(मंचाचा निर्णय : श्रीमती. मंजुश्री खनके - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 22/06/2016)
तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे...
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुतची तक्रार ही विरुध्द पक्षांनी अवलंबीलेल्या अनुचित व्यापार प्रथा व सेवेतील त्रुटी यासाठी दाखल केलेली असुन विरुध्द पक्षाच्या चुकीच्या पध्दतीने धनादेश वटविल्या न गेल्यामुळे दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ता पुढे नमुद करतो की, तक्रारकर्ता हा अधिवक्ता असुन त्याचे विरुध्द पक्षाच्या बँकेत बचत खाते क्र.19208110003237 आणि मुदत ठेव खाते आहे. तक्रारकर्त्याने धनादेश क्र. 223105 दि.11.01.2014 रोजी साई ऍग्रो इंजिनिअर्स, अकोला यांच्या नावाने दिला होता, ह्या धनादेशासोबत धनादेश क्र.223101 ते 223120 एवढे धनादेश वटविण्यांस टाकलेले होते. ते सर्व धनादेश वटविल्या गेले परंतु सदर प्रकरणातील वादातीत धनादेश क्र.223105 हा न वटवता तक्रारकर्त्याची अपूर्ण सही असल्या कारणाने परत करण्यांत आला. सदर धनादेश हा तक्रारकर्त्याने दि.11.01.2014 रोजी दिलेला असुन तो धनादंश घेणा-यांनी दि.22.03.2014 रोजी अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. येथे वटविण्याकरीता टाकला परंतु त्या दिवशी तो न वटविता तो परत आला. त्यानंतर तक्रारकर्त्याच्या खात्यातुन वापसीचे चार्जेस लावण्यात आले.
3. तक्रारकर्ता यापुढे असे नमुद करतो की, तो धनादेश परत आल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे चौकशी केली असता इंटरनेट पेजवरुन असे आढळून आले की, त्याच्या खात्याला स्पेसिमन सिग्नीचर नाही, तो कॉलम रिकामा आहे. परंतु तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, स्पेसिमन सिग्नीचर कार्ड हे विरुध्द पक्षाकडे उपलब्ध होते आणि त्या आधीचे चार धनादेश व्ययस्थीतपणे वटविल्या गेले होते. परंतु सदरचा धनादेशाबाबत विरुध्द पक्षाच्या निष्काळजीपणामुळे आणि तक्रारकर्त्याची सिग्नीचर न पाहिल्यामुळे त्यांने स्पेसिमन सिग्नीचर वेगळी असल्याचे नमुद केले. आणि हिच विरुध्द पक्षांच्या सेवेतील न्युनता आणि अवलंबीलेली अनुचित व्यापार प्रथा असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दि.24.05.2014 रोजी नोटीस पाठविला. त्याचे उत्तर विरुध्द पक्षांनी दि.02.06.2014 रोजी पाठविले आणि त्यात विरुध्द पक्षांच्या वकीलांनी त्यांचा निष्काळजीपणा मान्य केल्याचे नमुद केलेले आहे आणि ही बाब गंभीर स्वरुपाची असल्यामुळे मंचासमोर सदरची तक्रार दाखल करण्यांत आलेली आहे.
4. मंचात तक्रार दाखल करुन आणि सदर धनादेशाची रक्कम तसेच मानसिक, शारीरिक त्रासासाठी भरपाई आणि तक्रारीचा खर्च इत्यादींचा खर्च मिळून रु.18,000/- ची मागणी केलेली आहे.
5. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत धनादेश वटविल्या न गेल्याबाबतची पावती, नोटीस, नोटीसचे उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. मंचात तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्षांना नोटीस पाठविण्यांत आला असता ते हजर झाले असुन त्यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले. विरुध्द पक्षांनी आपल्या लेखीउत्तरात तक्रारकर्त्याचे तक्रारीतील संपूर्ण कथन परिच्छेदासह अमान्य केलेले आहे. परंतु हे म्हणणे मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याचे उपरोक्त क्रमांकाचे खाते विरुध्द पक्षांच्या बँकेत आहे. तसेच उपरोक्त क्रमांकाचे सर्व धनादेश वटविण्यांस टाकलेले होते, तसेच हे मान्य केले आहे की, धनादेश क्र.223105 हा न वटविता तक्रारकर्त्याच्या अपूर्ण सही असल्याचे नोंदीसह परत आलेला होता. तसेच हेही मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याची स्पेसिमन सिग्नीचर ही विरुध्द पक्षांच्या बँकेत उपलब्ध होती परंतु इलेक्ट्रॉनिक्स् पध्दतीने तपासल्या जात असल्याने ही मशिनरीची चुक असल्याने तसे कारण देण्यांत आले होते. आणि पुढे असेही नमुद करण्यांत आले आहे की, धनादेश वापसी करण्याचे पैसे विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेले नाही त्यामुळे विरुध्द पक्षांच्या सेवेत त्रुटी नसुन कुठलाही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दाखल केलेली सदरची तक्रार ही विरुध्द पक्षास त्रास देण्यासाठी दाखल केलेली आहे. तसेच पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्ते हे बँकेत याआधी नोकरी करीत होते, त्यामुळे त्यांना बँकेच्या सर्व व्यवहारांची माहिती आहे. तसेच तक्रारकर्त्यास नेहमीच बँकेविरुध्द केसेस दाखल करण्याची सवय आहे, या आधी सुध्दा तक्रारकर्त्याने ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केलेली होती परंतु ती मंचामार्फत खारिज करण्यांत आली होती. तसेच विरुध्द पक्षांनी कुठलीही अनुचित व्यापार प्रथा किंवा सेवेत त्रुटी न केल्यामुळे तसे उत्तर देखिल तक्रारकर्त्यास पाठविण्यांत आले होते. तरीही तक्रारकर्त्याने तथ्यहीन तक्रार दाखल केलेली असल्यामुळे ती खारिज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
7. उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्षाप्रत खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1. विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी आणि अनुचित व्यापार प्रथेचा
अवलंब केला आहे काय ? होय.
2. तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? होय.
3. आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
// कारणमिमांसा // -
8. मुद्दा क्र.1 व 2 बाबतः- अभिलेखावर दाखल असलेली तक्रार व विरुध्द पक्ष यांचे कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच तक्रारकर्ता व विरुध्द पक्षांचा युक्तिवाद ऐकला असता असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीतील म्हणणे खरे असल्याबाबत प्रस्तुत वादातीत धनादेशाची प्रत क्र.223105 दाखल आहे. तसेच अकोला अर्बन बँकेने धनादेश परताव्याचे मेमोसह धनादेश परताव्याचे दिलेले पत्र दाखल केले आहे. यावरुन सदर धनादेश हा तक्रारकर्त्याची सही अपूर्ण असल्याचे कारणावरुन परत आल्याचे दिसुन येते. परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेला नोटीस व त्यावरील विरुध्द पक्षाने दिलेल्या उत्तरातील मजकूरावरुन विरुध्द पक्षाने झालेली चूक मान्य केली असुन ती इलेक्ट्रॉनिक्स पध्दतीने सह्यांची तपासणी होत असल्यामुळे झालेली चुक असल्याचे मान्य केले आहे. तसेच त्याबद्दल तक्रारकर्त्याकडून धनादेश परताव्याकरीता कुठलीही रक्कम घेतली नसल्याचे मान्य केले आहे. परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीतील म्हणण्याप्रमाणे सही अपूर्ण असलेल्या कारणाने सदरचा धनादेश हा परत आलेला होता हे म्हणणे खरे नसल्याचे दिसुन येते. अभिलेखावर विरुध्द पक्षाने आपल्या लेखी युक्तिवादासोबत सदरचा वादातीत धनादेश दाखल केला आहे. त्यावर विरुध्द पक्ष बँकेचे नाव व तारीख स्पष्ट दिसुन येते. तसेच तक्रारकर्त्यांची पूर्ण व स्पष्ट सही दिसुन येत आहे, परंतु परताव्याच्या मेमो मधील अपूर्ण सही असल्याचे जे विरुध्द पक्षाने आपल्या लेखीउत्तरात म्हणणे दाखल केलेले आहे त्याचा कागदोपत्री पुरावा विरुध्द पक्ष मंचासमोर दाखल करुन शकले नाही. हे विरुध्द पक्षाच्या लेखी व तोंडी युक्तिवादाचे वेळी स्पष्ट झालेले आहे. अभिलेखावरील धनादेशाच्या प्रतीचे सुक्ष्म अवलोकन केले असता तक्रारकर्त्याची सही पूर्ण व स्पष्ट असल्याचे दिसुन येते. त्यामुळे विरुध्द पक्षाची चुक ही गंभीर स्वरुपाच असुन त्यामुळे धनादेश न वटविता परत आल्याने रक्कम देणा-यास व घेणा-यास दोन्ही व्यक्तिंना त्रास झालेला आहे. तसेच वेळही वाया गेलेला आहे, त्यामुळे विरुध्द पक्षाची ही चुक अनुचित व्यापार प्रथा व सेवेतील त्रुटी या अंतर्गत असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 नुसार तक्रारकर्ता हा नक्कीच मागणी प्रमाणे अंशतः स्वरुपात दाद मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. तक्रारकर्त्याने धनादेशाची रक्कम रु.8,000/- ही विरुध्द पक्षाकडून मिळण्यांत यावी अशी मागणी केलेली आहे, परंतु धनादेश क्र. 223105 हा न वटविता परत आल्याने तक्रारकर्त्यास त्या रकमेचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे सदरची रक्कम परत मिळण्यांत यावी ही मागणी पूर्ण करता येत नाही. परंतु विरुध्द पक्षाच्या या चुकांमुळे तक्रारकर्त्यास नक्कीच मानसिक, शारीरिक त्रास झालेला आहे, करीता त्या त्रासाची भरपाई मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मंच तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक त्रासाच्या भरपाई दाखल रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा असा आदेश पारित करीत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक त्रासाच्या भरपाई दाखल रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा.
3. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
4. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.