जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार अर्ज क्रमांक - 403/2010
तक्रार अर्ज दाखल तारीखः- 22/03/2010
तक्रार अर्ज निकाल तारीखः- 12/08/2015
श्री.प्रकाशचंद्र जगन्नाथ बेहेडे ........तक्रारदार
उ व 39 वर्षे धंदा व्यापार,
रा.प्लॉट नं.20,जे.के.पार्क रोड,स्वीमींग टँक जवळ,
मेहरुण भाग,जळगांव.
विरुध्द
1. म.सहायक महाप्रबंधक (तक्रार विभाग) .....सामनेवाला.
युनियन बँक ऑफ इंडिया,239,बॅकवे रेक्लमेशन,
विधान भवन मार्ग,नरीमन पॉईंट, मुंबई 400021.
2. म.वरिष्ठ व्यवस्थापक, सर्व्हीट ब्रॅच,
युनियन बँक ऑफ इंडिया,पी.एम.टी.बिल्डींग,
स्वारगेटख्, शंकरसेठ मार्ग,पुणे 411002.
3. म.मॅनेजर,
युनियन बँक ऑफ इंडिया,
शाखा सिंधी कॉलनी,
चेतना हॉस्पिटलसमोर, सिंधी कॉलनी,जळगांव.
कोरम –
श्री.व्हि.आर.लोंढे. अध्यक्ष.
श्रीमती.पुनम नि. मलिक. सदस्या.
तक्रारदार तर्फे अड.एच.ए.भंगाळे.
सामनेवाला तर्फे अड.एस.एस.तारे,अड.हेमंत काकडे,
नि का ल प त्र
(द्वारा – मा.श्रीमती पुनम नि मलिक,सदस्या)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना देण्याच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार हे सामनेवाला क्र.3 युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सिंधी कॉलनी यांचे जुने खातेदार असुन त्या शाखेत तक्रारदारांचे मल्टीगेनस सेव्हींग नावाने ओळखले जाणारे खाते क्र.507002170001026 आहे. तक्रारदार हे खात्यात रक्कमा जमा करीत होते व व्यवहार सुरु आहे त्या खात्यातुन दिल्या गेलेले चेकचे पैसे त्याच दिवशी संबंधीतास दिले जातात. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीचे नांव वधु-वर परिचय संमेलनामधे नोंदविण्या करीता त्यांचे खात्यातुन बहुशहरी चेक (Multicity Cheque) क्र.000787 दि.30/12/2009 रोजी रक्कम रु.500/- चा पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ,जिल्हा युवा समिती पुणे यांचे नांवे दिलेला होता. सदरचा चेक युनियन बॅकेने वटविण्यासाठी दिला असता तक्रारदाराचे खात्यात पुरेसे पैसे नसल्या कारणास्तव सामनेवाला क्र.2 यांनी दि.05/01/2010 रोजी तो न वटता परत पाठविला. वधु वर परिचय संमेलन दि.24/01/2010 रोजी पार पडले. तक्रारदाराचा चेक खात्यात पुरेसे पैसे असतांना देखील कोणतीही शहानीशा न करता रक्कम पुरेसे नसल्याचा शेरा लिहून परत पाठविला त्या कालावधीत तक्रारदार यांचे खात्यात रक्कम रु.40,000/- चे वर शिल्लक होती व चेक वटण्यास काहीही कारण नव्हते. सामनेवालच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदाराची नामुष्की व बदनामी झाली आणि तक्रारदारास संमेलनात जाता आले नाही. तक्रारदार याची काही एक चुक नसतांना सामनेवाले यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत कसुर केलला आहे म्हणुन तक्रारदाराची मागणी आहे की, तक्रारदाराची तक्रार मंजुर करावी व तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,00,000/- सामनेवालेकडुन देण्याचा आदेश व्हावा तसेच नोटीसचा खर्चा पोटी रक्कम रु.2,000/- तसेच तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.1,500/- सामनेवालेकडुन देण्याचा आदेश व्हावा अशी मंचासमोर मागणी केली आहे.
सामनेवाले यांना मंचाची नोटीस मिळाली त्यांनी हजर होऊन आपला लेखी खुलासा दाखल केला त्यांचे कथन असे की, तक्रारदार यांचे सामनेवाले बँकेचे सिंधी कॉलनी शाखेत बचत खाते क्र.507002170001026 असे आहे. सामनेवाले कडे चेक बुक संदर्भात शहरी व बहुशहरी असे दोन प्रकार आहेत. तक्रारदार यांची तक्रार लबाडीची असुन मंचा समोर चालु शकत नाही. तक्रारीत केलेले कथन खोटे व लबाडीचे असुन त्यांना कबुल नाही. संगणकातील तांत्रिक चुकीमुळे सदरचा चेक परत केलेला होता. सदरील चुक लक्षात आल्यानंतर दि.31/12/2009 रोजी तक्रारदारास भ्रमणध्वनीवरुन तांत्रिक चुक कळवून चेक परत वटवण्यासाठी टाकण्याबाबत विनंती केली. सामनेवाले कडे चेक बुक संदर्भात शहरी व बहुशहरी असे दोन प्रकार आहेत. तक्रारदार यांनी त्यापैकी बहुशहरी चेक बुक सिरीयल नं.00781 ते 00800 असे घेतलेले होते. तक्रारदार यांना ज्या सिरीयल नंबरचे बहुशहरी चेक बुक देण्यात आलेले होते त्याच सिरीयल नंबरचे चेक बुक शहरी सामनेवाले यांचे दुसरे खातेदार श्री. राघो चांभार कढोली शाखा खाते क्र.577002010000307 यांना देण्यात आलेले होते. तक्रारदाराने त्यांचे मुलीचे लग्न जमवीणे संदर्भात रु.500/- चा चेक क्र.000787 दि.30/12/2009 रोजी पुणे जिल्हा माहेश्वरी मंडळ यांना सदर चेक वटविण्यासाठी सामनेवालेचे पुण्यातील सर्व्हीस ब्रॅचला त्यांचे खात्याअंतर्गत पाठविला होता. तक्रारदार व राघो चांभार यांचे चेक बुकचा सिरीज नंबर सारखा असल्याने तक्रारदार यांचा सदरचा चेक वटविण्यासाठी खात्यात रक्कम दाखवितांना संगणकाने तांत्रिक चुकीने राघो चांभार यांचे खात्यातील रक्कम दाखवीली व त्यावेळेस चेक वटण्याइतकी पुरेशी रक्कम राघो चांभार यांचे खात्यात नसल्याचे दाखविले आणि म्हणुनच चेक परत पाठविण्यात आला. सामनेवाला बॅंकेचे तांत्रीक चुकीसाठी विनाकारण वेठीस धरुन नुकसान भरपाईच्या नावाखाली रक्कम उकळण्याच्या हेतुने सदरची खोटी व बेकायदेशीर तक्रार दाखल केलेली आहे. म्हणुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य करण्याची विनंती समानेवाले यांनी मंचासमोर केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेला पुरावा शपथपत्र कागदपत्र यांचे अवलोकन केले असता न्याय निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर.
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली
आहे काय ? होय.
2. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2 -
तक्रारदाराची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने दि.30/12/2009 रोजी रु.500/- धनादेश पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ यांना दिला होता. दि.05/01/2010 रोजी सदरचा धनादेश हा अनादरीत झालेला आहे. तक्रारदारांचे खात्याचा उतारा पाहीले असता खात्यामधे दि.31/12/2009 रोजी रु.40,475/- शिल्लक दिसत आहे. तक्रारदारांच्या खात्यात रक्कम शिल्लक असुन सुध्दा सामनेवाले बँकेच्या चुकीमुळे सदरचा धनादेश अनादरीत झालेला आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या कथनामध्ये हे मान्य केले आहे की, तक्रारदार व राघो चांभार यांचे धनादेश बुकचा सिरीज नंबर सारखा असल्याने तक्रारदार यांचा सदरचा चेक वटविण्यासाठी खात्यात रक्कम दाखवितांना संगणकाने तांत्रिक चुकीने राघो चांभार यांचे खात्यातील रक्कम दाखवीली व त्यावेळेस धनादेश वटण्याइतकी पुरेशी रक्कम राघो चांभार यांचे खात्यात नसल्याचे दाखविले आणि म्हणुनच धनादेश अनादरीत झाला. सामनेवालेचे कृतीमुळे तक्रारदाराच्या मुलीचे नांव पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ येथे नोंदविता आले नाही त्यामुळे तक्रारदारांची समाजात पत कमी झाली. सबब सामनेवाला बँकेने तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणुन तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडुन संयुक्तीकरित्या वैयक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रु.10,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. म्हणुन मुद्या क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यत येते.
2. सामनेवाल क्र.1 ते 3 यांनी संयुक्तीकरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदार यांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) आदेश पारीत झालेल्या तारखेपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावे.
3. उभयपक्षकारांना निकालाची प्रत विनाशुल्क देण्यात यावी.
जळगांव.
दि.12/08/2015.
श्रीमती.पुनम नि. मलिक विनायक आर.लोंढे
सदस्या अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.