ग्राहक तक्रार क्रमांकः-278/2009 तक्रार दाखल दिनांकः-21/04/2009 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-0वर्ष11महिने26दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.सुहास मारुती विंचू सध्या राहणार-502,गार्डेनिया, एव्हरेस्ट वर्ल्ड, बायर इंडिया कंपनीसमोर, कोलशेत रोड, ठाणे(प)400 607 ...तक्रारकर्ता विरुध्द 1)शाखा व्यवस्थापक, युनिक मर्कंटाईल इंडिया प्रा.लि., रौनक आर्केड,गोखले रोड, नौपाडा,ठाणे. ...वि.प.1 2)मुख्य रिसॉर्ट व्यवस्थापक, श्री.आलोक रावल युनिक मर्कंटाईल इंडिया प्रा.लि., कार्यालयः-एफ-7,विशाल कमर्शियल सेंटर, दिनेश हॉलजवळ, इनकम टॅक्स,आश्रम रोड, अहमदाबाद ... वि.प.2 उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.एस.एल.आग्रे. विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.आर.एस.राजवाडे. गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-17/04/2010) श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारदाराने सदरची तक्रार ही विरुध्दपक्षकाराने सेवेमध्ये निष्काळजीपणा केला आहे, त्याबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा1986 नुसार कलम12अन्वये दाखल केली असून त्यातील कथन संक्षिप्तपणे खालील प्रमाणेः- 2/- तक्रारदाराने विरुध्दपक्षकाराकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची विमा पॉलीसी घेतली. त्या विमा पॉलीसीच्या 'किंग गोल्ड' या योजनेअंतर्गत तक्रारदाराला एक कार्ड खरेदी करावे लागले. वरील कार्डनुसार युनिक कंपनी बरोबर करार असलेल्या कोणत्याही हॉटेल/रिसॉर्टमध्ये ठरावकि कालावधीसाठी मोफत राहण्याची व्यवस्था करण्याची योजना आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्डापोटी दिनांक15/12/2004 रोजी रुपये3,250/- विरुध्दपक्षकाराचे ठाणे कार्यालयात रक्कम जमा केली. सदरची कार्डाची मुदत दिनांक29/11/2007 पर्यंत कार्यान्वित होती. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तक्रारदाराने दिनांक22/10/2007 रोजी हॉटेल बुकींगसाठी रुपये200/- भरले व महाबळेश्वर येथे (मिस्टी वुड हॉटेल)12/11/2007 ते 13/11/2007 रोजी वास्तव्य करण्याचे बुकींग केले. तक्रारदार त्यांचे कुटूंबियासमवेत महाबळेश्वर येथे मिस्टीवुड हॉटेलचे व्यवस्थापकास विनंती केली असता त्यांनी अशा प्रकारचे कोणतीही व्यवस्था केली नाही. त्याऐवजी जर तक्रारदाराची राहण्याची तयारी असल्यास एक अत्यंत घाणेरडी खोली ज्यामध्ये पाण्यात जास्त दुर्गंधी,मोडल्या तोडक्या खुर्च्या व टेबल व घाणेरडी बाथरुम व संडास अशी खोली दाखविली ती खोली तक्रारदारास पसंत आली नाही. तक्रारदाराने जी खोली बुक केली होती, ती मिळण्यासाठी हॉटेल व्यवस्थापकास विनंती केली. परंतु तक्रारदारास ती खोली दिली नाही व इतर ग्राहकासमोर तक्रारदाराला अपमानास्पद वागणुक दिली. त्या दरम्यान वरील हॉटेलमध्ये इतर दोन युनिट कार्ड धारक श्री.संदीप पंदिरकर आणि श्री.पटेल आले असता त्यांना खोलीची व्यवस्था न करता अपमानास्पद वागणुक दिली. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कुटूंबिय यांना बराच मानसिक व शारीरीक त्रास झाला. त्याची तक्रार महाबळेश्वर येथील पोलीस स्टेशनमध्ये दिनांक12/11/2007 रोजी नोंद केली. वरील घटना विरुध्दपक्षकारास सांगितली असता त्यांनी दिनांक28/12/2007 रोजी तक्रारदारास दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र लिहीले. अशा रितीने विरुध्दपक्षकाराने सेवेमध्ये निष्काळजीपणा,हलगर्जीपणा केला असल्यामुळे तक्रारदाराने त्यांचे विरुध्द ठाणे मंचामध्ये तक्रार दाखल करुन तक्रारीचे कारण दिनांक28/12/2007 रोजी विरुध्दपक्षकाराने दिलगिरी व्यक्त केली तेव्हापासून घडले असल्यामुळे ही तक्रार आर्थिक व भौगोलिक व समय सिमेच्या आत असल्यामुळे या मंचाला ही तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे असे कथन केले. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणे. 1)विरुध्दपक्षकाराने कार्ड रक्कम रुपये3,250/- अधिक पर्यायी व्यवस्था खर्च 3/- रुपये1800/- अधिक 200/- रुपये प्रोसेसिंग चार्जेस अधिक 1155/- खाजगी वाहन खर्च अधिक रु.80/- इतर खर्च बरोबर एकुण खर्च रुपये6,485/- द्यावा व त्या रकमेवर 15टक्के द.सा.द.शे.दराने व्याज द्यावे. 2)विरुध्दपक्षकाराने मानसिक नुकसानीपोटी रुपये50,000/- द्यावे. 3)विरुध्दपक्षकाराने तक्रारीचा खर्च रुपये10,000/- द्यावा.4)इतर योग्य ते आदेश तक्रारदाराच्या लाभात व्हावेत. 2)वरील तक्रारीची मंचाची नोटीस नि.5नुसार विरुध्दपक्षकारास पाठविली. नि.6वर पोच पावती दाखल. नि.7वर लेखी जबाब दाखल व प्रतिज्ञापत्र नि.8वर दाखल व नि.9व 10वर वकीलपत्र दाखल. लेखी जबाब नियोजीत वेळेत दाखल न केल्याने 'नो डब्ल्यु एस आदेश' पारीत करण्यात आला. व 'नो डब्ल्यु एस आदेश' रद्दबातल ठरविण्यासाठी त्यांना रुपये800/- कॉस्ट बसविण्यात आली व ती रक्कम दिल्यानंतर लेखी जबाब दाखल करुन घेण्यात आला. तक्रारदाराने त्यांचे प्रत्युत्तर नि.11 वर दाखल केले व नि.12 वर कागदपत्रे दाखल केले. नि.13वर तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, प्रत्युत्तर व कागदपत्रे हिच लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसीस सादर केली व विरुध्दपक्षकाराने नि.14 वर त्याचा लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली. विरुध्दपक्षकाराचे लेखी जबाबातील कथन खालील प्रमाणे. तक्रार ही त्रास देण्याचे हेतुने दाखल केली. तक्रारीसाठी कोणतेही कारण घडले नाही. तक्रारदाराची अवास्तव मागणी आणि गैरवर्तणुक या कारणास्तव तक्रारदाराला वरील योजनेचा लाभ घेता आला नाही. तक्रारदाराने हॉटेलमध्ये येण्याची वेळ 12 वाजताची होती. परंतु तक्रारदार सायंकाळी 6वाजता पोहचले त्यावेळी ते मद्याच्या नशेत होते. त्या परिस्थितीत त्यांना बोलता व उभे राहता येत नव्हते. तक्रारदाराने हॉटेल स्वागतिकेस(रिशेफ्शनिष्ट)/व्यवस्थापकास अदवातदवा बोलले, व शिवीगाळ केली. व भाडंण केले त्यांचे भांडणामुळे हॉटेलमधील इतर पर्यटकास त्रास झाला. तक्रारदार मंचाची दिशाभुल करीत आहेत. पोलीसाने तक्रारीत तथ्ये नसल्याने हॉटेल व्यवस्थापनाविरुध्द गुन्हा नोंदविला नाही. तक्रारदार दारुच्या नशेत असल्याने पोलीसांनी फक्त एनसी नोंदविली व योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याची सुचना केली. वरील हॉटेल व्यवस्थापनाबद्दल आजपर्यंत कोणतीही तक्रार नाही. विरुध्दपक्षकाराने कोणतीही त्रुटी/निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा केला नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास बंधनकारक नाहीत. उलट विरुध्दपक्षकाराला झालेल्या मनस्तापाबद्दल तक्रारदाराने विरुध्दपक्षकाराला रु.10,000/- द्यावे व तक्रार रद्दबातल ठरवावी. 4/- 3)या तक्रारीसंबंधी उभय पक्षकारांनी सादर केलेली कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, प्रत्युत्तर व लेखी जबाबातील कथन यांचे सुक्ष्मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्यायिक प्रक्रियेसाठी खालील मुद्दे उपस्थित होतात ते येणेप्रमाणे. अ)विरुध्दपक्षकाराने सेवेमध्ये त्रुटी,हलगर्जीपणा तथा निष्काळजीपणा केला हे तक्रारदार सिध्द करुन शकले काय.? उत्तर-होय. ब)तक्रारदार मानसिक नुकसानीपोटी भरपाई मिळण्यास व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरतात काय.?उत्तर-होय. कारण मिमांसा अ)स्पष्टीकरणाचा मुद्दाः- तक्रारदाराने दाखल केलेल्या पत्रानुसार तक्रारदाराने विरुध्दपक्षकाराकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची ''किंग गोल्ड'' योजनेअंतर्गत तक्रारदाराने एक कार्ड खरेदी केले होते. त्यानुसार तक्रारदाराने विरुध्दपक्षकाराकडे दिनांक22/10/2007 रोजी रुपये200/- ची रक्कम भरली व त्यामध्ये दिनांक12/11/2007 रोजी महाबळेश्वर येथील हॉटेलमध्ये FREE STAY PACKAGE असा स्पष्ट उल्लेख आहे. वरील संदर्भानुसार उभयतामध्ये प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट होता व त्यासंबधी अगोदरच कन्सिडरेशन विरुध्द पक्षकाराने स्विकारले होते. त्यानुसार तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत लायक ठरतात व विरुध्दपक्षकार हे सेवा देण्यास पात्र ठरतात. परंतु तक्रारदार कुटूंबियासमवेत महाबळेश्वर येथे हॉटेलमध्ये गेले असता नियोजीत खोलीमध्ये दुस-याच व्यक्तीस दिल्यामुळे तक्रारदाराला व त्यांच्या कुटूंबियांना शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास झाला. त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. विरुध्दपक्षकाराने असे कथन केले की, तक्रारदाराने मद्य प्राशन केले होते व त्याची वागणुक चांगली नव्हती व त्यांनी हॉटेल व्यवस्थापकास शिवीगाळ गेली. विरुध्दपक्षकाराने मद्य प्राशनासंबंधी कोणतेही सबळ पुरावा किंवा डॉक्टराचे प्रमाणपत्र किंवा पोलीसांचे प्रमाणपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचे विधान विश्वसनिय वाटत नाही. सबब विरुध्दपक्षकाराचे सेवेमध्ये त्रुटी व बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा सिध्द होतो. ब)स्पष्टीकरणाचा मुद्दाः- महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे तेथे सतत प्रवाशांची वर्दळ असते. अशा ठिकाणी तक्रारदाराने आगावू रिझर्व्हेशन केले होते. परंतु त्यांना नियोजीत खोली न मिळाल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियाना त्रास झाला. त्याऐवजी दुर्गंधीयुक्त दुसरी खोली देऊ करणे म्हणजे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास देणे होय. तसेच तक्रारदाराच्या कुटूंबियानाही वरील कृतीचा प्रचंड त्रास झाला. आगाऊ रक्कम घेऊन नियोजीत 5/- व त्यांचे नियमानुसार हॉटेलमधील खोली बहाल न करणे म्हणजे सेवेमध्ये त्रुटी,न्युनता,बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा करणे होय. विरुध्दपक्षकाराची वरील कृति न्यायोचित,विधीयुक्त नाही व तसेच त्यांची कृती ही नैसर्गिक न्यायाचे दृष्टीकोनातूनही बेजबाबदारपणा आहे. तक्रारीमध्ये तथ्ये आणि सत्य आढळून आल्याने हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 278/2009 ही अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2)विरुध्दपक्षकाराने तक्रारदारास हॉटेल खर्च व इतर खर्च रुपये6485/-(रु.सहा हजार चारशे पंच्याऐंशी फक्त)द्यावा. 3)विरुध्दपक्षकाराने तक्रारदारास रुपये 3,000/-(रु.तीन हजार फक्त)मानसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी. 4)विरुध्दपक्षकाराने रुपये1,000/-(रु.एक हजार फक्त)तक्रारीचा खर्च द्यावा. 5)वरील आदेशाची तामिली विरुध्दपक्षकार नं.1व 2 यांनी संयुक्तीकरित्या व वैयक्तीकरीत्या सही शिक्क्याची प्रत मिळाल्या तारखेपासून 30 दिवसांचे आत परस्पर करावी. 6)वरील आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-17/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|