::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. गैरअर्जदार यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार बाईची मालकीची खास इंडिका विस्टा असुन गाडीचा नोंदणी क्रमांक MH 33 A 4266 आहे. सदर गाडीची विमा पॉलिसी गैरअर्जदार कंपनीकडून अनुदानाने घेतली असून त्यांचा कालावधी दिनांक १२.०१.२०१५ पासून दिनांक ११.०१.२०१६ पर्यंत वैध आहे. सदर गाडीचा चालक म्हणून अमित गंगाधर मेकरतीवार असून त्याचे जवळ गाडी चालविण्याचा वैध परवाना होता. त्याचा वाहन चालक परवाना क्र. २००९००२६०२६ हा आहे. अर्जदाराने रक्कम रु. १३,९७४/- प्रिमीयम भरुन दिनांक १२.०१.२०१५ ते दिनांक ११.०१.२०१६ या कालावधी करीता भरून उपरोक्त कालावधीकरता गैरअर्जदार विमा कंपनीकडून पॉलिसी घेतली आहे. विमा पॉलिसी मध्ये आयडी व्ही म्हणून गाडीची किंमत रक्कम रु. ४,४९,३७६/- दाखवलेली आहे. दिनांक २२.०९.२०१५ रोजी दुपारी १२.३० ते १३.०० च्या दरम्यान करडी ते जोगापुर मेनरोडने जात असतांना बल्लारपुरकडुन येणारी महिन्द्रा कंपनीची बेलोरो गाडी क्र.एम.एच. २९ ए.डी. २७८८ चे चालकाने वाहननिष्काळजीपणे चालवुन गाडीला समोरुन धडक मारुन त्यात बसलेल्या इसमांना जखमी केले. सदर घटनेचा रिपोर्ट गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. सदर अपघातानंतर घटने विषयी माहिती गैरअर्जदारास देण्यात आली तसेच गाडीची बरीच हानी झाल्यामुळे क्षतीग्रस्त झाल्यामुळे गैरअर्जदार यांच्या तोंडी सांगण्यावरून विमा कंपनीच्या व सर्व्हेअरच्या निरीक्षणार्थ व दुरुस्तीसाठी मेसर्स ए.के.गांधी, नागपुर रोड, चंद्रपुर येथे नेण्यात आली. टॅक्स इनवाईस प्रमाणे रक्कम रु. ३,२८,४३४/- दुरुस्ती पोटी अर्जदाराकडून नगदी देण्यात आले. गैरअर्जदार विमा कंपनीच्या सर्व्हेअरने क्षतीग्रस्त गाडीचे निरीक्षण करून छायाचित्र घेतले होते. अर्जदाराने गैरअर्जदाराला सर्व कागदपत्रांसह दावा अर्ज भरून व वाहन चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्याच्या छायांकित प्रत जोडून विमा पॉलिसीच्या छायांकित प्रतीसह मागणीपत्र सादर करून बराच कालावधी लोटला तरी गैरअर्जदारांनी विमाकृत असलेल्या अर्जदाराच्या क्षतिग्रस्त गाडीची भरपाई देण्यात आलेली नाही. गैरअर्जदाराच्या सर्व्हेअर यांच्या सांगण्यानुसार अर्जदाराच्या गाडीचे संपुर्ण नुकसान झालेले आहे. सबब अर्जदाराची क्षतिग्रस्त कार्य दुरुस्त करणे अव्यवहार्य आहे. अर्जदाराने गाडीची किंमत विमा पॉलिसी काढतांना गैरअर्जदार विमा कंपनीच्या सांगण्यावरून रक्कम रु. ३,२८,४३४/- अशी दर्शवलेली आहे. परंतु वास्तविक अर्जदाराला रक्कम रु. ४,७५,४३४/- एवढी रक्कम गैरअर्जदाराकडून मिळणे आवश्यक आहे. गैरअर्जदारांनी अर्जदाराचा विमा दावा ९० दिवसांच्या आत निकाली काढणे अनिवार्य होते. परंतु गैरअर्जदाराने अर्जदारा प्रती अनुचित सेवा पद्धतीचा अवलंब केलेला असून सेवेत न्यूनता दिली आहे दिली असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार यांनी केलेली कृती ही सेवेत त्रुटी व अनुचित व्यापारी पद्धतीचा अवलंब केलेला आहे, असे घोषित करण्यात यावे तसेच अर्जदाराला गैरअर्जदार विमा कंपनी यांनी रक्कम रु. ४,७५,४३४/- द्यावे किंवा नवीन इंडिका विस्टा कार देण्यात यावी असा आदेश पारित करावा तसेच गोंडपिपरी वरून क्षतिग्रस्त गाडी चंद्रपुर येथे आणण्याकरीता रक्कम रु. ५,०००/- अर्जदाराने खर्च केल्यामुळे ती रक्कम गैरअर्जदाराने अर्जदाराला द्यावी तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी अर्जदाराला गैरअर्जदाराने रक्कम रु. १,२०,०००/- देण्यात यावे व तक्रारीचा खर्च रक्कम रु. ३०,०००/-अर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा तसेच सर्व वरील सर्व रक्कमेवर द.सा.द.शे. १८% अपघाताच्या दिनांकापासून व्याज देण्यात यावे, अशी मागणी अर्जदाराने तक्रारीत केली आहे .
३. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदाराला नोटीस पाठविण्यात आले. गैरअर्जदाराने वकिला मार्फत तक्रारीत उपस्थित राहुन त्यांचे लेखी उत्तर दाखल करुन अर्जदारांनी केलेले आरोप नाकबुल करुन पुढे कथन केले की गैरअर्जदार यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता असे लक्षात आले कि, सदर अपघाताची काही कागदपत्रे पोलीस स्टेशन अधिकारी, गोंडपिपरी यांनी योग्यप्रकारे शहानिशा न करुन त्या कागदपत्रावर मोहोर मारलेली नव्हती. त्यामुळे हा प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलीस स्टेशन, गोंडपिपरी यांचे कडुन सदर कागदपत्राची प्रमाणीत प्रत घ्यावी लागली. या सर्व प्रकरणात अर्जदारांचा दावा देण्यात वेळ झाला परंतु त्यानंतर रक्कम रु. २,३४,०००/- खर्च मंजूर करून अर्जदाराच्या बँकेत सदर रक्कम जमा करण्यात आली. सबब गैरअर्जदारावर कोणतीही जबाबदारी नाही. सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी. अशी विनंती गैरअर्जदारांनी केली आहे.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी अतिरिक्त युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी विमा कराराप्रमाणे सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार
सिद्ध करतात काय ? नाही
२. गैरअर्जदार नुकसान भरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश ? अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :-
५. अर्जदार बाईची मालकीची इंडिका विस्टा असुन गाडीचा नोंदणी क्रमांक MH 33 – A - 4266 आहे. सदर गाडीची विमा पॉलिसी अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून घेतली असून त्यांचा कालावधी दिनांक १२.०१.२०१५ पासून दिनांक ११.०१.२०१६ पर्यंत वैध आहे. अर्जदाराने रक्कम रु. १३,९७४/- प्रिमीयम भरलेले आहे ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. अर्जदारांनी वादातील गाडीचा अपघात झाल्यानंतर गैरअर्जदाराकडे विमा प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार सर्व्हेअर अहवालानुसार गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या खात्यामध्ये रक्कम रु. २,३४,०००/- जमा केली ही बाब अर्जदाराला मान्य आहे. परंतु सदर रक्कम अर्जदाराला पूर्णपणे मान्य नाही असे अर्जदाराने शपथपत्रात नमूद केलेले असून अतिरिक्त युक्तिवादात सुद्धा पहिल्यांदा कथन केले आहे कि, सदर क्षतिग्रस्त गाडी दुरुस्त करताना कार्यशाळा व्यवस्थापक यांनी गाडीच्या सुट्या भागाच्या किंमतीमध्ये २१% भाव वाढल्याचे सांगितले. त्यामुळे गाडी दुरुस्ती करीता जास्तीचा खर्च झाला आहे. परंतु ही बाब अर्जदाराने त्यांच्या तक्रारीत किंवा शपथपत्रात कुठेही नमूद केलेले नाही. जर अर्जदाराला गाडीच्या सुटे भागासाठी अतिरिक्त खर्च झाला असेल तर सदर बाबीची माहिती अर्जदाराने गैरअर्जदारास दिल्याबद्दल अर्जदाराने कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सबब, गैरअर्जदाराने अर्जदाराला सर्व्हेअरच्या अहवालानुसार योग्य ती नुकसान भरपाई दिलेली असून ती रक्कम अर्जदाराने स्विकारलेली असल्यामुळे अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामधील करार संपुष्टात आला आहे. सबब मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र. ३ बाबत :-
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ८७/२०१६ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाही.
३. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती.किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)