निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे अध्यक्ष, यांनी पारीत केले
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ग्रा.स.कायदा) कलम 12 नुसार सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांनी सामनेवाल्यांकडून दि.24/1/2013 रोजी रु.1,00,042/- इतकी रक्कम अदा करुन 1054 चौरस मिटर इतका 500 मायक्रॉन जाडीचा कागद शेत तळयासाठी विकत घेवून शेत तळे तयार केले. शेत तळे तयार करण्यासाठी त्यांनी खोदाईसाठी रु.75,000/- देखील खर्च केला. सदर शेत तळयावर त्यांनी 4 एकर डाळींबाची बाग तयार करण्याचे नियोजन केले होते. मात्र सामनेवाल्यांनी निकृष्ठ प्रतिचा प्लास्टीक कागद दिल्यामुळे त्यांचे शेत तळे लीक झाले. डाळींब बागाला पाणी देता आले नाही. त्यामुळे एकरी रु.2,00,000/- याप्रमाणे त्यांचे रु.4,00,000/- चे नुकसान झाले. सामनेवाल्यांनी तक्रार केल्यावर एकदा शेत तळयाचा कागद दुरुस्त केल्यावर तक्रारदारांनी 100 टँकर द्वारा 5,00,000 लिटर पाणी शेत तळयात टाकले होते. मात्र शेततळयाची दुरुस्ती नीट न झाल्यामुळे ते पाणी वाहून गेले. त्यामुळे त्यांचे सुमारे रु.1,00,000/- चे नुकसान झाले. त्यामुळे वकील फी, शारिरीक व मानसिक त्रास असा एकूण रु.11,52,000/- इतकी नुकसान भरपाई व्याजासह मिळावी, अशी विनंती त्यांनी मंचाकडे केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.6 लगत इन्व्हॉईस, डिलीव्हरी चलन्स, वारंटी पत्र, सामनेवाल्यांना पाठविलेली नोटीस व त्याची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. मंचाची नोटीस मिळून दि.17/10/2013 रोजी सामनेवाले अॅड. माया कटारे यांच्यामार्फत हजर होत आहेत, अशी पुरसीस देण्यात आली होती. मात्र दि.14/2/2014 रोजी पावेतो त्यांनी जबाब न दिल्यामुळे तक्रारदारांचा अर्ज नि.10 मंजूर करुन प्रस्तूत तक्रार अर्ज सामनेवाल्यांच्या जबाबा विना चालविण्यात यावा, असे आदेश पारीत करण्यात आले होते. त्यानंतर दि.17/6/2014 रोजी सामनेवाल्यांनी त्यांच्याविरुध्द ‘नो से’ चे आदेश अस्तित्वात असतांना वकीलपत्र हजर करुन जबाब नि.14 व प्रतिज्ञापत्र नि.15 दाखल केले. मंचाने देखील कामाच्या व्यस्ततेत सामनेवाल्यांचा जबाब व प्रतिज्ञापत्र दाखल करुन घेतलेले आहेत. मात्र सामनेवाल्यांचा तो जबाब व प्रतिज्ञापत्र कायदेशीररित्या पुराव्यात वाचता येणार नाहीत. त्यानंतरही सामनेवाल्यांना पुरावा देण्यासाठी संधी देण्यात आली. मात्र सामनेवाल्यांनी हजर राहून पुरावा सादर केला नाही. त्यामुळे दि.27/1/2015 रोजी त्यांचा पुरावा बंद करण्यात आला. अशा रितीने सामनेवाल्यांनी तक्रारदारांच्या तक्रार अर्जास कायदेशीररित्या आव्हानित केलेले नाही.
5. तक्रारदारांचे वकील अॅड.कुलकर्णी यांचा लेखी युक्तीवाद नि.24 त्यांच्या तोंडी युक्तीवादासह विचारात घेण्यात आला. सामनेवाल्यांना संधी देवूनही त्यांनी युक्तीवाद केलेला नाही.
6. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास
सदोष कागद विकला काय? होय.
2. आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
7. तक्रारदारांनी त्यांच्या शपथेवरील पुराव्यात त्यांनी सामनेवाल्यांकडून 500 मायक्रॉन जाडीचा 1053 चौ.मि.इतका कागद रु.81,088/- ला विकत घेतला व रु.18,954/- इतकी रक्कम अदा करुन तो त्यांच्याकडून शेत तळयात फिटींग देखील करुन घेतला. मात्र सदरचा कागद व करण्यात आलेली फिटींग दोघेही सदोष असल्यामुळे जॉईंट्समधून पाणी गळून गेले. सामनेवाल्यांच्या प्रतिनीधीने येवून प्रत्यक्ष पाहणी केली. जॉईंट दुरुस्त देखील करुन दिले. मात्र त्यानंतरही शेत तळयात टाकलेले पाणी राहीले नाही. त्यांना 4 एकरावरील डाळिंब बागेस पाणी देता आलेले नाही, असे नमूद केलेले आहे. तक्रारदारांच्या वरील तोंडी पुराव्यास दस्तऐवज यादी नि.6 लागत दाखल केलेली कागदपत्रे टॅक्स इन्व्हॉईस नि.6/1, डिलेव्हरी चलन नि.6/2, सामनेवाल्यांनी दि.24/5/2013 रोजी दिलेले पत्र नि.6/4 इ.कागदपत्रे पुष्टी देतात. सामनेवाल्यांनी तक्रारदारांचा वरील पुरावा कायदेशीररित्या जबाब देवून आव्हानित केलेला नाही. त्यामुळे सामनेवाल्यांनी तक्रारदारांना शेत तळयाचा सदोष कागद विकला व त्याची फिटींग देखील सदोष केली, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
8. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाल्यांनी तक्रारदारांना शेत तळयाचा कागद व शेत तळयाच्या कागदाची फिटींग या दोन्ही बाबी सदोष दिलेल्या आहेत. तक्रारदारांनी सामनेवाल्यांच्या सदोष सेवेपाई खालीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केलेली आहे.
अ.क्र. | तपशील | रक्कम रुपये |
1 | फिटींग चार्जेस व शेत तळयाचा कागद | 1,00,042/- |
2 | शेततळयाची खोदाई | 75,000/- |
3 | 100 टँकर पाणी | 1,00,000/- |
4 | एकरी रु.2 लाख या हिशोबाने 4 एकर डाळींब बागेचे नुकसान | 8,00,000/- |
5 | वकील व स्टॅम्प फी | 10,000/- |
6 | शारिरीक व मानसिक त्रास | 25,000/- |
एकूण | 11,52,042 |
9. तक्रारदारांनी वरीलप्रमाणे नुकसान भरपाई मागितलेली असली तरी अ.क्र.3 मध्ये दावा केल्याप्रमाणे 100 टँकर पाणी भरले व त्यासाठी रु.1,00,000/- इतका खर्च आला तसेच अ.क्र.4 ला दावा केल्याप्रमाणे पाणी न दिल्यामुळे 4 एकरवरील डाळिंब बाग सुकून गेला याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी मंचासमोर सादर केलेला नाही. अ.क्र.2 मध्ये दावा केल्याप्रमाणे शेततळे खोदण्यासाठी रु.75,000/- इतका खर्च तक्रारदारांना आलेला असला तरी ती खोदाई कायमस्वरुपी असल्यामुळे केवळ कागद खराब झाल्यामुळे तो खर्च वाया गेला अशी परिस्थिती नाही. त्यामुळे अ.क्र.2,3 व 4 मध्ये दिलेला दावा केलेला खर्च देय नाही, असे आमचे मत आहे. मात्र तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडून शेत तळयाचा कागद व केलेली फिटींगचा खर्च रु.1,00,042/- कागद विकत घेतल्याची तारीख म्हणजे दि.24/1/2013 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% व्याजासह मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.7000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना
वैयक्तीक व संयुक्तीकरित्या शेत तळयाचा कागद व त्याच्या फिटींगची एकूण रक्कम रु.1,00,042/- दि.24/1/2013 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% व्याजासह अदा करावी.
2. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना
वैयक्तीक व संयुक्तीकरित्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.7000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः27/2/2015