नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. तक्रारदाराचा कायदेशीर असलेला विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांची मुलगी शारदा मधुकर निकुंभे ही शेठ राणुलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालय रांझणी, ता.तळोदा जि.नंदुरबार मध्ये सन 2008-09 या शैक्षणिक वर्षात शेतकी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होती. सदर विद्यालयाने कॉलेजमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. (यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांचेकडून जनता वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी घेतली होती. त्याचा पॉलिसी क्र.230503/47/08/61/0000242 असा आहे. पॉलिसीची मुदत दि.28/08/08 ते दि.27/08/09 असा होता.
तक्रार क्र.241/10
3. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांची मुलगी शारदा हिला रक्तदाबाचा (बी.पी) आजार होता. तिच्यावर धुळे येथील डॉ.मोरे यांचे औषधोपचार चालू होते. तिची तब्येत हळूहळू सुधारत होती. परंतू दि.23/03/09 रोजी तक्रारदार यांची मुलगी शारदा स्टोव्हवर स्वंयपाक करीत असतांना स्टोव्हचा अचानक भडका उडाल्याने ती जळाली व सिव्हील हॉस्पीटल, धुळे येथे औषधोपचार चालू असतांना तिचा दि.07/04/09 रोजी मृत्यु झाला. तक्रारदार यांनी विम्याची रक्कम मिळावी म्हणून विमा कंपनीकडे आवश्यक ती कागदपत्रे पाठविली. परंतू दि.31/03/10 रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून “No Claim due to under the policy exclusion” असे नमुद करुन तक्रारदार यांचा विमा क्लेम नामंजूर केला.
4. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडून विमा पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.07/04/09 पासून 12 टक्के व्याज, शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
5. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.3 वर शपथपत्र, तसेच नि.5 वरील यादीनुसार 7 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यात नि.5/1 वर क्लेम नामंजूर केल्याचे पत्र, नि.5/2 वर डॉ.हिरामण मोरे यांच्या औषधोपचाराची प्रत, नि.5/3 वर खबर, नि.5/4 मृत्यु प्रमाणपत्र, नि.5/5 वर विद्यार्थ्यांची यादी, नि.5/6 वर विमा पॉलिसी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. विमा कंपनीने आपले लेखी म्हणणे नि.11 वर दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी तक्रारदार यांची तक्रार खोटी व बेकायदेशीर आहे. तक्रारदार यांच्या मुलीचा जनता अपघात पॉलिसी विमा होता. परंतू कु.शारदा निकुंभे ही अपघात घडायच्या एक ते दोन महिने पासून सतत आजारी राहत असल्यामुळे व तिचा रक्तदाब हा कमी जास्त होत असल्यामुळे तिचा डॉ.हिरामण मोरे यांचेकडे औषधोपचार चालू होता. दि.23/03/09 रोजी कु.शारदा हीने आजारी असल्यामुळे औषध गोळया घेतलेल्या होत्या. अशा अवस्थेत स्टोव्हवर स्वयंपाक करीत असतांना, स्टोव्हचा भडका होवून 49 टक्के भाजली गेली. परंतू तिचा मृत्यु हा ब्लड प्रेशर कमी जास्त झााल्यामुळे झालेला आहे. हा मृत्यु अपघाती नसून नैसर्गिक असल्यामुळे विमा कंपनी या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही विमा देण्यास जबाबदार नाही असे नमुद करुन तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती केली आहे.
7. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनी यांचा खुलासा व दाखल कागदपत्रांवरुन आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण
तक्रार क्र.241/10
खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
3. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
8. मुद्दा क्र.1- तक्रारदार यांची मुलगी शारदा मधुकर निकुंभे ही शेठ राणुलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालय रांझणी ता.तळोदा या शाळेत शिकत होती. सदर संस्थेने सन 2008-09 साली कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची विमा पॉलिसी घेतली होती. एखाद्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रक्कम रु.1,00,000 ची जोखीम विमा कंपनीने स्वीकारली होती या बद्दल काहीही वाद नाही.
9. तक्रारदार यांच्या म्हणण्या नुसार दि.23.03.2009 रोजी त्यांची मुलगी रात्री घरी स्टोव्हवर स्वयंपाक करत असतांना स्टोव्हचा अचानक भडका उडाला व उपचार घेत असतांना तिचा दि. 07.04.2009 रोजी मृत्यु झाला. कॉलेजने विमा घेतला असल्यामुळे विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवला असता विमा कंपनीने सदर प्रस्ताव नाकारला. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारला आहे व सेवेत त्रुटी केली आहे.
10. विमा कंपनीने आपल्या खुलाशामध्ये कु.शारदा सतत आजारी होती व ती डॉ. मोरे यांच्याकडे औषाधोपचार घेत होती व तिचा मृत्यु हा ब्लडप्रेशर कमी जास्त झाल्यामुळे झालेला आहे त्यामुळे हा मृत्यु अपघाती नसून नैसर्गीक आहे. त्यामुळे विमा कंपनी रक्कम देण्यास जबाबदारी नाही असे म्हटले आहे.
11. वरील परस्पर विरोधी म्हणणे पाहता तक्रारदार यांच्या मुलीचा मृत्यु अपघाती मृत्यु आहे काय हे पाहणे आवश्यक ठरते. तक्रारदार यांनी निशाणी 5 सोबत दाखल केलेल्या कागदकपत्रातील निशाणी नं.5/3 वर खबर ची प्रत आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यात पुढील मजकूर आहे. “ मुलगी शारदा ही घरात स्टोव्हवर स्वयंपाक करीत असतांना स्टोव्हचा अचानक भडका उडाल्याने तिचे अंगावरील कपडयांनी पेट
तक्रार क्र.241/10
घेतल्याने तीस पत्नी सुनंदा हिने लागलीच रिक्शाने सीव्हील हॉस्टपीटल धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार चालू असतांना आज दि. 07.04.2009 रोजी सायंकाळी 6.15 वाजता मयत झाल्याचे डॉक्टर बाफना यांनी घोषीत केलेले आहे.” पोलिस स्टेशन धुळे यांनी आकस्मात मृत्यु रजिष्टर नंबर 15/2009 अन्वये कलम 174 अन्वये गुन्हयाची नोंद केल्याचे दिसून येते.
12. तक्रारदार यांनी पोलिसां समोर दिलेली खबर व पोलिसांनी आकस्मात मृत्यु म्हणून केलेली नोंद पाहता कुमारी शारदा हिचा मृत्यु स्टोव्हचा भडका उडाल्याने झाल्याचे दिसून येते. विमा कंपनीनेही कुमारी शारदा औषधोपचार घेत होती व तिने गोळया घेतल्या होत्या असे म्हटले आहे. यावरुन असा निष्कर्ष निघतो की, कुमारी शारदा हिने ब्लड प्रेशरच्या गोळया घेतल्या होत्या. त्यामुळे ब्लडप्रेशर कमी जास्त होऊन तिचा अपघात झाला असे म्हणता येणार नाही. विमा कंपनीने कुठल्याही पुराव्याचा आधार नसतांना अनुमानाच्या आधारे कु.शारदा हीचे ब्लड प्रेशर कमीजास्त झाल्यामुळे अपघात झाला असे म्हटले आहे.
13. संचिकेत दाखल कागदपत्रावरुन विमेदार कुमारी शारदा हिचा मृत्यु अपघाती मृत्यु होता असे आम्हास वाटते. त्यामुळे विमा कंपनीने विमा दावा नारकारुन सेवेत तृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
14. मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडून विमा पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.07/04/09 पासून 12 टक्के व्याज, शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे. कुमारी शारदा हिचा मृत्यु अपघाती असल्याचे आम्ही मुद्दा क्र.1 मध्ये स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार विमा पॉलिसी नुसार रक्कम रु.1,00,000/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.31/03/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळण्यायास पात्र आहेत. तसेच मानसिक त्राासापोटी रु.3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
15. मुद्दा क्र.3 - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
तक्रार क्र.241/10
2. विरुध्द पक्ष युनायटेड इंडिया इन्शुरन्स इन्शुरन्स कं.लि. यांनी तक्रारदारास रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.31/03/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्ती पासून 30 दिवसाच्या आत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष युनायटेड इंडिया इन्शुरन्स इन्शुरन्स कं.लि. यांनी मानसिक त्रासापोटी रु.3000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2000/- या आदेशाच्या प्राप्ती पासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे