जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ८२/२०१२ तक्रार दाखल दिनांक – १८/०४/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १३/११/२०१४
मेसर्स जोगेश्वरी कंन्स्ट्रक्शन
प्रोपा-दिपक एकनाथ शेलार
वय ४०, धंदा – व्यापार
रा.काळखेडा, ता.जि. धुळे
आणि
रा.प्लॉट नं.२७, सर्व्हे नं.३३३/२-बी,
लक्ष्मीनगर, कॉटन मार्केटमागे, धुळे . तक्रारदार
विरुध्द
१) उज्वल ऑटोमोटीव्हज
अवधान, मुंबई आग्रारोड, धुळे
ता.जि. धुळे ४२४ ३११.
२) टाटा इंजिनिअरींग अॅण्ड लोकोमोटीव्ह क.लि.
२६ वा मजला, सेंटर नं.१,
वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफपरेड,
मुंबई ४०० ००५. .सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड. श्री.एल.पी. ठाकूर)
(सामनेवाला क्र.१ तर्फे – अॅड.श्री.एस.ए. पंडीत)
(सामनेवाला क्र.२ तर्फे – अॅड.श्री.एन.पी.आयचित)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते मेसर्स जोगेश्वरी कंन्स्ट्रक्शन या संस्थेचे चालक आहेत. त्यांचा बांधकाम साहित्य पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडे LPK2518 TC या ट्रकची मागणी नोंदविली होती. या ट्रकसाठी तक्रारदार यांनी बॅंक ऑफ इंडिया यांच्याकडे कर्जाची विनंती केली होती. दि.२८/०३/२०१२ रोजी बॅंकेने रूपये १८,५०,०००/- एवढ्या रकमेचे कर्ज मंजूर करून सामनेवाले क्र.१ यांना तसे पत्र दिले. तक्रारदार हे पत्र घेवून सामनेवाले क्र.१ यांच्याकडे गेले असता तुम्ही रूपये ५०,०००/- भरा आणि एक कोरा धनादेश द्या, तुम्हाला दोन दिवसात ट्रक देतो असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी रूपये ५०,०००/- भरले व ०८८४४८ या क्रमांकाचा कोरा धनादेश दिला. दि.३०/०३/२०१२ रोजी तक्रारदार यांनी रूपये २२,५०,०००/- एवढ्या किंमतीची पे ऑर्डर व पत्र सामनेवाले क्र.१ यांना दिले. दि.३१/०३/२०१२ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना इनव्हाईस क्रमांक UjwaAu-1112&02376, ट्रक टाटा टिप्पर LPK2518 चेसिस क्र.MAT448085CZB02702 इंजिन क्रमांक B5.91803121B63229836 असे बिल दिले व उद्या ट्रक घेवून जा असे सांगितले. मात्र त्यानंतरही सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना ट्रक दिला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. त्याची भरपाई सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून मिळावी, ट्रक ताब्यात मिळेपर्यंत सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून बॅंकेच्या हप्त्यापोटी दरमहा रूपये ५०,०००/- मिळावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रूपये ५,००,०००/- मिळावे, सामनेवाले यांना दिलेला कोरा धनादेश त्यांच्याडून परत मिळावा, अर्जाचा खर्च रूपये २५,०००/- मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दि.३०/०३/२०१२ रोजी पैसे भरल्याची पावती, बॅंक ऑफ इंडियाची पोहोच पावती, बॅंकेने कर्ज मंजूर केल्याचे पत्र, तक्रारदार यांनी दि.२८/०३/२०१२ रोजी पैसे भरल्याची पावती, तक्रारदार यांनी दि.१३/०२/२०१२ रोजी पैसे भरल्याची पावती, बॅंकेचे स्टेटमेंट, उज्वल ऑटोमोटीव्हज यांची पावती, टॅक्स इनव्हाईस आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र.१ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार कायदेशीर नाही. तक्रारीतील मजकूर खोटा आणि लबाडीचा आहे तो मान्य नाही. तक्रारीतील वाद ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत अभिप्रेत असलेल्या वाद या संज्ञेत मोडत नाही. ग्राहक संरक्षण कायद्यात नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार हे ग्राहक नसल्याने त्यांची तक्रार या मंचात दाखल होवू शकत नाही. तक्रारदार हे सदर वाहनाचा उपयोग व्यापारी प्रयोजनासाठी आणि नफा मिळविण्यासाठी करीत असल्याने त्यांना या मंचात दाद मागण्याचा अधिकार नाही. सामनेवाले क्र.१ हे खरेदीदाराच्या मागणीनुसार ट्रकची नोंदणी सामनेवाले क्र.२ यांच्याकडे करीत असतो. सामनेवाले क्र.२ यांनी ट्रक उपलब्ध करून दिल्यानंतरच तो खरेदीदार यांना देता येतो. सदर प्रकरणात ट्रक प्राप्त होताच सामनेवाले क्र.१ यांनी तो तक्रारदार यांना दिला आहे. त्यामुळे सेवेत त्रुटी केली हे म्हणणे खरे नाही. तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी सामनेवाले क्र.१ यांनी केली आहे.
५. सामनेवाले क्र.१ यांनी खुलाशासोबत सदर वाहन नोंदणीचे विवरण दाखल केले आहे.
६. सामनेवाले क्र.२ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथन मान्य नाही. तक्रारदार हे वस्तुस्थिती लपवित आहेत. त्यांना या मंचासमोर तक्रार दाखल करण्याचा अधिकार पोहचत नाही, कारण सदर वाहनाचा उपयोग ते व्यवसायिक प्रयोजनासाठी करत आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडे थेटपणे वाहनाची नोंदणी केलेली नव्हती. सामनेवाले क्र.१ यांच्याशी असलेले सामनेवाले क्र.२ यांचे नाते ‘प्रिन्सीपल टू प्रिन्सीपल’ अशा स्वरूपाचे आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रारीबाबत सामनेवाले क्र.२ हे कोणत्याही प्रकारे उत्तरदायी ठरत नाही. त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे.
७. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ यांचा खुलासा त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.२ यांचा खुलासा आणि तिन्ही पक्षांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कार्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
त्रुटी केली आहे काय ? नाही
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
८. मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून सामनेवाले क्र.२ यांनी उत्पादित केलेला ट्रक खरेदी करण्यासाठी पैसे भरले होते. सामनेवाले क्र.१ यांनी दि.३०/०३/२०१२ रोजी तक्रारदार यांच्याकडून रूपये २२,५०,०००/- एवढी रक्कम स्विकारल्याची पावती त्यांना दिली आहे. या पावतीचा क्रमांक UjwaAu-1112-02190 असा आहे. ही बाब तक्रारदार आणि सामनेवाले क्र.१ व २ यांनी नाकारलेली नाही. तक्रारदार यांनी सदरची पावती तक्रारीसोबत दाखल केली आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ यांचे ग्राहक होतात हे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्यामार्फत सामनेवाले क्र.२ यांनी उत्पादित केलेला ट्रक खरेदी केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ यांच्यासोबत सामनेवाले क्र.२ यांचेही ग्राहक ठरतात हे स्पष्ट होते. याच कारणामुळे आम्ही मुद्दा क्र. ‘अ’ चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सामनेवाले क्र.१ यांनी संपूर्ण रक्कम स्विकारल्यानंतरही कबूल केल्याप्रमाणे निर्धारीत वेळेत ट्रक ताब्यात दिला नाही अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दिनांक ३०/०३/२०१२ रोजी सामनेवाले क्र.१ यांनी रूपये २२,५०,०००/- स्विकारल्याबाबत दिलेली पावती, बॅंक ऑफ इंडियाने कर्ज मंजुरीबाबत दि.३०/०३/२०१२ रोजी दिलेले पत्र, बॅंक ऑफ इंडियाने दि.२८/०३/२०१२ रोजी दिलेले पत्र, सामनेवाले क्र.१ यांनी दि.२८/०३/२०१२ रोजी रूपये ५०,०००/- स्विकारल्याबाबत दिलेली पावती, दि.१३/०२/२०१२ रोजी रूपये १०,०००/- स्विकारल्याबाबत दिलेली पावती, बॅंकेचे स्टेटमेंट, सामनेवाले क्र.१ यांनी दि.०८/१२/२०१२ रोजी दिलेले सेल डेपोट, दि.३१/०३/२०१२ रोजीची टॅक्स इनव्हॉईस आदी कागदपत्रे दाखल केली आहेत.
दि.३०/०३/२०१२ रोजी सामनेवाले क्र.१ यांना रूपये २२,५०,०००/- ची पे ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी लगेच ट्रक ताब्यात देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन त्यांनी पाळले नाही आणि त्यामुळे तक्रारदार यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असे तक्रादार यांचे म्हणणे आहे.
सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांचा आरोप फेटाळून लावला असून तक्रारदार यांना कोणतेही खोटे आश्वासन दिले नव्हते असे म्हटले आहे. तक्रारदार यांनी ट्रकची संपूर्ण किंमत दि.३०/०३/२०१२ रोजी अदा केली आणि त्यानंतर ट्रक उपलब्ध होताच म्हणजे दि.२३/०४/२०१२ रोजी तो त्यांच्या ताब्यात देण्यात आला असे सामनेवाले क्र.१ यांनी म्हटले आहे.
सामनेवाले क्र.१ यांनी खुलाशासोबत सदर ट्रकची परिवहन विभागाकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र (विवरण) दाखल केले आहे. त्यात ट्रक मालकाचे नाव दीपक एकनाथ शेलार, नोंदणी दि.०२/०५/२०१२, वाहनाचा प्रकार टिप्पर इंजिन क्रमांक B591803121B63229836 असा असून चेसिस क्रमांक MAT448085C2B02702 असा दर्शविण्यात आला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दि.३१/०३/२०१२ रोजीच्या टॅक्स इनव्हॉईसवर वरील क्रमांक नमूद आहे.
तक्रारदार यांच्या विद्वान वकिलांचे युक्तिवादात असे म्हणणे होते की, सामनेवाले क्र.१ यांनी दि.३१/०३/२०१२ रोजी आपल्याला सदरची टॅक्स इनव्हॉईस दिली. त्यावर ट्रकचे वरीलप्रमाणे चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक टाकलेले होते. म्हणजेच दि.३१/०३/२०१२ रोजी सामनेवाले क्र.१ यांच्या ताब्यात ट्रक येवूनही तो त्यांनी जाणूनबुजून आपल्याला विलंबाने दिला. यामुळे आपले व्यवसायाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सामनेवाले क्र.१ यांच्या विद्वान वकिलांनी त्यावर खुलासा करतांना म्हटले की, तक्रारदार यांच्याकडून ट्रकची मागणी आल्यानंतर सामनेवाले क्र.२ यांच्या बिहार येथील कारखान्याकडे ती मागणी पाठविण्यात आली, मात्र तेथून ट्रक उपलब्ध होवू शकत नाही असे कळाल्यानंतर लगेच कर्नाटक येथील कारखान्याकडे मागणी पाठविण्यात आली. कर्नाटक येथील कारखान्याकडून दि.२२/१२/२०१२ रोजी ट्रक उपलब्ध झाल्यानंतर लगेच म्हणजे दि.२३/०४/२०१२ रोजी तो तक्रारदार यांच्या ताब्यात देण्यात आला. यात सामनेवाले क्र.१ यांनी जाणूनबुजून विलंब केलेला नाही.
तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत आणि दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये ट्रक त्यांच्या ताब्यात मिळाला असल्याचा उल्लेख केलेला नाही. तक्रारदार यांनी तक्रारीतील विनंती ‘अ’ मध्ये वरील वर्णनाचा ट्रक सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून प्रत्यक्ष ताब्यात मिळावा अशी मागणी केली आहे. तर सामनेवाले क्र.१ व २ यांनी वरील वर्णनाचा ट्रक तक्रारदार यांना प्रत्यक्षात ताब्यात देण्यात आले असल्याचे म्हटले आहे. सामनेवाले क्र.१ यांनी सदर ट्रकची प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रारदार यांच्या नावे दि.०२/१२/२०१२ नोंदणी झाल्याचे विवरणपत्र दाखल केले आहे.
वरील मुद्यांचा विचार करता सदरचा ट्रक तक्रारदार यांच्या ताब्यात मिळाला असून त्याची त्यांच्या नावे दि.०२/०५/२०१२ रोजी नोंदणी झाल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत सदरचा ट्रक त्यांना ताब्यात मिळाला नसल्याचे म्हटले असले तरी त्याच्या पुष्ट्यर्थ कोणताही पुरावा समोर आणलेला नाही. सामनेवाले क्र.१ यांच्याकडून सदरचा ट्रक मिळण्यास जाणीवपूर्वक विलंब झाला असे तक्रारदार यांनी म्हटले आहे. तथापि, त्याच्या पुष्ट्यर्थही त्यांनी कोणताही पुरावा समोर आणलेला नाही. याच कारणामुळे सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रुटी केली हे तक्रारदार सिध्द करू शकलेले नाहीत असे आमचे मत बनले आहे. यामुळे आम्ही मुद्दा क्रमांक ‘ब’ चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील मुद्यांवरून सामनेवाले क्र.१ व २ यांनी सेवा देण्यात त्रुटी केली हे तक्रारदार सिध्द करून शकलेले नाही असे स्पष्ट होते. सामनेवाले क्र.२ यांच्या विद्वान वकिलांनी युक्तिवादावेळी मा. राष्ट्रीय आयोगाचे व मा.सर्वोच्च नयायालयाचे काही दाखले सादर केले. त्यात
१. २०१२ (२) सीपीआर-३०१ (एनसी-सिंघल फिनस्टॉक विरूध्द जयपी इन्फ्राटेक)
२. २०१२ (४) सीपीआर-२९८ (एनसी-सावी गुप्ता विरूध्द ओमॅक्स अॅझोरिम)
३. २००९ एनसीजे-७२० (एनसी-मारूती उद्योग विरूध्द नागेंद्र प्रसाद)
४. २०१२ (४) सीपीआर-२२४ (एनसी-अदविक इंडस्ट्रीज विरूध्द उपल हौसिंग)
५. लक्ष्मी इंजिनिअरींग विरूध्द पी.एस.जी. इंडस्ट्रीयल इन्स्टीटयूट
६. भारती क्निटींग कंपनी विरूध्द डीएचएल वर्ल्ड वाईड
७. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन विरूध्द कन्झुमर प्रोटेक्शन काऊन्सील
आदी दाखल्यांचा समावेश आहे. या दाखल्यांमधील वस्तुस्थिती आणि घटनाक्रम भिन्न असल्यामुळे सदरच्या तक्रारीत ते लागू पडत नाहीत आणि त्यांचा संदर्भ घेणे योग्य होणार नाही असे आमचे मत आहे.
वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांची तक्रार मंजूर करणे योग्य होणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबात कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.