जदार नं. 1 व 2 यांचा बेजबाबदारपणा दिसून येतो. म्हणून अर्जदाराला आलेल्या उपचाराचा खर्च व्याजासहीत देण्याची गैरअर्जदार नं. 1 यांची जबाबदारी आहे. तसेच गैरअर्जदार नं. 2 यांनी अर्जदाराला आवश्यक मदत न केल्यामुळे अर्जदाराला उपचाराकरिता खर्च झालेली रक्कम मिळण्याकरिता विलंब होत आहे व त्यामुळे अर्जदाराला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता गैरअर्जदार नं. 2 हे सुध्दा जबाबदार आहेत. त्यामुळे गैरअर्जदार नं. 2 यांनी अर्जदाराला नुकसान भरपाई द्यावी असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात एकूण रुपये 6,966/- व त्यावर 18% दराने व्याज अशी रकमेची मागणी केलेली आहे. परंतु अर्जदाराची मागणी पूर्णपणे मान्य करता येणार नाही. कारण अर्जदाराने त्याला उपचाराकरिता आलेला खर्च रुपये 4,600/- वर दिनांक 5.9.2003 ते 4.11.2004 या कालावधीकरिता 18% दराने रुपये 1,096/-व्याज लावलेले आहे. परंतु सद्य परिस्थितीत 18% व्याजदर प्रचलीत नसल्यामुळे सदर व्याजाची रक्कम मंजूर करता येणार नाही.
वरील सर्व विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार-1 यांनी अर्जदाराला रुपये 4,600/- दि. 5.9.2003 पासून रक्कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत 9% व्याजदराने आदेश पारित झाल्याचे दिनांकापासून 1 महिन्याच्या आत द्यावे.
3 गैरअर्जदार-2 यांनी अर्जदाराला तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासापोटी रुपये 1000/-द्यावे..