१. अर्जदार हिने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 तील तरतुदीनुसार प्रस्तूत तक्रार दाखल केली असून तक्रारीतील मजकूर असा आहे की, अर्जदार हिचे पती श्री.प्रभाकर दयाराम अवसरे यांचे नांवे सोनेगांव, ता.ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र.283 ही शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्याकरीता काढलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे पतीचा रू.1,00,000/- चा विमा उतरविला होता. अर्जदार हिने नमूद केले की, तिचे पतीचा दिनांक 11/3/2009 रोजी वाहनावरून रस्त्याने जात असतांना समोरून येणा-या अन्य वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी होवून अपघाती मृत्यु झाला. त्यानंतर अर्जदाराने विरूध्द पक्ष क्रं. 3 मार्फत गैरअर्जदारक्र.1 विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी मागणी केलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु अर्जदाराने रीतसर अर्ज व आवश्यक दस्तावेज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीच्या पतिचा मृत्युदाव्याबाबत काहीही न कळविल्याने अर्जदाराने नातेवाईकांमार्फत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागीतली असता त्यांना दावा प्राप्त झाल्याचे कळविले परंतु दावा मंजूर वा नामंजूर केल्याचे अर्जदाराला कळविले नाही. विरूध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी सदर विमा दाव्याबाबत निर्णय न घेवून अर्जदाराला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब अर्जदार हिने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. 3. अर्जदार हिने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, विरूध्द पक्षांनी विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर प्रस्ताव दाखल केल्यापासून 18 टक्के द.सा.द.शे. व्याजासह देण्याचे आदेश व्हावे, तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. 30,000/- व तक्रारीचा खर्च रु. 15,000/- विरूध्द पक्षांकडून मिळण्याचा आदेश व्हावा. 4. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्रं 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी हजर होवून त्यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी विमा पॉलीसी मान्य केली परंतु तक्रारकर्तीचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून लेखी कथनामध्ये प्राथमीक आक्षेप घेत नमूद केले की, अर्जदाराचे पतीचा मृत्यु दिनांक11/3/2009 रोजी रस्ता अपघातात झाला व त्यानंतर तिने गै.अ.क्र.3 कडे दावा दाखल केल्याचे मोघम कथन केले आहे. मात्र दावा कोणत्या तारखेला दाखल केला ही बाब लपवून ठेवली. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली गै.अ.क्र.3 कडे माहिती मागितली व त्याचे दिनांक 21/11/2016 चे उत्तरात तक्रारकर्तीचा दावा फेटाळला आहे असे कळल्याचे खोटे नमूद केले आहे. गैरअर्जदार क्र.1 पुढे नमूद करतात की, त्यांनी अर्जदाराला पत्रान्वये वारंवार सुचना देऊही तिने विमादावा अर्ज निकाली काढण्याकरीता, मृतकाचे नांवाचा जुना फेरफार, व्हिसेरा रिपोर्ट, मृतकाचा वाहनचालक परवाना इत्यादि आवश्यक दस्तावेज जमा केले नाही. त्यामुळे या सर्व कारणांस्तव विरूध्द पक्ष क्र.1 ने अपु-या दस्तावेजांस्तव तक्रारकर्तीचा विमादावा बंद केला व तसे दिनांक 25/1/2010 च्या पत्रान्वये तक्रारकर्तीस सुचीत केले. सबब या तारखेपासून 2 वर्षांच्या आत म्हणजे दिनांक 24/1/2012 किंवा त्यापूर्वी तक्रार दाखल करणे आवश्यक होते, परंतु दिनांक 11/3/2009 रोजी झालेल्या अपघाती मृत्युचा विमादावा दिनांक 25/1/2010 रोजी बंद करण्यांत आल्यानंतर अर्जदाराने दिनांक 22/6/2017 रोजी म्हणजेच तब्बल सहा वर्षे विलंबाने व तेही चुकीच्या विमा कंपनीविरूध्द तक्रार दाखल केली असून ती मुदतबाहय असल्यामुळे खारीज करण्यांत यावी. गैरअर्जदार त्यांच्या लेखी बयाणात पुढे नमूद करतो की अर्जदाराच्या पतीचा किराणा दुकानाचा व्यवसाय होता व त्याच्या दुकान परवान्याची प्रत सोबत जोडण्यात येत आहे. तसेच अर्जदार ही मयत प्रभाकरची पत्नी असल्याबाबतचा कोणताही दस्तावेज वा पुरावा जोडलेला नाही तसेच सन 2017 मध्ये या गैरअर्जदाराविरूध्द ग्राहक दावा दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नसल्यामुळे या कारणास्तव अर्जदाराची तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. 6. विरूध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांनी प्रकरणात उपस्थीत होवून कोणताही बचाव प्रस्तूत न केल्यामुळे मंचाने दिनांक 11/9/2018 रोजी तक्रार त्यांच्या लेखीउत्तराशिवाय चालविण्याचा आदेश पारीत केला. 7. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तसेच विरूध्द पक्ष क्रं 1 यांचे लेखीउत्तर, गैरअर्जदारक्र.1 चे शपथपत्र व लेखी युक्तिवाद, तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष क्र.1 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे. मुद्दे निष्कर्ष (1) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. 1 यांची ग्राहक आहे काय ? होय. (2) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं.2 व 3 यांची ग्राहक आहे काय ? नाही. (3) विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? नाही. (4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबत :- 8. अर्जदार हिने दाखल केलेल्या दस्त 7/12 उतारा, गांव नमूना आठ अ, यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचे पती मयत श्री.प्रभाकर दयाराम अवसरे यांचे नांवे सोनेगांव, ता.ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र.283 ही शेतजमीन आहे. यावरून अर्जदाराचे मयत पती हे शेतकरी होते व शेतीतील उत्पन्नावर ते कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्द होते. शासनाने अपघातग्रस्त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्याकरीता काढलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे पतीचा रू.1,00,000/- चा विमा उतरविला होता. तक्रारकर्ती ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी असून सदर विम्याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 ची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. . मुद्दा क्रं. 2 बाबत :- विरूध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 ने विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार ही विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रं. 3 बाबत :- 9. अर्जदाराने तिच्या युक्तिवादात कथन केले की तिचे पती शेतकरी होते व त्यांचा दिनांक 11/3/2009 रोजी अपघातात मृत्यु झाला मात्र गैरअर्जदाराने दस्तावेज दाखल केले नाहीत या सबबीखाली तिचा विमादावा नामंजूर केला. अर्जदाराने नि.क्रग.4 समवेत तक्रारीत दस्तावेज दाखल केले असून सदर दस्तावेजांचे अवलोकन केले असता दस्तावेज क्र.4 नुसार पोलीसांनी एफ आय आर मध्ये अर्जदाराचे पतीविरूध्द मोटार वेहिकल अॅक्टच्या कलम 185 अंतर्गत प्राणांतीक अपघाताचा गुन्हा नोंदविलेला आहे. सबब अपघाताच्या वेळी अर्जदाराचा पती हा दारूच्या नशेत होता ही बाब स्पष्ट झाली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या पि.एम. रिपोर्टनुसारही अर्जदाराचे पती हे अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्यामुळे सदर अपघात झाला ही बाब स्पष्ट होत आहे. गैरअर्जदाराने त्याच्या तोंडी युक्तिवादात असे प्रतिपादन केले की अर्जदाराचे पती अपघाताचे वेळी दारूच्या नशेत असल्यामुळे शेतकरी अपघात विमा त्रिपक्षीय करारामधील क्लॉज 8 (3) मधील एक्स्क्लुजन क्लॉज 2 प्रमाणे मद्य प्राशनाने मद्यार्काच्या अंमलाखाली झालेल्या अपघाती मृत्युस विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही असे नमूद आहे. सबब वरील प्रमाणे युक्तिवाद व उपलब्ध दस्तावेजांचा विचार करून मंच या निष्कर्षास आले आहे की, अर्जदाराचे पती अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्यामुळे सदर अपघात होऊन त्यांत त्यांचा मृत्यु झाला ही बाब स्पष्ट होत असल्यामुळे व शेतकरी विमा प्रपत्र क नुसार विमा संरक्षणामध्ये समाविष्ठ नसणा-या बाबींमध्ये क्रमांक 4 चे तरतुदीनुसार अंमली पदार्थाच्या अंमलाखाली झालेला अपघात असल्यामुळे अर्जदाराचा उपरोक्त विमादावा नाकारून गैरअर्जदार क्र.1 यांनी सेवेत कोणतीही न्युनता केलेली नाही व त्यामुळे प्रस्तूत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्रं. 4 बाबत ः- 11. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश (1) अर्जदाराची तक्रार क्र.101/2017 खारीज करण्यात येते. (2) उभय पक्षांनी आपआपला तक्रारीचा खर्च सोसावा (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी. चंद्रपूर दिनांक - 12/9/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |