जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 88/2011 तक्रार दाखल तारीख- 01/07/2011
श्री.विलास पि.विश्वनाथ डावकर,
वय – 55 वर्ष, धंदा – शेती व नौकरी
रा.मु.पो.मौज, ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. युनायटेड इंडिया इंश्यरन्स कंपनी लि.मुंबई,
द्वारा – व्यवस्थापक, तथा शाखाधिकारी
युनायटेड इंडिया इंश्यरन्स कंपनी लि.बीड ता.जि.बीड
2. कबाल इंश्युरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
राज अपार्टमेंट,जी सेक्टर प्लॉट नं.29 रिलायन्स
फ्रेशच्या पाठीमागे, टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद
3. तालूका कृषि अधिकारी, बीड ता.जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – आर.जे.करांडे,
सामनेवाले1तर्फे – वकील – व्ही.एस.जाधव,
सामनेवाले2तर्फे – वकील – स्वत:,
सामनेवाले3तर्फे – वकील – प्रतिनिधी
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा ता.जि.बीड येथील रहिवाशी असुन त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तक्रारदाराची मयत पत्नी ही शेतकरी असुन तीचे नावे गट क्रं.333 मध्ये 1 हेक्टर 20 आर व गट क्र.343 मध्ये 37 आर एवढी जमीन मृत्यू समयी होती. तक्रारदाराची मयत पत्नी ही दि.30.9.2009 रोजी विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेली असता, पाण्यात बुडून मरण पावली. तीचा पिंपळनेर ता.जि.बीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र.28/2009 नुसार नोंदविण्यात आला. त्यात सीआरपीसी 174 नुसार अकास्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. तक्रारदाराचे मयत पत्नीचा वैधकीय श्वविच्छेदन अहवालात Death due to drawing असे नमुद केले आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.31.12.2010 रोजी तक्रारदाराची मयत पत्नीने आत्महात्या केले असे पत्र देवून तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने मयत पत्नीचा शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- सामनेवाले क्रं.1 याचेकडून द.सा.द.शे.15 टक्के व्याजासह, मानसिक, आर्थीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने त्याचे लेखी म्हणणेचे पुष्ठयार्थ एकुण 22 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.3 यांनी आपले लेखी म्हणणे दि.25.8.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा 5.2.2010 रोजी जावक क्रं.326 नुसार कार्यालयास प्राप्त झाला. सदर प्रस्ताव हा दि.23.02.2010 रोजी सामनेवाले नं.2 यांना प्राप्त झाला, असे म्हंटले आहे.
सामनेवाले नं.2 यानी आपले लेखी म्हणणे दि.29.8.2011 रोजी दाखल केले असुन त्यात त्यांनी सामनेवाले नं.1 यांनी दि.31.12.2010 रोजी विमा नाकारला असे म्हंटले आहे.
सामनेवाले नं. 1 यानी आपले लेखी म्हणणे दि.4.10.2011 रोजी दाखल केले असुन त्यात त्यांनी दि.31.12.2010 रोजी तक्रारदारास त्यांची मयत पत्नीने आत्माहात्या केल्यामुळे आपला प्रस्ताव नामंजूर केला आहे, असे म्हंटले आहे.
सामनेवले नं.1 ते 3 यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केली नाहीत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे, दोघांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
तक्रारदारानी दाखल केलेला पोलीस पंचनामा यात पहिल्या पानावरील मुद्द नं.4 मध्ये आत्महात्या असे वर्णन आले आहे. मुद्दा नं.6 मध्ये विहिरीत पडून मृत्यू. विहिर ही काठोकाट भरलेली दिसत असुन पाणी घेण्याची जागा घसरती दिसत आहे, असा उल्लेख परिच्छेत क्रं.8 मध्ये दिसून येतो. सीआरपीसी 174 नुसार झालेल्या निष्पणात तक्रारदाराची मयत पत्नी ही सायंकाळी पाणी पिण्यास गेली असता, पाण्यात बुडून मरण पावली असा निष्कर्ष काढला आहे. तसेच वैद्यकीय श्वविच्छेदन आहवालानुसार Death due to drawing असे म्हंटले आहे. यावर सामनेवले यांनी कोणताही आधिक पुरावा तक्रारदाराची मयत पत्नीने आत्महात्या केली आहे, हे सिध्द करण्यासाठी आवश्यक असणारा भारतीय पुरावा कायदयानुसार योग्य पुरावे या न्यायमंचा समोर सादर केले नाहीत. त्यामुळे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराच्या मयत पत्नीचा शेतकरी आपघात विम्याची रक्कम न देवून सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराच्या मयत पत्नीचा शेतकरी आपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा करावेत.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्रं.2 चे पालन मुदतीत न केल्यास सदर रक्कमेवर दि.31.12.2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड