निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/02/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2013
तक्रार निकाल दिनांकः- 23 /08/2013
कालावधी 05 महिने. 18 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मारोती पिता संभाजी करले. अर्जदार
वय 39 वर्षे.धंदा.नोकरी पोलीस शिपाई बक्कल नं.965 अड.डी.यु.दराडे.
रा.पोलीस क्वॉर्टर परभणी ता.जि..परभणी.
विरुध्द
1 युनाइटेड इंडीया इंन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार.
तर्फे व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
शाखा दयावान कॉम्पलेक्स,स्टेशन रोड, परभणी.
2 दि परभणी जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.
परभणी, तर्फे सचिव, पोलीस मुख्यालय,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराचा अपंगत्वाचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची आहे.
अर्जदाराची थोडक्यांत तक्रार पूढील प्रमाणे आहे.अर्जदार हा परभणी येथील पोलीस दलांत नायक म्हणून नौकरीस आहे व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ही सहकारी संस्था असून परभणी जिल्हयातील पोलीस दलातील कर्मचा-यांसाठी स्थापण केलेले आहे.
अर्जदार सदर सहकारी संस्थेचा सभासद आहे व तसेच या संस्थेने सर्व सभासदाची अपघात विमा पॉलिसी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे उतरवली होती सदर पॉलिसीचा कालावधी 5 वर्षासाठी होता, दिनांक 02/12/2010 ते 01/12/2015 पर्यंत सदर पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्यू बाबत 1,00,000/- रुपये व कायम अपंगत्वासाठी (नियम “ C ” व “ D ” नुसार 1,00,000/- देय राहील) असे नमुद केले आहे.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा दिनांक 16/10/2011 रोजी ड्युटीवर असतांना रात्रीच्या वेळी जिंतूर औंढा रोडवर महामार्ग सुरक्षा कार्यालयाच्या पथकासमोर अज्ञात वाहनाने अर्जदारास धडक दिली व त्यामध्ये अर्जदाराच्या उजव्या पायास गंभीर मार लागला सदर अपघाता नंतर अर्जदारास दवाखान्यांत भरती केले व त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून काढून टाकण्यात आला. सदर अपघाता संबंधी अज्ञात वाहनावर गुन्हा क्रमांक 205/11 नोंदवण्यात आला.त्यानंतर अर्जदाराने सदरच्या अपंगत्वामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा प्रस्ताव दाखल केला, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदर विमा प्रस्तावाचा नैसर्गिक न्यायतत्वाच्या विचार न करता दिनांक 27/01/2012 रोजी पत्राव्दारे फेटाळला, सदर दावा फेटाळताना गैरअर्जदार क्रमांक 1 ने असे कारण दिले की, विमेदार अपंग व्यक्ती हि त्यांच्या पॉलिसी मध्ये कव्हर नाही. अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, पुढे चौकशी केल्यानंतर त्यास असे कळाले की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी विमा पॉलिसी घेत असतांना जी 1302 कर्मचा-यांची यादी दिली होती त्यामध्ये अनुक्रमांक 780 वर अर्जदाराचे नांव व बक्कल क्रमांक दिलेला होता, परंतु सदर यादी तयार करतांना गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या सबंधीत कर्मचा-याने नजर चुकीने अर्जदाराचे नांव मारोती संभाजी करलेच्या ऐवजी संभाजी मारोती करले, असे लिहिले मात्र बक्कल नंबर बरोबर टाकण्यात आला होता, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ने कोणतीही काळजी न घेता विमा प्रस्ताव फेटाळला. अर्जदाराच्या खात्यातून 255/- रुपये हे विम्या हप्त्यापोटी गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे भरला होता.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, सदरच्या अपघातामुळे अर्जदारास 70 टक्के कायमचे अपंगत्व आलेले आहे, व पॉलिसीच्या नियमातील कलम सी व डी प्रमाणे अर्जदार हा रु. 1,00,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्यास पात्र आहे. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना असा आदेश करावा की, त्यांनी अर्जदारास आलेल्या अपंगत्वा बाबत विमा रक्कम रु.1,00,000/- हे दिनांक 27/08/2012 पासून द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याजासह अर्जदारास द्यावे, मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी अनुक्रमें 15,000/- व 5,000/- रुपये द्यावे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.तसेच नि.क्रमांक 4 वर 8 कागदपत्राच्या यादीसह 8 कागदपत्रे दाखल केलेले आहेत.ज्यामध्ये दोषारोप, ओळखपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरर्जदार क्रमांक 2 यांस दिलेले पत्र, पॉलिसी प्रमाणपत्र, विमा भरणा-या सभासदांची यादी, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे कर्ज खतावनी. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना त्यांचे लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ती ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत चालू शकत नाही,म्हणून खारीज होणे योग्य आहे, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा योग्य ते कारण दाखवुन नाकारलेला आहे.व गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, सदरचा अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत नाही,त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपीनने अर्जदाराचा विमादावा नाकारला व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, पॉलिसी क्रमांक 230601/47/10/61/00002075 अन्वये अर्जदाराच्या नावाचा विमा त्याच्या विमा कंपनीकडे काढलेलाच नाही.म्हणून दिनांक 27/08/2012 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या नावे विमा प्रस्ताव नसल्या कारणाने विमा दावा योग्य ते कारण दाखवुन नाकारला, म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही, व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, सदरच्या पॉलिसी क्रमांका अंतर्गत गैरअर्जदार विमा कंपनीकडे संभाजी मारोती करले यांच्या नावे बक्कल क्रमांक 965 दर्शवुन विमा पॉलिसी काढलेली आहे, परंतु अर्जदाराचे नाव बघता मारोती संभाजी करले असे आहे व तो गैरअर्जदार विमा कंपनीचा लाभधारक नाही,त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने त्याचा विमा प्रस्ताव नाकारला आहे,म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 ने मचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्या लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 13 वर आपले लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, परभणी जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था तर्फे गैरअर्जदार विमाक कंपनीकडे जनता अपघात विमा पॉलिसी काढली ज्या पॉलिसीचा क्रमांक 230601/47/10/61/00002075 असा आहे व ती दिनांक 02/12/2010 ते 01/12/2015 या कालावधीसाठी पॉलिसी काढलेली आहे या पॉलिसीच्या यादी मध्ये सभासद क्रमांक 965 वर मारोती संभाजी करले बक्कल नंबर 965 यांचे नाव आहे, परंतु नजर चुकीने संभाजी मारोती करले बक्कल नंबर 965 असे झालेले आहे, म्हणून त्याचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने नाकारला आहे,तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे असे म्हणणे आहे की, परभणी जिल्हा पोलीस दलात मारोती संभाजी करले बक्कल नंबर 965 हे एकमेव व्यक्ती आहेत, त्याचाच विमा पोलीस पतसंस्था तर्फे काढला आहे.पोलीस पतसंस्था ही फक्त परभणी जिल्हा पोलीस दलातील कर्मचा-यासाठीच आहे,आणि त्याचाच विमा पोलीस पतसंस्था मार्फत काढला जातो.पोलीस दलाच्या बाहेरील व्यक्ती ही संस्थेची सभासद होत नाही, व त्यांचा विमा काढला जात नाही.गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे असे म्हणणे आहे की, मारोती संभाजी करले बक्कल नंबर 965 यांचे सर्व कागदोपत्री पुरावा म्हणून त्याचे ओळखपत्र सादर केले आहे, तरी त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरच्या पॉलिसी अंतर्गत अर्जदार मारोती संभाजी करले बक्कल नंबर 965 यास गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने पैसे दिल्यास आमची काहीही हरकत नाही व अर्जदाराना त्यांना त्याचा लाभ द्यावा, ही मंचास विनंती केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियती वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचा विमादावा प्रस्ताव
नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे
अर्जदाराच्या नावात बदल करुन अर्जदारास मानसिक त्रास
दिला आहे काय ? होय.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराचा दिनांक 16/10/11 रोजी जिंतूर औंढा रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अर्जदाराचा अपघात झाला ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील कागद पत्रावरुन सिध्द होते व तसेच सदरील अपघातात अर्जदारास 70 टक्के अपंगत्व आले हे नि.क्रमांक 4/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.तसेच जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था परभणी यांनी अर्जदाराचे नाव शाखा अधिकारी युनाइटेड इंडीया इंन्शुरन्स कंपनीकडे विमा काढणेस जेव्हा पाठविला तेव्हा त्याचे नाव संभाजी मारोती करले असे लिहिले होते. हे नि.क्रमांक 4/5 वरील दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. सदरील यादी मधील अनुक्रमांक 780 वर संभाजी मारोती करले बक्कल नंबर 965 असा उल्लेख करुन गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा प्रस्ताव पाठविला होता व तसेच सदरच्या विमापोटी 222/- रुपयांचा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे भरला होता ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील दाखल केलेल्या विमा भरणा-या सभासदांच्या यादी वरुन सिध्द होते, तसेच अर्जदार नामे करले मारोती संभाजी रँक एन.पी.सी. बक्कल नंबर 965 हा पोलीस दलात परभणी येथे कार्यरत होता ही बाब नि.क्रमांक 4/2 वरील दाखल केलेल्या आय.कार्डवरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सदरील विमा अंतर्गत अपघातामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमादावा दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/4 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, तसेच सदरच्या अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 27/08/2012 रोजी नो क्लेम असे रिमार्क मारुन विमादावा मंजूर करण्याचे नाकारले,ही बाब नि.क्रमांक 4/4 वरील दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते व सदरच्या रेप्युडेशन लेटर मध्ये गैरअर्जदार विमा कंपनीने असे म्हंटलेले आहे की, अर्जदाराच्या नावे त्यांच्याकडे कोणतीही पॉलीसी काढलेली नाही.बक्कल नंबर 965 अंतर्गत संभाजी मारोती करले यांच्या नावे पॉलिसी काढली असल्यामुळे मारोती संभाजी करलेचा विमादावा नाकारला. ही बाब देखील नि.क्रमांक 4/4 वरील दाखल केलेल्या कागदपत्रावरुन
सिध्द होते. गैरअर्जदार क्रमांक 1 ने दाखल केलेल्या पॉलिसीचे नियम पुढील प्रमाणे आहेत.
A) If such injury shall within Twelve calendar months of its occurrence be the sole and direct cause of death the Insured the capital sum insured stated in the schedule. The amount payable under this clause shall be paid to the Assignee shown in the Schedule.
B) If such injury shall within twelve calendar months of its occurrence be the sale and direct cause of the total and irrecoverable loss of sight of both. eyes, or total and irrecoverable loss of use of two feet, or use of two hands or one hand and one foot, or such loss of sight of one eye and such loss of hand or of one foot the capital sum insured stated in the Schedule hereto.
C) If such injury shall within twelve calendar months of its occurrence be the sole and direct cause of the total and irrecoverable loss of sight of one eye, or total and irrecoverable loss of use of a hand or a foot, fifty percent (50%) of the capital sum insured stated in Schedule here.
D) If such injury shall within twelve calendar months of its occurrence be the sole and direct cause of permanently totally and absolutely disabling the insured from engaging in being occupied with or giving attention to any employment or occupation of any description whatsoever the capital Sum Insured stated in the schedule.
सदरील नियमा अंतर्गत क्लॉज सी हा नियम अर्जदारास लागु होतो,असे मंचास वाटते. गैरअर्जदार विमा कंपनीने केवळ पॉलिसी मध्ये अर्जदाराचे नाव चुकीचे पडल्यामुळे पॉलिसी नाकारलेली आहे, जेव्हा की, बक्कल नंबर एकच आहे, आणि बक्कल नंबर बद्दल विमा कंपनी गप्प आहे.यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दली आहे,जेणे करुन अर्जदार हा सदर पॉलिसी अंतर्गत 50,000/- रुपये विमा कंपनीकडून मिळविण्यास पात्र आहे. असे मंचास वाटते.तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवितांना अर्जदाराचे नाव सिरीयल क्रमांक 780 वर मारोती संभाजी करले ऐवजी संभाजी मारोती करले अशी घोडचुक करुन अर्जदारास मानसिकत्रास दिला आहे, हे यावरुन सिध्द होते. केवळ नांव लिहिण्यात चुक झालेली असून विमाकृत व्यक्ती मात्र तोच आहे,ही बाब देखील गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना नंतर स्पष्टीकरण देवुन त्यांच्या लक्षात आणून दिले आहे, त्यामुळे केवळ नांव लिहिण्यात चुक झाली म्हणून विमादावा नाकारणे हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुध्द आहे,असे मंचास वाटते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
रु.50,000/- फक्त (अक्षरी रु.पन्नासहजार फक्त) द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह
27/08/2012 पासून ते रक्कम अदाकरे पर्यंत द्यावे.
3 गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.15,000/-फक्त (अक्षरी
रु.पंधराहजार फक्त).तसेच तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.4,000/- फक्त
(अक्षरी रु.चारहजार फक्त) आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत द्यावे.
4 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष