::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये,श्री.विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- ०७/१२/२०१५ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदार हा बल्लारपूर कॉलरी, ३/४ पिटस बल्लारपूर येथे कारकुनाच्या पदावर कार्यरत होता, त्यांचे नियमित पगार अर्जदाराचे युको बॅंक येथिल खात्यात जमा करण्यात येत होते. अर्जदाराला दोन मुली आहेत. अर्जदाराच्या दोन्ही मुलीच्या शिक्षणाकरीता गैरअर्जदाराच्या बॅंकेतून शिक्षण कर्ज सन २००७ व २००९ मध्ये रितसर काढण्यात आले होते. वरील व्यवहार अर्जदार हा वे.को.ली. नौकरीवर असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलींचा जमानतदार म्हणून ठेवण्यात आले व अर्जदाराच्या दोन्ही मुलींना कर्जदार म्हणून दाखविण्यात आले. अर्जदाराने दि. २३.०७.२००७ रोजी कु. सपना हिचे शिक्षणाकरीता रु. 2 लाख व कविता हिला दि. ०९.०९.२००९ रोजी गैरअर्जदाराच्या बॅकेकडून शिक्षणाकरीता २,०७,०००/- रु. कर्ज घेतले होते. अर्जदाराने त्याच्या स्वतःच्या कामाकरीता सुध्दा बॅंकेतून रक्कम रु. ६१,६७०/- रु. खाजगी कर्ज म्हणून घेतले होते. अर्जदार हा वि.को.ली. च्या नौकरीतून दि. ३१.१०.२०१३ रोजी सेवानिवृत झाले. अर्जदार सेवानिवृत्ती नंतर चेक क्रं. ७९८७९३ रु. १०,०००,०००/- चा ग्रॅच्युटी(उपदान) रक्कम म्हणून गैरअर्जदाराच्या बॅंकेत जमा झाली. गैरअर्जदाराने सदर रकमेतून अर्जदाराच्या पर्सनल लोन पैकी रक्कम रु. ६१,६६४/- व त्यांच्या मुलीच्या कर्ज रकमेपैकी रु. ३,३९,५७९/- आणि रु. २,४७,३४८/- बेकायदेशिररित्या अर्जदाराला माहीती न देता, अवैध व चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन अर्जदाराच्या खात्यातून वरील रक्कम कमी करुन गैरअर्जदार बॅंकेने स्वतःच्या खात्यात त्याच म्हणजे दि. १३.११.२०१३ रोजी जमा केले. गैरअर्जदाराने कर्ज रकमेची वसुली संबंधी कायदयातील तरतुदी व नियमांचे उल्लंघन करुन बळजबरीने अवैघरित्या वसुल करता येत नाही. गैरअर्जदाराने ज्या मार्गाने रक्कम वसूल करण्याचा अधिकार नसल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराचे शाखा अधिका-यांना समजविण्याचे पुष्कळ प्रयत्न केले व अधिकाराचे खात्यातून बेकायदेशिरपणे काढण्यात आलेली रक्कम त्याला परत देण्यात यावी अशी विनंती केली पण गैरअर्जदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून शेवटी अर्जदाराला त्यांचे वकीलामार्फत दि. १०.०१.२०१४ रोजी गैरअर्जदाराला नोटीस पाठवावे लागले. सदर नोटीस गैरअर्जदाराला दि. १३.०१.२०१४ रोजी प्राप्त झाले. गैरअर्जदाराने अर्जदाराला वकीलाने १५.०१.२०१४ रोजीचे पञान्वये कळविले कि, त्याने सदर नोटीस त्यांचे झोनल मॅनेजर नागपूर येथे पाठविलेले आहे. माञ त्यानंतर गैरअर्जदाराकडून किंवा गैरअर्जदाराचे झोनल कार्यालयातून कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराचे खात्यातून एकूण रक्कम रु. ६,४८,५९१/- अर्जदाराला कोणतीही पूर्व सुचना न देता अवैध व नियमाबाहय रित्या काढून घेतली. सदर बाब गैरअर्जदाराने अर्जदारापोटी अनुचित व्यवहार पध्दती दर्शविली असून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली आहे.
२ अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराचे खात्यातून काढून घेतलेली रक्कम रु. ६,४८,५९१/- रु. दि. १२.११.२०१३ पासून व्याजासह अर्जदाराचे खात्यात जमा करण्याचे आदेश दयावे. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. १४ वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने त्यांच्याविरुध्द तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबुल आहे. गैरअर्जदाराने विशेष कथनात असे नमुद केले आहे कि, अर्जदाराला सदर तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कायदेशिर कारण घडलेले नाही. अर्जदाराने त्याची मुलगी कु. सपना हिचे शिक्षणाकरीता शैक्षणिक कर्ज दि. २३.०७.२००७ रोजी रु.२ लाख व दुसरी मुलगी कु. रामास्वामी सुदाला हिचे करीता शैक्षणीक कर्ज दि. ०८.०९.२००९ रोजी रु. २,०७,०००/- गैरअर्जदार बॅंकेकडून कर्ज घेतले होते. अर्जदाराने स्वतः दि. ०४.०२.२०१० रोजी बॅंकेकडून रु. १,५०,०००/- कर्ज घेतले होते. उपरोक्त तिन्ही कर्जचे वेळेस अर्जदाराने व त्याचे मुलींनी बॅंकेला करारनामा करुन दिला होता. अर्जदाराने ऑगस्ट २०१३ नंतर शिक्षणाकरीता गैरअर्जदाराकडून घेतलेली रक्कम नियमित हप्ते भरणे बंद केले होते व अशा रितीने अर्जदार व त्यांची मुलगी डिफॉल्टर झाली. अर्जदाराने दि. ०६.०२.२०१० ला घेतलेले कर्जाचे हप्ते एप्रिल २०१३ पासून भरणे बंद केले व तो ही डिफॉल्टर ठरला. अर्जदाराने त्यांचे मुलीचे शिक्षणाकरीता घेतलेले कर्ज व स्वतः घेतले व्यक्तिगत कर्ज भरले नसल्याने त्यांचे कर्ज खाते एन. पी. ए. झालेले आहे. त्याबत गैरअर्जदाराने अर्जदाराला दि. १०.०१.२०१३ रोजी नोटीस पाठवून शिल्लक असलेल्या कर्जाच्या रकमेची मागणी केली. सदरहु नोटीस अर्जदाराला मिळाल्यानंतर त्याच दिवशी दि. १०.०१.२०१३ रोजी बॅंकेला पञ देवून नोटीसातील मजकुर मान्य करुन कर्जाची रक्कम भरण्याकरीता ०२ महिण्याची मुभा मागीतली होती. सदरहु कर्जाची रक्कम अर्जदाराकडुन वसूल होवू नये या उदेशाने बॅंक ऑफ बडोदा बल्लारपूर येथे नविन खाते उघडले व त्यात १०,००,०००/- रु. चा धनादेश जमा केला. सदर धनादेश गैरअर्जदार बॅंकेत बॅंक ऑफ बडोदा कडून दि.१२.११.२०१३ रोजी क्लीअरींग करीता आले होते परंतु सदरहु धनादेश गैरअर्जदार बॅंकेत अर्जदाराचे नाव असल्यामुळे गैरअर्जदार बॅंकेने सदरहु धनादेश क्लिअर न करता दि. १७.११.२०१३ रोजी मेमो सह बॅंक ऑफ बडोदा येथे परत पाठविले. सदरहु धनादेश गैरअर्जदार बॅंकेकडून क्लिअर न झाल्यामुळे अर्जदार हा १३.११.२०१३ रोजी गैरअर्जदार बॅंकेत येवून सदरहु धनादेश जमा करुन गैरअर्जदार बॅंकेती मॅनेजर यांना चूक झाल्याचे कबुल करुन त्यांना तोंडी सांगितले तिन्ही खात्यामधील रकमेचा हिशोब करुन थकीत रक्क्म सदरहु धनादेशामधून रकेमची कपात करुन उर्वरित रक्कम अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करावी त्यानुसार गैरअर्जदार बॅंकेने अर्जदाराच्या खात्यातून कर्जाची रक्कम रु. शिल्लक कर्जाची रक्क्म रु. ६,४८,५९१/- रु. अर्जदाराच्या खात्यातून कमी करुन गैरअर्जदार बॅंकेने स्वतःच्या खात्यामध्ये दि. १३.११.२०१३ रोजी अर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे जमा केले. गैरअर्जदार बॅंकेने कोणतीही अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना किंवा चुकीचा मार्गाव्दारे अर्जदाराच्या खात्यातून कर्जाची रक्कम कपात केलेली नाही. गैरअर्जदाराने कर्ज मंजूरीमधील अटी व शर्तीनुसार व अर्जदाराचे सांगण्यानुसार अर्जदाराकडून कायदेशिर कर्ज वसूली केली आहे व गैरअर्जदाराने त्याचे सेवेत कोणतीही न्युनतापूर्ण सेवा केलेली नाही. अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी केली आहे.
४. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
२) गैरअर्जदाराने अर्जदराप्रति न्युनतम सेवा दर्शविलेली
आहे काय ? नाही .
३) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीची
अववलंबना केली आहे काय ? नाही.
४) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
५. अर्जदार हा बल्लारपूर कॉलरी, ३/४ पिटस बल्लारपूर येथे कारकुनाच्या पदावर कार्यरत होता, त्यांचे नियमित पगार अर्जदाराचे युको बॅंक येथिल खात्यात जमा करण्यात येत होते. अर्जदाराला दोन मुली आहेत अर्जदाराच्या दोन्ही मुलीकरीता गैरअर्जदाराच्या शिक्षण कर्ज सन २००० व २००९ मध्ये काढण्यात आले होते. वरील व्यवहार अर्जदार हा वे.को.ली. नौकरीवर असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलींचा जमानतदार म्हणून ठेवण्यात आले व अर्जदाराच्या दोन्ही मुलींना कर्जदार म्हणून दाखविण्यात आले. अर्जदाराने दि. २३.०७.२००७ रोजी कु. सपना हिचे शिक्षणाकरीता रु. 2 लाख व कविता हिला दि. ०९.०९.२००९ रोजी गैरअर्जदाराच्या बॅकेकडून शिक्षणाकरीता २,०७,०००/- रु. कर्ज घेतले होते. अर्जदाराने त्याच्या स्वतःच्या कामाकरीता सुध्दा बॅंकेतून रक्कम रु. ६१,६७०/- रु. खाजगी कर्ज म्हणून घेतले होते. ही बाब अर्जदार व गैरअर्जदार बॅंकेला मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ व ३ बाबत ः-
६. अर्जदाराने दि. ३१.१०.२०१३ रोजी नौकरीतून सेवा निवृत्त झाल्यावर अर्जदाराला मिळालेले उपदान बाबत चेक रु. १०,००,०००/- रक्क्म म्हणून अर्जदाराने बॅंक ऑफ बडोदा बल्लारपूर येथिल असलेल्या अर्जदाराचे खात्यात जमा केले होते व सदरहु चेक न वटता बॅंक ऑफ बडोदा बल्लारपूर येथे गैरअर्जदार बॅंकेने परत केला ही बाब गैरअर्जदाराने दाखल नि. क्रं. २० वर दस्त ५ वरुन सिध्द होत आहे. अर्जदाराने सदरहु बाब तक्रार दाखल करतेवेळी लपविलेली आहे हे ही सिध्द झाले आहें. त्यानंतर अर्जदाराने वरील नमुद असलेला चेक गैरअर्जदाराचे बॅंकेत असलेल्या त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले होते यात दोघां पक्षांचे सम्मती असून त्यांना मान्य आहे. गैरअर्जदार बॅंकेने अर्जदार व त्यांचे मुलीना दिलेल्या कर्जाची मागणी व वसूल करण्याचे पूर्ण अधिकार आहे असे मंचाचे मत ठरले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे कर्ज खातेचे पडताळणी करताना व अर्जदाराचे मुलीचे शिक्षणाकरीता दिलेल्या कर्ज खात्याचे पडताळणी करतांना असे दिसले कि गैरअर्जदार बॅंकेने अर्जदाराकडील कर्जाचे रक्क्म व त्याचे व्याज शिल्लक होते व अर्जदाराने ब-याच हप्त्यात कर्ज खात्यात जमा केलेली नव्हती. गैरअर्जदार बॅंकेने कर्जाची रक्क्म वसूल करण्याकरीता कर्जदार किंवा त्यांचे खात्यात असलेली रकमातून कपात करुन कर्ज वसूली करण्याचा अधिकार आहे. अर्जदाराने वरील नमुद असलेला चेक दुस-या बॅंकेत जमा करुन वटविण्याचा प्रयत्न केला ही बाब तक्रारीत दर्शविलेली नसून अर्जदार हा या मंचाच्या समक्ष तक्रार दाखल करण्याकरीता स्वच्छ हाताने आलेला नाही असे सिध्द झाले आहे. ‘’दि पमेट ऑफ ग्रॅच्युटी अॅक्ट १९७२’’ कलम १३ सदरहु वादात लागु होत नाही. अर्जदाराने सदरहु चेक गैरअर्जदार बॅंकेत जमा करतेवेळी अर्जदाराला याची जाणिव होती कि, अर्जदाराने गैरअर्जदार बॅंकेत कर्ज घेतले आहे व त्याचे हप्ते बाकी आहे. तसेच अर्जदार व गैरअर्जदार बॅंकेमध्ये झालेल्या कर्जाविषयी कराराचे शर्त व अटी बाबत सुध्दा अर्जदाराला जाणिव होती त्या अनुषंगाने गैरअर्जदार बॅंकेने अर्जदाराचे खात्यात जमा असलेली रक्क्म नियमांप्रमाणे कर्ज वसूली करण्याकरीता वजा करुन कर्ज खात्यात जमा केली यात गैरअर्जदार बॅंकेने कोणीतही अनुचित व्यवहार पध्दती किंवा सेवेत ञुटी अर्जदाराप्रति दर्शविलेली नाही असे सिध्द झाले आहे. सबब मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
७ मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
२. उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
३. उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ०७/१२/२०१५