(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 26 फेब्रूवारी 2014)
तक्रारकर्ती हिने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ता क्र.1 पत्नी आणि 2 व 3 हे स्वर्गीय जिआउद्दीन फकरुद्दीन शेख यांची मुले आहेत. तक्रारकर्ती हीचे पतीने गैरअर्जदार क्र.1 कडून गैरअर्जदार क्र.3 मार्फत वैयक्तीक अपघात विमापञ खरेदी केले. त्याचा क्र.060600/42/10/05/00000326, आश्वासीत विमा रक्कम रुपये 1,25,000/-, विमा कालावधी दि.6.4.2010 ते 5.4.2014 होता. मृतक जिआउद्दीन फकरुद्दीन शेख यांचा दि.14.6.2010 रोजी मोटार सायकलने अपघात झाला. सदर अपघातात डोक्यास जबर दुखापत झाल्याने दि.4.12.2010 रोजी त्यांचा मृत्यु झाला. गैरअर्जदार क्र.3 ने सांगितल्याप्रमाणे अर्जदाराने सर्व मुळ दस्ताऐवज त्याचे सुपूर्द केले. तसेच, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे आवश्यक कागदपञाची पुर्तता केले व दि.27.11.2012 रोजी तारेने कळविलेले आहे. परंतु, गैरअर्जदार अर्जदारास विमापञाचा लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहे. विम्याची रक्कम न दिल्याने गैरअर्जदाराची कृती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1)(r) नुसार अनुचीत व्यापार प्रथेत मोडते. गैरअर्जदारांची सदरची कृती ही दोषपूर्ण सेवा, निष्काळजीपणा, जाणीवपूर्वक ञास देणे व कारणाशिवाय रक्कम रोखून धरणे या सदरात मोडते. तक्रारकर्त्यांना नाईलाजाने विद्यमान मंचाकडे तक्रार करावी लागली. त्यामुळे, तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून रुपये 1,25,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह, तसेच मानसिक, शारीरिक व आर्थीक नुकसानीपोटी रुपये 25,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- मिळण्याकरीता प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.7 नुसार 16 दस्ताऐवज व नि.क्र.26 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.18 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.18 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात अर्जदाराची बहूतांश तक्रार अमान्य केली आहे. गैरअर्जदारातर्फे कोणत्याही प्रकारची अनुचीत व्यापार पध्दती अवलंबिण्यात आलेली नाही किंवा सेवेमध्ये ञुटी केली नाही. त्यामुळे सर्व आरोप अमान्य व नाकबूल आहे. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार स्वतःचे मोटार सायकलवर जात असतांना त्याचे मोटार सायकलला संजयसिंग गेदासिंग चंदेल याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल हयगयीने वेगाने निष्काळजीपणाने चालवून मृतक जिआउद्दीन यास खाली पडून जखमी केले व तो मरण पावला. सदर तक्रारीमध्ये संजयसिंग चंदेल व त्याच्या मोटार सायकलची विमा कंपनी यांना गैरअर्जदार म्हणून पार्टी करणे आवश्यक होते. परंतु, नॉन जॉईन्डर ऑफ नेसेसरी पार्टी सदराखाली तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. मृतक जिआउद्दीन शेख यांचेजवळ मोटार सायकल चालविण्याचा वैध परवाना नव्हता. त्यामुळे त्याने मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केले आहे. तसेच पोष्टमार्टम रिपोर्टमध्ये हेड इन्ज्युरी मृत्यु एकमेव कारण आहे. मृतकाने विना वैध मोटार वाहन परवाना तसेच हेल्मेटचा वापर न करता मोटार वाहनाचा उपयोग करुन कायद्याचा भंग केला, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने क्लेम मंजूर केला नाही. अर्जदारानी केलेली नुकसान भरपाईची मागणी गैरवाजवी अवास्तव व बेकायदेशिर आहे. मृतकाचा अपघात झाल्याबरोबर विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे 24 तासाच्या आत दुर्घटनेबद्दल व अपघाताबद्दल माहिती कळविण्याची जबाबदारी अर्जदारांवर होती ती त्यांनी पार पाडलेली नाही. पॉलिसीच्या तरतुदीप्रमाणे सेक्शन 1 मध्ये अपघाती मृत्युसाठी रुपये 1,00,000/- प्राविधान आहे, तसेच सेक्शन 2 मध्ये अपघातानंतर औषधोपचारासाठी लागलेल्या खर्चापोटी रुपये 25,000/- प्राविधान आहे. मृतक जियाउद्दीन यांचा अपघात दि.14.6.2010 रोजी मोटार सायकलने जाताना झाला. विमा पॉलिसीच्या इतर तरतुदी नामनिर्देशन आदीचा विचार करुनच दावा फेटाळण्यात आला. मृतक जिआउद्दीन यांचा मृत्यु दि.4.12.2010 ला झाला, जवळपास 6 महिण्यानंतर झालेला मृत्यु हा अपघाती मृत्यु नसून नैसर्गीक मृत्यु होता. अर्जदाराने मृतक जिआउद्दीन हा दि.4.12.2010 पर्यंत दवाखाण्यात असल्याचे दर्शविणारे औषधोपचाराचे कागदपञ दाखल केले नाही, म्हणजेच त्याचा मोटार सायकलने झालेल्या अपघातामुळे मृत्यु झाला हे म्हणणे असत्य आहे. अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 कडून नुकसान भरपाई मागण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. गैरअर्जदाराने सेवेत कुठल्याही प्रकारे ञुटी व न्युनता ठेवलेली नाही. सबब दावा खारीज करावा अशी विनंती केली.
4. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि.क्र.22 नुसार प्रतीउत्तर, नि.क्र.26 नुसार 3 दस्ताऐवज, नि.क्र.29 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.23 नुसार रिजॉईन्डर दाखल केले. अर्जदाराने नि.क्र.30 नुसार लेखी युक्तीवाद व नि.क्र.31 नुसार 6 मुळ दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.24 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : नाही.
केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : नाही.
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी नि.क्र.7 वरील दस्त क्र.9 राशन कार्ड दाखल केलेले आहे व त्याचेमध्ये तक्रारदार क्र.1, 2 व 3 यांचे नांव नोंदविले आहे असे दिसून येते. त्या राशनकार्ड मध्ये मय्यत जिआउद्दीन फकरुद्दीन शेख यांचे नांव सुध्दा नोंदविलेले आहे, म्हणून अर्जदार हे मय्यत जिआउद्दीन फकरुद्दीन शेख चे वारसदार आहे असे सिध्द होते. मय्यत जिआउद्दीन फकरुद्दीन शेख यांनी गैरअर्जदार क्र.1 कडून गैरअर्जदार क्र.3 मार्फत व्यक्तीगत अपघात विमापञ खरेदी केलेले होते व अर्जदार हे मय्यतचे वारसदार असून गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 चे ग्राहक आहे असे सिध्द होते, म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. अर्जदाराने नि.क्र.7 वरील दस्त क्र.5 विमा पॉलिसी क्र.060600/42/10/ 05/00000326 चे छायाप्रत दाखल केलेले आहेत. सदर विमा पॉलिसी ही गैरअर्जदार क्र.1 च्या कंपनीची आहे यासंदर्भात अर्जदार व गैरअर्जदारांचा कोणताही वाद नाही. सदर पॉलिसीची पडताळणी करतांना असे दिसून आले की, पॉलिसीमध्ये नॉमिनीचे नांव Najmunnsha Jiyaudeen shaikh आणि नातेसंबंध पत्नी म्हणून नोंदविलेले आहे. सदर बाबी बाबत आक्षेप घेतांना गैरअर्जदाराने नॉमिनीचे क्लॉजमध्ये अर्जदाराचे नांव नोंदविलेले नाही म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नाकारलेला आहे. अर्जदाराने त्याच्या अर्जामध्ये व तोंडी युक्तीवादात असे सांगीतले की, सदर पॉलिसीमध्ये चुकीने आईचे नांव नॉमिनी म्हणून नोंदविलेले आहे. अर्जदाराने दाखल केलेले प्रमाणपञ दस्तावेज नि.क्र.32(3) वरील पडताळणी करतांना असे दिसून आले की, मय्यत जिआउद्दीन फकरुद्दीन शेख चे आईचे नांव ‘‘नजमुन्नीसा फकरुद्दीन शेख’’ असे आहे. सदर प्रमाणपञाप्रमाणे मय्यत श्री जिआउद्दीन फकरुद्दीन शेख याचे आईचे नांव ‘‘नजमुन्नीसा फकरुद्दीन शेख’’ आहे असे सिध्द होते. सदर विमा पॉलिसीमधील नॉमिनीचे नांव व प्रमाणपञामधील असलेल्या नावात फरक आहे, म्हणून अर्जदाराच्या कथनाप्रमाणे पॉलिसीमध्ये चुकीने नॉमिनी क्लॉजमध्ये मय्यतचे पत्नीचे नांवा ऐवजी आईचे नांव नोंदविल्या गेले आहे हे म्हणणे मंचाच्या मताप्रमाणे विचारात घेण्यासारखे नाही. वरील कारणामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा क्लेम नाकारुन कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही असे सिध्द होते आणि अर्जदार गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यास पाञ नाही, म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-26/2/2014