विदयमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
यांचे न्यायालयासमोर
अखिल सभागृहाजवळ, गणेशपूर रोड, भंडारा
तक्रार क्र. CC/ 12/ 89 दाखल दि. 29.10.2012
आदेश दि. 15.07.2014
तक्रारकर्ते :- श्री जयगोपाल नारायण गायधने
वय 58 वर्षे, धंदा—पेन्शनर
रा.रुक्खिमीणीनगर,आनंद मंगल कार्यालयासमोर,
खात रोड,भंडारा ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- श्री उमेश अरविंद बडवाईक,
वय 40 वर्षे, धंदा—प्रोप्रा.गायत्री एजन्सीज
बोअरवेल अॅड मशिनरी,
बसस्टॅन्ड जवळ,भंडारा
ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.हरडे
वि.प.तर्फे सक्सेना
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 15 जुलै 2014)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला बोअरवेल खोदण्याचे काम दिले होते तसेच त्यांचे कडून प्लॉस्टीक केसींग पाईप विकत घेतले होते. परंतु विरुध्द पक्षाने कमी दर्जाचे पाईप पुरविल्यामुळे व बोअरवेल निष्कृष्ट दर्जाची केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या बोअरवेलला गढुळ पाणी सतत येत असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ता हा न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात राहत असून विरुध्द पक्ष हा गायत्री एजन्सी अॅड बोअरवेल मशिनरी याचा Propriator असून तो न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात व्यवसाय करतो.
3. तक्रारकर्त्यास पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्याने स्वतःसाठी बोअरवेल खोदण्याचे काम विरुध्द पक्षास दिले. विरुध्द पक्षाने बोअरवेल करण्यासाठी जागा निश्चित करुन दिली तसेच बोअरवेल साठी लागणारे चांगल्या प्रतीचे केसींग पाईप पुरविण्याचे कामही तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिले. केसींग पाईप हे 120/-रुपये प्रती फुट दराने व बोअरवेल खोदण्याचे कामासाठी 70/-रुपये प्रती फुट प्रमाणे काम देण्याचे ठरविले.
4. दिनांक 16/2/2012 ला विरुध्द पक्षाने बोअरवेल साठी 246 फुट खोदकाम केले व 210 फुटावर त्याला स्वच्छ पाणी लागले तसेच विरुध्द पक्षाने 270 फुट केसींग पाईप त्याच्या दुकानातून तक्रारकर्त्याच्या बोअरवेल करीता विकत घेतले.
5. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिनांक 16/2/2012 ला केसींग पाईप व बोअरवेल खोदण्याचे कामापोटी रुपये 46,860/- चे बील दिले.
6. तक्रारकर्त्याने ओम साई इलेक्ट्रीकल अॅड मशिनरी या दुकानातून सबमर्सिबल पंप व इतर साहित्य असे एकूण 19,410/- रुपये ओम साई इलेक्ट्रीकल अॅड मशिनरीचे प्रोप्रा भास्कर तिघारे यांचेकडून दिनांक 19/2/2012 च्या बिलापोटी दिले.
7. तक्रारकर्त्याची बोअरवेल 6 महिने व्यवस्थित चालल्यानंतर जुलै 2012 पासून बोअरवेलमधुन सतत Muddy Water येत असल्यामुळे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 4/8/2012 ला ओम साई इलेक्ट्रीकल अॅड मशिनरीचे प्रोप्रा भास्कर तिघारे यांच्याशी संपर्क साधला. भास्कर तिघारे यांनी पंप काढून गढूळ पाणी येण्याचे कारणाचा शोध घेतला असता त्यांना सबमर्सिबल पंपासोबत 2 केसींग पाईपचे तुकडे जे 22 इंच लांबीचे आहे ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आढळले.
8. दिनांक 12/8/2012 ला तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी केसींग पाईप कमी दर्जाचे असल्याने तुटल्यामुळे तक्रारकर्त्याच्या बोअरवेल ला सतत गढुळ पाणी येत असल्याचे सांगितले व बोअरवेल त्वरीत दुरुस्त करण्याची विनंती केली.
9. दिनांक 12/8/2012 ला विरुध्द पक्षाने बोअरवेलची खोली (depth) मोजली असता ती 247 फुट ऐवजी 210 फुट आढळली 37 फुट बोअरवेल ही ढासळलेली आढळली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना बोअरवेल दुरुस्त करुन नवीन पाईपची मागणी केली. तक्रारकर्त्याने दिनांक 9/9/2012 ला सुध्दा बोअरवेल दुरुस्त करण्याबद्दल विनंती केली परंतु विरुध्द पक्ष यांनी कुठलीच दाद दिली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिनांक 12/9/2012 ला बोअरवेल दुरुस्त करुन देण्याबाबत नोटीस पाठविली. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मागणी पुर्ण न केल्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीस कारण जुलै 2012 पासून उद्भवल्यापासून 2 वर्षाचे आंत सदरहू तक्रार कागदपत्रासहित दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने रुपये 65,810/- एवढी आर्थिक नुकसान भरपाई व्याजासह तसेच 20,000/- रुपये मानसिक त्रासासाठी व 10,000/- रुपये तक्रारीच्या खर्चापोटी देण्याची विनंती केली.
10. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षास दिनांक 29/10/2012 ला नोटीस काढण्यात आली.
11. विरुध्द पक्षाने जबाब दिनांक 24/12/2013 ला दाखल केला. विरुध्द पक्षाने जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले. विरुध्द पक्षाने आपले जबाबात असे म्हटले आहे की त्याचा व्यवसाय हा वॉटरपंप विकण्याचा व पाईप विकण्याचा असून तो बोअरवेलला लागणारे इतर साहित्य विकण्याचा व्यवसाय करतो. याकरीता विरुध्द पक्ष व भंडारा येथील इतर व्यावसायिक साऊथ इंडियन बोअरवेल कंत्राटदार यांच्याशी संपर्क साधून बोअरवेल खोदण्याचे काम करतात. तक्रारकर्त्याने कंत्राटदार राजा यांना बोअरवेल खोदण्याची जागा दाखविली परंतु राजा यांनी सदरहू जागा ही नाल्याजवळ असल्यामुळे ती बदलण्याचा सल्ला दिला किंवा सिमेंट क्रांक्रीट प्लॅटफॉर्म करण्याचा सल्ला दिला. कंत्राटदार राजा यांनी तक्रारकर्त्यास प्लॉस्टीक केसींग पाईप रार्घोते मशिनरी यांचेकडून विकत घेण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे राजा यांनी बोअरवेल 247 फुट घेतली व त्यांना कुठलाही कडक दगड लागला नसून त्यांनी केसींग पाईप रार्घोते मशिनरी यांच्या कडून विकत घेऊन बोअरवेल मध्ये लावले. संपुर्ण बोअरवेलचे काम हे राजा यांनी केले.
12. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून संपुर्ण कामाचे पैसे घेवून ते कंत्राटदार राजा यांना दिल्याचे जबाबातील पॅरा 8 मध्ये म्हटले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून बोअरिंगचे कुठलेही साहित्य विकत घेतले नाही, फक्त राजा यांचे मार्फत विरुध्द पक्ष यांनी रुपये 30,000/-पार्ट पेमेंट म्हणुन घेतल्यामुळे विरुध्द पक्ष यांना या तक्रारीमध्ये विनाकारण पार्टी बनविले आहे. विरुध्द पक्षाची सेवेमध्ये कुठलीही त्रृटी नसल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी असे जबाबात म्हटले आहे.
13. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विरुध्द पक्ष यांचे दिनांक 16/2/2012 चे बील पान नं.11 वर दाखल केले आहे. तसेच ओम साई इलेक्ट्रीकल अॅन्ड मशिनरी यांचे बील पान नं.12 वर, केसींग पाईपचे तुकडयांचे फोटो पान नं.13 वर, बोअरवेलचे घरासमोरील जागेचे फोटो पान नं.14 वर, दिनांक 12/8/2012 रोजी भास्कर तिघरे हे सबमर्सिबल पंप साफ करीत असतांनाचे फोटो पान नं. 15 वर, विरुध्द पक्षास नुकसान भरपाई देण्याबाबत पाठविलेले दिनांक 20/8/2012 चे पत्र पान नं.16 वर, बोअरवेलचे नुकसान झाल्याबद्दल नुकसान भरपाई मिळण्याबाबतचे दिनांक 12/9/2012 चे पत्र पान नं.18 वर, पत्र पोस्टाने पाठविलेल्या पावत्या पान नं.20 वर दाखल केल्या आहेत.
14. तक्रारकर्त्याचे वकील अॅड.हरडे यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाने बोअरवेल काढण्याचे व केसींग पाईप बोअरवेलला लावण्यासाठी रुपये 30,000/- घेतले होते व ते 30,000/-रुपयांची रक्कम मिळाल्याबाबतचे दिनांक 16/12/12 चे बील ज्यावर विरुध्द पक्ष यांची स्वाक्षरी आहे ते पान नं 11 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने सबमर्सिबल पंच व इतर साहित्य ओम साई इलेक्ट्रीकल अॅड मशिनरी या दुकानातून दिनांक 19/12/2012 ला घेतले व त्याचे मालक बी.बी.तिघारे यांनी याबद्दल जे बील दिले ते पान नं 12 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना बोअरवेल खोदण्याचे व पाईप खरेदीसाठी संपुर्ण पैसे दिले होते. विरुध्द पक्ष हे पाईप विक्री व बोअरवेल खोदण्याचे काम भंडारा येथे ब-याच वर्षांपासून करतात. विरुध्द पक्ष बोअरिंग खोदण्याचे काम साऊथ इंडियन कंत्राटदार राजा यांचे मार्फत त्यांचेशी परस्पर करार करुन करतात व संपुर्ण कामाची जबाबदारी विरुध्द पक्ष स्वतः घेवून त्याबाबत रक्कम स्विकारुन व त्यांचे दुकानातून बोअरिंग पाईप सुध्दा देतात. त्यामुळे बोअरवेल संबंधी उद्भवलेल्या सर्व नुकसान भरपाईसाठी विरुध्द पक्ष हे जबाबदार आहेत. विरुध्द पक्षाने जबाबामध्ये पॅरा 9 मध्ये कबुल केले आहे की त्याने 30,000/-रुपये बोअरिंग व पाईप सप्लॉय करण्यापोटी स्विकारले. विरुध्द पक्षाने खोदलेल्या बोअरिंगला 6 महिन्यानंतर सतत गढुळ पाणी आले व ते पिण्यायोग्य नसल्यामुळे व पुढे पाणी येणे बंद झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे बोअरवेल दुरुस्त करण्यासंबंधी विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने कुठलेही लक्ष दिले नाही. दिनांक 4/8/2012 ला तक्रारकर्त्याने ओम एजन्सीचे प्रोप्रा यांचेशी संपर्क साधून बोअरवेल संबंधी चौकशी करण्याचे सांगितले. तिघरे यांनी बोअरवेलची पाहणी करुन त्यांना सबमर्सिबल पंपाचे 2 तुटलेल्या पाईपचे तुकडे आढळले व केसींग पाईप हे कमी दर्जाचे असल्यामुळे त्यातुन येणारे पाणी हे गढुळ येत असल्याबद्दल तिघरे यांनी तक्रारकर्त्याच्या लक्षात आणून दिले. तिघरे यांनी सबमर्सिबल पंपाची पाहणी केली असता त्याच्या मध्ये कुठलाही दोष आढळला नव्हता. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे वारंवार विनंती करुन सुध्दा तक्रारकर्त्याला बोअरवेल दुरुस्त करुन दिली नाही. विरुध्द पक्ष यांनी वर्तमानपत्रात बोअरवेल खोदण्याबद्दल व बोअरवेलचे पाईप विक्री बद्दल त्यांचे दुकानाची जाहिरात दिली आहे ती सदरहू प्रकरणात दाखल केली आहे. विरुध्द पक्ष यांनी कमी दर्जाचे पाईप तक्रारकर्त्यास दिल्यासंबंधी व ते ISI दर्जाचे नसल्यामुळे प्रेशरमुळे तुटल्यामुळे तक्रारकर्त्यास नुकसान झाले, याकरीता तक्रारकर्त्याने तिघरे यांचे प्रतिज्ञापत्र तसेच आजुबाजुच्या रहिवाशांच्या तेवढयाच उंचीच्या बोअरवेलमधुन येणारे पाणी याबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या बोअरवेलला सतत गढुळ पाणी येत असल्यामुळे व विरुध्द पक्षाने पैसे घेवून सुध्दा तक्रारकर्त्यास सेवा न पुरविल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याने तिघरे यांचे प्रतिज्ञापत्र व इतर रहिवाशांचे प्रतिज्ञापत्रानुसार बोअरवेलच्या नुकसान भरपाईस विरुध्द पक्ष जबाबदार असल्याचे सिध्द् होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे, असा युक्तीवाद केला.
15. विरुध्द पक्षाचे वकील अॅड.सक्सेना यांनी युक्तीवाद केला की विरुध्द पक्ष यांनी बोअरवेल खोदण्याचे सदरहू काम हे साऊथ इंडियन कंत्राटदार राजा यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना सदरहू प्रकरणात पार्टी न केल्यामुळे प्रकरण खारीज करण्यात यावे असा युक्तीवाद केला. विरुध्द पक्ष यांचा कंत्राटदार राजा यांच्याशी कुठलाही करार नसून विरुध्द पक्ष हे राजा यांनी केलेल्या बोअरवेलच्या कामास जबाबदार नाहीत. विरुध्द पक्षांनी राजा तर्फे फक्त रक्कम स्विकारली परंतु बोअरवेल खोदयाचे व बोअरवेलसाठी लागणारे पाईप पुरविण्याचे काम राजा यांनी केल्यामुळे ते या नुकसान भरपाईसाठी जबाबदार आहेत व विरुध्द पक्ष कुठल्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्यास किंवा सेवेच्या त्रृटीसाठी जबाबदार नाहीत. विरुध्द पक्षाने दिनांक 2/4/2013 ला सावरबांधे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यांचे प्रतिज्ञापत्रानुसार तक्रारकर्त्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या नाल्यामुळे बोअरवेलला गढूळ पाणी येते तसेच बोअरवेलच्या आजुबाजुला सिमेंट क्रॉक्रीटचा ओटा तयार न केल्यामुळे बोअरवेलला वारंवार गढूळ पाणी येते तसेच आजुबाजुची माती खचल्यामुळे व पाईपवर काहीतरी अवजार पडल्यामुळे पाईप तुटले व केसींग पाईपची मोडतोड पंप काढतांना झाली असे प्रतिज्ञापत्रात नमुद केल्यामुळे विरुध्द पक्ष हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. तक्रारकर्त्याच्या बोअरवेलला सुरुवातीला 6 महिने स्वच्छ पाणी आले व त्यानंतर गढुळ पाणी आले, त्यामुळे बोअरवेल व पाईप मध्ये कुठलीही कमतरता नाही असा युक्तीवाद विरुध्द पक्ष यांचे वकिलांनी केला तसेच सदरहू तक्रारीमध्ये पाईपच्या Quality बद्दल कुठलाही Expert Evidence दाखल केला नाही. तसेच बोअरवेला गढुळ पाणी हे कुठल्या कारणामुळे आले याबद्दल तक्रारकर्त्याने पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
16. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, विरुध्द पक्ष यांचा जबाब तसेच कागदपत्रे व दोन्ही पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतात.
1. तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का? – होय
कारणमिमांसा
17. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिनांक 16/2/2012 ला 46,400/- रुपयांचे बील दिले. सदरहू बिलामध्ये विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला बोअरवेल खोदकामाचे 70 रुपये प्रती फुट प्रमाणे 246 फुटाचे 17,220/- रुपये व केसींग पाईपचे 120 रुपये प्रती फुटाप्रमाणे 247 फुटाचे 29,640/- रुपयांचे बील दिले. विरुध्द पक्षाने सदरहू बिलापोटी 30,000/- रुपये जमा करुन घेतल्याचे लिहीलेले आहे. विरुध्द पक्षाने त्यांचे जबाबामध्ये परिच्छेद 9 मध्ये 30,000/- रुपये हे दिनांक 16/2/2012 च्या बिलापोटी दिले आहे हे म्हणणे कबुल केले आहे. तसेच दिनांक 24/9/2012 ला अॅड.सक्सेना यांच्यातर्फे पाठविलेल्या जबाबातही विरुध्द पक्षाने 30,000/-रुपये बिलापोटी मिळाले हे कबुल केले आहे.
18. तक्रारकर्त्याने बोअरवेलला गढुळ पाणी येते याबद्दल वारंवार तोंडी व लेखी तक्रार विरुध्द पक्ष यांचेकडे दिनांक 20/8/2012 व 12/9/2012 ला रजिस्टर पोस्टाने पाठविली होती त्याची प्रत पान नं.16 व 18 वर दाखल केली असून ती विरुध्द पक्षास मिळाल्याबद्दल Postal Acknowledgement Receipt पान नं. 20 वर दाखल केली आहे व त्यावर विरुध्द पक्ष यांची सही आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी मराठी दैनिक ‘लोकजन’ या वर्तमानपत्रामध्ये गायत्री बोअरवेल एजन्सीज अॅड मशिनरी यांचेकडून पंप व पाईप विक्री व दुरुस्तीचे काम केले जाईल अशी जाहिरात विरुध्द पक्ष यांचे नांवाने मोबाईल नंबरसह दिलेली आहे. यावरुन सिध्द् होते की ते बोअरवेल खोदण्याचे काम करतात व बोअरवेलसाठी लागणारे साहित्य तसेच पाईप विक्रीचे काम करतात. विरुध्द पक्षाने बिलामध्ये तसेच जबाबामध्ये कबुल केले आहे की त्यांना 30,000/- रुपये बोअरवेलच्या कामासाठी घेतले आहे, त्यावरुन विरुध्द पक्षास तक्रारकर्त्याकडून बोअरवेलच्या कामासाठी व त्यासाठी लागणारे पाईप पुरविण्यासाठी पैसे मिळाले हे सिध्द् होते. परंतु बिलापोटी उर्वरित रक्कम तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास केव्हा व कधी दिली या बद्दल कुठलाही पुरावा तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही. तक्रारकर्ता सदरहू तक्रारीमध्ये विरुध्द पक्षाला रुपये 30,000/- एवढी रक्कम दिली, हेच सिध्द करु शकलेला आहे.
19. तक्रारकर्त्याने सबमर्सिबल पंप व त्याला लागणारे साहित्य ओम साई इलेक्ट्रीकल्स अॅन्ड मशिनरी या दुकानातून त्याचे प्रोप्रा भास्कर तिघारे यांच्याकडून विकत घेतले हे दिनांक 19/12/2012 च्या बिलावरुन सिध्द् होते.
20. विरुध्द पक्षाच्या वकिलांनी युक्तीवाद केला की विरुध्द पक्षाने 30,000/- रुपये हे कंत्राटदार राजा यांच्यातर्फे बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी स्विकारले. या म्हणण्याकरीता विरुध्द पक्षाने कुठलाही पुरावा सदरहू प्रकरणात दाखल केला नाही. विरुध्द पक्ष व कंत्राटदार राजा यांच्यामधील Privaty of Contract या बद्दल कुठलाही करारनामा हा सदरहू प्रकरणात दाखल केला नाही किंवा तसा पुरावा सदरहू प्रकरणात विरुध्द पक्षाने आणलेला नाही. विरुध्द पक्षाच्या वकिलांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने कंत्राटदार राजा यांना Necessary Party असल्यामुळे सदरहू प्रकरणात प्रतिवादी बनविणे जरुरी होते. परंतु तक्रारकर्ता व कंत्राटदार राजा या दोघांचा कुठलाही Direct agreement किंवा Contract नसल्यामुळे व दोघांमध्ये कुठलीही आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने राजा याला या प्रकरणात Necessary Party म्हणुन जोडण्याची आवश्यकता नाही, तक्रारकर्त्याच्या या युक्तीवादाला सहमत आहे. या उलट विरुध्द पक्षाने मंचासमोर अर्ज करुन कंत्राटदार राजा यांना प्रतिवादी करण्याचा अधिकार होता व Privaty of Contract सिध्द करण्याची संधी सुध्दा होती. विरुध्द पक्ष यांनी कंत्राटदार राजा यांना प्रतिवादी बनविले असते तर ते त्यांच्यातील Privaty of Contract सिध्द करु शकते असते. विरुध्द पक्ष हे कंत्राटदार राजा व तक्रारकर्ते यांच्यामध्ये बोअरवेल खोदण्याचा व पाईप पुरविण्याचा Contract होता हे सिध्द करु शकले नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून बोअरवेल खोदणे व त्यासाठी लागणारे पाईपसाठी पैसे स्विकारणे म्हणजे या कृतीसाठी ते सर्वस्वी तक्रारकर्त्यास बोअरवेल संबंधी व पाईप संबंधी सेवा देण्यास बंधनकारक आहेत.
21. तक्रारकर्ता याने विरुध्द पक्षास वारंवार बोअरवेल दुरुस्त करण्याबद्दल व पाईप नवीन बदलून देण्याबद्दल केलेली विनंती यांनी न मान्य करणे ही निश्चितच सेवेतील त्रृटी आहे.
22. तक्रारकर्त्याने त्याच्या शेजारील रहिवाशी मोतीराम आखरे यांचे शपथपत्राद्वारे पुरावा दाखल केला आहे. त्या शपथपत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते तक्रारकर्त्याच्या घराच्या बाजुला राहतात व त्यांचेकडे सुध्दा बोअरवेल असून तिला व्यवस्थित स्वच्छ पाणी येते व ती चांगल्या स्थितीत आहे. सदरहू बोअरवेलला एक वर्षापुर्वीच खोदण्यात आले होते तसेच तक्रारकर्त्याच्या घराचे बाजुला लागून मोठा नाला नसून नगरपरिषदेची छोटी नाली आहे. तसेच तक्रारकर्त्याचे शेजारी राहणारे मुन्नालाल मोटघरे यांनी पुरावा शपथपत्राद्वारे दिनांक 4/5/2013 ला दाखल केला आहे. त्यांचे पुराव्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांच्याकडे 5 वर्षापासून बोअरवेल असून तिला भरपुर शुध्द चांगले पाणी येते. या दोन्ही पुराव्यावरुन सिध्द् होते की तक्रारकर्ते ज्या ठिकाणी राहतात त्या भागामध्ये जमीनीखाली पाणी भरपुर प्रमाणात असून ते चांगल्या प्रतीचे पाणी आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या कंपाऊन्डला लागून एक छोटया स्वरुपाची नाली असल्यामुळे त्या नालीमुळे बोअरवेलच्या पाण्याला कुठलीही इजा पोहोचत नाही. तसेच तक्रारकर्त्याच्या घराच्या बाजुला मोठा नाला आहे हे विरुध्द पक्षाचे म्हणणे चुकीचे असून व त्या नाल्यामुळे बोअरवेलला गढूळ पाणी येते हे म्हणणे संयुक्तिक नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घराच्या बाजुला नाला आहे हे सिध्द् करण्यासाठी नगर परिषदेकडून कुठलेही प्रमाणपत्र तसेच नकाशा सदरहू प्रकरणात दाखल केला नसल्यामुळे तक्रारकर्त्याच्या घराच्या कंपाऊन्डच्या बाजुला मोठा नाला आहे हे विरुध्द पक्षाचे म्हणणे सिध्द् होत नाही.
23. तक्रारकर्त्याने ओम साई इलेक्ट्रीकल्स अॅन्ड मशिनरी चे प्रोप्रा भास्कर तिघरे यांचा पुरावा शपथपत्राद्वारे दिनांक 27/9/2012 ला पान नं.21 वर दाखल केला आहे. भास्कर तिघरे हे इलेक्ट्रीकल मोटर, जेट मोटर, सबमर्सिबल मोटर ची विक्री व दुरुस्तीचे काम करतात असे त्यांनी दाखल केलेल्या दिनांक 19/12/2012 च्या बिलामध्ये नमुद केलेले आहे. भास्कर तिघरे यांनी त्यांच्या पुराव्यामध्ये असे म्हटले आहे की दिनांक 12/8/2012 ला तक्रारकर्त्याच्या घरी बोअरवेल पाहणी करीता बोलविले असता त्यांना केसींग पाईप फुटल्यामुळे व त्यामध्ये माती गेल्यामुळे बोअरवेल मध्ये गढुळ पाणी व रेती येत आहे. तसेच बोअरवेल व समबर्सिबल पंप काढून बघितले असता बोअरवेलमध्ये तुटलेल्या पाईपचे तुकडे आढळले व तुटलेल्या पाईपचे फोटोग्राफस त्यांनी त्यांचे समक्ष काढले ते पान नं.13 वर दाखल केले आहे तसेच त्यांनी बोअरवेलची खोली मोजली असता त्यांना 247 फुट ऐवजी 210 फुट एवढी बोअरवेलची खोली आढळली. तक्रारकर्त्याची बोअरवेल सतत खचत असल्यामुळे सबमर्सिबल पंपामध्ये माती व रेती गेल्यामुळे सबमर्सिबल पंप सुध्दा जमिनीच्या खाली अडकून गेल्यामुळे ते वारंवार काढले जावू शकत नाही व ते कोणत्याही परिस्थितीत उपयोगात आणले जावू शकत नाही. भास्कर तिघरे हे मागील ब-याच वर्षापासून बोअरवेल व त्याला लागणारे साहित्य या व्यवसायामध्ये काम करीत असल्यामुळे त्यांचा पुरावा हा Expert Evidence म्हणून ग्राहय धरल्या जावू शकतो. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास पुरविलेले पाईप हे ISI Quality व उच्च दर्जाचे नामांकित कंपनीचे असल्याबद्दल सदरहू प्रकरणात लेखी पुरावा विरुध्द पक्षाने दाखल न केल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या बोअरवेल साठी पुरविलेले केसींग पाईप हे Inferior Quality चे होते हे सिध्द् होते व विरुध्द पक्ष तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानीसाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षाने 30,000/- कंत्राटदार राजा तर्फे स्विकारले याबद्दल Rebuttal करण्यासाठी कुठलाही पुरावा दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार हे मंचासमोर Clean Hands आलेले नसून तक्रारकर्त्यास होणा-या नुकसान भरपाईसाठी गैरअर्जदार हे स्वतः जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून पैसे स्विकारुन सुध्दा चांगल्या प्रतीची बोअरवेल खोदून न देणे व चांगल्या प्रतीचे केसींग पाईप पुरविणे ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार न पाडल्यामुळे तसेच केसींग पाईप कमी दर्जाचे दिल्यामुळे त्याचे सबमर्सिबल पंप निकामी झाले व त्याला त्याबद्दल आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या सर्व नुकसान भरपाई करीता व तक्रारकर्त्यास झालेल्या मनस्तापाकरीता गैरअर्जदार हे व्यक्तीशः जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. करीता खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2. तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाने नुकसान भरपाई म्हणुन 30,000/- रुपये
द.शा.द.शे. 8 टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल झाल्यापासून म्हणजेच
दिनांक 29/10/2012 पासून ते संपुर्ण पैसे मिळेपर्यंत व्याजासह देण्यात यावे.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सबमर्सिबल पंप व त्याला लागणारे साहित्याच्या
नुकसान भरपाई बद्दल रुपये 19,410/- रुपये देण्यात यावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक त्रासासाठी रुपये 15,000/- रुपये
दयावे.
5. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- दयावे.
6. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
7. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.