(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 26/09/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.30.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तक्रारकर्ती ही सन 22.05.2002 ते 28.10.2009 पर्यंत गैरअर्जदारांकडे कर्मचारी म्हणून कार्यरत असतांना तिचे व मुलगी आणि तिचे गैरअर्जदार पत संस्थेत संयुक्त बचत खाते उघडले होते, त्याचा क्रमांक अनुक्रमे 455 व 702 असा होता.
3. तक्रारकर्तीने बचत खाते क्र.455 मध्ये दि.13.03.2010 अखेर रु.1,08,856/- तसेच बचत खाते क्र.702 मध्ये दि.17.03.2010 रोजी रु.11,433/- एवढी रक्कम जमा केली. तक्रारकर्तीची मोठी मुलगी मेंदूज्वराने आजारी पडल्याने, वैद्यकीय उपचापराकरीता पैशाची आवश्यकता असल्यामुळे तक्रारकर्ती सदर संस्थेत बचत खात्यातून पैसे काढण्याकरीता गेली असता तिला गैरअर्जदार संस्थेने रक्कम काढण्यांस मज्जाव केला व तिचा अपमान केला. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना सदर बचत खात्यातील जमा रक्कम व्याजासह देण्याविषयी नोटीस पाठवुनही गैरअर्जदारांनी त्याची दखल घेतली नाही अथवा तक्रारकर्तीची देय रक्कमही परत केली नाही.
4. गैरअर्जदारांनी खोटया आरोपाचे आधारे तक्रारकर्तीस संस्थेचे नोकरीतुन कमी केले. सदर आदेशाविरुध्द तक्रारकर्तीने कामगार न्यायालय, नागपूर येथे तक्रार दाखल केली असता गैरअर्जदार संस्थेने मासिक सभेत ठराव करुन तक्रारकर्तीस परत कामावर रुजु करुन घेतले. त्यानंतर तक्रारकर्तीने दि.28.10.2009 रोजी नोकरीचा राजीनामा दिला. या सर्व घडामोंडीचा बदला म्हणून गैरअर्जदार तक्रारकर्तीला सदर खात्यातून रक्कम काढण्यांस मज्जाव करीत आहे, ही गैरअर्जदारांची कृती अनुचित व्यापारी प्रथा आहे म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल करुन खात्यातील रक्कम 18% व्याजासह परत करावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.25,000/- मिळाण्याबाबत मागण्या केलेल्या आहेत.
5. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
6. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीने सदरचे बचत खाते उघडल्याचे तसेच तक्रारकर्ती सन 2002 पासुन गैरअर्जदार संस्थेत लिपीक या पदावर कार्यरत असल्याचे व दि.28.10.2009 रोजी तिने सदर पदाचा राजीनामा देऊन सेवा निवृत्ती घेतल्याचे तक्रारकर्तीचे म्हणणे मान्य केलेले आहे. परंतु गैरअर्जदारांनी इतर सर्व आरोप अमान्य केले आहे.
7. गैरअर्जदारांच्या कथनानुसार दि.29.06.2010 रोजी संस्थेच्या सभासदांची सभा होऊन त्यावर तक्रारकर्तीच्या कायदेशिररित्या दिलेल्या नोटीसबाबत चर्चा झाली त्यावर सर्व सभासदांचे एकमत होऊन संस्थेने असा ठराव केला की, संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अंतर्गत संस्थेमधे झालेल्या अपहाराची चौकशी उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांचेकडे सुपूर्द केली असुन त्यात भुतपुर्व कर्मचा-याबाबत सुध्दा शेरे असल्यामुळे जोपर्यंत कलम 83 व 88 ची चौकशी पुर्ण होऊन संस्थेत तिचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत तक्रारकर्ती व इतर भुतपूर्व कर्मचारी यांचे सर्व व्यवहार गोठवुन ठेवण्यांत यावे असे सर्वांनुमते ठरले व सदर ठराव सर्वांनुमते पारित झाला असल्यामुळे, तसेच कलम 83 व 88 ची कार्यवाही सुरु असल्यामुळे भुतपूर्व कर्मचारी यांचे व्यवहार गोठवुन ठेवले आहेत.
8. वास्तविक तक्रारकर्तीने तिचे पती व सासु यांचे संयुक्त नावाने गैरअर्जदार संस्थेमध्ये बचत खाते क्र.310 असुन त्या खात्यात बरीच रक्कम असुन सदर खाते तक्रारकर्तीची सासु विना रोकटोक वापरीत आहे. तसेच तक्रारकर्ती संयुक्त कुटूंबात राहत असल्यामुळे तिची कुठल्याही प्रकारची आर्थीक कुचंबना होत नाही.
9. संस्थेच्या आर्थीक व्यवहारात गडबड आढळुन आल्यामुळे चार्टर्ड अकाऊंटंटकडे ऑडीटरची नेमणुक करुन आर्थीक व्यवहारांचे ऑडीट संस्थेत सादर करण्यास सांगितले आहे. तसेच जोपर्यंत कलम 83 व 88 ची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत भुतपूर्व कर्मचा-यांची रक्कम काढू देणे कायद्याने उचित होणार नाही. सदरची चौकशी पूर्ण झाल्यावर व सर्व व्यवहारांबाबत पारदर्शकता आल्यावर मा. कोर्टाचा आदेश शिरसावंध मानण्यात येईल.
10. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 11 वर बचत खाते क्र.455 व 702 ची पुस्तिका, कायदेशिर नोटीस, स्थगनादेश अर्ज, रुजू रिपोर्ट, मेडिकल प्रमाणपत्र इत्यादींच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत.
11. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.14.09.2011 रोजी आली असता तक्रारकर्ती व गैरअर्जदारांचे वकील हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला, तक्रारकर्तीचा युक्तिवाद व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
12. तक्रारकर्तीचे शपथेवरील कथन तसेच दस्तावेज क्र.1 व 2 वर दाखल बचत पुस्तिकेचे अवलोकन करता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने गैरअर्जदार संस्थेत तिचे व मुलगी हिमगौरी आणि तक्रारकर्ती ह्यांचे नावाने संयुक्त बचत खाते उघडलेले होते त्याचा खाते क्र. अनुक्रमे 455 व 702 असा होता. त्यापैकी खाते क्र.455 या बचत खात्यात दि.13.03.2010 अखेर एकूण रु.1,08,856/- तसेच बचतखाते क्र.702 मधे दि.17.03.2010 अखेर रु.11,433/- जमा असल्याचे दिसुन येते. तसेच दस्तावेज क्र.6 वरुन असेही दिसुन येते की, तिला तिच्या मुलाच्या उपचाराकरीता पैशाची आवश्यकता असल्यामुळे सदर बचत खात्यातील रकमांची मागणी तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना केली होती.
13. गैरअर्जदारांच्या मते त्यांच्या संस्थेमधे झालेल्या अपहाराची चौकशी उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांचेकडे सुपूर्द केली आहे. कलम 83 व 88 ची चौकशी पुर्ण होऊन रिपोर्ट सादर होत नाही तोपर्यंत तक्रारकर्ती व कर्मचा-यांचे व्यवहार गोठवुन ठेवण्यांत आले व तसा ठराव सर्वांनुमते पारित करण्यांत आला. त्यामुळे सदरची चौकशी पुर्ण होऊन आर्थीक व्यवहाराबाबत स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत तक्रारकर्तीची बचत खात्यातील रकमेच्या मागणीचा विचार करता येणार नाही.
14. परंतु तक्रारकर्तीने दस्तावेज क्र. 109 वरील कलम 83 चा अहवाल व दस्तावेज क्र. 144 वर सादर केलेल्या कलम 88 च्या चौकशीच्या आदेशाचे निरीक्षण करता असे दिसुन येते की, कलम 83 ची चौकशी ही गैरअर्जदार संस्थेचे आजी-माजी संचालक मंडळ सदस्यांचे विरुध्द असल्याचे दिसुन येते. कलम 88 ची चौकशी कार्यवाही ही कलम 83 च्या चौकशी अहवालावर आधारीत असुन ती गैरअर्जदार संस्थेचे आजी-माजी संचालक मंडळा विरुध्द आहे, त्यात तक्रारकर्तीचा संबंध दिसुन येत नाही. त्यामुळे कलम 83 व 88 चे चौकशीच्या कारणास्तव तक्रारकर्तीच्या बचत खात्यातील रकमा परत न करण्याचा अथवा रकमा गोठविण्याची गैरअर्जदारांची कृती निश्चितच अनुचित व्यापारी प्रथेत मोडते. तसेच तक्रारकर्तीने गैरअर्जदारां विरुध्द संबंधीत न्यायालयात केलेली तक्रार केली या कारणास्तव गैरअर्जदार संस्थेने हेतूपुरस्सर तिला कलम 83 व 88 चे चौकशीचे निराधार कारण पुढे करुन तिच्या बचत खात्यातील रक्कम काढण्यांस मज्जाव केला, ही गैरअर्जदारांची कृती सेवेतील कमतरता आहे. गैरअर्जदार यांच्या सदरच्या कृतीमुळे निश्चितच तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला. वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस तिच्या बचत खाते क्र.455 मध्ये जमा असलेली रक्कम रु.1,08,856/- तसेच बचत खाते क्र. 702 मध्ये जमा असलेली रक्कम रु.11,933/- तक्रारदारास परत करावी. सदर रकमेवर रक्कम अदा करेपर्यंत गैरअर्जदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज द्यावे.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे.