::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 01.04.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदार क्र.1 ने त्याची पत्नी श्रीमती बेला मंडेलिया अर्जदार क्र.2 हीचे नावाने गैरअर्जदाराकडून जेष्ठ नागरीक युनीट योजना 1993 अंतर्गत 1280 युनीट 1996 मध्ये खरेदी केले. त्याचा प्रमाणपञ क्र.109710510000117 हा आहे. या युनीट खरेदीचा व्यवहार हाि गैरअर्जदार क्र.1 चे एजंट गैरअर्जदार क्र.2 एजंट क्र.550374 यांचे मार्फतीने गडचांदूर येथून रुपये 12,800/- मध्ये घेतले व त्या योजनेनुसार अर्जदारांना प्रमाणपञ/पोचपावती नं.149027 प्राप्त झाली. त्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार युनीटचा फायदा हा अर्जदारांना मिळणार असून तीन पक्षांमध्ये हा करार करण्यात आलेला होता ज्यात अर्जदार, गैरअर्जदार क्र.1 व न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी आहे. वरील युनीट्सचा फायदा अर्जदार किंवा त्याच्या घरच्या लोकांना वैद्यकीय उपचाराकरीता रुपये 5,00,000/- पर्यंत न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी तर्फे मिळणार होता. यदाकदाचीत न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीने पैसे दिले नाही तर वैद्यकीय उपचाराकरीता लागेल्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 ने घेतलेली होती. अर्जदारांना गैरअर्जदाराचे दिनांक 19.1.2012 चे पञानुसार वरील योजना ही दिनांक 18.2.2008 ला बंद केली. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे याआधीच रकमेची गुंतवणूक केली असल्यामुळे आणि त्याचा फायदा जो अर्जदारास गुंतवणूक करण्याचे वेळी सांगण्यात आले त्यानुसार अर्जदाराने गुंतवणूक केलेली आहे. अर्जदारांना त्याच्या वाढत्या वयात फायदा न देता योजना बंद केल्याने सेवेमध्ये ञुटी केली आहे. गैरअर्जदाराने योजना दिनांक 19.1.2012 रोजी बंद केल्याने अर्जदारांना मानसिक व शारिरीक ञास सहन करावा लागला. गैरअर्जदार अर्जदाराला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास योजनेची रक्कम, भरलेली रक्कम, शारिरीक व मानसिक ञासापोटीचा खर्च तसेच तक्रारीचा खर्च असे एकूण रुपये 6,62,800/- द.सा.द.शे.18 टक्के दराने देण्याचा आदेश व्हावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 प्रकरणात हजर होऊन गैरअर्जदार क्र.1 ने निशाणी क्र. 12 वर त्यांचे लेखीउत्तर व दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने निशाणी क्र.26 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, अर्जदाराने त्यांचेवर तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून खरेदी केलेले युनीट योजना अंतर्गंत स्वास्था विषयी आजार निश्चित अवधीखाली देण्यात आलेले होते त्याची बातमी/सुचना नागपूर येथे दिनांक 26.1.2008 रोजी हिंदुस्थान, टाईम्स ऑफ इंडिया आणि ब्युझीनेस स्टॅंडंर्ड, व्यक्तीशः पञाव्दारे कळविण्यात आलेले होते. परंतु, अर्जदारांनी अतिरिक्त योजनेच्या अंतर्गत स्वास्था विषयी विमाकरीता कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. अतिरिक्त योजना अर्जदाराला घेण्याकरीता अर्जदाराला संधी देण्यात आली होती. सदर संधी दिनांक 4.2.2008 रोजी नस्तीबध्द करण्यात आली. त्यामुळे अर्जदाराला दवाखाण्यात किंवा भरती किंवा स्वास्था विषयी लाभ देता येत नाही. दिनांक 18.2.2008 रोजी प्रत्येक युनीटची किंमत रुपये 23.2257 होती. अर्जदाराने तक्रारीत खोटे कथन केलेले आहे की, दिनांक 19.1.2012 रोजी सदर योजना नस्तीबध्द करण्यात आले होते. सदर योजना नस्तीबध्द करतोवेळी अर्जदाराच्या युनीटचे मुल्य रुपये 53603.47 अशी होती त्यामुळे तक्रारदारास रुपये 6,50,000/- चा लाभ देता येत नाही. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
5. गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, अर्जदाराने त्यांचेवर तक्रारीत लावलेले आरोप खोटे असल्याने त्यांनी अमान्य केले. गैरअर्जदार क्र.2 ही गैरअर्जदार क्र.1 ची अभिकर्ता होती. गैरअर्जदार क्र.2 व अर्जदार यांचे दरम्यान कोणतेही ग्राहक नाते नाही. अर्जदाराचे म्हणण्यानुसार अर्जदारास योजनेचा फायदा न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून मीळणार होता. परंतु, अर्जदाराने या कंपनीला या केसमध्ये पार्टी केलेले नाही. यामुळे योग्य व्यक्तिला पार्टी न केल्याच्या कारणामुळे अर्जदारास ही केस खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराची तक्रार ही पूर्णपणे मुदतबाह्य झालेली आहे. अर्जदाराने हा वाद विद्यमान न्यायालयाच्या अधिकार क्षेञात आणण्याकरता फक्त गैरअर्जदारास पार्टी केले असावे. गैरअर्जदार क्र.1 चे चंद्रपूर जिल्ह्यात विद्यमान न्यायालयाचे अधिकार क्षेञात कोणतेही कार्यालय नाही. अशापरिस्थितीत अर्जदाराची तक्रार गैरअर्जदाराविरुध्द खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदाराचे तक्रार व जवाब, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ? : नाही
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची : नाही
अवलंबना केली आहे काय ?
4) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
7. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून जेष्ठ नागरीक युनीट योजना 1993 अंतर्गत 1280 युनीट 1996 मध्ये खरेदी केले होते. सदर युनीट अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतले याबाबत अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 मध्ये कोणताही वाद नाही. सबब अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
8. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने त्याचे लेखी कथनात असे सांगीतले आहे की, अर्जदाराला देण्यात आलेले युनीट योजना दिनांक 18.2.2008 ला बंद करण्यात आली व त्याचे ऐवजी अर्जदाराला दुसरी योजनेच्या अंतर्गत युनीट खरेदी करण्याकरीता सुचविण्यात आले होते. त्यावर अर्जदाराने कोणतीही संमती दर्शविली नाही व गैरअर्जदार क्र.1 ला असमंती बाबत कोणतीही सुचना मिळाली नाही. सदर योजना युनीट धाराकांचा लाभांकरीता सुरु करण्यात आली होती परंतु व्याजदारात कमी झाले असल्याने सदर योजना भारत सरकार व सेबी च्या परवानगीसह नस्तीबध्द करण्यात आली, त्यात गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास कोणतीही न्युनतम् सेवा व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही. गैरअर्जदाराने जबाबासोबत भारत सरकार व्दारा जारी/प्रकाशीत परिपञक तसेच त्याबाबत सुचना विषयी बातम्या पञात जाहीरात प्रसिध्दीबाबत वर्तमान पञांची प्रतिलिपी दाखल केलेली आहे. सदरहू दस्तऐवज व भारत सरकारव्दारा प्रकाशीत परिपञकाची पडताळणी करुन मंचाचे असे मत ठरले आहे की, गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रति न्युनतम् सेवा दर्शविली नाही व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
9. गैरअर्जदार क्र.2 हा एंजट असून त्याचे मार्फत अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कंपनीचे जेष्ठ नागरीक युनीट योजना अंतर्गत, युनीट खरेदी केले होते. त्याबाबत, गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराकडून कोणताही मोबदला घेतला नसल्याने गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द कोणतेही आदेश पारीत करता येत नाही.
10. गैरअर्जदार क्र.1 ने त्यांचे जबाबात असे सांगीतले आहे की, अर्जदाराने त्यांना दिलेले युनीटची योजना बंद झाल्यावर गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास दिलेले प्रस्तावावर कोणतीही सहमती दिली नाही, सदर सहमती दिल्यावर अर्जदाराचे मुल्यांकीत असलेले युनीटची रक्कम नियमांप्रमाणे देता येईल. सदर बाब व मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी आप-आपल्या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
4) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 01/04/2016