निकालपत्र :- (दि.25/11/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
सामनेवाला बँकेने चुकीच्या पध्दतीने व्याजाची रक्कम कर्ज खातेस नांवे टाकून सेवात्रुटी केलेने सदरची तक्रार दाखल करणेत आली आहे.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- अ) तक्रारदार कोल्हापूर येथील रहिवाशी असून सामनेवाला बँक ही बँकींग सेवा देणारी वित्तीय संस्था असून तक्रारदाराने सामनेवाला बँकेच्या कोल्हापूर शाखेमध्ये घर बांधणेसाठी हौसिंग लोन स्किममधून सन 2003 मध्ये कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते वेळोवेळी भरलेले आहेत. सदरचे कर्ज हे फिक्सड इंटरेस्ट ने घेतले होते. त्यावेळी सदर कर्जाचा व्याजाचा दर हा 10.5 टक्के इतका होता.
ब) तदनंतर सामनेवाला बॅंकेने व्याजदर कमी झालेमुळे तक्रारदारांना बोलावून प्रोसेसिंग चार्जेस रु.580/- इतके भरुन घेऊन व्याजदर 8.75 टक्के इतका लागू केला. सदर व्याजदराप्रमाणे तक्रारदाराने कर्जखातेवर रक्कमा जमा केलेल्या आहेत. तदनंतर दि.25/07/2007 रोजी तक्रारदारास कोणतीही लेखी अथवा तोंडी सुचना न देता सामनेवाला बँकेने तक्रारदाराचे कर्ज खातेवर रक्कम रु.25,596/- इतकी रक्कम ‘’ टू लिकेज ऑफ इन्कम डयु टू चेंज इन इंटरेस्ट रेट ‘’ या सदराखाली रक्कम नांवे टाकलेली आहे. सामनेवालांचे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर, अनाधिकाराचे व सेवेतील त्रुटी आहे. सदरची बाब तक्रारदारास दि.05/04/2008रोजी खाते उता-याची नक्कल घेताना प्रथम समजून आली. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवालांच्या शाखेत प्रत्यक्ष भेटून तसेच दि.09/04/2008 रोजी लेखी पत्र देऊन विचारणा केली त्यास सामनेवाला यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे दि.24/05/2008 रोजी बँकींग ऑम्ब्डसमन (बँक महालेखापाल) यांचेकडे पत्राने कळवले. त्यास दि.10/07/2008 रोजी सविस्तर तक्रार दाखल करणेबाबत कळवल्याने दि.11/07/2008 रोजी महालेखापालांकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्याबाबत दि.23/07/2008 रोजी प्रस्तुतची तक्रार सामनेवाला बँकेकडे वर्ग करणेबाबत लेखापालाने तक्रारदारास कळवले. त्यास अनुसरुन दि.04/08/2008 रोजी सामनेवाला बॅंकेस कळवले. त्याची दखल सामनेवाला बँकेने घेतली नाही. त्यामुळे पुन्हा दि.08/09/2008 रोजी महालेखापाल यांना कळवले. त्यास महालेखापाल यांनी दि.09/02/2009 रोजीचे पत्राने बॅंक अपसातीने मॅटर संपविणार आहे असे कळवले. मात्र सामनेवालांनी प्रत्यक्षात तक्रारदारांना मात्र काही कळवले नाही. सदर पत्रास अनुसरुन दि.19/02/2009 रोजी सामनेवाला बॅंकेस कळवले व व्याजदराबाबत विचारणा केली मात्र त्यास सामनेवाला बॅंकेने कोणतेही उत्तर दिले नाही.
क) तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला बँकेचे असि.जनरल मॅनेजर श्री मानवी यांना प्रत्यक्ष भेटून व पत्राव्दारे कळवले असता त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. दि.30/03/2009 रोजी र्इ मेल व्दारे सामनेवाला बँकेने वयाजाबाबत कोणतीही स्किम नसलेचे कळवले. सामनेवाला बँकेने प्रोसेसिंग चार्ज भरुन घेऊन तसेच रक्कम रु.25,596/- इतके व्याज कर्ज खातेस खर्ची टाकून सेवेत त्रुटी ठेवली आहे. सामनेवालांचा हेतू शुध्द नाही. तक्रारदाराच्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली नाही. याउलट पाठविलेल्या नोटीसला खोडसाळपणाचे उत्तर दिले आहे. सामनेवालांचा हेतू हा शुध्द नसुन तक्रारदारांना फसवणेचा आहे हे सिध्द होते. सबब प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होऊन बेकायदेशीरपणे टाकलेली व्याजाची रक्कम रु.25,596/- कमी करणेत यावी तसेच कर्ज खातेस द.सा.द.शे. 8.75 टक्के व्याज आकारणी करणेबाबत बँकेस आदेश व्हावेत. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- ई मेल व फोनचा खर्च रु.1,200/- व नोटीस फी रु.1,100/-, टायपिंग , झेरॉक्स व इतर खर्च रु.700/- इत्यादी रक्कम सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ कर्जाचा खातेउतारा, तक्रारदार यांची तक्रार, परिशिष्ट अ, बँकींग ओंम्ब्डसमन यांचेकडे दिलेली तक्रार व र्इ मेल , त्यांचे आलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला बँकेस दिलेले पत्र, सामेनवाला यांनी बँकींग ओंम्ब्डसमन यांना दिलेले पत्र, ओंम्ब्डसमन बँकींग यांनी तक्रारदारास पाठविलेला ई मेल, सामनेवाला यांनी दिलेले उत्तर, तक्रारदाराने सामनेवाला बँकेला दिलेला ई मेल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराचा अर्ज खोटा, खोडसाळपणाचा व लबाडीचा आहे. त्यातील कथने सामनेवाला यांना कोणत्याही प्रकारे मान्य व कबूल नाहीत; सामनेवाला त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार करतात. कलम 2 मधील तक्रारदाराने कर्जाचे हप्ते व्याजासह वेळचेवेळी भरले आहेत. तसेच कलम 4 मधील त्यानंतर पुन्हा अचानक----------- टू लिकेज ऑफ इन्कम डयु टू चेंज इन इंटरेस्ट रेट या सदराखाली नांवे टाकली आहे. सामनेवालांचे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर, अनाधिकाराचे व सेवेतील त्रुटी आहे. तसेच खातेउता-याची नक्कल घेतली त्यावेळी समजून आले इत्यादी मजकूर अमान्य केलेला आहे. कलम 6 मधील संपूर्ण मजकूर अमान्य आहे. कलम 7 मधील पंरतु सामनेवाला यांनी प्रत्यक्षात तक्रारदार यांना कधीही कळवलेले नाही. तसेच कलम 8 मधील परंतु त्यांचेकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच हेतू शुध्द नाही, सेवेत त्रुटी आहे, दुस-यांदा प्रोसेसिंग चार्ज घेउुनही फसवणूक केली आहे इत्यादी मजकूर मान्य नाही. कलम 9 मधील सामनेवालांनी खोडसाळपणाचे मतलबी उत्तर दिले-------सदरचा अर्ज दाखल केलेला आहे हा मजकूर मान्य नाही.
ब) तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही व दाखवलेले कारण खरे व बरोबर नाही. सबब तक्रारदाराने केलेली मागणी मान्य करता येणार नाही. तक्रारदाराने कोणताही सबळ कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नव्हता व नाही. सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. प्रस्तुतची तक्रार मा. मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही. सबब खर्चासह नामंजूर करणेत यावी.
क) तक्रारदाराने सत्य वस्तुस्थिती लपवून ठेवून खोटी व कपोलकल्पीत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार स्वच्छ हाताने सदर मंचासमोर आलेला नाही. तक्रारदाराने सामनेवाला बँकेस वेळोवेळी योग्य ती कागदपत्रे व सिक्युरिटी डॉम्युमेंटस लिहून दिलेली होती व आहेत. तक्रारदाराचे खातेवर बेकायदेशीर व्याजाची आकारणी केलेली नाही. तक्रारदाराचे अर्जास इस्टोपल या कायदेशीर तत्वाचा बाध येतो. सबब सदरचा तक्रार अर्ज नामंजूर होणेस पात्र आहे.
ड) सामनेवाला यांनी तक्रारदारास गृहकर्ज रक्कम रु.5,00,000/- इतकी कर्ज रक्कम दि.01/02/2003 रोजी मंजूर करुन दि.07/06/2003 रोजी अदा केलेली होती व आहे. तदनंतर दि.16/12/2003 रोजी तक्रारदाराने लेखी अर्ज दाखल करुन गृहकर्ज रक्कम फेडणेसाठी सुधारीत योजनेनुसार 15 ते 20 वर्षाचा कालावधी मिळावा अशा आशयाची विनंती केलेली होती व त्याप्रमाणे कर्ज फेडणेस 20 वर्षाचा कालावधी दिला होता व आहे. तदनंतर दि.27/2004 रोजी नवीन पॉलीसीप्रमाणे व्याजदर कमी करणेबाबत लेखी अर्ज केलेला होता. तदनंतर कर्ज फेडीची मुदत 20 वर्षे इतकी झालेने वयाजदर हा 10 टक्के फिक्सड वरुन 9.25 टक्के फिस्कड असा कमी केलेला होता. त्याबाबत दि.28/02/2004 रोजी रिसेटलींग चार्जेस व कमी व्याजदर आकारलेने रक्कम रु.5,180/- इतकी रक्कम नियमाप्रमाणे वसुल केली होती व आहे. माहे जुलै-07 मध्ये सामनेवाला बँकेचे नियमित ऑडीट सुरु झाले. सदर ऑडीटमध्ये ऑडिटर यांनी व्याजाचा दर माहे जुलै-08 मध्ये चुकीच्या पध्दतीने कमी केला आहे तसेच बँकेच्या मागर्दशक त्तवानुसार व मार्गदशर्नानुसार झाले नाही; मार्गदर्शक परिपत्रकानुसार बदललेला वयाजाचा दर अनिश्चित कडून निश्चित केला आहे. त्यामुळे व्याचाजा दर 10.50 ते 9.25 चा जो बदल केला आहे. तो चुकीचा आहे. त्यामुळे रक्कम रु.25,596/- कर्जदाराकडून पुन्हा परत घ्यावेत असा सल्ला सामनेवालांनी दिला होता व आहे. त्यास अनुसरुन सामनेवालांनी रक्कम रु.25,596/- तक्रारदारचे कर्ज खातेस व्याजापोटी खर्च टाकलेले आहेत. तक्रारदाराने सामनेवाला यांना बदललेल्या व्याजदराबाबत कोणतेही कागदपत्रे लिहून दिली नव्हतीत व नाही. त्यामुळे सदरची रक्कम पूर्णपणे योग्य व कायदेशीर आहे. सबब सामनेवाला यांचेकडे बहुसंख्य प्रमाणात कर्जदार व ग्राहक आहेत. सबब तक्रारदाराचे खातेवर बेकायदेशीररित्या रक्कम खर्ची टाकणेचा प्रश्न उदभवत नव्हता व नाही असे प्रतिपादन केले आहे.
(06) सामनेवाला यांनी सदरचे म्हणणे शपथपत्रासह दाखल केले असून अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
(07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? ---होय.
2) काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- अ) सामनेवाला बँकेने तक्रारदारास गृहकर्ज रक्क्म रु.5,00,000/- दि.01/02/2003 रोजी मंजूर करुन दि.07/06/2003 रोजी अदा केलेले होते व सदर कर्जासाठी 10.5 टक्के इतका फिक्सड व्याजदर होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीतील कलम 3 मध्ये व्याजदर कमी झालेने तक्रारदारास बोलावून घेऊन रक्कम रु.5,180/- इतकी प्रोसेसिंग चार्जेस भरुन घेऊन पूर्वीच्या व्याजदरा ऐवजी 8.75 टक्के इतका व्याजदर लागू केला असे नमुद केले आहे. तर सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराने दि.16/12/2003 रोजी गृहकर्ज फेड रक्कमेच्या सुधारित योजनेप्रमाणे 15 ते 20 वर्षाचा कालावधी मिळावा असा लेखी अर्ज दिला व त्यास अनुसरुन कर्जाची मुदत 20 वर्षे इतकी केली. सदर कालावधी वाढल्यामुळे प्रस्तुतचा व्याजदर हा 9.25 टक्के फिक्सड व्याजदर केलेला होता. त्यासाठी दि.28/02/2004 रोजी रिसेटलींग चार्जेसपोटी रक्कम रु.5,180/- नियमाप्रमाणे तक्रारदाराकडून वसुल केलेले आहेत.
ब) तक्रारदार व सामनेवाला यांचे या कथनाचा विचार करता नमुद कर्जाचा कालावधी हा 20 वर्षापर्यंत केला याबाबत सामनेवालांचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस कर्जाचा कालावधी वाढल्यामुळे नियमाप्रमाणेव्याजदर कमी केला असलेचे प्रतिपादन केलेले आहे. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे 8.75 इतका नसुन 9.25 इतका आहे. सदर प्रोसेससाठी त्याने रक्कम रु.5,180/- इतकी रक्कम दि.05/12/2004 रेाजी लोन अपलोड या कारणाखाली तक्रारदाराचे कर्ज खातेस खर्ची टाकलेले आहे हे दाखल खातेउता-यावरुन निदर्शनास येते व सामनेवालांनी सदर रक्कम मिळालेचे मान्य केलेले आहे याबाबत दुमत नाही.तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या कर्ज खाते उता-याचे अवलोकन केले असता सदर कर्ज खातेवर न चुकता नियमितपणे मासिक हप्ते भरलेचे दिसून येते.
क) सामनेवाला बँकेने प्रस्तुत कर्जाचा वाढीव कालावधी व व्याजदरातील कपात ही बँकेच्या अधिकार क्षेत्रास अधीन राहून केलेली होती. मात्र माहे जुलै-07 मध्ये नियमित ऑडीटला सुरुवात झाली व ऑडीटर यांनी सदर केलेला बदल हा बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार व मार्गदर्शनानुसार तसेच परिपत्रकानुसार झालेला नाही. सबब तो चुकीचा आहे. त्यामुळे कर्जदाराकडून (तक्रारदाराकडून) रक्कम रु.25,596/- व्याज म्हणून घेणेत यावे असा सल्ला दिला व त्यास अनुसरुन सदरची रक्कम तक्रारदाराचे कर्ज खातेस नांवे टाकलेली आहे. प्रस्तुत रक्कम रु.25,596/- ही दि.25/07/2007 रोजी टू लिकेज ऑफ इन्कम डयु टू चेंज इन इंटरेस्ट रेट या सदराखाली नांवे टाकलेली आहे. याबाबीची कल्पना तक्रारदारास दिलेली नाही तसेच सदर रक्कम बेकायदेशीरपणे नांवे टाकलेली आहे व येथेच वादाचा मुद्दा उपस्थित झाला.
ड) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तसेच युक्तीवादाच्या वेळेस ऑडिटर यांनी सामनेवाला बँकेने केलेली कर्ज व्याजदर बदलाची कृती ही बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार व परिपत्रकानुसार नियमबाहय ठरवली आहे याबाबतचा ऑडिटर्स अहवाल अथवा सदर व्यवहाराबाबत मारलेला शेरा अथवा टिप्पणी तसेच नमुद परिपत्रक ज्यानुसार सदर बँकेची कृती ही नियमबाहय आहे हे सामनेवालांना दाखवता आले असते असा कोणताही कागदोपत्री पुरावा सामनेवाला यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही.
इ) सामनेवाला बॅकेने नमुद कर्जाचा कालावधी वाढवणे व त्याप्रमाणे वाढीव कालावधीमध्ये व्याजदरातील कपात ही योग्य आहे व त्यास अनुसरुन रक्कम रु.5,180/- इतकी चार्ज भरुन घेऊन प्रस्तुतची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सामनेवाला बँक ही नामांकित वित्तीय बँक आहे. प्रस्तुत अधिका-यांना आपल्या बॅंकेची मार्गदर्शक तत्वे परिपत्रके वेळोवेळी जारी होणारे नियम इत्यादीची माहिती असते हे गृहित धरले जाते व त्याप्रमाणे सदर अधिका-यांना वेळोवेळी प्राप्त होणा-या अधिकारानुसार कृती केली जाते. त्यामुळे कर्जाचा वाढीव कालावधी व व्याजदरातील कपात करणेसाठी नियमाप्रमाणे त्यांनी रक्कम रु.5,180/- भरुन घेऊन कार्यवाही केलेली आहे असे सामनेवालांनीच मान्य केलेले आहे. सदरची बाब जर नियमाप्रमाणे केली असेल तर संबंधीत ऑडिटर यांनी कोणत्या आधारावर सामनेवालांची कृती ही मार्गदर्शक तत्वानुसार व परिपत्रकानुसार नसलेने नियमबाहय तसेच अधिकारक्षेत्राबाहेरील ठरवले आहे. याबाबत सामनेवालांनी आपल्या कथनात व्यतिरिक्त अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवालांच्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. तसेच तक्रारदाराने वेळोवेळी सामनेवाला बॅंकेकडे लेखी तक्रार केलेल्या आहेत. तसेच बॅंकींग ओम्ब्डसमन यांचेकडेही तक्रार केलेली आहे हे दाखल कागदपत्रावरुन निर्विवाद आहे. तसेच प्रस्तुत तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण करणेचे बॅकींग ओम्बडसमन यांनी सामनेवाला यांना कळवूनही त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. तदनंतरही तक्रारदाराने ओम्बडसमन यांनाही कळवलेले आहे; तसेच सामनेवालांचे अधिकारी श्री माने यांनाही लेखी कळवलेचे दिसून येते. सदर तक्रारीची दखल सामनेवाला बॅकेने घेतलेली नाही. सरतेशेवटी दि.30/05/2009 रोजी तक्रारदाराने वकील नोटीस पाठवली. त्या नोटीसला सामनेवालांनी उत्तर दिलेले आहे. सदर नोटीसीस उत्तर व सामनेवालांनी दाखल केलेले म्हणणे तेच आहे.
ई) वरील वस्तुस्थितीचा विचार करता एका बाजूस सामनेवाला बँक नमुद कर्जाचा वाढविलेला कालावधी व त्यामुळे व्याजदर कमी केलेला आहे व सदर कृती करणेसाठी नियमाप्रमाणे रक्कम रु.5,180/- वसुल केलेले आहेत असे म्हणते. त्यानुसार कर्जाचा वाढीव कालावधी हा 20 वर्षापर्यंत केला व 10.50 टक्केवरुन व्याजदर 9.25 टक्के फिक्सड व्याजदर केला. हे सर्व नियमाप्रमाणे केलेचे मान्य करतात व दुस-या बाजूस सामनेवाला बँकेची ही कृती ऑडिटर यांनी नियमबाहय ठरवलेने 10.50 टक्के प्रमाणे आकारणी न केलेले व्याज रक्कम रु.25,596/- त्यांचे सल्ल्यानुसार तक्रारदारास कोणतीही कल्पना न देता त्यांचे कर्ज खाते रक्कम नांवे टाकतात. सामनेवालांचे हे कृत्य निश्चितच बेकायदेशीर आहे. आकडेमोडीमुळे हिशोबात होणा-या चुका दोन्ही बाजूंनी समजून घेऊन दुरुस्त( rectification ) करता येतात व त्याप्रमाणे व्यवहाराच्या नोंदी करता येतात. मात्र प्रस्तुतची चुक ही हिशोबाच्या आकडेमोडीची नसुन सामनेवालांची ही कृती नियमानुसार आहे की नियमबाहय आहे याबाबीची आहे. सामनेवालांनी प्रस्तुतची कृती ही नियमानुसारच केले असलेचे आपले लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेले आहे. सामनेवालांच्या या कृतीस इस्टॉपलचा बाध येतो. त्यामुळे त्यांना सदर कृतीच्या मागे जाता येणार नाही. मात्र वर विशद केले प्रमाणे ऑडिटरचे सल्ल्यानुसार रक्क्म रु.25,596/- इतकी व्याजापोटी कर्जखातेस नांवे टाकलेची बाब कायदेशीर असलेचे नमुद केले आहे. यामध्ये तक्रारदाराची काय चुक आहे? तसेच त्याबाबत मात्र कोणताही सबळ कायदेशीर पुरावा नसलेने हे मंच सदरची बाब मान्य करु शकत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी रक्कम रु.25,596/- तक्रारदारास कोणतीही कल्पना न देता तसेच रक्कम रु.5,180/- चार्ज आकारुनही नांवे टाकलेली आहे त्यामुळे ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे व सामनेवालांच्या व्यवहारात झालेल्या चुकीसाठी तक्रारदारास जबाबदार धरता येणार नाही. सबब सामनेवाला यांनी आपल्या सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2 :- सामनेवालांनी दि.25/07/2007 टू लिकेज ऑफ इन्कम डयु टू चेंज इन इंटरेस्ट रेट या सदराखाली नांवे (डेबीट) टाकलेली रक्कम रु.25,596/- तक्रारदारच्या कर्ज खातेस जमा(क्रेडीट) करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. कारण तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार निवारण करणेसाठी प्रस्तुत सामनेवाला बँकेकडे तसेच बॅकींग ओम्बडसमन यांचेकडेही पाठपुरावा केलेला आहे. त्याची दखल न घेतलेने तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदार मानसिक व शारिरीक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे यानिष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्ज खातेस नांवे टाकलेली रक्कम रु.25,596/-(रु.पंचवीस हजार पाचशे शहान्नव फक्त) तक्रारदाराचे सदर कर्ज खातेस जमा(क्रेडीट) करुन घ्यावी.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.3,000/-(रु.तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) अदा करावेत.