जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 473/2006
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-20/09/2006.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 06/08/2013.
श्री.नरेश गोपाल नरवाडे,
उ.व.सज्ञान, धंदाः गाडीमालक,
रा.रामदेवजी बाबा नगर, मु.पो.पारोळा,
ता.पारोळा,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
ब्रँच मॅनेजर,
युनायटेड इंडीया कंपनी लि,
जळगांव कार्यालय 28, हरेश्वर नगर,
रिंगरोड, मु.पो.ता.जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.संदीप पंडीतराव कापसे वकील.
विरुध्द पक्ष तर्फे श्री.एस.बी.अग्रवाल वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः अपघात विमा नुकसान भरपाई मिळाली नसल्याने तक्रारदाराने व्यथीत होऊन या मंचासमोर तक्रार अर्ज दाखल केला असुन सोबत विलंब माफ होऊन मिळणे बाबत विनंती अर्ज दाखल केला आहे. सदर विलंब माफीच्या अर्जावर तत्कालीन मंचाने दि.26/09/2006 रोजी आदेश पारीत करुन तक्रारदाराचा विलंब माफ केला होता., सदर तत्कालीन मंचाचे आदेशावर नाराज होऊन विरुध्द पक्ष यांनी मा.राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेले रिव्हीजन पिटीशन क्र.33/2007 मध्ये दि.25/06/2008 रोजी अंतीम आदेश पारीत करुन विरुध्द पक्षास विलंब माफीचे अर्जावर म्हणणे दाखल करण्याची संधी देऊन सदर विलंब माफीचा अर्ज नव्याने निकाली काढणेबाबत आदेश पारीत केले. त्यानुसार तक्रारदाराचे विलंब माफीचे अर्जावर या मंचासमोर कामकाज चालले. 2. तक्रारदार यांची विलंब माफीचे अर्जातील थोडक्यात हकीकत अशी तक्रार आहे की, तक्रारदार हे माल वाहतुकीचा व्यवसाय मालट्रक वाहन क्र.एम.एच.19/5344 या वाहनातुन करतात. सदर वाहनाचा विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे विमा पॉलीसी क्र.8164/99 अन्वये विमा उतरविला होता. सदर विमाकृत वाहनास दि.13/11/2000 रोजी मौजे झोडगे, ता.मालेगांव,जि.नाशिक येथे अपघात झाला. अपघातातील नुकसानीची विरुध्द पक्षाकडे रितसर अर्ज करुन मागणी केली असता विरुध्द पक्षाकडुन सन 2005 पावेतो कुठलाही खुलासा आला नाही म्हणुन तक्रारदाराने दि.25/07/2005 रोजी विरुध्द पक्ष विमा कंपनीस नोटीस दिली. सदर नोटीसीस विरुध्द पक्षाने दि.6/08/2005 रोजी उत्तर देऊन नुकसान भरपाई देण्यास स्पष्टपणे नकार दिला. विरुध्द पक्ष विमा कंपनीने सन 2005 पावेतो कुठलाही खुलासा न केल्याने तक्रारदारास दि.25/07/2005 रोजी नोटीस पाठवावी लागली व त्याचे उत्तर दि.6/8/2005 रोजी विरुध्द पक्षाकडुन तक्रारदारास मिळाले त्यावेळेस सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यास कारण घडले. तक्रारदाराने सदरचा अर्ज मुदतीत दाखल केला असुन कुठलीही तांत्रीक अडचण राहु नये म्हणुन सोबत विलंब माफीचा अर्ज सादर करीत आहे. सबब विनंती की, तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज मंजुर करावा व झालेला तांत्रीक विलंब माफ करावा, तक्रारदाराचे अर्जास नंबर लावण्यात यावा व तक्रारदाराचे हिताचे निर्णय व्हावे अशी विनंती तक्रारदाराने प्रस्तुत विलंब माफीचे अर्जातुन केली आहे.
3. तक्रारदाराचे विलंब माफीचे अर्जावर मा.राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार विरुध्द पक्षास म्हणणे मांडणेकामी संधी देण्यात आली. विरुध्द पक्ष विमा कंपनीने याकामी हजर होऊन तक्रारदाराचे विलंब माफीचे अर्जावर लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.
4. तक्रारदाराने विलंब माफीचे अर्जात दिलेली सर्व कारणे खरी व योग्य नसल्याने ती विरुध्द पक्षास मान्य नाहीत. तक्रारदाराने विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे दि.14/11/2000 रोजी वाहन क्र.एम.एच.19/ 5344 चा विमा क्लेम दाखल केला. सदर क्लेम संदर्भात कागदपत्रांची मागणी विरुध्द पक्ष विमा कंपनीचे जळगांव कार्यालयाने दि.23/02/2001 रोजीचे पत्रानुसार केली. सदरचे पत्र तक्रारदारास प्राप्त होऊन देखील त्याने कागदपत्रांची कोणतीही पुर्तता केली नसल्याने तक्रारदारास विमा कंपनीने दुसरे पत्र दि.21/03/2001 रोजी पाठवुन सात दिवसाचे आंत जर कागदपत्रांची पुर्तता तक्रारदाराने न केल्यास तक्रारदाराचा क्लेम नो-क्लेम होईल असे स्पष्टपणे कळविले. तक्रारदारास विमा कंपनीचे सदरचे दुसरे पत्र प्राप्त होऊन देखील त्याने विमा कंपनीस कोणतीही कागदपत्रे दिलेल्या मुदतीत न दिल्याने तक्रारदाराचा क्लेम नो-क्लेम केला. तक्रारदारास योग्य त्या कागदपत्रांची पुर्तता विरुध्द पक्षाकडे न केल्याने त्याचा क्लेम नो-क्लेम केल्याची बाब माहिती असल्यामुळे त्याने विरुध्द पक्ष विमा कंपनीस दि.26/12/2001 रोजी पत्र लिहुन त्याची फाईल पुन्हा नव्याने ओपन करण्याची विनंती केली. अशा प्रकारे वस्तुस्थिती असतांनाही तक्रारदाराने विरुध्द पक्षास वकीलामार्फत नोटीस पाठवुन त्याचा विलंब माफीचा कालावधी नियमीत करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तक्रारदाराने विलंब माफी बाबत कोणतीही महत्वाची बाब समोर आणली नाही. केवळ नोटीस पाठवुन झालेला विलंब माफ करता येणार नाही. तक्रारदाराने घटना घडल्यापासुन दोन वर्षाच्या आंत म्हणजे दि.21/03/2001 पासुन दोन वर्षाचे आंत तक्रार दाखल करणे क्रमप्राप्त होते तथापी तक्रारदाराने माहे सप्टेंबर,2006 मध्ये प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे त्यास मुदतीची बाधा येत आहे. तक्रारदाराने मुदत माफी साठी कोणतीही कायदेशीर व सक्षम कारणे दिलेली नाहीत. तक्रारदार हा स्वच्छ हाताने या मंचासमोर आलेला नाही. सबब तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज फेटाळण्यात यावा व तक्रारदाराकडुन योग्य ती भरपाई विरुध्द पक्षास मिळावी अशी विनंती विरुध्द पक्ष विमा कंपनीने केलेली आहे.
4. तक्रारदार यांचा विलंब माफीचा अर्ज, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष विमा कंपनीचे लेखी म्हणणे तसेच विरुध्द पक्षाचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) तक्रारदार हा विलंब माफ होऊन मिळण्यास पात्र
आहे किंवा कसे? नाही.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
5. मुद्या क्र.1 - तक्रारदाराचे विलंब माफीचे अर्जावर युक्तीवादाकरिता तक्रारदारास या मंचाने पुरेशी संधी दिली. तक्रारदार याकामी सतत गैरहजर असल्याने मंचाने तक्रारदारास विलंब माफीचे सुनावणीची तारीख या मंचाचे पत्र जा.क्र.829/2013 दि.21/06/2013 अन्वये रजिष्ट्रर पोष्टाने कळवुनही तक्रारदार हे विलंब माफीचे अर्जावरील सुनावणीचे तारखेस गैहजर, विरुध्द पक्षाचे वकीलांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराचे विलंब माफीचे अर्जावरुन तक्रारदारास एकुण 46 महीन्यांचा विलंब झाल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदारास दि.23/02/2001 व दि.21/03/2001 रोजी लेखी पत्र पाठवुन आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याबाबत कळविले होते हे नि.क्र.14 लगत दाखल कागदपत्र यादीवरुन व पत्रांचे स्थळप्रतीवरुन स्पष्ट होते. सदरची पत्र विमा कंपनीने तक्रारदारास रजिष्ट्रर पोष्टाने पाठविल्याबाबतची पोष्टाची पावती व तक्रारदारास पत्र मिळाल्याची पोहोच पावती असे कागदपत्रही सोबत दाखल केलेले आहेत. तक्रारदाराने योग्य त्या कागदपत्रांची पुर्तता विरुध्द पक्षाकडे न केल्याने त्याचा क्लेम नो-क्लेम केल्याची बाब माहिती असल्यामुळे त्याने विरुध्द पक्ष विमा कंपनीस दि.26/12/2001 रोजी पत्र लिहुन त्याची फाईल पुन्हा नव्याने ओपन करण्याची विनंती केली असल्याचे नि.क्र.14 लगत दाखल तक्रारदाराचे स्वाक्षरीतील पत्राची मुळ प्रत विरुध्द पक्षाने दाखल केली आहे.
6. उपरोक्त एकंदर विवेचन विचारात घेता तक्रारदाराने त्याची तक्रार दाखल करण्याकामी झालेला 46 महीन्यांचा विलंब हा नेमका कशामुळे झाला याचा सर्मपक व कायदेशीररित्या योग्य असा खुलासा योग्य त्या कागदोपत्री पुराव्यानिशी या मंचासमोर शाबीत केलेला नाही. उलटपक्षी विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदारास वेळोवेळी क्लेम बाबत कागदपत्रे दाखल करण्याचे कळवुनही त्याने त्याची दखल न घेतल्याने त्याचा विमा क्लेम नो-क्लेम केल्याची वस्तुस्थिती या मंचासमोर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यानिशी शाबीत केलेली आहे. या एकंदर परिस्थितीवरुन तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज फेटाळण्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज आम्ही फेटाळत असल्याने तक्रारदाराच्या मुळ तक्रार अर्जावर कोणतेही भाष्य न करता आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा विलंब माफीचा अर्ज फेटाळण्यात येतो. ( ब ) तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज या मंचाने फेटाळला असल्याने तक्रारदाराची या मंचासमोर दाखल असलेली ग्राहक तक्रार क्र.473/2006 काढुन टाकण्यात येते.
( क ) उभय पक्षाने आपला खर्च आपण सोसावा.
ज ळ गा व
दिनांकः- 06/08/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.