(मंचाचा निर्णय : श्री. प्रदिप पाटील - सदस्य. यांचे आदेशान्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 16/05/2016)
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे...
1. तक्रारकर्त्यानी नागपूरवरुन अकोला येथे जाण्याकरीता प्रेरणा एक्सप्रेसची दोन टिकीटे गाडी क्र.11454, पीएनआर नं.8221524769, कोच नं. एस-1, बर्थ नं.33 व 37 दि.23.02.2014 ची घेतली होती. तक्रारकर्त्याने प्रवासाचे दिवशी एस-1 डब्यामधे प्रवेश केल्यानंतर त्याला लक्षात आले की, सदर कोच अतिशय घाणेरडे व अस्वच्छ होते त्यानंतर तक्रारकर्त्याने एस-2 व एस-3 कोचचे जाऊन निरीक्षण केले असता त्याचे निदर्शनांस आले की, शौचालयामध्ये कचरा व घाण साचलेली आढळून आली तसेच बेसिनमध्ये कचरा पडला असल्यामुळे त्यात पाणी साचलेले होते. त्याशिवाय बर्थच्या खाली पूर्ण डब्यातधे कचरा पडला होता. यावरुन तक्रारकर्त्याचे लक्षात आले की, त्या कोचला स्वच्छ न करता आहे त्या स्थितीत चालविल्या जात आहे. तक्रारकर्त्याने सदर्हू कोचचे टिकीट निरीक्षण श्री. हर्षकुमार यांना यासंबंधी तक्रार केली. आणि तक्रार पुस्तिकेची मागणी केली, त्यावेळी सदर टिकीट निरीक्षकंनी तक्रार पुस्तीका देण्यास असमर्थनियता दर्शविली. त्यानंतर तक्रारकर्त्याने अकोला स्टेशनवर आल्यानंतर त्यासंबंधीची तक्रार नोंदविली तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे रेल्वे विभागातर्फे दि.11.09.1998 रोजी एक परिपत्रक जारी करण्यांत आलेले आहे. त्यामध्ये रेल्वेचे अधिक्षक, कंडक्टर आणि टिकीट निरीक्षक यांच्या कर्तव्याची यादी दिलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केलेला आहे. तसेच तक्रारकर्त्याचे मते केंद्रीय लेखापरिक्षण विभाग (CAG) मधे नमुद केले आहे की, भारतातील रेल्वे मधील अस्वच्छता व सॅनिटेशन यावर त्यांनी रिपोर्ट प्रसिध्द केलेला आहे आणि त्यावरुन रेल्वेतील घाण व अस्वच्छता कशी आहे हे लक्षात येते.
2. तक्रारकर्त्याने त्यानंतर दि.05.05.2014 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना पत्र पाठवुन त्याने प्रवास केलेल्या प्रेरणा एक्सप्रेसमधील अस्वच्छता व घाणेरडेपणा याबद्दल अवगत केले. आणि संबंधीत कर्मचारी व अधिकारी यांनी सेवेत दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांचेवर त्यांची चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली. तसेच त्या कोचमध्ये प्रवास करणा-या सर्व प्रवाश्यांना प्रत्येकी रु.100/- नुकसान भरपाई म्हणून देण्यांत यावी व सदरची रक्कम संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून वसुल करण्यांत यावी अशी विनंती केली.
त्यानंतर तक्रारकर्त्याने दि.24.06.2014 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना स्मरणपत्र पाठविले आणि त्याने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यांत यावी अशी विनंती केली. तक्रारकर्त्यानी आपल्या स्मरणपत्रात भारतीय रेल्वे नियम 212 प्रमाणे अस्वच्छ व घाणेरडेपणासाठी संबंधीत कर्मचा-यांवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली. विरुध्द पक्षांच्या अधिकारी व कर्मचा-यांनी नियमाप्रमाणे जर आपले कर्तव्य बजावले असते तर तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षास पत्र पाठविणे तसेच तक्रार करण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून तक्रारकर्त्याला नाईलाजास्तव सदरची तक्रार मंचात दाखल करावी लागली.
3. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत नोटीस पाठविली असता विरुध्द पक्षाने उत्तर सादर केले, त्यात त्यांनी तक्रारकर्त्यानी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. विरुध्द पक्षांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, प्रेरणा एक्सप्रेसचा रखरखाव हा नागपूर विभागाकडे आहे. दि.23.02.2014 रोजी सदर्हू गाडी ही स्वच्छ केल्यानंतर प्लॅटफॉर्मला लावण्यात आली होती. तक्रारकर्त्याशिवाय त्या गाडीने प्रवास करणा-या कोणत्याही प्रवाश्याने गाडीतील अस्वच्छतेबद्दल तक्रार केलेली नाही. तसेच गाडीत तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या अस्वच्छता, घाण आणि असुविधा नव्हत्या. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही सर्वस्वी खोटी व काल्पनीक असल्यामुळे ती खारिज होण्यांस पात्र आहे. तक्रारकर्ता हा रेल्वेविरुध्द सतत तक्रारी करीत असतो त्यामुळे तो स्वभावाने तक्रारखोर असल्यामुळे तो खोट्या तक्रारी करीत असतो.
4. प्रकरणाच्या निर्णयासाठी खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण
व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? होय.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- // कारणमिमांसा // -
5. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्ता व त्याची पत्नी हे नागपूर ते अकोला गाडी क्र.11454, पीएनआर नं.8221524769, कोच नं. एस-1, बर्थ नं.33 व 37 दि.23.02.2014 प्रवास करीत होते हे तक्रारकर्त्याचे म्हणणे विरुध्द पक्षांनी नाकारलेले नाही. याशिवाय सदर्हू गाडी ही अस्वच्छ व घाणेरडी होती आणि शौचालय तसेच बेसिनमध्ये कचरा पडून होता, यासंबंधी तक्रारकर्त्याने कोचमधील अस्वच्छते बाबत फोटो दाखल केलले आहेत, त्यामध्ये सदर कोच अतिशय घाणेरडा व अस्वच्छ होता, सिट व बर्थच्या खाली खुप कचरा पडून होता. याशिवाय वॉशबेसिन व शौचालयात घाण जमलेली होती हे दाखल फोटोंवरुन स्पष्ट होते, म्हणजेच तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे सदर्हू कोच स्वच्छ केलेला नव्हता हे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या फोटोबाबत विरुध्द पक्षांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही, यावरुन तक्रारकर्त्याचे मताला पुष्टी मिळते. म्हणजेच तक्रारकर्त्याने रेल्वेकडून पैसे देऊन टिकीट विकत घेतलेले आहे व तो विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे हे स्पष्ट होते. परंतु कोचमध्ये असलेल्या अस्वच्छता व घाणीवरुन रेल्वेने त्याला योग्य त्या सोयी सुविधा पुरविलेल्या नाही. म्हणून त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला यावरुन विरुध्द पक्षाने योग्य ती सेवा देण्यांस टाळाटाळ केली आहे हे स्पष्ट आहे. तक्रारकर्त्याने अकोला रेल्वेस्टेशनला कोचमध्ये असलेल्या घाण व असुविधेबद्दल केलेल्या तक्रारीची प्रत दाखल केलेली आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि.05.03.2014 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांना पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. याशिवाय तक्रारकर्त्याने दि.24.06.2014 रोजी पाठविलेल्या स्मरणपत्राची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने दि.24.02.2014 ला टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलेल्या बातमीचे तसेच महाराष्ट्र टाईम्स, नागपूरमध्ये छापलेल्या बातमीची प्रत दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत भारत सरकार रेल्वे मंत्रालयातर्फे प्रसिध्द केलेल्या विविध अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या कर्तव्याचे परिपत्रक जोडलेले आहे. त्यामध्ये रेल्वे अधिक्षक, हा संपूर्ण गाडीचा इंन्चार्ज असून गाडीसंबंधी असणा-या सोयी सुविधा उपलब्द करुन देण्याची जबाबदारी ही त्यांची असते, असे नमुद केले आहे. त्यानंतर त्या परिपत्रकामध्ये व्दितीयश्रेणी शयणयानमधील टिकीट निरीक्षकाच्या कर्तव्याचे परिपत्रक जोडलेले आहे, त्यामध्ये प्रत्येक डब्बा स्वच्छ असल्याबाबत खात्री करुन घेण्याची जबाबदारी हि टिकीट निरीक्षकाची असते असे नमुद केलेले आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने केंद्रीय लेखापरिक्षण विभाग (CAG) चा अहवाल सादर केला आहे. त्यामधे शौचालयाची अवस्था फार घाणेरडी व अस्वच्छ असल्याचे नमुद केले आहे व रेल्वेने त्यामध्ये लक्ष घालुन स्वच्छता करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या राजपत्रामध्ये गाडीमधे अस्वच्छता व घाण करणा-यासाठी दंड व शिक्षेची तरतुद केलेली आहे.
6. तक्रारकर्त्यानी आपल्या प्रतिज्ञापत्रात तक्रारकर्त्याच्या कथनाची दखल घेण्याऐवजी त्याचेवर खोटे आरोप केल्याबद्दल आक्षेप नोंदविलेला आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, रेल्वेमधून प्रवास करणा-या सर्वसामान्य प्रवाश्यांना किती गैरसोयींचा सामना करावा लागतो हे स्पष्ट केले आहे. कोचचा रखरखाव, त्यामधील स्वच्छता पुरविण्यांत येणारे पाणी तसेच शौचालयातील स्वच्छता याकरता रेल्वे प्रवाश्यांकडून शुल्क आकारीत असतात परंतु प्रत्यक्षात प्रवाश्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. यासंबंधी तक्रार टिकीट निरीक्षकांना केल्यावरही ते त्याची दखल घेत नाहीत, एवढेच नव्हेतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 या वरिष्ठ पातळीवर तक्रारकरुनही त्याची दखल घेतल्या गेली नाही. यावरुन रेल्वेची प्रवाश्यांकरता असलेली उदासिनता दिसुन येते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे सदर्हू कोचबाबत केलेल्या तक्रारीची माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता दि.26.03.2014 च्या पत्राव्दारे तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील सत्यता आढळून आली आणि त्या कोचशी संबंधीत कर्मचा-यांवर कारवाई करण्यांत आल्याचे तक्रारकर्त्यास कळविण्यांत आले. म्हणजेच तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्ता व त्याची पत्नी करीत असलेल्या कोचमधे घाण व अस्वच्छता होती हे विरुध्द पक्षांनी मान्य केले आहे व त्यांनी संबंधीत कर्मचा-यांवर कारवाई केलेली आहे, हे स्पष्ट होते. अश्या परिस्थितीत तक्रारकर्त्याची तक्रार मान्य करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ता व त्याचे पत्नीस विरुध्द पक्षांनी पुरविलेल्या त्रुटीपूर्ण सेवांबद्दल प्रत्येकी रु.100/- देण्यांत येत आहे. तसेच तक्रारकर्त्यास व त्याचे पत्नीस झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबाबत योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुढील प्रमाणे देत आहे.
करीता मंच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवज व उपरोक्त निष्कर्षाच्या आधारे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरुध्द पक्षांनी पुरविलेल्या त्रुटीपूर्ण सेवांबद्दल तक्रारकर्त्याला प्रत्येकी रु.100/- अदा करावे.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास व त्याचे पत्नीला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- अदा करावा.
3. वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षानी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे आदेशाची
प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
(प्रदीप पाटील) (श्रीमती मंजुश्री खनके) (मनोहर चिलबुले)
सदस्य सदस्या अध्यक्ष