निकालपत्र
(पारित दिनांक १४-११-2008)
द्वारा. श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे ः
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, ..........
1. तक्रारकर्ता यांनी दि भंडारा को-ऑफ-बँक लि. शाखा तिरोडा यांचे कडून सन २००७ मध्ये कर्ज घेऊन टाटा कंपनीचे रोलर घेतले. सदर रोलर तक्रारकर्ता यांनी वि.प. यांचेकडून पॉलीसी क्र. २३०१०३/३१/०७/०१/००००१६९० कालावधी ०६/०६/०७ ते ०५/०६/०८ करिता विमाकृत केले होते. रोलरमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दि. ०४/०४/०८ रोजी रोलर मिस्त्री मुन्ना बघेले यांच्या गॅरेजमध्ये नेले. त्या रात्री अज्ञात चोरांनी रोलरची एक्साईड कंपनीची बॅटरी चोरुन नेली. तक्रारकर्ता यांनी दि. ०५/०४/०८ रोजी सदर घटनेची वर्दी पोलिस स्टेशन तिरोडा येथे दिली व त्या अनुषंगाने पोलिसांनी एफ.आय.आर क्र. ५८/०८ कलम ३७९ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास केला परंतू चोर मिळाले नाहीत.
2. तक्रारकर्ता यांनी सदर घटनेची लेखी माहिती दि. ०६/०४/०८ रोजी बँकेमार्फत वि.प. यांना दिली व सर्व कागदपत्रांसाह क्लेम फॉर्म हा त्यांच्याकडे पाठविण्यात आला. परंतू वि.प. यांनी दि. ०८/०८/०८ रोजी तक्रारकर्ता यांचा दावा रद्द केला. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, चोरी गेलेल्या बॅटरीची रक्कम रु. १२,५00/- दि. 0५/0४/0८ पासून १२ टक्के व्याजासह देण्यात यावी व तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी रु. ५,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु. 3,000/- देण्यात यावे.
3. वि.प. यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 0७ वर दाखल केला आहे. वि.प. म्हणतात कि, रोलर हा निष्काळजीपणे गॅरेजमध्ये ठेवण्यात आला होता त्याची बरोबर काळजी घेण्यात आली नाही. वि.प. यांनी पोलिसांचा फायनल रिपोर्ट मागितला असता तक्रारकर्ता यांनी तो पुरविला नाही. तक्रारकर्ता यांनी पॉलिसीतील कलमांचा भंग केल्यामुळे त्यांचा दावा हा 'नो क्लेम' म्हणून बंद करण्यात आला. सदर तक्रार ही दिवाणी न्यायालयात चालण्यात यावी अश्या प्रकारची आहे. त्यामुळे सदर तक्रार ही नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
४. तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांच्या रोलरची बॅटरी ही दि. 0४/0४/0८ रोजी चोरी गेली व वि.प. यांनी दि. 0८/0८/0८ रोजी तक्रारकर्ता यांचा विमा दावा हा 'नो क्लेम' म्हणून बंद केला.
५. सेक्शन 1 मध्ये म्हटले आहे की, Loss of or Damage to the Vehicle Insured
1. The Company will indemnify the insured against loss or damage to the vehicle insured hereunder and/or its accessories whist thereon:
II. by burglary housebreaking or theft;
Subject toadeduction for depreclation at the ratesmentioned below in respct of parts replaced:
1. For all rubbner/nylon/plastic parts, tyer, tubes, batteries and air bags - 50% .
तर पालिसीतील सेक्शन 1(2) मध्ये असे नमुद केले आहे की, "The company shall not be liable to make any payment in respect of (a) consequential loss, deprecation, wear and tear, mechanical or electrical breakdown, failures or breakages nor for damage caused by overloading or strain of the insured vehicle nor for loss of or damage to accessories by burglary housebreaking or theft unless such insures vehicle is stolen at the same time"
६. सदर पॉलिसीमध्ये कलम 2 मध्ये असे म्हटले आहे की, जर का विमाकृत असलेले वाहन हे त्याचवेळी चोरीला गेले तरच accessories ची नुकसान भरपाई मिळू शकते. मात्र सेक्शन १ मध्ये असे नमूद केले आहे की, जर बॅटरी बदलवली तर त्याची ५0 टक्के रक्कम देता येते. सेक्शन १ मधील कलमांचे एकत्रित वाचन केले असता पॉलिसीच्या कलमाचे दोन अर्थ निघत असल्यामूळे ते संग्दिध स्वरुपाचे आहे असे म्हणता येते.
७. नॅशनल इंशुरन्स कं. लि. विरुध्द नचत्तर सिंग या II (2006) CPJ 120 (NC) मध्ये प्रकाशित झालेल्या न्यायनिवाडयात आदरणिय राष्ट्रीय आयोगाने असे प्रतीपादन केले आहे की, पॉलीसी ही संग्दिध स्वरुपाची असेल व त्यावरुन दोन अर्थ काढता येत असतील तर जो अर्थ पॉलीसी धारकाच्या हिताचा असेल तो स्विकारला पाहिजे.
८. तक्रारकर्ता यांनी बदलवण्यात आलेल्या बॅटरीचे रु. १२,५00/- चे देयक रेकॉर्डवर दाखल केले आहे. त्याची ५0 टक्के रक्कम ही रु. ६,२५0/- अशी होते.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना रु. ६२५0/- ही रक्कम दि. 0८/0८/0८ पासून ती रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होईपर्यंत ९ टक्के व्याजासह दयावी.
3. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना शारिरीक व मानसीक त्रासासाठी रु. 2000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु. 1000/- दयावेत.
४. वि. प. यांनी आदेशाचे पालन आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे.