निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष यांनी पारीत केले
नि का ल प त्र
पारित दि.11/3/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स. का.1986’) च्या कलम 12 नुसार प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांचे सामनेवाल्यांकडे बचत खाते क्र.339010000068 आहे. दि.26/8/2013 रोजी ते आपले पासबुक भरण्यासाठी गेले असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, दि.1/7/2013 रोजी त्यांच्या खात्यावरुन धनादेशावर खोटी सही करुन रु.78,000/- काढण्यात आलेले आहेत. त्यांनी त्याबाबत सामनेवाल्यांकडे तक्रार केली. दि.15/9/2013 रोजी सामनेवाल्यांनी त्यांना कळविले की, रोहन मोरे नावाच्या व्यक्तीने तो रिलायन्स कंपनीचा एजंट आहे, असे खोटे सांगत रु.74/- इतक्या रकमेत सेट टॉप बॉक्सची विक्री करतो, असे सांगून धनादेश घेवून व तो घेतांना त्या खालील कोरा धनादेश काढून घेत, अनेक ग्राहकांची पैसे काढून फसवणूक केलेली आहे. मात्र त्यांनी रोहन मोरे नावाच्या कोणत्याही व्यक्तीला तसा धनादेश दिलेला नसतांना सामनेवाल्यांनी त्यांची जबाबदारी टाळण्यासाठी वरील सबब सांगितलेली आहे. त्यांनी सामनेवाल्यांकडे धनादेश क्र.812219 वरील पुढील व मागील बाजुस केलेल्या स्वाक्षरीची प्रत मिळवली असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, ते चेकवर करतात ती सही व ज्या धनादेशाद्वारे पैसे काढण्यात आले ती खोटी सही, यामध्ये कोणतेही साधर्म्य नसतांना सामनेवाल्यांनी पैसे अदा केलेले आहेत. कोणतीही पडताळणी न करता अशा प्रकारे पैसे अदा करणे ही सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे काढण्यात आलेली रक्कम रु.78,000/- व्याजासह मिळावी. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- सह मिळावेत, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.5 लगत खाते उतारा, सामनेवाल्यांना दिलेले पत्र, सरकार वाडा पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार, बँकींग अॅम्ब्युडसमन यांनी दिलेले उत्तर, वटविण्यात आलेल्या चेकची झेरॉक्स, चेकबुक रिक्वीझीशन फॉर्म व त्यावरील नमुना हस्ताक्षर इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला यांनी जबाब नि.10 दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांनी तक्रारदांचे म्हणणे नाकारले. त्यांच्या मते, तक्रारदारांनी सेट टॉप बॉक्स खरेदी केल्याबाबत रोहन मोरे या व्यक्तीस रु.74/- चा धनादेश दिला ही बाब तक्रारदारांनी कबूल केलेली आहे. ती तक्रारदारांची व्यक्तीगत घटना आहे. त्यांनी वादातील धनादेश नियम व कायद्याप्रमाणे वटविलेला आहे. त्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. सामनेवाल्यांनी त्यांच्या बचावा पुष्ठयर्थ नि.12 लगत तोतया लोकांकडून ग्राहकांची झालेल्या फसवणुकीच्या बातम्या असणा-या वृत्तपत्रांची 5 कात्रणे दाखल केलेली आहेत.
6. तक्रारदारांचे वकील अॅड.देशपांडे यांचा लेखी युक्तीवाद ऐकण्यात व विचारात घेण्यात आला. सामनेवाल्यांनी संधी देवूनही युक्तीवाद केलेला नाही. त्यामुळे आज रोजी आम्ही प्रस्तूत केस न्यायनिर्णयासाठी घेत आहोत.
7. निष्कर्षासाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाल्यांनी तक्रादारांना सेवा देतांना
कमतरता केली काय ? होय.
2. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्र.1 बाबतः
8. तक्रारदारांनी रोहन मोरे नावाच्या व्यक्तीला सेट टॉप बॉक्स खरेदी करण्यासाठी रु.74/- चा धनादेश दिला व तो धनादेश (विवादीत धनादेश) आपण कायद्यानुसार वटविलेला आहे. सदर बाब सेवेतील कमतरता ठरत नाही, असा बचाव सामनेवाल्यांनी त्यांचा जबाब नि.10 मध्ये घेतलेला आहे. याउलट तक्रारदारांनी सामनेवाल्यानी वटविण्यात आलेल्या विवादीत धनादेशाची प्रत प्राप्त करुन ती दस्तऐवज यादी नि.5/5 ला दाखल केलेली आहे. त्याच बरोबर तक्रारदारांनी चेकबुक घेतांना जो रिक्विझीशन फॉर्म भरुन दिला जातो त्याची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. विवादीत धनादेशावर करण्यात आलेली खोटी सही व रिक्विझीशन फॉर्मवरील तक्रारदारांची मुळ सही, याचे साध्या डोळयांनी जरी निरीक्षण केले तरी त्या दोन सहयांमधील तफावत सहजगत्या लक्षात येत असतांना देखील सामनेवाल्यांनी विवादीत धनादेश वटवून पैसे अदा केलेले आहेत. सदर बाब सेवेतील कमतरता आहे, असा तक्रारदारांचा युक्तीवाद आहे.
9. आम्ही तक्रारदारांच्या वरील युक्तीवादाशी सहमत आहोत. त्याचे प्रमुख कारण असे की, तक्रारदारांची मुळ सही व विवादीत धनादेशावरील खोटी सही या सहजगत्या लक्षात येण्यासारख्या असतील त्यावेळी भारतीय पुराव्याचा कायदा 1872 च्या कलम 47 प्रमाणे हस्ताक्षर तज्ञाच्या अभिप्रायाची गरज उरत नाही. सामनेवाल्यांनी देखील त्यांच्या जबाबात तशी मागणी केलेली नाही. याचाच अर्थ 2 सहयांमधील फरक सामनेवाल्यांना देखील मान्य आहे. सामनेवाल्यांनी त्यांचा जबाब नि.10 सोबत धनादेशावरील खोटया सहयांमुळे अनेक जेष्ठ नागरीकांच्या खात्यांवरुन पैसे चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात, याबाबतची वृत्तपत्रीय कात्रणे दाखल केलेली आहेत. त्यावरुन सामनेवाल्यांनी धनादेश वटवितांना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे, ही बाब त्यांना ज्ञात होती व आहे हे लक्षात येते. तसे असतांनाही सामनेवाल्यांनी तक्रारदारांच्या धनादेशावरील खोटी सही बारकाईने न तपासता रु.78,000/- रोहन मोरे नावाच्या व्यक्तीला अदा करणे, ही बाब सेवेतील कमतरता आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
10. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाल्यांनी रोहन मोरे या व्यक्तीला चेक वरील सही व तक्रारदारांची मुळ सही बारकाईने पडताळणी न करता रक्कम अदा करुन, सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार ती रक्कम रु.78,000/- ती अदा केल्याचा दिनांक 1/7/2013 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतात. त्याचप्रमाणे झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु.7000/ व अर्ज खर्चापोटी रु.3000/ मिळण्यासही तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
- सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना रक्कम रु.78,000/- दि.01/07/2013 पासुन ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह अदा करावेत.
- सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.7000/- व अर्ज खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.
- निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात
नाशिक
दिनांकः11/03/2015