(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :20/04/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.08.08.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तिने नागपूर येथून मुंबई येथे जाण्याकरीता टिकीट क्र. 81433107 व्दारे विदर्भ एक्सप्रेस ट्रेन क्र.2105 एस.सी.कोच क्र.एस/5 मधे दि.24.10,2010 रोजी प्रवास सुरु केला. तिचेजवळ रु.26,000/- किमतीच्या वस्तु असलेली पिशवी होती, ती आरक्षीत बोगीमधुन चोरीस गेली. या संबंधाने तिने रेल्वे पोलिसांकडे तक्रारकेली मात्र उपयोग झाला नाही. रेल्वे अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे व इतर प्रवाशांना आरक्षीत डब्यात घुसू दिल्यामुळे ही चोरी झाली. या संबंधात रेल्वे पोलिसांतर्फे तपास पूर्ण झाला असुन त्यामधे तक्रारकर्तीचे सामान आढळून आले नाही असे कळविण्यांत आले, त्यामुळे गैरअर्जदारांच्या सेतेतील त्रुटीचे कारणावरुन तक्रारकर्तीने ही तक्रार मंचात दाखल केली व ती व्दारे रु.26,000/- चोरीस गेलेल्या वस्तुंच्या किमतीपोटी मिळावे, तिला गैरअर्जदारांकडे वेळोवेळी भेटी देण्यास आलेला खर्च रु.3,000/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.17,000/- व नोटीसचा खर्च रु.2,000/- एवढया रकमा 20% व्याजासह मिळावा अश्या मागण्यां केलेल्या आहेत.
3. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 12 दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
5. गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपले उत्तर सादर केले आणि तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकारली आणि तक्रारकर्तीने प्रवास केला, तिचे सामान चोरीस गेले व त्याची किंमत रु.26,000/- होती इत्यादी बाबीं नाकारल्या व असे नमुद केले की, टिकीटवरील वय आणि तक्रारीत लिहीलेले वय यात खुप फरक आहे. तक्रारकर्तीने सामानासंबंधी जे दस्तावेज दाखल केले त्यावर तिचे नाव नाही आणि या कारणास्तव तक्रारकर्तीची तक्रार खारिज करण्यांत यावी असा उजर घेतलेला आहे.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.20.03.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर, त्यांचा युक्तिवाद ऐकला, तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. सदर प्रकरणात गैरअर्जदारांनी जो लेखी जबाब दाखल केलेला आहे त्यास तक्रारकर्तीने कोणत्याही प्रकारे प्रतिउत्तर देऊन नाकारलेले नाही, तिला तशी संधी देण्यांत आलेली होती परंतु तिने शवटपर्यंत आपले प्रतिउत्तर दाखल केले नाही आणि गैरअर्जदारांनी उपस्थित केलेल्या मुद्दांचे निराकरण केलेले नाही.
8. तक्रारकर्तीने दाखल केलेले टिकीटावरील प्रवास करणा-या प्रवाश्याचे वय हे 46 व 47 वर्षे दर्शविलेले आहे आणि तक्रारकर्तीचे तक्रारीतील वय हे 32 वर्षे दर्शविलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी घेतलेल्या बचावात स्पष्टपणे तथ्य दिसुन येते की, ती प्रवास करणारी व्यक्ति आणि प्रकरणातील व्यक्ति ही एकच व्यक्ति नव्हती. दुसरे असे की तक्रारकर्तीचे म्हणणे असे आहे की, तिने ए.एम.सी. इंडियाकडून प्राप्त केलेल्या सामानाची किंमत रु.26,000/- होती, या संबंधाने तक्रारकर्तीने दस्तावेज क्र.7 या प्रकरणात दाखल केलेले आहे, त्यामध्ये सामानांची किंमत रु.24,700/- दर्शविलेली आहे. मात्र सदर दस्तावेजावर तक्रारकर्तीचे नाव नसुन विना डी. गायकवाड, नाव नमुद आहे. त्यामुळे या वादावाठी असे गृहीत धरले की, तक्रारकर्तीने प्रवास केला तर तिचेजवळ तेवढया किमतीचे सामान होते असा निष्कर्ष काढता येत नाही. म्हणून तक्रारकर्तीने आपली तक्रार सिध्द करण्याचे दृष्टीने योग्य पुरावा सादर केला नाही, यास्तव ती निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.