जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी
--------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – २०९/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०८/०७/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २८/०१/२०१४
अमोल टिकेश्वर घोटेकर ----- तक्रारदार.
उ.व.३२ वर्ष, व्यवसाय- इंजिनिअर.
रा.द्वारा एम.पी.धोपटे,प्लॉट नं.८,
न्यू उर्वेला कॉलोनी,नागपूर-१५
विरुध्द
(१)शाखा प्रबंधक ----- सामनेवाले.
यूनियन बैंक ऑफ इंडिया,
धूळे शाखा,धूळे,महाराष्ट्र
न्यायासन
(मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्या - सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वत:)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.बी.बी.जमादार)
----------------------------------------------
निकालपत्र
(द्वारा : मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
----------------------------------------------
(१) सामनेवाले यांनी ए.टी.एम. सेवेत त्रुटी ठेवल्याने, तक्रारदाराच्या बचत खात्यातील धोखाधडी करुन काढलेली रक्कम परत मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, ते मुळचे नागपूरचे निवासी असून इरकॉन इंन्टरनॅशनल लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमात नोकरीत असतांना त्यांची धुळे येथे नियुक्ति होती. मासिक वेतन जमा करण्यासाठी तक्रारदारांनी सामनेवाले शाखेत एक बचत खाते क्र.३२४००२०१०१५९४८३ उघडले होते. त्यासाठी सामनेवाले यांनी तक्रारदारास एटीएम कार्ड क्र.४२३६८३२४००२५३६९ उपलब्ध करुन दिले होते व त्याद्वारे तक्रारदार नेहमी बचत खात्यातील वेतन राशी काढीत असायचा. तक्रारदार दि.०८-१२-२००८ ला नागपूरला आला व त्यानंतर धुळयाला परत गेला नाही. दरम्यानचे काळात त्याने सामनेवाले शाखेतून बचत खात्यातील पैसे काढले नाही. त्यावेळी सदर बचत खात्यात रक्कम रु.४५,६२६/- शिल्लक होते.
तक्रारदाराने दि.२७-११-२००९ व दि.०१-१२-२००९ रोजी नागपूर येथे सदर खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, खात्यात पुरेसे पैसे नाहीत असे एटीएम वर समजले. या बाबत नागपूर शाखेतून धुळे शाखेतील बचत खात्याचे विवरण संगणकाद्वारे मिळाले असून त्यामुळे सदर खात्यात केवळ रक्कम रु.५११/- शिल्लक असल्याचे तक्रारदारास समजले.
तक्रारदाराच्या खात्यातील रक्कम रु.४५,०००/- लबाडीने व धोखाधडी करुन काढले गेले आहेत. म्हणून ते परत मिळण्यासाठी तक्रारदाराने सामनेवाले व सामनेवालेंचे प्रधान कार्यालय,मुंबई यांचेकडे दि.०२-१२-२००९ रोजी लिखित तक्रार केली. परंतु सामनेवाले यांनी त्यास उत्तर दिले नाही, त्याबाबत चौकशी केली नाही किंवा रक्कमही तक्रारदाराच्या खात्यात जमा केली नाही.
या वाद विषयाबाबत तक्रारदाराने प्रथम नागपूर ग्राहक मंचात तक्रार अर्ज दाखल केला होता, परंतु अधिकार क्षेत्राअभावी सदर तक्रार योग्य अधिकारक्षेत्र असलेल्या मंचात दाखल करण्याचे तक्रारदारास सांगण्यात आले.
सबब सामनेवाले यांचेकडून, धोखाधडी करुन काढण्यात आलेले रक्कम रु.४५,०००/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.५०,०००/-, अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.५,०००/- असे एकूण रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी तक्रारदारांनी शेवटी विनंती केली आहे.
(३) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.नं.१ वर शपथेवर तक्रार अर्ज तसेच पुराव्यासाठी नि.नं.२ वरील यादीनुसार एकूण ५ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात सामनेवालेंविरुध्द दिलेली तक्रार, अनुस्मरणपत्र क्र.१, अनुस्मरणपत्र क्र.२, बचत खात्याचे विवरण आणि नागपूर मंचाचा आदेश यांचा समावेश आहे. तसेच प्रतिउत्तर दाखल केले आहे.
(४) सामनेवाले यांनी त्यांचा खुलासा नि.नं.१५ वर दाखल केला असून, त्यात त्यांनी तक्रारदारांचा खाते नंबर आणि एटीएम कार्ड नंबर बरोबर असल्याचे मान्य केले आहे, मात्र तक्रारदार ग्राहक आहे ही बाब सिध्द करावी असे नमूद केले असून तक्रारीतील मागणी अमान्य केली आहे. त्यांचे पुढे असे कथन आहे की, तक्रारदारांच्या बचत खात्याच्या तपशिलावरुन सदर एटीएम कार्डद्वारे सामनेवालेंच्या नागपूर येथील शाखेतून व इतर बॅंकेतून वेळोवेळी रक्कम काढली असून काही वेळा खरेदीचे बिलही सदर एटीएम कार्डद्वारे दिले गेले आहे. सदरील प्रकरणाची चौकशी करणे बॅंकेच्या धकाधकीच्या व्यवहारात शक्य नाही.
एटीएम कार्डचा नंबर हा गुप्त असतो व तो केवळ संबंधित कार्डधारकास माहित असतो. तसेच एटीएम मशिनवर वेळोवेळी पिन नंबर बदलविण्याची सोय असते. त्याचा वापर करुन एटीएम धारक त्याचा नंबर बदलवू शकतो. त्यामुळे धोखाधडी होण्याचा संभव येत नाही.
तक्रारदारांच्या तक्रारीत व त्यांच्या संबंधित खाते उता-यात तफावत आहे. तक्रार निराधार, निरर्थक आहे. तक्रारीतील कथनाच्या पुराव्यासाठी तक्रारदाराने कोणताही कागदोपत्री सबळ पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी सामनेवाले यांनी शेवटी विनंती केली आहे.
(५) सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशाच्या पुष्टयर्थ नि.नं.१६ वर शपथपत्र तसेच तक्रारदारांच्या खाते उता-याची छायांकीत प्रत दाखल केली आहे.
(६) तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे आणि सामनेवाले यांचा खुलासा, दाखल खाते उतारा पाहता तसेच तक्रारदारांनी स्वत: व सामनेवालेंच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : नाही |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले बॅंकेत बचत खाते उघडले होते हे उभयपक्षास मान्य असून त्या बाबत कोणताही वाद नाही. यावरुन तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांच्या सामनेवाले बॅंकेतील बचत खात्यामधील रक्कम धोखाधडीने काढली गेली आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदारांच्या तक्रारीचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, दि.०८-१२-२००८ पासून तक्रारदार नागपूर शहरात असून धुळे शहरात आलेले नाहीत. तसेच सामनेवाले बॅंकेच्या कोणत्याही अधिकारी/कर्मचा-याने तक्रारदारांची फसवणूक केल्याचे तक्रारदाराने नमूद केलेले नाही. केवळ धोखाधडी करुन आपले खात्यातील पैसे काढले गेले एवढेच तक्रारदार तक्रार अर्जात नमूद करत आहेत.
प्रकरणात दाखल कागदपत्रांचे विशेषत: सामनेवाले यांनी दाखल केलेल्या तक्रारदारांच्या बचत खात्याचे हिशोबाच्या तक्त्याचे अवलोकन केले असता हे स्पष्ट होते की, नागपूर शहरातील विविध बॅंकेचे एटीएम द्वारे सदर खात्यातून वेळोवेळी रक्कम काढली गेली आहे. तसेच काही प्रसंगी खरेदीचे बील अदा करण्यासाठी सदर एटीएम कार्डद्वारे नागपूर येथेच रक्कम दिली गेली आहे. एटीएम कार्डचा नंबर हा गोपनीय असतो व तो केवळ असे कार्डधारक व्यक्ती अथवा अशा व्यक्तीने तो नंबर इतर कुणास सांगितला असेल तर अशा व्यक्तीलाच माहित असतो. एटीएम द्वारे, केवळ एटीएम कार्ड जवळ बाळगणारी व्यक्ती अथवा केवळ एखाद्या एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांक माहित असलेली व्यक्ती रक्कम काढू शकत नाही. एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी गोपनीय क्रमांक माहित असणे आणि संबंधीत एटीएम कार्ड जवळ असणे या दोन्ही बाबी आवश्यक असतात. त्यामुळे एटीएम द्वारे, तक्रारदारांच्या एटीएम कार्डचे वापरा शिवाय केवळ गोपनीय क्रमांकाचे आधारे अथवा इतर मार्गाने वारंवार पैसे काढले गेले असे संभवत नाही.
वाद विषय असलेले एटीएम कार्ड तक्रारदाराने कधी इतर कोणाचे ताब्यात दिले होते काय ?, सदर कार्डचा गोपनीय क्रमांक त्यांनी इतर कोणास सांगितला होता काय ? या बाबत तक्रारदारांनी तक्रार अर्जात कोणताही सुस्पष्ट खुलासा केलेला नाही. तसेच तक्रारदारांच्या बचत खात्यातून रक्कम काढल्याचा व जमा केल्याचा तपशील दर्शविणारे जे विवरणपत्र सामनेवालेंनी दाखल केले आहे त्यात तक्रारदारांचा एटीएम कार्ड क्रमांक ४२१३६८३२४००२५३६९ असा असल्याचे दिसते. मात्र तक्रारदारांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये त्यांचा एटीएम कार्ड क्रमांक ४२३६८३२४००२५३६९ असा असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी व सामनेवालेंनी नमूद केलेल्या संबंधित एटीएम कार्डचे क्रमांकात तफावत आहे. परंतु या बाबतही तक्रारदाराने कोणताही समर्पक खुलासा प्रकरणात दाखल केलेला नाही.
उपरोक्त सर्व बाबीचा विचार करता, सामनेवाले यांनी धोखाधडीने तक्रारदारांच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचे सिध्द होत नाही. तसेच तक्रारदारांनी कोणत्याही सबळ पुराव्याने सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी असल्याचे शाबीत केलेले नाही. त्यामुळे सामनेवालेंनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याने तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द होण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) उपरोक्त सर्व बाबीचा विचार करता न्यायाचे दृष्टीने खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २८/०१/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)