श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 29/07/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्यांचे गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे बँक खाते क्र. 442402011000505 होते, एप्रिल/मे 2006 मध्ये त्यावर एटीएम कार्ड क्र. 4213684424003016 आवंटीत करण्यात आले. परंतू या कार्डचा वापर तक्रारकर्ते करु शकत नव्हते, कारण ती शाखा अन्य बँकेशी जोडण्यात आलेली नव्हती. काही दिवसांनी त्यांनी ते परत केले. सन 2008 मध्ये त्यांना नविन कार्ड क्र.4213684424039465 देण्यात आले. त्याचा ते वापर करीत होते. 02.05.2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 कडून त्यांना एक पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये रु.65,355/- कार्ड क्र. 4213684424003016 चा वापर केल्याबाबत नावे टाकण्यात आलेले होते व बाकी रु.1,855/- भरा अशी सुचना मिळाली. त्यावर त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 ची भेट घेतली आणि वस्तूस्थिती समजावून सांगितली व पुराव्याची मागणी केली, मात्र त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 ला भेटण्यास सांगितले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कार्ड क्र. 4213684424003016 चा कोणताही वापर केला नाही आणि याबाबत त्यांनी तक्रार केली. तसेच गैरअर्जदारांना खाते उता-याची मागणी केली व रक्कम परत करा अशी मागणी केली. त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. गैरअर्जदारांनी केलेली कारवाई ही एकतर्फी आहे. पहिले कार्ड घेऊन दुसरे कार्ड त्यांना देण्यात आले, त्यामुळे पहिले कार्ड परत केल्याबाबत पावती मिळण्याचा प्रश्न नव्हता. ही वसुली मुदत बाह्य आहे व गैरकायदेशीर आहे, म्हणून तकार दाखल करुन कपात करण्यात आलेली रक्कम रु.65,355/- व्याजासह परत मिळावी, रु.1,855/- ची मागणी करण्यात येऊ नये, आर्थिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई, प्रकरणाचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर प्रकरणाची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाल्यावर त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. खात्यासंबंधी बाबी मान्य केल्या. बचत खाते क्र. 442402011000505 होते व तक्रारकर्त्याला एटीएम कार्ड क्र. 4213684424003016 हे गैरअर्जदाराने स्विकारले आणि त्याचा गैरवापर केला आणि अशा वापराची बाब त्यांनी गैरअर्जदारांपासून लपवून ठेवली व त्यांनी रु.65,355/- चा माल खरेदी केला व रोख स्वरुपात एटीएमद्वारे रक्कम काढली. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे तक्रारकर्त्याला कार्ड क्र.4213684424039465 देण्यात आल्यावरही तक्रारकर्त्याने त्याच्याकडे आधीचे एटीएम कार्ड असल्याची बाब लपवून ठेवली. पुढे गैरअर्जदार क्र. 1 ह्यांनी तक्रारकर्त्याला पत्र दिले व उचल केलेली रक्कम त्वरित भरण्यास सांगितले, मात्र तक्रारकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही, म्हणून ती रक्कम त्यांच्या खात्यात नावे टाकली. तक्रारकर्त्याने कार्ड क्र. 4213684424003016 हे स्वतःच्या सहीने स्विकारले आहे आणि ते कार्ड दुस-या व्यक्तीच्या खात्याशी संबंधित असल्यामुळे त्या खात्यातून रक्कम वजा झाली. तक्रारकर्त्यांनी आपल्या खात्यातून रक्कम का वगळली जात नाही ह्याची चौकशी करणे गरजेचे होते, तसे त्यांनी केले नाही. दुस-या खातेधारक श्री. गुप्ता यांनी लेखी तक्रार पाठविली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली, त्यामध्ये कोणतीही चुक गैरअर्जदारांनी केलेली नाही. तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची आणि गैरकायदेशीर आहे. ती खारीज करावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केलेली आहे. -निष्कर्ष- 3. या प्रकरणी गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सर्वप्रथम 02.05.2009 रोजी पत्र देऊन रु.65,355/- एवढी रक्कम त्यांच्या खात्यातून वगळल्याचे व उर्वरित रु.1,855/- एवढी रक्कम तुम्ही जमा करा अशी सुचना दिली आहे. या पत्रात त्यांनी असे नमूद केले की, गैरअर्जदार हे त्या अन्य खात्याचा वरीलप्रकारे गैरवापर करीत आहे या वस्तूस्थितीची सुचना गैरअर्जदार क्र. 2 च्या प्रभारी अधिका-यांनी आधीच दिली होती. ही बाब तक्रारकर्त्यांनी साफ नाकारली. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जबाबात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याला गैरअर्जदार क्र. 1 ने पत्र दिले होते व सदर कार्डचा गैरवापराची रक्कम जमा करावयास व त्वरित भरण्यास सांगितले, मात्र तक्रारकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही, म्हणून बँकेच्या नियमाप्रमाणे ती रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यातून नावे टाकली. गैरअर्जदारांनी जरी असे विधान केले असले तरीही त्यासंबंधीचे कोणतेही पत्र प्रकरणात दाखल केले नाही. सर्वात महत्वाची बाब व गैरअर्जदारांचे 02.05.2009 च्या पत्राप्रमाणे DBA Extension Counter च्या प्रभारी अधिका-यांनी तक्रारकर्त्यांना यासंबंधी सुचना दिली. ही बाब सिध्द करण्याच्या दृष्टीने संबंधित व्यक्तींचे प्रतिज्ञालेख गैरअर्जदारांनी दाखल केलेले नाहीत. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, तक्रारकर्त्यांच्या खात्यातील रक्कम वगळण्यापूर्वी तक्रारकर्त्यास कोणतीही सुचना दिलेली नाही आणि एकतर्फी कारवाई करुन तक्रारकर्त्याच्या खात्यातील संबंधित रक्कम वगळण्यात आलेली आहे. या संबंधी तक्रारकर्त्यांनी आपली भिस्त मा. राष्ट्रीय आयोगाच्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद वि. जर्नेल सिंग 2010 NCJ 54 (NC) या निकालावर ठेवलेली आहे. त्यामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने स्पष्टपणे निकाल दिलेला आहे की, जर बँकेकडून चूक झालेली असेल तर ती चुक एकतर्फी दुरुस्त करता येणार नाही. त्या निकालाच्या अवलोकन केले असता असे स्पष्ट दिसते की, बँकेने या संबंधित तक्रारकर्त्यांना सुचना देऊन नंतर संबंधित कारवाई करणे गरजेचे होते. तसे त्यांनी केले नाही. सदरच्या निकालात मा. राष्ट्रीय आयोगाने असेही स्पष्ट केले आहे की, अशा प्रकरणात बँकेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे गरजेचे होते. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता बँकेने एकतर्फी कारवाई करुन तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला रु.65,355/- एवढी रक्कम परत करावी. या रकमेवर दि.02.05.2009 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याज प्रत्यक्ष रकमेच्या अदायगीपावेतो द्यावे. तसेच तक्रारकर्त्याकडून रु.1,855/- ची मागणी करु नये. 3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.2,000/- द्यावे. 4) तक्रारकर्त्यांची नुकसान भरपाईची मागणी अमान्य करण्यात येते. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे. 6) यातील गैरअर्जदार बँकेने तक्रारकर्त्याविरुध्द दावा दाखल करुन रकमेची मागणी करण्यासाठी बँकेचे अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहेत. या निकालपत्रातील कोणतेही मुद्दे त्याठिकाणी विचारात घेऊ नये.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |