(मंचाचा निर्णय : श्री. प्रदिप पाटील - सदस्य. यांचे आदेशान्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 16/05/2016)
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे...
1. तक्रारकर्त्यानी नागपूरवरुन दोन टिकीट ए.सी.2 टायरचे दि.13.06.2013 ला नागपूर ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते अकोला रु.6,350/- देऊन काढले होते. त्या टिकीटांचा पीएनआर नं.6220640884 असा आणि गाडी क्र.11040 होता, दुसरा पीएनआर नं.8501353320 असा आणि गाडी क्र.11039 होता. तक्रारकर्ता दि.03.07.2013 रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसने काल्हापूर येथे गेला. तक्रारकर्त्याला ए-1 कोचमध्ये क्र. 23 व 24 कोल्हापूर ते अकोला या प्रवासाकरीता बर्थ मिळाले होते. दि.06.07.2013 रोजी कोल्हापूरवरुन गाडी सुरु झाल्यानंतर कोच अटेंडन्टने बेडशिट आणि बँकेट तसेच उश्या सर्व प्रवाशांना पुरविल्या त्या सर्वांचा दर्जा एकदम निकृष्ट होता. पुरविण्यांत आलेले बँकेट हे घाणेरडया स्थितीत आणि अस्वच्छ होते. तसेच देण्यांत आलेल्या बेडशिट या व्यवस्थीत धुण्यांत आलेल्या नसुन अस्वच्छ होत्या. प्रवासा दरम्यान नॅपकीनसुध्दा देण्यांत आलेले नव्हते. तक्रारकर्त्याने बँकेटला बेडशिट जोडून कसातरी प्रवास केला या संबंधी कोच अटेंडन्ट व टिसीला तक्रार करण्यांत आली, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने मलकापूर स्टेशनला दि.07.07.2013 रोजी या संबंधी तक्रार केली.
2. तसेच तक्रारकर्ता जेव्हा दि.03.07.2013 रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसने कोल्हापूरला जाण्यांस निघाला तेव्हा रहीमतपूरपर्यंत त्याला नॅपकीन देण्यांत आलेले नव्हते ती गोष्ट त्याने कोच अटेन्डट आणि टिसीचे निदर्शनास आणून दिले. परंतु त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही. असाच अनुभव तक्रारकर्त्यास परतीचे प्रवासात आला. तक्रारकर्त्याने दि.10.07.2013 ला विरुध्द पक्ष क्र. 1 यांना यासंबंधाने पत्र पाठविले आणि झालेल्या मनःस्तापाबद्दल सदर कोचमधील प्रवास करणा-या सर्व प्रवाश्यांना रु.100/- देण्याची मागणी केली. तक्रारकर्त्याने प्रवाश्यांना देण्यांत येणा-या मानसिक त्रासाबद्दल मिळणा-या रकमेची वसुली रेल्वेच्या निष्काळजीपणे काम करणा-या कर्मचा-यांच्या तसेच संबंधीत ठेकेदाराकडून वसुली करण्याची विनंती केली. तक्रारकर्त्याचे हे लक्षात आले की, तो प्रवास करीत असलेल्या एसी कोच हा पूर्णजुना होता आणि त्यातील वातानुकूलीत यंत्रणा बरोबर काम करीत नव्हते. कोचमध्ये कोंदट वातावरण होते, हवेचा पुरेसा पुरवठा होत नव्हता आणि कोचमधील उष्णतामान हे कमी-जास्त होत होते, कारण वातानुकूलीत यंत्रणा व्यवस्थीत काम करीत नव्हती. अनेक प्रवाश्यांना होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी छतावरील पंखे बंद केले. त्यामुळे बाजुला असलेल्या बर्थच्या प्रवाश्यांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्ता ज्या दिवशी म्हणजे दि.03.07.2013 रोजी नागपूरहून रहमतपूर पर्यंत प्रवास करीत होता त्यावेळी त्याचे कोचमध्ये अनेक अनारक्षीत प्रवाश्यांनी प्रवास केला ही घटना भुसावळ ते मनमाड या दरम्यान घडली हे सर्व प्रवासी रेल्वेचे कर्मचारी किंवा मासिक पासधारक होते. यासंबंधी तक्रारकर्त्याने असे नमुद केले आहे की, नागपूरहून प्रवास सुरु झाला त्यावेळीही काही रेल्वेचे कर्मचारी हे आरक्षीत कोचमध्ये बसुन प्रवास करीत होते. टिकीट निरीक्षकांना या संबंधी वारंवार सांगूनही त्यांनी मुक-बधीराची भुमिका घेतली होती. आकस्मीक तपासणी पथक किंवा दक्षता पथक यांनी जर वेळोवेळी तपासणी केली तर आरक्षीत कोचमधुन प्रवास करणा-या प्रवाश्यांना हा त्रास सहन करावा लागणार नाही. परंतु ते आपल्या कर्तव्यात कसुर करीत असल्यामुळे प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्ता जरी एसी-2 टायर कोचमधुन प्रवास करीत होता तेव्हा त्याला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला तर एसी-3 टायर आणि स्लीपर कोचमधुन प्रवास करणा-या प्रवाश्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल ही कल्पनाच भयावह आहे. रेल्वे मंत्रालय तसेच रेल्वे बार्डाने वातानुकूलीत कोचमध्ये पुरविण्यांत येणा-या बेडशिट, टॉवेल, ब्लँकेट पुरविण्या संबंधी दि.19.07.2013 निर्देश दिलेले आहेत. तसेच ट्रेन अधिक्षक, कंडक्टर, टिकीट निरीक्षक यांच्या कर्तव्यासंबंधी रेल्वे बोर्डाने दि.11.09.1998 रोजी परिपत्रक जारी केलेले आहे. तक्रारकर्त्याने त्यानंतर दि.24.09.2013 रोजी त्याला झालेल्या त्रासाबद्दल विरुध्द पक्ष क्र. 1 यांना स्मरणपत्र पाठविले परंतु त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे जर प्रवाश्यांच्या तक्रारीची दखल विरुध्द पक्षांनी घेतली असती व त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असता तर तक्रारकर्त्याला सदरची तक्रार दाखल करावी लागली नसती. परंतु विरुध्द पक्षांचे निष्काळजीपणा तसेच प्रवाश्यांप्रती असलेली अनास्था व त्यांना पुरविण्यांत येणा-या सुखसोयी याबद्दल असलेल्या उणिवा यामुळे प्रवाश्यांना अतोनात मानसिक, शारीरिक व आर्थीक त्रास सहन करावा लागला आणि एवढे करुन रेल्वे प्रवाश्यांच्या प्रति असलेल्या कर्तव्यात उदासिन आहेत. आणि म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
3. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत नोटीस पाठविली असता विरुध्द पक्षाने उत्तर सादर केले, त्यात त्यांनी सदर्हू तक्रारीचा उगम हा कोल्हापूर व अकोला या दरम्यान झालेला असल्यामुळे सदरची तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यामुळे सदरची तक्रार चालविण्याचा अधिकार मंचाला नाही म्हणून ती खारिज करण्यांत यावी. तसेच कोल्हापूर आणि अकोला ही दोन्ही स्टेशने ही विरुध्द पक्ष क्र. 2 चे अधिकारात येत नसल्यामुळे आणि भुसावळ विभागाअंतर्गत येत असल्यामुळे सदरची तक्रार चालविल्या जावू शकत नाही. तसेच तक्रारकर्त्याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत, आणि तक्रारकर्त्याने प्रवासा दरम्यान कोणतीही तक्रार नोंदविलेली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार पूर्व नियोजीत असावी असे वाटते आणि त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
4. प्रकरणाच्या निर्णयासाठी खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण
व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? होय.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- // कारणमिमांसा // -
5. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्ता व त्याची पत्नी यांनी दि.30.07.2013 रोजी नागपूर ते कोल्हापूर आणि दि.06.07.2016 रोजी कोल्हापूर ते अकोला असा प्रवास केला. महाराष्ट्र एक्सप्रेस वातानुकूलीत व्दितीय श्रेणीने प्रवास केला याबद्दल मतभेद नाही व ते विरुध्द पक्षांनी आपल्या उत्तरात मान्य केलेले आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि.10.07.2013 रोजी विरुध्द पक्षाकडे त्याला पुरविण्यांत आलेल्या अपु-या सोयी सवलतीसंबंधी तक्रार केलेली आहे, त्यासंबंधी स्मरणपत्र त्यांनी दि.19.07.2013 रोजी विरुध्द पक्षास पाठविलेले आहे. तक्रारकर्त्यानी त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल विरुध्द पक्षांना दि.24.09.2013 रोजी पुन्हा पत्र पाठविलेले आहे. परंतु विरुध्द पक्षांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. तक्रारकर्त्याने नागपूरहून प्रवासाचे तिकीट काढले होते आणि ते तिकीटाचे पैसे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे भरलेले होते म्हणजे तक्रारकर्ता विरुध्द पक्षांचा ग्राहक असुन तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षांनी योग्य ती सेवा दिली नाही व सोयी सुविधा पुरविल्या नाही ही विरुध्द पक्षांच्या सेवेतील त्रुटी आहे आणि त्याकरीता विरुध्द पक्ष सर्वस्वी जबाबदार आहेत. प्रवाश्यांकडून तिकिटांचे व पुरविण्यांत येणा-या सोयी सुविधेचे पैसे आकारुन त्यांना सोची सुविधा न देणे ही सेवेतील त्रुटी तर आहेच पण त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेणे ही बाब गंभीर स्वरुपाची व निष्काळजीपणाची असुन यात रेल्वेची प्रवाश्याप्रती असलेली उदासीनता दिसून येते. तक्रारकर्त्याने रेल्वे निरीक्षक व कोच अटेन्डंट यांना वारंवार तक्रारी करुनही त्यांनी प्रवाश्यांप्रती आपल्या सेवेत केलेला कसुर आहे. वातानुकूलीत श्रेणीतील किंवा इतर श्रेणीतील प्रवाश्यांकडून टिकीटे आणि सोयी सवलतीचे पैसे घेऊनही त्यांना नॅकपीन न देणे, तसेच बेडशिट मळलेल्या पुरवीणे, ब्लँकेट अस्वच्छ पुरवीणे ह्या प्रवाश्यांप्रती असलेल्या न्युनतापूर्ण सेवा दर्शवितात. याशिवाय आरक्षीत कोचमध्ये अनारक्षीत प्रवासी व रेल्वे कर्मचारी तसेच मासिक पासधारक यांना प्रवास करु देणे हा रेल्वेचा गलथानपणा दर्शविते, प्रवाश्यांकडून प्रवासभाडे तसेच इतर सोयी सुविधांचे शुल्क आकारुन त उपलब्ध करुन न देणे व त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांना त्रास सहन करावी लागणे ही बाब नित्याची झालेली आहे. परंतु तक्रारकर्त्यासारखा एखादा सजग व दक्ष प्रवासी एखादाच असतो जो या सर्व निष्काळजीपणात दोषपूर्ण सेवा व रेल्वेल्या उदासीनतेबद्दल तक्रार नोंदवितो व त्याचा पाठपुरावा करतो. सदर्हू तक्रार ही तक्रारकर्त्याच्या जागरुकतेबाबतचे उदाहरण आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीची योग्य ती दखल घेणे व त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या सेवेतील त्रुटी दूर करुन सुधारणा करणे हे रेल्वेचे प्रवाश्यांप्रती कर्तव्य होते. परंतु विरुध्द पक्षांनी त्याकडे संपूर्णतः दूर्लक्ष केलेले आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होय असा नोंदविला आहे.
6. मुद्दा क्र.2 व 3 बाबतः- तक्रारकर्त्याने संपूर्ण प्रवासाचे तिकीट नागपूरवरुन काढले होते आणि त्याने प्रवास नागपूरहून सुरु केला आणि नागपूरलाच संपवलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीत ज्या गाडीमधुन प्रवास केला त्यासंबंधीची असल्यामुळे या मंचाच्या अधिकार क्षेत्रात आहे. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याच्या आरक्षीत कोचमध्ये अनेक अनारक्षीत प्रवासी मासिक पासधारक व रेल्वेचे कर्मचारी यांनी नागपूरवरुनच प्रवास सुरु केला आणि या संबंधीची तक्रार तक्रारकर्त्याने टि.सी. कडे सुरवातीलाच केली होती. आणि त्यानंतर तक्रारकर्त्याने त्याला होत असलेल्या विरुध्द पक्षाच्या निष्काळजीपणामुळे त्रासाबद्दल विरुध्द पक्षांकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. परंतु विरुध्द पक्षांनी त्यांच्या कोणत्याही तक्रारीची दखल न घेता उलट त्याची तक्रार अधिकार क्षेत्रात येत नाही असा आक्षेप घेतला. प्रत्यक्षात विरुध्द पक्षांनी या सर्व निष्काळजीपणाची व गैरसोयीची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु प्रवाश्यांकडून प्रवासाचे भाडे याशिवाय देण्यांत येत असलेल्या सर्व सोयी सुविधांबद्दल दुर्लक्ष करणे आणि त्यांना आहे त्या परिस्थितीत प्रवास करणे भाग पाडणे, म्हणजे त्यांचा मानसिक छळ करणे होय. अश्या परिस्थितीत तक्रारकर्त्यासारखा एखादाच प्रवासी या सर्व बाबी उचलून धरतो त्यावरच आक्षेप घेऊन सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे सांगणे म्हणजे सजक नागरीकांचे मनोधैर्य खच्ची करणे असे म्हणता येईल. विरुध्द पक्षांनी आपल्या असलेल्या सेवेतील त्रुटी दूर करुन प्रवाश्यांना योग्य त्या सेवा पुरविणे व चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे त्यांचे कर्तव्य असुनही ते आपल्या चुकांचे समर्थन करीत आहेत हे मोठे आश्चर्य आहे. अश्या परिस्थितीत तक्रारकर्त्यांनी तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षांच्या सेवेतील त्रुटी स्पष्टपणे समोर आणलेली आहे.
7. तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल करुन विरुध्द पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांना उत्तरे दिलेली आहेत. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तरात हे स्पष्ट केले आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 हे 5 विभागांचे प्रमुख म्हणुन काम करीत आहेत. त्यात मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या विभागांचा समावेश होतो. त्यामुळे विरुध्द पक्षांचे हे म्हणणे चुकीचे व अयोग्य आहे की, त्यांनी योग्य पक्षांना जोडलेले नाही. तक्रारकर्त्यानी आपल्या प्रतिज्ञापत्रात मा. राष्ट्रीय आयोगाच्या एका न्याय निवाडयाचा हवाला दिलेला आहे त्यात एखाद्या पक्षाला चुकीने किंवा तक्रारीत जोडले नाही म्हणून ती तक्रार किंवा दावा चालू शकणार नाही किंवा खारिज होण्यांस पात्र आहे हे म्हणणे योग्य होणार नाही. मा. राष्ट्रीय आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, दिवाणी प्रक्रिया संहीता ग्राहक कायद्याला तंतोतंत लागू होत नसल्याने त्याचा फक्त मर्यादीतच उपयोग करण्यांत यावा. तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्षांचे हे म्हणणे खोडून काढले आहे की, तक्रारकर्ता व त्याची पत्नी प्रवास करीत असलेल्या कोचमध्ये योग्य सोयी सुविधा पुरविलेल्या होत्या. प्रत्यक्षामध्ये त्याला देण्यांत आलेल्या बेडशिट, ब्लँकेट हे अतिशय खराब अवस्थेत व घाणेरडे होते. त्याशिवाय त्याला शेवटपर्यंत नॅपकीन देण्यांत आले नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या कोचमध्ये बसलेल्या प्रवाश्यांचे नाव दिलेले असुन त्यांनी पण विरुध्द पक्षांच्या सेवा सुविधेत अनेक त्रुटया असल्याचे म्हटलेले आहे. तक्रारकर्त्यानी आपल्या प्रतिज्ञालेखाबरोबर रेल्वेने त्याला पाठविलेले पत्र लावलेले आहे त्यात त्याचेकडून पत्र मिळाल्याचे स्पष्ट नमुद करण्यांत आलेले आहे आणि त्यांनी होत असलेल्या गैरसोयी आणि उणिवा या त्यांच्या नजरेस आणून दिल्याबद्दल आभार मानले आहे. आणि दि.14.10.2014 चे पत्रान्वये त्याला कळविले आहे की, तक्रारकर्ता प्रवास करीत असलेल्या कोचमधील कॉन्ट्रक्टरवर त्यानी त्रुटीपूर्ण सेवा दिल्याबाबत रु.2,000/- दंड देण्यांत आलेला आहे. तसेच सामग्री पुरविणा-या रेल्वेच्या कर्मचा-यांना समज देण्यांत आले असून खराब असलेले ब्लॅंकेट स्वच्छ करण्यांत आलेले आहे. तक्रारकर्त्यानी आपल्या युक्तिवादासोबत राष्ट्रीय आयोगाचे दि.15.02.2015 च्या न्याय निवाडयाची प्रत जोडलेली आहे. त्यामधे राष्ट्रीय आयोगाने विद्युत मंडळाच्या कर्मचा-यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांना दंड करण्यांत आल्याचे नमुद केलेले आहे. आणि म्हणून तक्रारकर्त्याने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या कोचमधील रेल्वे कर्मचा-यांवर दंड आकारण्यांत यावा असे म्हटले आहे. अश्या परिस्थितीत तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करुन त्याला झालेल्या गैरसोयी व त्रासाबद्दल नुकसान भरपाई देणे उचित होईल असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्यानी आपले म्हणणे सिध्द करण्याकरीता बरेच परिश्रम घेतलेले आहे आणि रेल्वेचे अनेक नियम व परिपत्रके सोबत जोडलेली आहेत त्यामध्ये रेल्वेच्या कर्मचा-यांची कर्तव्ये नमुद केलेली आहे. तसेच प्रवाश्यांना देण्यांत येणा-या सोयी सुविधांबद्दल उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यांत येते. तक्रारकर्ता व त्याचे पत्नीस विरुध्द पक्षांनी पुरविलेल्या त्रुटीपूर्ण सेवांबद्दल प्रत्येकी रु.100/- देण्यांत येत आहे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबाबत योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुढील प्रमाणे देत आहे.
करीता मंच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवज व उपरोक्त निष्कर्षाच्या आधारे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरुध्द पक्षांनी पुरविलेल्या त्रुटीपूर्ण सेवांबद्दल तक्रारकर्त्याला प्रत्येकी रु.100/- अदा करावे.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास व त्याचे पत्नीस झालेल्या शारीरिक, मानसिक
त्रासापोटी रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- अदा करावा.
3. वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षानी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे आदेशाची
प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
(प्रदीप पाटील) (श्रीमती मंजुश्री खनके) (मनोहर चिलबुले)
सदस्य सदस्या अध्यक्ष