निकालपत्र
--------------------------------------------------------------------
(1) मा.सदस्य,श्री.सी.एम.येशीराव. – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून नुकसानभरपाई मिळणे करिता, तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ते मु.पो.खेडे येथील रहिवाशी असून त्यांच्या शेतीचा गट नंबर 459/2 क्षेत्रफळ हे 0-59 आर असा आहे. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र.2 यांच्याकडून विरुध्दपक्ष क्र.1 यांनी उत्पादीत केलेल्या मिरचीचे बियाणे, 24 व्हेजिटेबल सीड्स व्हरायटी (जात हायब्रीड चीली) हे वाण विरुध्दपक्ष क्र. 2 च्या शिफारशी नूसार दि.24-10-2008 रोजी 10 ग्रॅमची एकूण 10 पाकीटे प्रत्येकी रु.350/- चे विकत घेतले. सदर बियाण्याचा नंबर 3027000 व पॅकींग दि.23-01-2008, सेटींग दि.02-01-2008, शुध्दता 98 टक्के नमूद केलेली असा आहे. सदर बियाण्याची तक्रारदाराने दि.28-10-2008 रोजी लागवड केली. शेतामध्ये आवश्यक ती नांगरणी, मशागत करुन शेणखत टाकले, सल्फेट फवारणी केली. सदर मिरची झाडांना सहा महिन्यानंतर मिरची लागली. त्याची सरासरी लांबी 2.6 इंच होती. त्यामुळे तक्रारदारांनी दि.13-07-2009 रोजी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परषिद धुळे व गट विकास अधिकारी, पंचायत समिती धुळे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने दि.01-08-2009 रोजी तक्रारदारांच्या शेतास भेट दिली व पिक परिस्थितीचा पंचनामा तयार केला. त्यात त्यांनी शेतक-यास मिरची पिकाचे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही असा अभिप्राय नोंदविला आहे.
(3) तक्रारदारास रु.7,00,000/- एवढया उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र त्याला तसे उत्पन्न आले नाही. त्यानंतर दि.23-03-2010 रोजी विरुध्दपक्षास नोटिस दिली. त्यानंतरही पुर्तता न झाल्यामुळे तक्रारदारांनी रु.6,44,030/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- व त्यावर 18 टक्के व्याज मिळण्यासाठी या न्यायमंचात तक्रार दाखल केलेली आहे.
(4) विरुध्दपक्ष यांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13 (1) (ब) नुसार नोटिस काढण्यात आली. विरुध्दपक्ष मंचात हजर झाले. त्यांनी नि.नं.15 वर जबाब, नि.नं.16 वर प्रतिज्ञापत्र, नि.नं.17 वर लेखी युक्तिवाद दाखल केला.
(5) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. कृषि अधिका-यांनी विरुध्दपक्षास पंचनाम्याचे वेळेस नोटिस दिलेली नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आयुक्तालयाचे परिपत्रक जा.क्र.गुनियो/बियाणे/स्था.अ./5/92 का.96,दि.27-03-1992 चा भंग झालेला आहे. सदरच्या अहवालात मिरची फळाची लांबी सरासरी 2.06 इंच असल्याचे नमूद आहे. त्यावरुन बियाण्यात उगवणीबाबत व फळ लागणीबाबत दोष नाहीत हे सिध्द होते असे कथन केले आहे. तसेच मिरची पिकावर चुरडा-मुरडा रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होता व रस शोषन करणा-या किडीचा प्रादुर्भावर दिसून आला. त्यावरुन मिरची पिकाचे अपेक्षीत उत्पन्न मिळणार नाही असे अनुमान समितीने काढले आहे. त्यात बियाण्यात दोष असल्याचे ठोसपणे नमूद नाही व किडीमुळेच अपेक्षीत उत्पन्न येणार नाही. यात विरुध्दपक्षाचा दोष नाही, असे कथन केलेले आहे. या बाबत त्यांनी CPJ II (2005) 94 (NC) Sonekaran Gladioli Growers V/s Babu Ram या निवाडयाचा उल्लेख केलेला आहे. तक्रारदारांच्या उत्पन्ना बाबत, नुकसानीबाबत व मशागती बाबतचा सर्वर मजकूर विरुध्दपक्ष यांनी नाकारला आहे. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे असे कथन केले आहे. या कामी त्यांनी Kesari Venkata Reddy V/s Anaparthy Venkata Chalapathi Rao, 1 (2000) CPJ 439 (A.P.) या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
(6) तक्रारदाराने नि.नं.2 वर तक्रार अर्ज व शपथपत्र दाखल केले असून नि.नं.5 वर बियाणे घेतल्याच्या पावत्या, खते व फवारणीसाठी घेतलेल्या रसायणाची बिले दाखल केलेली आहेत. नि.नं.5 ते 8 वर पिक परिस्थिती पंचनामा, नि.नं.5/11 वर वकील नोटिस, नि.नं.5/14 वर 7/12 चा उतारा दाखल केला आहे.
(7) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी नि.नं.15 वर खुलासा, नि.नं.16 वर प्रतिज्ञापत्र, नि.नं.17 वर लेखी युक्तिवाद आणि नि.नं.18 वर परिपत्रके दाखल केलेली आहेत.
(8) तक्रारदारांची तक्रार तसेच विरुध्दपक्षांची कैफियत आणि प्रकरणात दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ः होय. |
(ब)विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे काय ? | ः होय. |
(क)तक्रारदार नुकसान भरपाई व मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | ः होय. |
(ड)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(9) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी नि.नं.5/1 व 5/2 वर बियाणे खरेदीच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. त्यानुसार तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(10) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांच्याकडून विरुध्दपक्ष क्र.1 यांनी उत्पादीत केलेले 24 व्हेजिटेबल सीड्स व्हरायटी (जात हायब्रीड चीली) या वाणाचे मिरचीचे बियाणे विकत घेतले होते. सदर बियाणे त्यांनी आपल्या शेतातील गट नंबर 459/2 क्षेत्रफळ हे 0-59 आर मध्ये पेरले. मात्र बराच कालावधी होऊनही अपेक्षीत उत्पन्न किंवा फळे दिसून न आल्यामुळे दि.13-06-2009 रोजी त्यांनी या बाबत कृषि अधिकारी जिल्हापरिषद धुळे यांच्याकडे तक्रार केली. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने दि.01-08-2009 रोजी तक्रारदारांच्या शेतीस भेट देऊन पिक पाहणी करुन पिक परिस्थितीचा पंचनामा सादर केला. त्यात खालील प्रमाणे अभिप्राय नमूद आहे.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारीत प्रक्षेत्रातील मिरची पिक वाण शैना-715 ची प्रक्षेत्र पाहणी केली. शेतक’यांच्या सांगण्यानुसार सदर बियाणे रोपे तयार करणेसाठी दि.28-10-2009 रोजी लागवड केली असून, रोपे तयार झाले नंतर दि.15-12-2008 रोजी रोपांची पुनर्रलागवड केली असल्याचे सांगितले. प्रक्षेत्रातील रॅण्डम पध्दती प्रमाणे 10 X 10 फूट प्लॉट मधिल एकूण 16 झाडांची निरिक्षणे घेतली असता सरासरी झाडांची उंची 2.43 फूट आढळूण आली. तसेच झाडांना सरासरी 14.43 फळे (मिरची) लागल्याचे दिसून आले व आलेल्या मिरची फळांची सरासरी लांबी 2.06 इंच असल्याचे आढळूण आले. सद्यस्थितीत मिरची पिकावर चुरडा-मुरडा या रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आढळूण आले व इतर रस शोषन करणा-या किडींचा सुध्दा प्रादुर्भाव दिसून आला. तक्रारीत प्रक्षेत्राची पाहणीअंती शेतक-यास मिरची पिकाचे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही असे समितीचे मत आहे.
या अहवालात शेतक-यास अपेक्षीत उत्पन्न येणार नाही ही बाब नमूद आहे. सदर अहवालात पिकांना किडीचा प्रादूर्भाव झाल्याची बाब नमूद आहे. मात्र शेतक-याने आवश्यक ती खते व रसायनाची फवारणी केली आहे. त्यानंतरही किडीचा प्रादूर्भाव झाला याचाच अर्थ असा की,सदर बियाण्याची रोग प्रतिकारकशक्ती कमी होती. त्यामुळे किडीचा प्रादूर्भावर झाला व अपेक्षीत फळधारणा झाली नाही आणि त्यामुळे अपेक्षीत उत्पन्न येणार नाही. त्यामुळे शेतक-याचे नुकसान होणार आहे. तसेच विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकरणी दाखल केलेले आदरणीय वरीष्ठ न्यायालयाचे निवाडे सदर प्रकरणी तंतोतंत लागू करता येणार नाहीत असेही आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(11) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी सदोष बियाण्यामुळे झालेल्या रु.6,44,030/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- व त्यावर 18 टक्के व्याज मिळावे अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदार यांनी त्यांना मागील वर्षी सदर क्षेत्रात मिळालेल्या उत्पन्नाबाबत कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच पंचनाम्यात तक्रारदारास 16 टक्के उत्पन्न मिळाले असल्याचे नमूद आहे. धुळे जिल्हयातील मिरची उत्पादनाबाबत सरासरीची माहिती घेतली असता ओल्या मिरचीस साधारणपणे एकरी 12 ते 13 टन उत्पन्न मिळते तसेच ओल्या मिरचीचा बाजारभाव प्रति किलो रु.10 ते 15 असल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारदार यांचे सुमारे 20 टनाचे नुकसान झाले आहे असे दिसून येते. तक्रारदार यांचे क्षेत्र 59 आर आहे. यावरुन तक्रारदार यांचे रु.30,000/- एवढया रकमेचे नुकसान झाले असल्याने ते सदरची रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. असे उत्पन्न न मिळाल्यामुळे तक्रारदारास निश्चितच शारीरिक व मानसिक त्रास झाला असल्यामुळे त्यासाठी नुकसान भरपाई मिळण्यासही तक्रारदार पात्र आहेत असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(12) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सदर निकाल प्राप्त झाल्यापासून पूढील तीस दिवसांचे आत विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी, वैयक्तिक व संयुक्तिक रित्या.
(1) तक्रारदारास मिरची पिकाच्या नुकसानीपोटी रक्कम 30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) द्यावेत.
(2) तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
(3) उपरोक्त आदेश कलम 1 व 2 मध्ये नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे.
दिनांक – 29-02-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.