निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे गुंतविलेली रक्कम मिळावी म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने दिनांक 11/08/2007 आणि दिनांक 21/8/2007 रोजी रु 92,299/- व रु 41,346/- गैरअर्जदाराकडे तीन वर्षाच्या योजनेमध्ये कार ऑप्शनमध्ये गुंतविले होते व त्यासाठी गैरअर्जदारासोबत करार केला होता. करारानुसार गैरअर्जदार युनीक ग्रूपने एकूण 36 चेक्स गुंतवणूकीच्या 10 टक्के व 30 टक्के चे धनादेश दिले. ऑगष्ट 2007 पर्यंत गैरअर्जदाराने योग्य सेवा दिली परंतु त्यानंतर गैरअर्जदाराने कोणतीही रक्कम दिली नाही. गैरअर्जदाराने त्यानंतर संस्था बंद केली व ठरल्याप्रमाणे रक्कम देण्यास टाळाटाळ केली व त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने त्यास गैरअर्जदाराकडून रक्कम रु 5,07,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने सादर केलेले करारपत्र आणि तक्रार दाखल करण्यासाठी घडलेल्या कारणाचा विचार करता प्रस्तूत तक्रार या मंचात चालू शकते काय ? आणि तक्रार मुदतीत आहे काय? असे मुद्दे उपस्थित झाले. तक्रारदाराने गैरअर्जदारासोबत केलेला करार पाहता तक्रारदाराचे गैरअर्जदारासोबत “ ग्राहकाचे ” नाते असल्याचे दिसत नाही. करारामध्ये तक्रारदाराचा उल्लेख “Lessor” आणि गैरअर्जदाराचा उल्लेख “Lessee” असा करण्यात आलेला आहे. यावरुन तक्रारदार व गैरअर्जदार यांचे नाते भाडयाने देणारा व भाडयाने घेणारा असे असल्याचे स्पष्ट दिसते. कराराद्वारे गैरअर्जदाराने तक्रारदाराला प्रतिमाह भाडे देण्याचेच कबुल केलेले आहे. भाडयाची रक्कम देणे म्हणजे “सेवा” होत नाही. त्यामुळे तक्रारदार गैरअर्जदाराचा “ग्राहक” नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून ही तक्रार या मंचात चालण्यास योग्य नाही. याशिवाय तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण ऑगष्ट 2007 मध्ये घडलेले असल्यामुळे त्याने ही तक्रार या मंचासमोर ऑगष्ट 2009 पूर्वी दाखल करणे आवश्यक होते परंतु त्याने ही तक्रार अत्यंत विलंबाने दाखल केलेली आहे. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करावा अशी मागणी केली आहे. परंतु विलंबाबाबत तक्रारदाराने समाधानकारक खुलासा केलेला नाही. या मंचात तक्रार चालु शकते याबाबत माहिती नसल्यामुळे मुदतीत तक्रार दाखल करु शकलो नाही असे तक्रारदाराने विलंबाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सदर कारण संयुक्तिक नाही व त्यामुळे विलंब माफ करता येणार नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रार सुनावणीसाठी स्वीकृत न करता प्राथमिक अवस्थेतच फेटाळण्यात येते.
- तक्रारदाराला आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस. देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |