::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,वर्षा जामदार,मा.सदस्या) (पारीत दिनांक :12.01.2012) 1 अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. अर्जदार आपल्या कुटूंबाचे पालन पोषण मोबाईचा व्यवसाय करुन करतो. दि.28/04/011 रोजी अर्जदाराने BSNL कंपनीचा मोबाईल क्रमांक 9421717377 यांचे सिमकार्ड युनिनॉर कंपनीच्या सिमकार्ड मध्ये बदलवून मिळण्याकरीता BSNL कंपनीकडे विनंती केली. BSNL कंपनीने अर्जदाराची मागणी मान्य करुन पोर्टींग क्रमांक B 2346243 दि. 28/04/2011 ला 18.28 मिनिटाने दिला. त्यानंतर दि.06/05/2011 ला युनीनॉर कंपनीकडे अर्जदाराने सिमकार्ड ऍक्टीव्हेट करण्याबाबत कळविले. परंतु गेटवे एमसीएच नकार कम्प्युटर नेटवर्क वर दाखवून सिमकार्ड ऍक्टीव्हेशन युनिनॉर कंपनीने नाकारले. युनिनॉर कंपनीने अर्जदाराला सेवा न दिल्यामुळे अर्जदाराचा मोबाईल बंद आहे. त्यामुळे अर्जदाराला त्याच्या कामात नुकसान होत आहे. अर्जदाराकडून नंबर बदलविण्यासाठी पोर्टींग चार्जेस घेण्यात आले. अर्जदाराचा मोबाईल क्रमांक 9421717377 हा खुप ग्राहकांकडे व मिञ संबंधिताकडे असल्यामुळे अर्जदाराला सदर क्रंमांकावर मोबाईल रिचार्जचे ऑर्डर व मोबाईल रिपेरिंग व दुरुस्तीचे ऑर्डर मिळत होते. त्यातून अर्जदाराला रु.3,000/- प्रतिमाहचे उत्पन्न मिळत होते. परंतु सदर मोबाईल कंपनीची सेवा युनिनॉर कंपनीने बंद केल्यामुळे रु.3,000/- प्रतिमाह, सेवा बंद केल्यापासून अर्जदाराचे नुकसान होत आहे. अर्जदाराने अनेक वेळा गैरअर्जदार क्रं. 1 कडे सिमकार्ड ऍक्टीव्हेशन करण्याबद्दल विनंती केली. परंतु अर्जदाराला फक्त तोंडी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे अर्जदाराने दि.31/05/2011 ला रजि.पोस्टाव्दारे लेखी तक्रार केली. परंतु गैरअर्जदार यांची चंद्रपूर शाखा कुलूप लावून बंद असल्यामुळे गैरअर्जदाराला सदर तक्रार मिळू शकली नाही व लिफाफा परत आला. त्यामुळे अर्जदार गैरअर्जदाराचे नागपूर कार्यालयात गेला व सिमकार्ड ऍक्टीव्हेट करण्याबाबत विनंती केली. गैरअर्जदाराने अर्जदाराला फक्त तोंडी आश्वासन दिले. अर्जदाराने दि.14/06/2011 ला रजि.पोस्टाव्दारे गैरअर्जदार क्रं.2 ला तक्रार पाठविली. परंतु आजही अर्जदाराचे सिमकार्ड ऍक्टीव्हेशन झालेले नाही. अर्जदाराने BSNL कंपनीकडून सिमकार्ड युनिनॉर कंपनीची सेवा मिळण्यास विनंती केली, ही विनंती मान्य झाली. परंतु युनिनॉर सर्व्हिस सेंटरने सिमकार्ड ऍक्टीव्हेशन करुन देण्यात सेवेत न्युनता केली आहे. युनिनॉर कंपनीने अर्जदाराची सिमकार्ड BSNL ते युनिनॉर बदलवून देण्याची विनंती मान्य केल्यामुळे अर्जदार हा युनिनॉर कंपनीचा ग्राहक आहे. अर्जदाराचे सिमकार्ड बंद असल्यामुळे अर्जदाराला झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी गैरअर्जदार क्रं. 1 व 2 जबाबदार असून 20,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द व्हावा अशी मागणी अर्जदाराने केली आहे. तसेच मोबाईल क्रमांक 9421717377 या क्रंमाकाची सेवा विलंब न लावता सुरु करण्याचा निर्देश गैरअर्जदारांना दयावा. तसेच रु 3,000/- प्रतिमाह गैरअर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने सदर रकमेवर 24 टक्के द.सा.द.शे.याप्रमाणे व्याज आकारुन गैरअर्जदारा विरुध्द आदेश करावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने नि. 5 नुसार 8 दस्तऐवज व नि. 18 नुसार 2 दस्तऐवज दाखल केले आहेत. 2 अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. 3 गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने हजर होवून नि. 11 वर प्राथमिक आक्षेप घेतला आहे. अर्जदाराचा आक्षेप खारीज करण्यात आला. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 नी नि. 13 वर आपले लेखीउत्तर सादर केले. गैरअर्जदारानी अर्जदाराची पोर्टींग नाकारली असल्याबद्दल मान्य केले आहे. गैरअर्जदाराच्या म्हणणे प्रमाणे नंबर पोर्टीबिलीटी साठी योग्य पध्दतीचा अवलंब करायला हवा. ग्राहक ऑपरेटरकडे आपली पोर्टीग विनंती पाठवितो व युनिक पोर्टींग कोड प्राप्त करतो. ग्राहकांनी फॉर्म भरुन दिल्यावर युनिनॉर फॉर्म मध्ये मोबाईल क्लिअरंस हाऊस (MCH) कडे अर्जदाराची विनंती पाठविण्यात येते. व त्यामध्ये ग्राहकाला युनिनॉर सर्व्हिस स्विकारायची आहे याबद्दल माहिती देण्यात येते. MCH ही स्वतंञ संस्था असून सर्व पोर्टीग विनंती त्यांच्याकडे पाठविण्यात येतात. ग्राहकाला युनिक पोर्टींग कोड हा पालक नेटवर्क (Parent Network) मध्ये पालक ऑपरेटर(Parent Operator) कडून प्राप्त होतो. जर पालक ऑपरेटर ग्राहकाची विनंती मान्य करीत असेल तर MCH युनिनॉर कंपनीला तशी माहिती देते, आणि MCH कडून हिरवी झेंडी मिळाल्यावर युनिनॉर कंपनीला युनिनॉर मध्ये नंबर मान्य करण्याचा अधिकार असतो. जर पालक ऑपरेटर ग्राहकाची विनंती नाकारत असेल तर MCH युनिनॉर कंपनीला ‘’पोर्टींग विनंती अमान्य’’ असे कळविते. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराला पोर्टींग कोड BZ 346243 हा BSNL कडून देण्यात आला होता, परंतु MCH अर्जदाराची विनंती नाकारली होती. ती विनंती नाकारण्याचे कारण BSNL ला माहिती आहे. त्यामुळे युनिनॉर अर्जदाराला आपल्या नेटवर्क मध्ये घेवू शकला नाही. अर्जदाराने ही MCH ने विनंती नाकारल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने BSNL कडे जाण्याऐवजी वारंवार युनिनॉर कडे विनंती केली. अर्जदाराला पॅरेंन्ट ऑपरेटरकडे जावून त्याचे कारण जाणून घेता आले असते. युनिनॉर फक्त MCH च्या निर्देशानुसार स्विकारु किंवा नकारु शकते. या सर्व प्रकरणात गैरअर्जदाराची कुठलीही चूक नाही, उलटपक्षी कुठलाही ग्राहक जर गैरअर्जदाराकडे पोर्टींग करीत असेल तर ते युनिनॉरच्या प्रतिष्ठेची बाब असते. युनिनॉरने अर्जदाराला BSNL कडे जाण्याची सूचना दिली होती. अर्जदाराने BSNL व MCH या तक्रारीमध्ये जोडलेले नाही, हे दोन्ही पक्ष सदर तक्रारीच्या निर्णयासाठी आवश्यक पक्ष आहे. अर्जदार कधीही युनिनॉरचा ग्राहक नसल्यामुळे गैरअर्जदाराविरुध्द सदर तक्रार ग्राहय नाही. फक्त पोर्टींग विनंती केल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होत नाही, त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराला कुठलिही न्युनतापूर्ण सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदाराला सदर प्रकरणामध्ये विनाकारण जोडल्यामुळे अर्जदारावर रु.10,000/- खर्च लावून अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदारानी केली आहे. 4 अर्जदाराने नि. 14 वर आपले शपथपञ दाखल केले, तसेच गैरअर्जदाराने नि.15 वर लेखीउत्तर शपथपञ, समजण्यात यावा अशी पुरशीस दाखल केली. गैरअर्जदाराने नि. 20 नुसार लेखीयुक्तीवाद दाखल केला. अर्जदाराने केलेला तोंडी युक्तीवाद व दोन्ही पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज व पुरावा शपथपञावरुन खालील कारणे व निष्कर्ष काढण्यात येत आहे. // कारणे व निष्कर्ष // 5 अर्जदाराचा मोबाईल क्रं. 9421717377 BSNL चा क्रमांक असुन अर्जदार दि.28/04/2011 पर्यंत त्याचीच सेवा घेत होता. परंतु दि.28/04/2011 ला अर्जदाराने मोबाईल क्रमांक तोच ठेवून फक्त सेवा देण्या-या कंपनी मध्ये बदल करण्यासाठी तशी विनंती BSNL कडे केली होती. अर्जदाराची विनंती BSNL नी मान्य केली व अर्जदाराला कंपनी बदलण्यासाठी पोर्टींग क्रमांक BZ 2346243 देण्यात आला. अर्जदाराने केलेल्या विनंती व्दारे विशिष्ट पध्दतीने अर्जदाराला दुस-या कंपनीची सेवा मिळू शकते. अर्जदाराने युनिनॉर गैरअर्जदार क्रं. 1 ची सेवा मिळण्यासाठी अर्ज केला होता, त्यामुळे योग्य (Process) पध्दतीनुसार ही प्रक्रिया पूर्ण होणार होती. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 नी नि. 13 मधील आपल्या लेखीउत्तरात त्या पध्दतीबद्दल सांगितले आहे. अर्जदाराने पोर्टबिलिटीसाठी विनंती केल्यावर युनिनॉर कंपनीने अर्जदाराची विनंती इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये भरुन MCH पाठविली होती. MCH ही अशी स्वतंञ स्वायत संस्था आहे जी पोर्टींगविनंती ची शहानिशा करुन सर्व ऑपरेटरला क्लिअरन्स देत असते. MCH कडून क्लिअरन्स आल्यावरच, युनिनॉर कंपनीला आपल्या नेटवर्कमध्ये कोणताही मोबाईल क्रमांक सामिल करता येतो. अर्जदाराच्या प्रकरणामध्ये MCH नी अर्जदाराची विनंती फेटाळण्याचे कारण BSNL ला माहित आहे. त्याचेशी युनिनॉरचा संबंध नाही. गैरअर्जदाराने नमूद केलेल्या हया पोर्टींग पध्दतीला अर्जदाराने नकाराले नाही किंवा हया व्यतिरिक्त इतर कोणती पोर्टींगची पध्दत असल्याचेही नमूद केले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राहय धरण्याजोगे असुन, अर्जदारालाही मोबाईल क्रमांक पोर्टींगसाठी त्याच प्रक्रियेतून जाणे भाग आहे. त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदाराने पोर्टींग सेवा न देवून सेवेत न्युनता केली असे प्रथम दर्शनी दिसत नाही. उलट गैरअर्जदाराने अर्जदाराला सेवा नाकारण्याचे कारण BSNL च्या अखत्यारितले व MCH च्या अधिकारातले असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. परंतु अर्जदाराने BSNL ला या प्रकरणात पक्ष म्हणून जोडले नाही. योग्य पक्ष न जोडल्यामुळे अर्जदाराला दिलेल्या सेवेत न्युनता झाली किंवा नाही, अपेक्षित सेवा देण्याची जबाबदारी कोणाची होती हे निश्चितपणे ठरविता येत नाही. गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राहय धरले असता गैरअर्जदाराच्या अधिकार क्षेञा बाहेरील ती बाब होती, त्यामुळे त्यांचे कडून न्युनता पूर्ण सेवा झाली असे म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे हया निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2 सर्व पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) सर्व पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 12/01/2012. |