::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 31/10/2017)
तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे मयत पती श्री. मधुकर दामाजी कुळमेथे यांच्या मालकीची मौजा मांगरूड, ता.नागभिड, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. 35 ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व शेतातील उत्पन्नावरच कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. 2 व 3 मार्फत विरूध्द पक्ष क्रं. 1 कडून तक्रारकर्तीचे पतीचा रू.1,00,000/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्तीचे पतीचा दि. 30/05/2011 रोजी बजाज एम 80 या वाहनाने जात असतांना समोरून येणा-या मारूती व्हॅन या वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी होवून अपघाती मृत्यु झाला.
2. तक्रारकर्तीचे पतीचा अपघातात मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीने दि. 9.9.2011 रोजी विरूध्द पक्ष क्रं. 2 कडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी मागणी केलेल्या दस्ताऐवजांची पुर्तता केली. परंतु तक्रारकर्तीने रीतसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक दस्तावेज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्तीचे पतीच्या मृत्युदाव्याबाबत काहीही कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 8/3/2016 रोजी विरूध्द पक्ष क्र.3 यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून विमादाव्याबाबत माहिती मागितली. परंतु गैरअर्जदार क्र.3 यांनी विमा दावा मंजूर वा नामंजूर झाल्याबाबत माहिती न देता केवळ दस्तावेज तक्रारकर्तीला दिले. त्यामुळे तक्रारकर्तीला मंचासमक्ष् तक्रार दाखल करण्याव्यतिरीक्त पर्याय उरला नाही. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-यांच्या कुटूंबाकरीता ही योजना सुरू केली त्या उद्देशालाच विरूध्द पक्ष तडा देत आहे. विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी सदर विमा दावा प्रलंबीत ठेवून तक्रारकर्तीला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, विरूध्द पक्ष यांनी विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर दिनांक 9/9/2011 पासून 18 टक्के द.सा.द.शे. व्याजासह देण्याचे आदेश व्हावे, तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. 30,000/- व तक्रारीचा खर्च रु. 15,000/- विरूध्द पक्ष यांचेकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्रं 1 ते 3 विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 हजर होवून त्यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले. विरूध्द पक्ष क्र. 3 हे मंचाचा नोटीस प्राप्त होवूनही मंचासमक्ष उपस्थीत न झाल्यामुळे दिनांक 09/08/2017 रोजी त्यांचेविरूध्द एकतर्फी कार्यवाहीचा आदेश आदेशपत्रावर पारीत करण्यांत आला.
5. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये नमूद केले आहे की, विमाधारकाचा मृत्यु हा शेतकरी अपघात विमा योजनेनुसार मोटार अपघातात मृत्यु झाला असेल तर प्रथम खबरी, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट, वाहन चालकाचा परवाना हे दस्तावेज जोडून विमादावा दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक 30/5/2011 रोजी अपघातात मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीने दि. 9.9.2011 रोजी विरूध्द पक्ष क्रं. 2 कडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला असे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे. मात्र तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 मार्फत विरूध्द पक्ष 1 कडे मुदतीत संपूर्ण दस्तावेजांसह विमादावा दाखल केल्याचा पुरावा रेकॉर्डवर उपलब्ध नाही. विरूध्द पक्ष क्र.2 कडे तक्रारकर्तीचा अर्ज दिनांक 15/3/2016 रोजी प्राप्त झाला. त्यामुळे तक्रारकर्तीचा दावा मुदतबाहय आहे. विमा करारातील अटींची तक्रारकर्तीने पुर्तता केल्याचा पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही. तसेच विरूध्द पक्ष क्र.2 व 3 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 कडे विमादावा मुदतीत दाखल करूनही त्यावर विरूध्द पक्ष क्र.1 ने निर्णय न घेतल्याचा पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही. याव्यतिरीक्त अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचे पतीजवळ वैध वाहन परवाना नव्हता. त्यामुळे विमा पॉलिसीतील अटी व करारातील तरतुदींनुसार विरूध्द पक्ष यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे.
6. गैरअर्जदार क्रं. 2 ने हजर होवून त्यांनी आपले म्हणणे दाखल केले. त्यामध्ये त्यांनी नमुद केले की, तक्रारकर्तीने दिनांक 14/9/2011 रोजी शेतकरी अपघात विमा बाबतचा सादर केलेला प्रस्ताव तपासून त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांना दिनांक 14/9/2011 रोजी सादर केला व जिल्हा कृषि अधिकारी चंद्रपूर यांनी तो विमा कंपनीला सादर केला. विमा मंजूर करण्याचा अधिकार विरूध्द पक्ष क्र.2 यांना नसून विरूध्द पक्ष क्र.1 यांना आहे. प्रस्तूत प्रकरणी विरूध्द पक्ष क्र.2 चे सेवेत कोणतीही त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार त्यांचेविरूध्द खारीज होण्यांस पात्र आहे.
7. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तसेच विरूध्द पक्ष क्रं 1 व 2 यांचे लेखीउत्तर, वि.प.क्र.1 चे शपथपत्र व लेखी युक्तिवाद, तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. 1 यांची ग्राहक आहे काय ? होय.
(2) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांची ग्राहक आहे काय ? नाही.
(3) प्रस्तूत तक्रार मुदतीत आहे काय ? होय
(4) विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण
सेवा दिली आहे काय ? होय.
(5) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत :-
8. तक्रारकर्तीचे मयत पती श्री. मधुकर दामाजी कुळमेथे यांच्या मालकीची मौजा मांगरूड, ता.नागभिड, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. 35 ही शेतजमीन होती हे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या 7/12 व इतर दस्तावेजावरून सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व महाराष्ट़्र शासनामार्फत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्यांचा विमा विरूध्द पक्ष क्र.1 कडे उतरविण्यात आला होता. तक्रारकर्ती मयत विमाधारकाची पत्नी व वारसदार म्हणून विम्याची लाभधारक आहे व त्यामुळे ती विरूध्द पक्ष क्र.1 ची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत :-
9. विरूध्द पक्ष क्रं. 2 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता विरूध्द पक्ष क्र.2 व 3 ने विना मोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र.2 व 3 यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत :-
10. विरूध्द पक्ष क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी उत्तराचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते की, त्यामध्ये “तक्रारकर्तीने दिनांक 14/9/2011 रोजी शेतकरी अपघात विमा बाबतचा सादर केलेला प्रस्ताव तपासून त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांना दिनांक 14/9/2011 रोजी सादर केला व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चंद्रपूर यांनी तो विमा कंपनीला सादर केला” असे नमूद आहे. तसेच तक्रारकर्तीने माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त केलेल्या दस्तावेजांमध्ये तक्रारकर्तीने वि.प. 2 मार्फत विमादावा दाखल केलेल्या अर्जाची नक्कल प्रत प्रकरणांत दाखल आहे. यावरून तक्रारकर्तीने दिनांक 14 सप्टेंबर 2011 रोजी शेतकरी विमा योजनेअंतर्गत विमादाव्याची रक्कम मिळण्याकरीता विरूध्द पक्ष क्र.2 मार्फत विरूध्द पक्ष क्र.1 यांचेकडे विहीत मुदतीत अर्ज केला होता हे सिध्द होते. विरूध्द पक्ष क्र.1 यांनी सदर अर्जावर निर्णय देउुन तक्रारकर्तीस सुचीत केलेल होते हे दर्शविण्यासाठी कोणताही दस्तावेज व पुरावा दाखल केला नाही. उलटपक्षी तक्रारकर्तीने दिनांक 15/3/2016 रोजी विरूध्द पक्ष क्र.2 यांना माहिती अधिकारांतर्गत अर्ज देऊन सदर दाव्याबाबत विचारणा करुन दस्तावेजाची मागणी केली. परंतु विरुध्द पक्षांनी विमादाव्याबाबत काय निर्णय घेण्यांत आला याबाबत काहीही कळविण्यांत न आल्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 2/11/2016 रोजी मंचासमक्ष प्रस्तूत तक्रार दाखल केली.
मा. राष्ट्रीय आयोगाने New India Assurance Co.Ltd. Vs. Satvinder Kaur & Anr. 2012 (ii) CPJ 413 (NC) या प्रकरणात दिनांक 2/4/2012 रोजी दिलेल्या निवाडयातील Since claim
was not repudiated cause of action subsisted and complaint filed is within limitation .हे न्यायतत्व प्रस्तूत प्रकरणात लागू पडते. प्रस्तूत तक्रारमध्ये सुध्दा विमा कंपनीने तक्रारकर्तीचे विमा दावा अर्जावर अद्याप निर्णय न दिल्यामुळे ती मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 3 व 4 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत :-
11. तक्रारकर्तीचे पती दिनांक 30/5/2011 रोजी बजाज एम 80 या वाहनाने तळोधी ते नागभिड रोडने जात असतांना बसस्थानकासमोर समोरून येणा-या मारूती ओमनी क्र.एमएच 36 एच 48 च्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे अपघात झाला व त्या अपघातात तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु झाला हे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तावेज एफ. आय. आर., इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल यावरून सिध्द होते. तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वि.प.क्र.1 कडून विमादाव्याची रक्कम मिळण्याकरीता सप्टेंबर 2011 मध्ये विरुध्द पक्ष क्रमांक 2 मार्फत अर्ज केला. तसेच विरूध्द पक्ष क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी उत्तराचे अवलोकन केले असता त्यामध्ये, तक्रारकर्तीने दिनांक 14/9/2011 रोजी शेतकरी अपघात विमा बाबतचा सादर केलेला प्रस्ताव तपासून त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांना दिनांक 14/9/2011 रोजी सादर केला व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांनी सदर दावा विमा कंपनीला सादर केला असे नमुद आहे. यावरुन तकारकर्तीने विरुध्द पक्ष क्र. १ कडे सदर शेतकरी विमा अपघात योजने अंतर्गत विमा दावा मिळण्याकरीता अर्ज केला होता हे सिध्द होते. याशिवाय दस्त क्र.6 वर मयत मधुकर यांचा वाहन परवाना दाखल असून त्यामध्ये सदर परवाना दिनांक 21/6/2010 ते दिनांक 14/6/2012 पर्यंत वैध आहे असे नमूद आहे. त्यामुळे विरूध्द पक्षाचे कथन की विमाधारकाजवळ घटनेच्या वेळी वैध वाहन परवाना नव्हता हे ग्राहय धरण्यासारखे नाही. विरूध्द पक्ष क्र.1 ला विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 ने तक्रारकर्तीचा विमा दावा सादर केल्यानंतरही विमा कंपनीने त्यावर कोणताही निर्णय न देवुन तक्रारकर्तीप्रती सेवेत त्रुटी दिली हे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीने विमा कंपनीकडे विमा दावा अर्ज सादर केल्यापासुन विमा कंपनीने तीन महिन्याचे मुदतीत निकाली न काढून प्रलंबीत ठेवल्यामुळे तक्रारकर्तीला शारिरीक व मानसीक त्रास झाला. त्यामुळे तक्रारकर्ती नुकसान-भरपाई मिळण्यांस पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 4 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 5 बाबत :-
12. मुद्दा क्रं. 1 ते 4 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल झाल्याच्या दिनांक 2/11/2016
पासुन तक्रारकर्तीच्या हातात रक्कम पडे पर्यन्त द.सा.द.शे.10 टक्के
व्याजासह, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावी.
(3) विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक
ञासापोटी नुकसान भरपाई रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/-
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावी.
(4) गैरअर्जदार क्रं.2 व 3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 31/10/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) ) ( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष