- निकालपञ -
(मंचाचे निर्णयान्वये, मा. श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 जानेवारी 2016)
अर्जदार यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराचे पती मयत किसनचा दिनांक 7.3.2014 ला नागपूर येथील होप हॉस्पीटलमध्ये मृत्यु झाला. सदरहू मृत्यु हा मयत किसन हे त्यांच्या राहत्या घराचे स्लॅबवरुन अचानक पाय घसरुन कोरड्या विहिरीत पडले त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने ते मरण पावले. सदरचा मृत्यु अकस्मात मृत्यु म्हणून रजिस्टरला नोंद करण्यात आली. मतकाचे नावे विमा पॉलिसी असल्यामुळे एल.आय.सी. च्या सेवा मिळण्यास मृतक आणि त्याची पत्नी ही पाञ आहे. मृतकाचे नावे विमा पॉलिसी क्रमांक 230104/47/09/51/00000374 ही रुपये 1,00,000/- ची व त्या पॉलिसीचे प्रिमीयम नियमीत भरीत असून त्याचा कार्यकाळ 21.12.2009 ते 20..12.2014 पर्यंत होता. मृतक किसनचा मृत्यु हा सदरहू पॉलिसीच्या कार्यकाळातच झाला. त्यामुळे, मृतक किसनच्या मृत्युपश्चात अर्जदाराने पॉलिसीची रक्कम मिळण्याकरीता लागणारे कागदपञे गैरअर्जदार कंपनीस सादर केली. गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 22.9.2015 रोजी पञ पाठवून अर्जदाराचे पती हे रोजच दारु पिणारे असल्यामुळे गैरअर्जदार हे वैयक्तीक जनता अपघात विमा दावा मंजूर करण्यास असमर्थ आहे व पुढे अर्जदारास पॉलिसीची रक्कम हवी असेल तर त्यांनी होप होस्पीटल नागपूर येथून अर्जदाराचे पती घटनेच्या वेळी दारु पिवून होते की नाही याबद्दलचे प्रमाणपञ आणण्यास सांगीतले. दिनांक 8.3.2014 च्या मयत किसनच्या पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार मयत दारु पिऊन असता तर त्यामध्ये तशी नोंद झाली असती. परंतु, गैरअर्जदारानी पोस्टमार्टम रिपोर्ट न वाचताच आणि ग्राह्य न धरता अर्जदाराचा दावा मंजून न झाल्याचे पञ पाठविले आणि काहीही कारण नसतांना विमा दावा खारीज करण्याची धमकी दिली. विमा पॉलिसीची रक्कम आपल्याला मिळणार नाही असे लक्षात आल्यानंतर मा.मंचाकडे न्यायासाठी तक्रार अर्ज दाखल करावा लागत आहे.
2. अर्जदारास विमा पॉलिसीची रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार कंपनीकडून मिळावे, तसेच गैरअर्जदाराकडून अर्जदारास झालेल्या शारिरीक, मानसिक ञासापोटी खर्च मिळावा व अर्जाचा खर्च मिळावा अशी प्रार्थना केली.
3. अर्जदाराने नि.क्र.3 नुसार 10 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.9 नुसार लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने त्याचे लेखी कथनात असे कथन केले आहे की, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदाराविरुध्द चुकीचे आरोप लावले होते. सदर तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण नसतांना खारीज होण्यास पाञ आहे, कारण अर्जदाराने दाखल केलेला विमा दावा गैरअर्जदाराकडे प्रलंबीत आहे त्यावर कोणताही निर्णय गैरअर्जदार कंपनीने घेतलेले नाही. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, मय्यत यांनी अपघाताचे दिवशी दारु व्यसन केले होते व त्या व्यसनामुळे त्याचा पडून मृत्यु झाले. मयत यांनी गैरअर्जदार कंपनीकडून कडून घेतलेली इंशुरन्स विमा शर्ती व अटी भंग केलेली आहे म्हणून अर्जदाराने दाखल दावा खारीज होण्यास पाञ आहे. सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.8 नुसार अर्जदाराने दाखल केलेली तक्रार हेच शपथपञ व लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. गैरअर्जदाराने नि.क्र.10 नुसार गैरअर्जदाराने दाखल केलेले लेखीउत्तर हेच शपथपञ व लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार, लेखी बयान, दस्ताऐवज व दोन्ही पक्षाचे तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराचे मयत पती श्री किसन निंबाजी मदनकर यांनी गैरअर्जदाराकडून व्यक्तीगत जनता अपघात विमा काढला होता ही बाब अर्जदार व गैरअर्जदारदोन्ही पक्षांना मान्य आहे तसेच अर्जदार ही मय्यताची पत्नी असून मयतने काढलेले विमा पॉलिसीची लाभार्थी असल्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने नि.क्र.3 वर गैरअर्जदाराने अर्जदारास पाठविलेले पञ दिनांक 22.1.2015 ची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदाराने अर्जदाराने दाखल केलेला विमा दावा निर्णय घेण्या संदर्भात असे कथन केले आहे की, अर्जदाराचे पती अपघाताचे दिवशी नशा-पाणी केले होते त्यामुळे अर्जदाराचा दावा मंजूर करण्यास गैरअर्जदार असमर्थ आहे. अर्जदाराव्दारे दाखल नि.क्र.2 वर दस्त क्रमांक 6, 7 व 8 ची पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदाराचे मृत्युचे कारण डोक्याला मार लागल्यामुळे झालेले आहे. त्यात पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अर्जदाराचे पती अपघातावेळी दारु पिऊन होते याबाबत कोणताही उल्लेख नाही, तरीसुध्दा गैरअर्जदाराचे कंपनीने अर्जदाराचे पतीला नशापाणी करणारे होते व त्यामुळे अर्जदाराचा विमा मंजूर केला नाही व प्रलंबीत ठेवला, ही बाब गैरअर्जदार कंपनीची अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शवीत आहे असे सिध्द झाले आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा क्रमांक 230104/47/14/ 51/90000052 दावा मंजूर करुन गैरअर्जदाराने अर्जदाराला रक्कम रुपये 1,00,000/ आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांनी आप-आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावे.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(6) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/1/2016