निकाल
दिनांक- 22.07.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार राहुल शितोळे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून रु.38,725/- मिळावे या मागणीसाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे बालाजी ऑफसेट या नावाने प्रिंटींग प्रेस चालवतात. त्याला लागणारे साहित्य व पेपर्स हे तक्रारदार यांनी मे.धनश्री पेपर मार्ट परळी वैजनाथ,जि. बीड यांच्याकडून दि.29.06.12 रोजी रक्कम रु.4.725/- खरेदी केले व दि.30.06.12 रोजी सदर मालाचे पार्सल सामनेवाला हयांच्या कुरीयर मार्फत पाठवले. सदर मालाचे पार्सल सामनेवाले यांच्याकडे आल्यानंतर तक्रारदार सदर पार्सल सोडवण्यास गेले असता ते पार्सल भिजलेल्या व फुटलेल्या अवस्थेत होते. तसेच ते पार्सल योग्य प्रकारे सामनेवाल्याने न पाठवल्याने खराब झाले, त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून तक्रारदाराने दि.01.08.12 रोजी लेखी नोटीस वकीलामार्फत पाठवली नोटीसमध्ये नुकसान भरपाई म्हणून रु.7,725/- ची मागणी केली. नोटीसची प्रत, पोस्टाची पावती दाखल अर्जासोबत जोडली आहे.
सामनेवाले मंचात हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला हयांनी तक्रारदाराचे सदर पार्सल सामनेवाला यांच्या कुरीयरने आलेले अमान्य केले आहे. तसेच तक्रारदारास पाठविलेले पार्सल खराब व फुटलेल्या अवस्थेत होते ही बाब अमान्य केली. सामनेवाल्याने तक्रारदारास मागणीशी संबंध नसल्यामुळे नोटीसचे उत्तर दिले नाही. सामनेवाला यांच्यामुळे तक्रारदारास कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही व कोणताही त्रास दिला नाही असे नमुद केले आहे. अधिक कैफियतमध्ये सामनेवाला यांनी म्हटले आहे की, तक्रारदार याने कुठल्याही प्रकारचा माल घेवून पावती घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला हयांचा ग्राहक होऊ शकत नाही. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रार अर्ज व लेखी जबाबावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुददे उपस्थित होतात व त्याचे समोरच त्यांची उत्तरे दिलेली आहेत.ी
मुददे उत्तर
1) तक्रारदार हा सामनेवाला यांचा ‘ग्राहक’ आहे, ही बाब सिध्द केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार यांनी केलेली मागणी मिळण्यास पात्र आहे काय? नाही. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले आहे. शपथपत्रात अर्जदार यांचे कथन की, ते धारुर येथे प्रिटींग प्रेस चालवतात. प्रिटींग प्रेस कामी लागणारे साहित्य ते मे. धनश्री पेपर मार्ट परळी वैजनाथ, जि.बीड यांच्याकडून खरेदी करतात. दि.29.06.2012 रोजी तक्रारदार यांनी रक्कम रु.4725/- चे प्रिटींग साहित्य ते धनश्री पेपर यांच्याकडून खरेदी केले. मे.धनश्री पेपर मार्टचे मालक सचिन काबरा यांना तक्रारदारांचे सांगणेप्रमाणे दि.30.06.2012 रोजी सामनेवाले मार्फत कुरिअरने तक्रारदारांस पार्सल पाठवले व सोबत मुळ बिल देखील पाठवले.तक्रारदार यांनी पुढे असेही कथन केले आहे की, तो माल सोडवून घेण्याकरिता गेला असता पार्सल हे फुटलेल्या व भिजलेल्या अवस्थेत आढळून आले म्हणून ते स्विकारले नाही. सामनेवाला यांनी माल पाठवित असताना काळजी घेतली नाही म्हणून तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले.
सामनेवाला यांनी आपल्या शपथपत्रात तक्रारदारांचे सर्व म्हणणे अमान्य केले आहे. सामनेवाले यांचे कथन की, त्यांनी कधीही कुरिअर मार्फत तक्रारीत नमूद केलेला माल तक्रारदार यांना पाठविला नाही. सामनेवाले यांचे कथन की,तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नाही. त्यामुळे त्यांला सदरील तक्रार दाखल करता येत नाही. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे व कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी मे.धनश्री पेपर मार्ट, परळी वैजनाथ, जि.बीड यांच्या कडून माल खरेदी केल्या बाबत पावती दाखल केली आहे. परंतु तो माल तक्रारदार यांच्याकडे पाठविण्याची जबाबदारी कुणाची होती या बाबत पुरावा दाखल केला नाही. मे. धनश्री पेपर मार्ट यांना तक्रारीत सामील केलेले नाही. तक्रारदारांनी कुरिअर मार्फत माल पाठविल्याची जी पावती दाखल केली आहे, त्यावर कुणाचीही सही नाही. तक्रारदार अगर धनश्री पेपर मार्ट, परळी वैजनाथ यांच्या सहया नाहीत. त्यामुळे सदरील पावती ग्राहय धरता येणार नाही. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे ही बाब तक्रारदार सिध्द करु शकला नाही. सबब, तक्रारदार तक्रारीत मागणी केलेल्या नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सबब, मुददा क्र.1 व 2 यांचे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड