RAVINDRA BHAURAOJI SANDE filed a consumer case on 22 Feb 2017 against UNION BANK OF INDIA THROUGH MANAGER in the Wardha Consumer Court. The case no is CC/12/2016 and the judgment uploaded on 23 Feb 2017.
Maharashtra
Wardha
CC/12/2016
RAVINDRA BHAURAOJI SANDE - Complainant(s)
Versus
UNION BANK OF INDIA THROUGH MANAGER - Opp.Party(s)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदाच्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रारवि.प. च्या विरुध्द दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशयथोडक्यात असाकी, त.क. हा बोरगांव (मेघे) वर्धा येथील रहिवासी असून तो खाजगी कंपनीत नौकरी करतो. तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष 1 च्या बॅंकेत बचत खाते क्रं. 3555502010101706असून सदर खात्याशी संलग्न असे ए.टी.एम.कार्ड आहे. त्यामुळे तक्रारकर्ता वेळोवेळी विरुध्द पक्ष 1 यांनी चालविलेल्या ए.टी.एम.सेवेचा लाभ घेत होता. तक्रारकर्त्याने दि. 04.10.2015 रोजी बोरगांव (मेघे) येथील विरुध्द पक्ष 2 च्या ए.टी.एम.मधून रोख रक्कम मिळण्याकरिता दुपारी 4.00 वाजताचे सुमारास पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु सदरहू ए.टी.एम.मशिनमध्ये पैश्याची कमतरता असल्याचे कारण व देत मशिनमध्ये तक्रारकर्त्याने केलेली प्रक्रिया रद्द केल्याचा खुलासा मशिनच्या स्क्रिनवर लिहून आला. त्यामुळे तक्रारकर्ता जवळच्या एच.डी.एफ.सी.बॅंकेच्या ए.टी.एम. बुथवर रोख रक्कम काढण्याकरिता गेला असता पुन्हा ए.टी.एम.मशिनमध्ये कार्ड टाकून आवश्यक तो पिनकोड टाकून रोख रक्कम रुपये 10,000/-ची उचल करण्याकरिता मशिनला सूचना दिल्या. परंतु तक्रारकर्त्याचे खात्यात रुपये259/- शिल्लक दाखविण्यात आली व खात्यात पुरेसा निधी नसल्याचे सांगण्यात आले.
तक्रारकर्त्याने सदरहू बाबीची तक्रार ताबडतोब वि.प. क्रं. 1 च्या ए.टी.एम.कार्डवर असलेल्या टोल फ्री नंबर 18002082244दिली व याबाबत विचारणा केली असता सात दिवसाचे आत तक्रारीचे निवारण करुन देऊ असे आश्वासन दिले. परंतु कोणतेही निराकरण झालेले नसल्यामुळे त.क.ने दि.19.11.2015 वर 7.12.2015 रोजी वि.प. क्रं. 1 कडे लेखी तक्रार दिली. अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार देऊन ही तक्रारीचे निराकरण करण्यात आले नाही. त्यानंतर विरुध्द पक्ष क्रं. 1 ने त.क.ला दि. 28.12.2015 रोजी पत्राद्वारे कळविले की, हमारे केन्द्रीय कार्यालय मुंबई के ई-मेल दि. 07.12.2015 द्वारा सूचित किया है की, बॅंक ऑफ इंडिया ने दावा खारिज कर दिया है इसलिए हम रक्कम वापसी नहीं कर सकते है ा. त.क. ला दिलेल्या सदर उत्तरातील विरुध्द पक्ष 2 यांनी प्रकरण खारीज करतांना कोणकोणत्या गोष्टी तपासल्या याची माहिती मागण्याकरिता वि.प. 1 कडे विचारणा केली असता वि.प. क्रं. 1 यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त.क.चे कोणतेही समाधान न करता त्याचे खात्यात रक्कम पूर्ववत जमा करण्यास स्पष्ट नकार दिला, त्यामुळे त.क.चे मोठे आर्थिक नुकसान झाले.
त.क. ने पुढे असे कथन केले की, वि.प. 1 यांनी वि.प. 2 च्या ए.टी.एम. मधील दि. 04.10.2015 रोजीची सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली असती तर ही बाब स्पष्ट झाली असती व त.क.ला सदर फुटेज दाखवून त्याचे समाधान करणे शक्य होते. परंतु दोन्ही वि.प. ने त.क.चे समाधान केलेले नाही व सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून त.क.ने प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या त.क.ला त्याची रक्कम रुपये 10,000/- व त्यावरील दंड व्याजासह द्यावे, शारीरिक मानसिक त्रासाबद्दल 10,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 5,000/-रुपये मिळावे अशी विनंती केली आहे.
वि.प. 1 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 12 वर दाखल केला असून त्यांनी तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. त्याचे म्हणणे असे की, त.क.चे त्यांच्या बॅंकेत बचत खाते असून तो ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतो. त.क.ने त्याच्या तक्रारीत दि. 04.10.2015 रोजी रुपये 10,259/- त्याच्या खात्यात जमा होते असे नमूद केलेले आहे. परंतु खाते उता-याप्रमाणे सदर रक्कम ही दि. 26.09.2015 रोजी दर्शविलेली आहे. दि. 04.10.2015 रोजी त.क.ने वि.प. 2 च्या ए.टी.एम. मधून 4.00 वाजता रक्कम काढण्याबाबतचा उल्लेख केला आहे, परंतु याबाबत वि.प.1 ने माहिती नसल्याचे कथन केले आहे. तसेच त.क.च्या खाते उता-यात फक्त 259/- रुपये दर्शविण्यात आलेले आहे, याबाबतची नोंद खाते उता-यात नमूद आहे. तसेच त.क.ने रुपये 10,000/- ची उचल केल्याबाबत दर्शविले आहे. वि.प. 1 ने पुढे असे ही नमूद केले की, त्याने त.क.ला कोणतेही आश्वासन दिलेले नाही. सदर रक्कमेचा व्यवहार वि.प. 2 च्या ए.टी.एम.मधून केल्यामुळे सदर रक्कमेची बाब वि.प. 2 शी संबंधित आहे. तसेच त.क.ने दिलेल्या तक्रारीबाबत वि.प. 1 ने वि.प. 2 ला कळविल्याचे नमूद केले आहे.
वि.प. 1 ने पुढे असे ही नमूद केले की, वि.प. 2 ने असे कळविले की, त.क.ने ए.टी.एम. मधून रुपये 10,000/-ची उचल केली आहे व त्याप्रमाणे त्याच्या बॅंक खात्यात नोंद केलेली आहे. त्यामुळे त्याने केलेली तक्रार ही खारीज करण्यात आली व त्याची माहिती त.क.ला सुध्दा देण्यात आली. वि.प. 1 ने असे ही कथन केले आहे की, त्याने त.क.ला कुठलेही उडवाउडवीचे उत्तर दिले नसून त.क. चा व्यवहार हा वि.प. 2 च्या ए.टी.एम. संबंधित असून वि.प. 1 शी कसलाही संबंध नाही. त्यामुळे त्याच्या खात्यात स्वतःहून कोणतीही रक्कम जमा करणे शक्य नाही. दि.04.10.2015 रोजीची संपूर्ण कार्यवाही वि.प. 2 कडूनच करण्यात आलेली आहे व त्यानुसार त.क.ने पैशाची उचल केल्यामुळे वि.प. 1 ची सदर रक्कमेबाबत कोणतीही जबाबदारी नाही. त.क.ने त्याच्या ए.टी.एम.चा वापर वि.प. 2 च्या ए.टी.एम.मधून रक्कम काढण्याकरिता केला आणि वि.प. 2 च्या नोंदीप्रमाणे त्याच्या खात्यात नोंद करण्यात आली. त्यामुळे सदर प्रकरणाशी वि.प. 1 चा कसलाही संबंध नाही. वि.प. 1 ने त.क.ला कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, त्यामुळे त्याच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
विरुध्द पक्ष 2 यांना मंचामार्फत नोटीस बजाविण्यात आली. सदर नोटीस प्राप्त होऊन ही वि.प. क्रं. 2 मंचासमक्ष हजर झाले नाही. करिता सदर प्रकरण वि.प. 2 विरुध्द एकतर्फा चालविण्यात आले.
त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ स्वतःचे शपथपत्र नि.क्रं. 13 ए वर दाखल केले असून वर्णन यादी नि.क्रं. 3 सोबत एकूण 4 कागदपत्र व वर्णनयादी नि.क्रं.17 नुसार 1 दस्त दाखल केले. वि.प.ने शपथपत्र दाखल न करता स्वतःच्या कथनाच्या पृष्ठयर्थ वर्णन यादी नि.क्रं. 13 प्रमाणे एकूण 6 कागदपत्रे दाखल केली. त.क. व वि.प.च्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
8.
अ.क्रं
मुद्दे
उत्तर
1
विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?
होय
2
तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ?
होय
3
अंतिम आदेश काय ?
आदेशानुसार
-: कारणमिमांसा :-
मुद्दा क्रं.1, 2 व 3 बाबत , ः- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 च्या बॅंकेत बचत खाते क्रं. 355502010101706 आहे व सदर खात्याशी सलंग्न ए.टी.एम. सेवा वि.प.ने त.क.ला दिली आहे त्यानुसार सदर ए.टी.एम. सेवेचा त.क.लाभ घेतो हे वादातीत नाही. त.क.च्या म्हणण्यानुसार दि. 04.10.2015 रोजी त्याच्या बचत खात्यात रुपये 10,259/- जमा असल्यामुळे व त्यास रोख रक्कमेची आवश्यकता असल्यामुळे त्याने विरुध्द पक्ष 2 यांच्या बोरगांव (मेघे) येथील ए.टी.एम. मधून रोख रक्कम काढण्याकरिता प्रयत्न केला. परंतु सदर ए.टी.एम. मशिन मध्ये पैशाची कमतरता असल्याचा हवाला देत मशिन मध्ये त.क.ने केलेली प्रक्रिया रद्द केल्याचा खुलासा मशिनच्या स्क्रीनवर लिहून आला. त्यामुळे तक्रारकर्ता हे तसेच एच.डी.एफ.सी. बॅंकेच्या ए.टी.एम. बुथवर गेले व रोख रक्कम मिळण्याकरिता ए.टी.एम. कार्ड वापरुन रुपये 10,000/-ची उचल करण्याकरिता मशिनला सूचना दिल्या. परंतु तक्रारकर्त्याच्या खात्यात रुपये 259/- शिल्लक दाखविण्यात आले व खात्यात पुरेसा निधी नसल्याचा हवाला देण्यात आला. तक्रारकर्त्याने ताबडतोब टोल फ्री नं. 18002082244 वर विचारणा केली असता 7 दिवसात तक्रारीचे निरासरण करुन देऊ असे आश्वासन देण्यात आले. परंतु वारंवांर विनंती करुन ही तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निरासरण न झाल्यामुळे दि. 19.11.2015 रोजी विरुध्द पक्ष 1 कडे लेखी तक्रार दिली, त्याची छायांकित प्रत नि.क्रं. 3(2) वर दाखल केलेली आहे. सदर तक्रारीस प्रतिसाद न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा दि. 07.12.2015 रोजी विरुध्द पक्ष 1 कडे लेखी तक्रार केली, त्याची छायांकित प्रत नि.क्रं.3(3) वर दाखल केलेली आहे. दि.28.12.2015 रोजी वि.प. 1 ने त.क.ला लेखी पत्राद्वारे असे कळविले आहे की, त्याचे केंद्रीय कार्यालय मुंबई येथून प्राप्त ई-मेल दि.07.12.2015 नुसार बॅंक ऑफ इंडियाने दावा खारीज केल्यामुळे त्यांना तक्रारकर्त्याची रक्कम परत करता येणार नाही. तक्रारकर्त्याचा दावा खारीज करतांना बॅंक ऑफ इंडिया ने कोणकोणत्या बाबी तपासल्या याबाबत विरुध्द पक्ष 1 कडे विचारणा केली असता विरुध्द पक्ष 1 बॅंकेने तक्रारकर्त्याचे समाधान केलेले नाही व त्याच्या खात्यात रक्कम पूर्ववत जमा करण्यास स्पष्ट नकार दिला. या उलट विरुध्द पक्ष 1 ने त्याच्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम रुपये 10,259.81 पै. दि. 26.09.2015 रोजी जमा होती व तक्रारकर्त्याने दि.04.10.2015ला विरुध्द पक्ष2 बॅंकेच्या ए.टी.एम. मधून रक्कम काढली याबाबत विरुध्द पक्ष 1 यांनी माहिती नाही असे नमूद केले आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या बचत खात्याच्या उता-याची छायांकित प्रत नि.क्रं.3(4)वर दाखल केली असून सदर खाते उता-याचे अवलोकन केले असता त.क.च्या खात्यात दि.26.09.2015 रोजी रुपये 10,259.81 पै जमा होते असे दिसून येते. त्यानंतर दि. 04.10.2015 रोजी त.क.च्या खात्यातून रुपये 10,000/- काढल्याची नोंद असून एकूण शिल्लक रुपये 259.81 पै. असे दाखविण्यात आले आहे.
तक्रारकर्त्याच्या बचत खात्यामध्ये दि.26.09.2015 च्या नोंदी नंतर दि.04.10.2015 ची नोंद असल्याचे दिसून येते. यावरुन दि. 04.10.2015 रोजी त.क.च्या बचत खात्यात रुपये10,259,81 पै. जमा होते हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दि.04.10.2015 रोजी वि.प.2 बॅंकेच्या ए.टी.एम. मधून रुपये 10,000/-काढण्यासाठी प्रयत्न केला असता, सदर मशिनमध्ये पैशाची कमतरता असल्याबाबतचे स्क्रीनवर लिहून आल्याचे तक्रारकर्त्याने नमूद केले आहे. परंतु त्याबाबत ए.टी.एम. मशिनद्वारे निघालेली पावती तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेली नाही. विरुध्द पक्ष 1 ने वर्णनयादी नि.क्रं. 13 दस्ताऐवज क्रं. 5 नुसार ए.टी.एम. ची पावती दाखल केली असून त्यात दि. 04.10.2015 रोजी विरुध्द पक्ष 2 च्या बोरगांव (मेघे) जि. वर्धा येथील ए.टी.एम.मधून झालेल्या व्यवहाराबाबतचा तपशील देण्यात आलेला आहे. सदर पावत्यांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने दि. 04.10.2015 रोजी ए.टी.एम.मशिनने केलेल्या व्यवहारा पूर्वी अजून 3 वेगवेगळया खात्यातील व्यवहार झाल्याचे दिसून येतात. त्यामध्ये 15:22 वाजता रुपये 5,000/- काढल्याचे दिसून येते, तर 15:33 वाजता व 15:37 वाजता रक्कम काढण्याचे इतर 2 वेगवेगळे व्यवहार झालेले असून सदर व्यवहारात शुन्य रक्कम निघाल्याबाबतची नोंद आहे. त्यानंतरचा व्यवहार 15:43 वाजता तक्रारकर्त्याच्या खात्यातून रुपये 10,000/-ची रक्कम काढल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने केलेला व्यवहारात वरीलप्रमाणे मशिन मधून रोख रक्कम न निघता ए.टी.एम.मशिन मध्ये पैशाची कमतरता असल्याबाबतचा मॅसेज (हवाला) देण्यात आल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने केलेल्या व्यवहारानंतर 15:46 वाजता झालेल्या दुस-या व्यवहारात सदर ए.टी.एम. मशिन मधून रुपये 500/- काढण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने 15:43 वाजता केलेल्या व्यवहाराच्या वेळी सदर मशिनमध्ये रुपये 10,000/-ची रोख रक्कम होती किंवा किती रक्कम होती याचा खुलासा विरुध्द पक्ष 2 बॅंकेने करावयास हवा होते. परंतु विरुध्द पक्ष 2 हे मंचासमक्ष हजर झाले नाही व आपले म्हणणे ही मांडले नाही.
विरुध्द पक्ष 1 यांनी वर्णनयादी नि.क्रं. 13 नुसार तक्रारकर्त्याला दि. 28.12.2015 रोजी पाठविलेल्या पत्राची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्यानुसार विरुध्द पक्ष 2 बॅंकेने तक्रारकर्त्याच्या ए.टी.एम. मधून रक्कम न निघाल्याचा दावा खारीज केल्याचे कळविले असून त्यामुळे तक्रारकर्त्याची रक्कम रुपये10,000/- परत करु शकत नाही असे कळविल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष 1 ने दाखल केलेल्या ए.टी.एम.च्या पावतीवरुन तक्रारकर्त्याच्या खात्यातून रुपये10,000/- रक्कम काढलेली असल्याचे दिसून येणारा ठोस पुरावा म्हणजेच सी.सी.टी.व्ही.फुटेज प्राप्त केला असता तर निश्चितपणे दि.04.10.2015 रोजी ए.टी.एम.मधून तक्रारकर्त्याच्या खात्यातून रुपये 10,000/- निघाले तसेच ते तक्रारकर्त्याने काढलेले आहेत आणि तक्रारकर्त्यालाच मिळाले हे कळले असते. परंतु विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी सदर सी.सी.टी.व्ही.फुटेजचा पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. विरुध्द पक्ष2 बॅंकेने तक्रारकर्त्याने व्यवहार केला त्यावेळेस मशिनमध्ये रुपये 10,000/-ची रक्कम, तक्रारकर्त्यास मिळाली असल्याबाबत, तसेच त्यानंतर ही दुस-या कार्ड धारकाने रुपये 500/- काढल्याबाबतचे कागदपत्र अभिलेखावर दिसून येत आहे. परंतु वि.प. 1 ने वि.प. 2 यांच्याकडून सी.सी.टी.व्ही.फुटेज मागविल्याचे दिसून येत नाही. तसेच तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीतच सी.सी.टी.व्ही. फुटेजचा पुरावा वि.प.ने द्यावा यासाठी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु सदर प्रकरण मंचासमक्ष सुरु असतांना देखील वि.प. 1 व 2 यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजचा पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे जरी बॅंकेच्या ए.टी.एम. पावतीनुसार तक्रारकर्त्याच्या खात्यातून रुपये10,000/- निघाल्याचे दाखविले असले तरी मशिन मधून रुपये10,000/- निघाले व ते तक्रारकर्त्यास मिळाले असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्त्याच्या वि.प. विषयी तक्रारीत असलेले म्हणणे तसेच वादाची मुख्य बाब ही आहे की, तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष 2 बॅंकेच्या ए. टी. एम. मशिन मधून रुपये 10,000/- प्रत्यक्षपणे तक्रारकर्त्यास मिळाले नाही.परंतु व्यवहार झाल्याचे दिसून येते. तसेच वि.प.यांनी व्यवहार झाल्याबद्दलचे कागदपत्र अभिलेखावर दाखल केलेले आहे. परंतु मुख्य मुद्दा हा की, प्रत्यक्षपणे तक्रारकर्त्यास रक्कम मिळाली किंवा नाही ही बाब वि.प.1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द करु शकले नाही. त्यामुळे ए.टी.एम.मशिन मधून तक्रारकर्त्याचे पैसे न निघता ही त्याच्या खात्यातून सदर रक्कम कमी करुन वि.प.ने सेवेत त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. त्याचप्रमाणे त.क.ने ए.टी.एम.मधून पैसे न निघाल्याबाबत वि.प.कडे केलेल्या तक्रारीचे वि.प.ने मुदतीत तसेच योग्य खुलासा देऊन निराकरण केले नाही, ही देखील वि.प. च्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
उपरोक्त निष्कर्षा वरुन वि.प. च्या सेवेतील त्रुटी सिध्द झालेली असल्यामुळे निश्चितच वि.प. हे तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानभरपाई देण्यास पात्र आहे. करिता मंच असा आदेश पारित करीत आहे की, वि.प. 1 चे बॅंकेत तक्रारकर्त्याचे खाते असल्यामुळे तो प्रत्यक्ष ग्राहक असल्याने विरुध्द पक्ष 1 हयांनी तक्रारकर्त्याचे रुपये10,000/- दि.04.10.2015 पासून द.सा.द.शे.4 टक्के व्याजासह द्यावे.
तसेच वि.प. 2 बॅंकेच्या ए.टी.एम. मशिनमधून तक्रारकर्त्यास रक्कम न मिळाल्यामुळे आणि वारंवांर पत्र व्यवहार करुन तसेच मंचासमोर तक्रार दाखल करण्यास तक्रारकर्त्यास निश्चितच शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्या त्रासाची भरपाई देण्यास वि.प. 1 व 2 हे अभिलेखावर दाखल असलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या ए.टी.एम.च्या व्यवहारा संबंधी असलेल्या सूचना व मार्गदर्शकानुसार जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता मंच असा आदेश पारित की, आहे की, वि.प. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाची भरपाई म्हणून रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- द्यावे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2 विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्यास रुपये 10,000/- ही रक्कम दि. 04.10.2015 पासून द.सा.द.शे. 4 टक्के दराने प्रत्यक्ष रक्कम अद्यायगीपर्यंत द्यावी.
3 विरुध्द पक्ष 1 व 2 ने संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये2,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु2000/- द्यावेत.
वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत वि.प. 1 व 2 यांनी करावी.
4 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
5 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.