गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. प्रदीप पाटील - सदस्य.
(मंचाचा निर्णय : श्री. प्रदीप पाटील - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 29/11/2014)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे थोडक्यात कथन असे की, ...
1. तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे पिता-पूत्र असुन नागपूर येथील स्थाई रहीवासी आहेत. तक्रारकर्ता क्र. 1 हा व्यवसायाने वकील असुन तो नागपूर येथे वकीली करतो व तक्रारकर्ता क्र. 2 हा विद्यार्थी आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या अधिकारामधे भारतात रेल्वे चालविल्या जातात. विरुध्द पक्ष क्र. 2 ते 5 हे विरुध्द पक्ष क्र. 1 चे पदाधिकारी असून वेगवेगळया ठिकणी वेगवेगळया पदावर कार्यरत आहेत. विरुध्द पक्ष क्र. 6 हे भारतामध्ये मध्यरेल्वे करता इंटरनेटव्दारा रेल्वे टिकीटांचे आरक्षण करतात. तक्रारकर्ता क्र.1 ने तक्रारकर्ता क्र.2 करीता दि.17.08.2012 रोजी नागपूर ते हैद्राबाद या प्रवासाकरीता विरुध्द पक्ष क्र.6 यांचेकडून तात्काळमध्ये त्रृतिय वातानुकूलीत वर्गाचे टिकीट आरक्षीत केले. सदर टिकीट दक्षिण एक्सप्रेस या गाडीचे होते व त्या गाडीचा क्रमांक 12772 असा होता. तक्रारकर्ता क्र. 1 याने स्वतःकरीता दि.17.08.2012 चे अगोदर आरक्षण केले होते त्याला बी-1 क्रमांकाच्या कोचमध्ये बर्थ क्रमांक 23 दिला होता तर तक्रारकर्ता क्र.2 ला कोच क्र.बी-1 मध्ये 22 क्रमांकाचा बर्थ देण्यांत आला होता. सुदैवाने वेगवेगळया दिनांकास आरक्षण करुनही तक्रारकर्त्यांना एकाच कोचमध्ये बर्थ देण्यांत आले होते. तक्रारकर्ते दि.17.08.2012 रोजी रेल्वे स्टेशनवर गेले असता तक्रारकर्त्याला माहित झाले की, दक्षीण एस्कप्रेसमध्ये वातानुकूलीत बी-1 हा कोच जोडण्यांत आलेला नाही व त्या ऐवजी सर्वसाधारण कोच जोडण्यांत आलेला आहे. तक्रारकर्ता क्र. 2 हा हैद्रराबाद येथे शिक्षण घेत असल्यामुळे त्याला हैद्रराबादला पोहचणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारकर्त्याला सर्वसाधारण कोचमधून प्रवास करण्या शिवाय पर्याय नव्हता. तक्रारकर्त्याला सांगण्यांत आले की, ज्या क्रमांकाचा बर्थ त्यांनादेण्यात आलेला आहे त्याच क्रमांकाच्या बर्थमधून त्यांना हैदराबाद पर्यंत प्रवास करता येईल व सर्वसाधारण स्लिपर कोच व वातानुकूलीत कोचच्या प्रवास भाडयाची रक्कम त्यांना परत करण्यांत येईल.
2. तक्रारकर्त्यांनी सर्वसाधारण कोचमधून प्रवास सुरु केल्यानंतर रेल्वे टिकीट तपासणीसानी तक्रारकर्त्यांना वातानुकूलीत कोच ऐवजी साधारण कोचमधून प्रवास करण्याबाबत वेगवेगळे प्रमाणपत्र दिले. तक्रारकर्त्यांना वातानुकूलीत 3 टियर कोचकधून प्रवास करावयाचे निश्चित असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंथरुन पांघरुण घेतलेले नव्हते कारण वातानुकूलीन कोचमध्ये विरुध्द पक्षाकडून सर्व सुखसोयी पुरविल्या जातात व त्याचे पैसे सुध्दा टिकीटांमध्ये समाविष्ट असतात. तक्रारकर्त्याने सर्वसाधारण कोचमधून प्रवास सुरु केल्यानंतर तक्रारकर्त्याला असे निदर्शनास आले की, त्या डब्याची अवस्था फारच खराब होती. खिडक्या बंद होत नव्हत्या तसेच टॉयलेटमध्ये पाणी नसुन ते स्वच्छ केलेले नव्हते, संपूर्ण कोचमध्ये कचरा परसलेला होता. एवढेच नव्हेतर तक्रारकर्त्यांना मिळालेले बर्थसुध्दा स्वच्छ करण्यांत आलेले नव्हते त्यावर धूळ साचलेली होती. तक्रारकर्ता नागपूर ते हैदराबादचे दरम्यान प्रवासात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सदर कोचमध्ये पावसाचे पाणी शिरत होते व त्यामुळे तक्रारकर्त्यांनी बर्थखाली ठेवलेले पुस्तके व किमती कपडे खराब झाले व त्यामुळे त्याचे रु.20,000/- चे नुकसान झाले. तक्रारकर्ते तक्रारीत सांगतात की, ते बसलेल्या कोचच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी आत शिरत बर्थ खाली ठेवलेले सामान पावसाच्या पाण्यात ओले होत होते त्यामुळे र्बिवर ठेवावे लागले असल्यामुळे त्यांना रात्री निट झोपता आले नाही. तक्रारकर्ते सर्व त्रास सहन करीत हैदराबाद रेल्वे स्टेशनला पोहचले तेव्हा त्यांनी टिकीटाच्या फरकाची मागणी केली असतांना त्यांना ई-टिकीट या पध्दतीने काढण्यांत आले असल्याने खर्चाची रक्कम ही विरुध्द पक्ष क्र.6 यांच्या वेबसाईटव्दारेच मिळेव त त्याकरता त्यांना टि.डी.आर. फाईल करावा लागेल. तक्रारकर्ता क्र. 1 यांने दि.20.08.2012 रोजी टि.डी.आर.साठी अर्ज केला त्यावेळी तक्रारकर्ता क्र. 1 याला रु.344/- परत मिळाले. तक्रारकर्ता क्र. 2 याचे टिकीट तत्काळ आरक्षण योजने अंतर्गत काढण्यांत आले असल्याने टिकीटाचे फरकाची रक्क्म परत करता येणार नाही असा ई-मेल दि.13.09.2012 रोजी तक्रारकर्ता क्र. 1 याला प्राप्त झाला. तक्रारकर्त्याला टिकीटाच्या फरकाची रक्कम परत न करण्याचे विरुध्द पक्ष क्र. 6 चे पत्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला. कारण तात्काळ आरक्षण हे तक्रारकर्त्याने रद्द केले नव्हते परंतु विरुध्द पक्षाच्या वातानुकूलीत कोच उपलब्ध न करुन देण्यामुळे विरुध्द पक्ष यांनीच रद्द केले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याची कोणतीही चूक नसतांना त्याचे टिकीटाचे फरकाची रक्कम कापून घेणे हे सरासर विरुध्द पक्षांची चूकी व सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारकर्त्याला वाटले, त्यामुळे त्याने दि.30.09.2012 रोजी ई-मेल प्राप्त झाल्यानंतर दि.16.10.2012 रोजी विरुध्द पक्षास नोटीस पाठविला. त्यावर दि.19.10.2012 रोजी तक्रारकर्त्याला तात्काळमध्ये काढलेले टिकीटाचे पैसे परत करता येत नाही असे कारण देत तक्रारकर्त्याचे पैसे देण्याचे नाकारले. त्यानंतर दि.27.10.2012 रोजी तक्रारकर्त्यास आणखी एक ई-मेल प्राप्त झाला व विरुध्द पक्ष क्र.4 व 5 यांनी दक्षिण मध्ये रेल्वेला पत्र पाठवून तक्रारकर्त्याच्या टिकीटाची फरकाची रक्कम परत करण्याच्या त्याच्या मागणी संबंधी तपासणी करावी विनंती केली व तक्रारकर्त्याला झालेल्या त्रास व असुविधेबद्दल क्षमा मागितली. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी असे आश्वासन दिले की, परताव्याची रक्कम उपलब्ध झाल्यावर ती त्याचे खात्यात जमा करण्यांत येईल. परंतु तक्रार दाखल करे पर्यंत त्यांना परताव्याची रक्कम प्राप्त झाली नाही त्यामुळे तक्रारकर्त्यांना झालेल्या त्रास, असुविधा व नुकसानीबद्दल तक्रार दाखल करणे भाग पडले.
3. तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यांत आली. सर्व विरुध्द पक्षांना नेटीस प्राप्त झाल्यानंतर ते मंचसमक्ष हजर झाले व त्यांनी आपले उत्तर दाखल केले.
विरुध्द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार ही रेल्वे कायदा 4 कलम 100 प्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येत नाही. परंतु त्यांनी आपल्या उत्तरात मान्य केले की, तक्रारकर्त्यांनी नागपूर ते हैदराबाद या प्रवासाकरता दक्षिण रेल्वेचे थ्री टियर वातानुकूलीन कोचचे आरक्षण केलेले होते. परंतु वातानुकूलीन कोचमध्ये बिघाड झाल्यामुळे तक्ररकर्त्यांना साधारण कोचने प्रवास करावा लागला हे त्यांनी नाकबुल केलेले नाही. त्यांनी हेही नाकारलेले आहे की, पावसाचे पाणी सर्वसाधारण कोचचे आत येणे शक्य नाही त्यामुळे तक्रारकर्त्याचे सामानाचे नुकसान होणे शक्य नाही. त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, टिकीटातील फरकाची रक्कम परत करणे ही जबाबदारी ही विरुध्द पक्ष क्र. 6 यांनी आहे, त्यासाठी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 5 यांची कोणतीही जबाबदारी नाही.
4. विरुध्द पक्ष क्र. 6 यांनी दाखल केलेल्या आपल्या उत्तरात असे म्हटले आहे की त्यांची जबाबदारी फक्त टिकीटे आरक्षित करणे व ती उपलब्ध करुन देणे एवढीच आहे. परंतु त्याशिवाय आरक्षीत कोच उपलब्ध करुन देणे किंवा इतर कोणत्याही सोयी सुविधेकरीता ते जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही. त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, तक्रारकर्त्यांच्या टिकीटातील फरकाची रक्कम त्यांना परत करण्यांत आली असल्याने आता त्यांचा कोणताही दावा त्यांचे विरुध्द चालू शकत नाही आणि तो खारिज करण्यांत यावा.
5. दोन्ही पक्षांचा त्यांचे वकीलामार्फत केलेला युक्तिवाद ऐकण्यांत आले तसेच त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर पुढील मुद्दे मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
ब) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास सेवेत न्यूनता
दिली आहे काय ? होय
क) तक्रारकर्ता मंचासमक्ष दाद मागण्यांस पात्र आहे काय ? होय
ड) आदेश ? तक्रार अंशतः मंजूर.
- // कारणमिमांसा // -
6. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे कोणीही खोडून काढले नाही की, तक्रारकर्त्याने दि.17.08.2012 रोजीच्या प्रवासाकरता नागपूर ते हैदराबादसाठी थ्री टियर वातानुकूलीन दक्षीण एक्सप्रेस या गाडीचे दोन टिकीट आरक्षीत केले होते व त्यांना कोच बी-1 मध्ये बर्थ क्र. 22 व 23 देण्यांत आलेले होते. त्याशिवाय प्रवासाचे दिवशी दक्षीण एक्सप्रेस गाडीला वातानुकूलीन बी-1 हा कोच जोडण्यांत आलेला नव्हता त्यामुळे त्या कोचमध्ये आरक्षण केलेल्या सर्व प्रवाश्यांना सर्वसाधारण स्लिपर कोच देण्यांत आला होता. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे कोणीही खोडून काढले नाही की, सर्वसाधारण कोचमध्ये धूळ, घाण व अस्वच्छता होती त्याशिवाय टॉयलेटमध्ये पाणी नव्हते व ते अस्वच्छ होते तसेच तक्रारकर्त्याला देण्यांत आलेले बर्थसुध्दा अस्वच्छ व घाण होते. तक्रारकर्त्याला सर्वसाधारण कोचमध्ये प्रवास करावा लागल्यामुळे त्याला वातानुकूलीन कोचमध्ये मिळणा-या कोणत्याही सोयी सवलती सर्वसाधारण कोचमध्ये उपलब्ध करुन देण्यांत आलेल्या नव्हत्या हे अमान्य केलेले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे रेल्वेचे आरक्षण केले होते याबद्दल कोणाचेही दुमत नाही त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
7. तक्रारकर्त्यांनी आपल्यासोबत अभ्यासाची पुस्तके घेतलेली होती व किती सामानाच्या बॅग्ज होत्या हे कुठेही स्पष्ट केले नाही. परंतु तक्रारकर्त्यानी वातानुकूलीन थ्री टियर कोचमध्ये आरक्षण करुन त्यांना सर्वसाधारण कोचमध्ये प्रवास करावा लागला त्यामुळे त्यांना मानसिक, अर्थीक त्रास सहन करावा लागला हे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी दक्षीण एक्सप्रेस गाडीला लावण्यांत आलेला सर्वसाधारण कोच हा स्वच्छ व व्यवस्थित होता याबाबत कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही कारण गाडीची स्वच्छता झाल्यानंतर त्या गोष्टीची नोंद ठेवणे हे रेल्वेच्या दैनंदीन कार्याचा भाग आहे व त्यासंबंधी त्यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. तक्रारकर्त्याने दि.17.08.2012 रोजी प्रवास केला आहे आणि त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर व त्याची नोटीस विरुध्द पक्षास प्राप्त झाल्यानंतर तक्रारकर्ता क्र. 2 याला टिकीटाच्या फरकाची रक्कम दि.04.03.2013 रोजी रु.549/- परत करण्यांत आली म्हणजे साधारणतः चार महीन्यांचे अवधीनंतर टिकीटांची रक्कम परत करण्यांत आली हे स्पष्ट होते. विरुध्द पक्षांनी आपल्या उत्तरात असे कुठेही म्हटले नाही की, दक्षीण एस्कप्रेसमधील थ्री टियर कोच क्र. बी-1 नादुरुस्त झाल्यानंतर दुसरा वातानुकूलीन कोच त्यांचेकडे उपलब्ध नव्हता किंवा भोपाळ ते नागपूर या प्रवासाला लागणा-या अवधीमध्ये त्याना नागपूरहून वातानुकूलीन कोच उपलब्ध करुन देणे शक्य नव्हते. परंतु त्यांनी तसा कोणताही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला असुविधांचा सामना करावा लागला व त्याला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला हे सुध्दा स्पष्ट होते. अश्या परिस्थितीत विरुध्द पक्ष हे त्रुटीपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई मिळणे योग्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करीता तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मान्य करुन आदेश पारित करण्यात येतो.
- // अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मान्य करण्यांत येत आहे.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या गैरसोयी व असुविधेबद्दल मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रु.10,000/- तसेच विरुध्द पक्ष क्र. 6 यांनी टिकीटाच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लावलेल्या विलंबामुळे झालेल्या त्रासाबद्दल रु.10,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी रु.3,000/- व विरुध्द पक्ष क्र. 6 यांनी रु.3,000/- तक्रारकर्त्यास अदा करावे.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
4. तक्रारकर्त्यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.