Maharashtra

Sangli

CC/11/164

Sushma Sadashiv Shinde - Complainant(s)

Versus

TVS Motor Co.Ltd., - Opp.Party(s)

S.S.Shinde

18 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/164
 
1. Sushma Sadashiv Shinde
Sakhar Karkhana,Sangli, Tal.Miraj
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. TVS Motor Co.Ltd.,
Pore's Auto, Indraprastha, Madhavnagar Rd., Sangli
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  Smt.V.N.Shinde MEMBER
  Smt.M.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                         नि.35


 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे


 

मा.सदस्‍या - सौ वर्षा नं. शिंदे


 

मा.सदस्‍या - सौ मनिषा कुलकर्णी


 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 164/2011


 

तक्रार नोंद तारीख   : 22/06/2011


 

तक्रार दाखल तारीख  :  23/06/2011


 

निकाल तारीख         :   18/12/2013


 

----------------------------------------------


 

 


 

सुषमा सदाशिव शिंदे


 

रा.साखर कारखाना, सांगली


 

ता.मिरज जि. सांगली                                      ....... तक्रारदार


 

 


 

विरुध्‍द


 

 


 

टि.व्‍ही.एस. मोटार कंपनी लि.


 

तर्फे अधिकृत डिलर, पोरेज ऑटो,


 

पत्‍ता इंद्रप्रस्‍थ, माधवनगर रोड,


 

सांगली ता.मिरज जि.सांगली                                 ...... जाबदार


 

                           


 

तक्रारदार तर्फे : अॅड सुषमा एस.शिंदे


 

                              जाबदारतर्फे  :  अॅड श्री ए.ए.कोपार्डे


 

 


 

- नि का ल प त्र -


 

 


 

द्वारा: मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  


 

 


 

1.    प्रस्‍तुतची तक्रार ऊपरनिर्दिष्‍ट तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 खाली जाबदारांनी त्‍यास दिलेल्‍या दूषित सेवेबद्दल दाखल केली आहे.


 

 


 

2.  थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार ही व्‍यवसायाने एक वकील असून तिच्‍याकडे टी.व्‍ही.एस. स्‍कूटी पेप प्रकारचे मोपेड वाहन, ज्‍याचा क्र.एमएच 10/एएल 7208 असा आहे, तिच्‍या मालकी वहिवाटीचे आहे. जाबदार ही टी.व्‍ही.एस. मोटार कंपनी म्‍हणजे सदर वाहनाचे उत्‍पादन करणा-या कंपनीचे अधिकृत डीलर आहेत. दि.13/6/11 रोजी सदर वाहनाचे चौथे पेड सर्व्हिसिंग करण्‍याकरिता तक्रारदाराने सदर वाहन जाबदारकडे दिले व त्‍याचा जॉब शीट नं.63367 तयार करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये तक्रारदाराने केलेल्‍या वाहनाच्‍या तक्रारी, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने इंजिन ऑईल गळती, क्‍लच बदली, हॉर्न स्‍वीच बदली, बॉडी फिटींग इ. तक्रारी लिहून घेण्‍यात आल्‍या. त्‍यानंतर तक्रारदारास तिची दुरुस्‍ती व सर्व्हिसिंग झालेले वाहन घेवून जाण्‍याची वेळ त्‍याच दिवशी संध्‍याकाळी 6.00 वाजता व सदर कामाची अपेक्षित खर्च रक्‍कम रु.600/- लिहून देण्‍यात आली. त्‍या दिवशी संध्‍याकाळी 6.00 वा. तक्रारदार तिचे वाहन घेण्‍यास गेली असता जाबदारांनी अपेक्षित खर्च वाढून रु.800/- झालेला आहे व जॉब कार्डप्रमाणे सर्व कामे झाली आहे, गाडी घेवून जा, असे सांगितले. सबब तक्रारदाराने त्‍यादिवशी पैसे भरुन वाहन घरी नेले. नेहमीप्रमाणे तिचे वाहन पार्कींग केले. तथापि, दि.14/6/11 ला पुन्‍हा सदर वाहनाचे गिअर बॉक्‍सखाली जमीनीवर इंजिन ऑईलचे ठिपके पडून ऑईल गळती झाल्‍याचे तक्रारदारास आढळले. त्‍यावरुन तक्रारदाराने पुन्‍हा सदर वाहन जाबदारकडे नेले व वर्कशॉपचे मॅनेजर यांना दाखविले. जाबदारचे वर्कशॉप मॅनेजर श्री जोशी यांनी त्‍यांचे मेकॅनिक श्री आसिफ यास ‘‘ गाडी बघ, ऑईल गळती सुरु आहे ’’ असे सांगितले. त्‍यावर सदर मेकॅनिक असिफने सदर गाडी वर्कशॉपमध्‍ये नेवून धूवून आणून दिली व देताना अर्जदारास सांगितले, ‘‘गाडी दुरुस्‍त झाली आहे, घेवून जा.’’ सबब तक्रारदाराने पुन्‍हा गाडी तिचे घरी नेवून पार्क केली असता ऑईल गळतीची तक्रार पूर्ववत चालू असल्‍याचे तिच्‍या निदर्शनास आले. म्‍हणून पुन्‍हा दि.15/6/11 रोजी तिस-यांदा सदर वाहन जाबदारकडे नेले असता वर्कशॉप मॅनेजर श्री जोशी व मेकॅनिक श्री आसिफ यांनी ‘‘ गाडी पुन्‍हा सोडून जा, बघावे लागेल ’’ असे तक्रारदारास सांगितले. त्‍यावरुन तक्रारदाराने, वर्कशॉप मॅनेजर यांना गाडीच्‍या जॉब कार्डप्रमाणे ऑईल गळती निघाली नाही, तुम्‍ही सदोष सेवा दिली आहे असे सुनावले. त्‍यावेळेला मॅनेजर व मेकॅनिक यांनी ते नाकारले व तक्रारदाराने केलेला खर्च व मजूरी परत देण्‍यास नकार दिला. नाईलाजाने दि.15/6/11 रोजी तक्रारदाराने सदर वाहन नादुरुस्‍त अवस्‍थेत घेतले व जाबदारपासून जवळच असलेल्‍या एक श्री साजिद शेख मिस्‍त्री यांचेकडे नेवून दुरुस्‍त करण्‍याचा निर्णय घेतला. सदरचे वाहन दुस-या मेकॅनिककडे खोलण्‍यापूर्वी अर्जदारने जाबदारचे वर्कशॉप मॅनेजर श्री जोशी यांना फोनद्वारे तशी माहिती देवून सदर मेकॅनिककडे प्रत्‍यक्ष पाहण्‍यास बोलावले. त्‍यावर वर्कशॉप मॅनेजर सदर ठिकाणी आले असता मेकॅनिक श्री साजिद शेख यांनी ती गाडी खोलण्‍यास सुरु केली. वाहनाचे गिअर बॉक्‍सचे झाकण काढले असता त्‍यातून हिरवट रंगाचे पातळ पाणी मिश्रीत वापरलेले/खराब झालेले ऑईल बाहेर पडले. सदर पाणी मिश्रीत खराब ऑईल पाहून श्री जोशी काही न बोलता तेथून निघून गेले. तात्‍काळ तक्रारदाराने फोटोग्राफर श्री सामंत यांना तेथे बोलावून घेतले व सदर पाणी मिश्रीत वापरलेले/ खराब झालेल्‍या ऑईलचे फोटो घेण्‍यात आले. साजिद शेख मिस्‍त्रीने ऑईल गळतीची दुरुस्‍ती करण्‍यास सुरुवात केली असता त्‍याचे मते इंजिनमधील ऑईल सिल खराब झाले आहे, ते बदलणे जरुरीचे असताना ते बदलले नव्‍हते. सदर नादुरुस्‍त झालेल्‍या ऑईल सिलचे फोटो काढण्‍यात आले. सदर मिस्‍त्रीने प्रशांत ऑटो स्‍पेअर्स, कॉलेज कॉर्नर यांचेकडून बिल नं.451 ने ऑईल सिल विकत आणले व बसविले. सदर ऑईल सिलची मागणी तक्रारदाराने जाबदारकडे केली असता जाबदारांनी स्‍टॉक संपला आहे असे म्‍हणून ऑईलसिल देण्‍याचे नाकारले. सदर साजिद शेख मिस्‍त्रीने नंतर इंजिन पुन्‍हा बसवून दिले. सदरचे इंजिनचे काम दु.12.30 ते 2.40 या काळामध्‍ये पूर्ण झाले.



 

3.    तक्रारदाराची मुख्‍य तक्रार अशी आहे की, जाबदारने सदर वाहनाचे दुरुस्‍तीचे काम योग्‍य प्रकारे न करुन तिला सदोष सेवा दिली आहे. सदोष सेवा देवून दि.13/6/11 रोजी इन्‍व्‍हॉईस नंबर 1362 ने रक्‍कम रु.813/- अर्जदाराकडून वसूल केले आहेत. तथापि दि.15/6/11 रोजी तक्रारदाराने श्री साजिद शेख मिस्‍त्री यांचेकडून सदर वाहनाचे काम करुन घेतले असता त्‍यास एकूण रु.217/- एवढा खर्च आला. त्‍यात दुरुस्‍तीची मजूरी रक्‍कम रु.150/-, स्‍पेअर पार्टसची रक्‍कम रु.30/- व इंजिन ऑईल 30 मिली रक्‍कम रु.37/- यांचा समावेश आहे. तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे तिचे वाहन दि.13/6/11 ते 15/6/11 या कालावधीत दुरुस्‍त न केल्‍याने तिला तिच्‍या व्‍यवसायाकरिता सदरचे वाहन वापरता आले नाही आणि तीन दिवस नुसते बसून रहावे लागले. सबब तिला व्‍यवसायामध्‍ये अपरिमित व न भरुन येणारे नुकसान झाले. तसेच जाबदारास सदोष सेवा दिल्‍याने तिला आर्थिक व मानसिक त्रासास नाहक सामोरे जावे लागले आहे. सबब तक्रारदाराने तिने जाबदारांना दिलेल्‍या बिलाची रक्‍कम रु.813/-, तक्रारअर्जाचा खर्च रु.2,000/- तसेच गाडी दुरुस्‍तीसाठी आलेला साजिद शेख मिस्‍त्री यांचेकडील खर्च रु.217/- व व्‍यावसायिक नुकसान भरपाई रक्‍कम रु.30,000/- व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- इत्‍यादी रकमा व्‍याजासह मिळण्‍याचा हक्‍क निर्माण झाला आहे तसेच दि.13/6/11 रोजी जाबदारांनी जॉब कार्डप्रमाणे संबंधीत वाहनाची दुरुस्‍ती न करुन सदोष सेवा दिली म्‍हणून त्‍या दिवशी दाव्‍यास कारण निर्माण झाले आहे.  अशा कथनावरुन तक्रारदाराने वर नमूद केलेल्‍या रकमेची मागणी केली आहे.



 

4.  आपल्‍या तक्रारअर्जाच्‍या पुष्‍ठयर्थ तक्रारदाराने नि.2 ला आपले शपथपत्र दाखल करुन नि.4 च्‍या फेरिस्‍तसोबत एकूण 13 कागदपत्रे व फोटो, सीडी इ. दाखल केलेले आहेत. 


 

 


 

5.    जाबदार हजर होवून त्‍यांनी आपली लेखी कैफियत नि.14 ला दाखल केली असून तक्रारअर्जातील सर्व कथने स्‍पष्‍टपणे अमान्‍य केलेली आहेत.  जाबदारचे म्‍हणण्‍याप्रमाणे संपूर्ण तक्रारअर्जामध्‍ये खोटी कथने केलेली असून तक्रारदार हे मंचापुढे स्‍वच्‍छ हाताने आलेले नाहीत. तक्रारदारास जाबदार काही रक्‍कम देवू लागतात हे कथन आणि तक्रारदाराच्‍या मागण्‍या जाबदारांनी स्‍पष्‍टपणे अमान्‍य केल्‍या आहेत. जाबदारचे स्‍पष्‍ट कथनानुसार तक्रारदार यांनी जाबदारकडून दि.23/8/08 रोजी दाव्‍यातील वाहन विकत घेतलेले असून वॉरंटी पिरेडमध्‍येच म्‍हणजेच वाहन घेतलेनंतर एक महिन्‍याने म्‍हणजे दि.23/9/08 रोजी पहिले फ्री सर्व्हिसिंग करुन घेतले आहे. तथापि वाहनाचे दुसरे फ्री सर्व्हिसिंग व इतर सर्व्हिसिंग नियमाप्रमाणे करुन घेतलेले नाही. तक्रारदाराने वाहनासंबंधीच्‍या मॅन्‍युअलचा अभ्‍यास करुन त्‍याचे पालन केले नाही व गाडीचा मेन्‍टेनन्‍स केला नाही. दि.14/3/09 रोजी तिसरे फ्री सर्व्हिसिंग करुन घेतल्‍यानंतर दि.13/6/11 पर्यंत म्‍हणजे सव्‍वादोन वर्षाच्‍या काळामध्‍ये तक्रारदार यांनी सदरचे वाहन कोणत्‍याही कामाकरिता एकदाही जाबदार यांचेकडे आणलेले नव्‍हते व नाही. दि.13/6/11 रोजी तक्रारदार यांचे वाहनातील इंजिन ऑईल बदली करुन सदर ऑईलचा मोकळा डबा व इतर वापरलेले पार्टस तक्रारदारांना परत केलेले आहेत. तसेच वाहनाचे ऑईल लिकेजचे काम करुन देवून गिअर बॉक्‍सचे गॅस्‍केट बदललेले आहे व जॉब कार्डवरील इतर सर्व तक्रारींच्‍या निरसन करुन तक्रारदार यांचे समाधान झालेनंतर तक्रारदार यांनी सदरचे वाहन अकनॉलेजमेंट न देता आपल्‍या ताब्‍यात घेवून प्रस्‍तुतची खोटी तक्रार जाबदारविरुध्‍द केली आहे. दि.13/6/11 रोजी तक्रारदाराने सदरचे वाहन जाबदारजवळ सोडले असता जाबदार यांनी त्‍यांच्‍या वाहनाचे सर्व काम करुन सदरचे वाहन तक्रारदार यांच्‍या ताब्‍यात दिले आहे. तक्रारदार यांनी त्‍या वाहनाची तपासणी करुन व ट्रायल घेवूनच सदरचे वाहन तिच्‍या ताब्‍यात घेतले आहे. वाहन ताब्‍यात घेतेवेळी जाणुनबुजून सदर वाहनाची अकनॉलेजमेंट/पोहोच जाबदारांना देणे आवश्‍यक असताना देखील तक्रारदाराने ती पोच आपल्‍याजवळच ठेवून घेवून, स्‍वार्थहिताने जाबदारविरुध्‍द त्‍याचा गैरवापर केलेला आहे. जाबदार यांनी कोणतीही सदोष सेवा तक्रारदारास दिलेली नाही. याउलट तक्रारदार यांना जेवढी मदत करता येईल तेवढी योग्‍य ती सर्व मदत व सहकार्य केलेले आहे. तथापि तक्रारदार यांनी जाणूनबुजून जाबदारांना नाहक पक्षकार केलेले आहे. सबब तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍याचा अधिकार नाही. जाबदार यांनी तक्रारदार याचे वाहनात इंजिन ऑईलच्‍या नावावर हिरवट रंगाचे पाणी मिश्रीत खराब ऑईल कधीच घातलेले नव्‍हते. तक्रारदारांनी फेरिस्‍तसोबत दाखल केलेली कागदपत्रे ही खोटी आहेत. जाबदार हे सांगली जिल्‍हयातील नावाजलेले व प्रतिष्ठित अशा टी.व्‍ही.एस. कंपनीचे डिलर आहेत. त्‍यांचा नावलौकीक आहे. त्‍यांनी वाहन खरेदीदारांना अद्ययावत सेवा पुरविलेली असल्‍याने सदर कंपनीच्‍या गाडयांचा खप देखील वाढलेला आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे हे कृत्‍य जाबदार यांचेकडून होण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. टी.व्‍ही.एस. मोटार कंपनी ही आवश्‍यक पक्षकार असताना त्‍यांना पक्षकार केलेले नाही. त्‍यामुळे तक्रारअर्जास Non-joinder of necessary parties या तत्‍वाचा बाध येतो. तक्रारदार यांनी जाणूनबुजून जाबदार यांचेविरुध्‍द खोटी व खोडसाळपणाची तक्रार दाखल केल्‍यामुळे त्‍यांचेवर रक्‍कम रु.25,000/- चा दंड खर्च बसविण्‍यात यावा अशा कथनांवरुन जाबदारांनी प्रस्‍तुतची तक्रार रु.25,000/- च्‍या दंड खर्चासह नामंजूर करण्‍याची विनंती केली आहे.



 

6.    जाबदारांनी आपल्‍या कैफियतीचे पुष्‍ठयर्थ प्रोप्रायटर श्री अविनाश कृष्‍णाजी पोरे यांचे शपथपत्र नि.15 ला दाखल करुन नि.16 या फेरिस्‍त सोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्‍यात टी.व्‍ही.एस. स्‍कूटी पेप या मोपेडचे मॅन्‍युअल, दि.13/6/11 चे 63367 या नंबरचे तक्रारदाराचे वाहनासंबंधीचे जॉब कार्ड, सदर वाहनाची सर्व्हिस हिस्‍टरी, सर्व्हिसिंग करताना वापरण्‍यात आलेल्‍या पार्टसबद्दलची बिले इ. कागदपत्रे तसेच सदर जाबदार कंपनीत ठेवण्‍यात आलेल्‍या टेलिफोन रजिस्‍टरचा उतारा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. जाबदारचे म्‍हणण्‍याप्रमाणे दि.13/6/11 रोजी तक्रारदारास जे खर्चाचे एस्टिमेट दिलेले होते, त्‍या खर्चात वाढ होत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर ती बाब तक्रारदाराच्‍या कानावर घालण्‍याकरिता व तक्रारदाराची त्‍यास मंजूरी घेण्‍याकरिता तक्रारदाराच्‍या फोनवर वेळोवेळी संपर्क साधला असता तक्रारदार उपलब्‍ध झाले नाहीत, हे दाखविण्‍याकरिता सदर टेलिफोन रजिस्‍टरचे उतारे याकामी दाखल करण्‍यात आले आहेत. 


 

 


 

7.    तक्रारदाराने पुराव्‍याचे कामी तिची साक्षीदार म्‍हणून सदर मेकॅनिक श्री साजिद शरीफ शेख यांचे सरतपासाचे शपथपत्र नि.21 ला, फोटोग्राफर श्री नितीन नारायण सामंत यांचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.26 ला दाखल केले असून नि.23 सोबत फोटोग्राफरने काढलेल्‍या फोटोंची संगणकीय सी.डी., फोटोग्राफरचे सर्टिफिकेट व फोटो स्‍टुडिओ, मुंबई दुकाने व संस्‍था अधिनियमाखाली सदर फोटो स्‍टुडिओचा नोंदणीचा दाखला इ. कागदपत्रे दाखल केलेली असून नि.28 या पुरसिस अन्‍वये आपला पुरावा थांबविला आहे. नि.30 या फेरिस्‍तसोबत वर नमूद केलेली मूळ कागदपत्रे हजर केलेली आहेत.



 

8.    जाबदारतर्फे जाबदारचे प्रोप्रायटर श्री अविनाश पोरे यांचे सरतपासाचे शपथपत्र नि.32 ला दाखल करण्‍यात आले असून त्‍यांनी इतर कोणताही पुरावा दिलेला नाही किंवा इतर कोणी साक्षीदार तपासलेला नाही.



 

9.    पुरावा संपलेनंतर आम्‍ही तक्रारदार व जाबदार यांचा युक्तिवाद ऐकून घेतला.



 

10.   प्रस्‍तुत प्रकरणात आमच्‍या निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.



 

            मुद्दे                                              उत्‍तरे


 

 


 

1. तक्रारदार ही जाबदारांची ग्राहक होते काय ?                           होय.


 

 


 

2. जाबदारने तक्रारदारास तक्रारअर्जात नमूद केल्‍याप्रमाणे सदोष


 

   सेवा दिली हे तक्रारदाराने शाबीत केले आहे काय  ?                  होय.


 

 


 

3. तक्रारदारास तक्रारअर्जात नमूद केलेल्‍या रकमा मिळणेस ती


 

  पात्र आहे काय ?                                 कथित व्‍यावसायिक


 

                                                 नुकसानीची भरपाई रक्‍कम


 

                                     रु.30,000/- वगळता


 

                                     तक्रारदारास झालेला प्रत्‍यक्ष


 

                                     दुरुस्‍तीचा खर्च रु.217/-,


 

       जाबदारास दुरुस्‍तीपोटी


 

       दिलेली रक्‍कम रु.813/- व


 

       मानसिक त्रासापोटी रक्‍कम


 

       रु.5,000/- व तक्रारअर्जाचा


 

       खर्च रु.500/- मिळण्‍यास


 

                                     तक्रारदार पात्र आहे.


 

       


 

4. अंतिम आदेश                                           खालीलप्रमाणे.


 

 


 

 


 

11.   आमच्‍या वरील निष्‍कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.



 

 


 

:- कारणे -:


 

मुद्दा क्र.1  


 

 


 

12.   वास्‍तविक तक्रारदार ही जाबदारची ग्राहक होते ही बाब जाबदारांनी अमान्‍य केलेली नाही. ही बाब वादातीत आहे की, तक्रारदाराने जाबदारकडून टी.व्‍ही.एस. स्‍कूटी पेप हे वाहन विकत घेतलेले असून सदर वाहनाचे सर्व्हिसिंग इ. जाबदारकडूनच करुन घेतलेले आहे. दि.13/6/11 रोजी देखील सदरचे वाहन तक्रारदाराने जाबदारकडे दुरुस्‍तीकरीता आणून जाबदारचे ताब्‍यात दिले होते व सदर दुरुस्‍तीपोटी झालेल्‍या खर्चाची रक्‍कम रु.813/- हा जाबदारास देवून त्‍यादिवशी संध्‍याकाळी सदरचे वाहन आपल्‍या ताब्‍यात घेतले होते ही बाब जाबदारांनी मान्‍य केली आहे. वाहनाची दुरुस्‍ती करुन देणे हे आपले काम आहे आणि ती ग्राहकास दिलेली सेवा आहे ही बाब जाबदारांनी कधीही नाकारलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे नातेसंबंध आहेत ही बाब वादातीतरित्‍या शाबीत होते. सबब तक्रारदार ही जाबदारची ग्राहक आहे या निष्‍कर्षास हे मंच आले आहे. सबब आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 


 

 


 

मुद्दा क्र.2



 

13.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.13/6/11 रोजी तिने सदर वाहन जाबदारकडे सर्व्हिसिंग व इतर किरकोळ दुरुस्‍तीकरिता नेलेले होते. त्‍यात मुख्‍य तक्रार इंजिनमधून ऑईल गळती होणे ही असल्‍याचे तक्रारदाराचे कथन आहे. सदरचे वाहन जाबदारचे प्रतिष्‍ठाणात नेल्‍यानंतर तक्रारदाराने सदर वाहनास आवश्‍यक असणा-या दुरुस्‍ती आणि तिच्‍या असणा-या तक्रारी जॉब कार्ड नं.63367 मध्‍ये नमूद केल्‍या होत्‍या ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य आहे. सदरचे मूळ जॉब कार्ड जाबदारने फेरिस्‍त नि.16 ला दाखल केले आहे. त्‍या जॉब कार्डचे अवलोकन करता असे दिसते की, तक्रारदाराने सदर जॉब कार्डमध्‍ये सदर वाहनाचे जनरल चेकअप, ऑईल बदली करणे, बॅटरी चेकअप करणे, स्‍टार्टर चालू होत नाही, किक चेक करणे, बॉडी लूज आहे, ऑईल लिकेज आहे आणि लिव्‍हर चेंज करणे इ. तक्रारी सांगितल्‍या. सदरचे वाहन दुरुस्‍तीकरिता स्‍वीकारल्‍यानंतर जाबदारांनी ते जॉबकार्डप्रमाणे असिफ नावाच्‍या मेकॅनिककडे दुरुस्‍तीकरिता सकाळी 11.00 वा दिले असे दिसते. जॉब कार्डवरुन पुढे असेही दिसते की सदर वाहनात ब्रेक लिव्‍हर, हॉर्नचे बटन, इंजिन ऑईल व गॅस्‍केट बदलण्‍यात आले. वाहनाचे संपूर्ण कामाकरिता, ऑइल बदली करण्‍याकरिता, गॅस्‍केट, हॉर्नस्‍वीच, ब्रेक लिव्‍हर इ. बदलण्‍याकरिता पार्टस आणि मजूरीची एकूण रक्‍कम रु.768/- तक्रारदाराकडून वसूल करण्‍यात आली. सदरचे वाहन दि.13/6/11 रोजी संध्‍याकाळी 7.10 वा. तक्रारदाराचे ताब्‍यात देण्‍यात आले व त्‍याप्रमाणे तक्रारदाराने जॉब कार्डवर डिलीव्‍हरी सर्टिफिकेट लिहून देवून आपली सही केल्‍याचे दिसते.



 

14.   तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे दि.13/6/11 ला वाहनाची डिलीव्‍हरी देत असताना जाबदारकडून सदरचे वाहन संपूर्ण दुरुस्‍त करण्‍यात आले आहे असे सांगण्‍यात आले होते. तरीदेखील दुसरे दिवशी म्‍हणजे दि.14/6/11 रोजी तिला इंजिनमधून ऑईल गळती होत असताना पुन्‍हा आढळून आले. याउलट जाबदारचे कथन असे आहे की, ज्‍याअर्थी सदर वाहनाची दि.13/6/11 रोजी संध्‍याकाळी 7.10 वा डिलीव्‍हरी घेत असताना, तक्रारदाराने सदर वाहन तिच्‍या ताब्‍यात चांगल्‍या, योग्‍य परिस्थितीत मिळाले असून त्‍याची दुरुस्‍ती तिच्‍या समाधानाप्रमाणे झाली आहे, असे लिहून दिले, त्‍याअर्थी जाबदारांनी सदर वाहनाची दुरुस्‍ती ही योग्‍यरित्‍या करुन दिलेली होती व तक्रारदाराची त्‍याबद्दल कोणतीही तक्रार नव्‍हती आणि त्‍यामुळे तक्रारदारास त्‍यांनी कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही.



 

15.   तक्रारदाराचे असेही कथन आहे की, दि. 14/6/11 रोजी पुन्‍हा इंजिनमधून ऑईल गळती दिसून आल्‍यानंतर तिने सदरचे वाहन पुन्‍हा जाबदारकडे नेले व त्‍यास दुरुस्‍ती योग्‍यरित्‍या न झाल्‍याबद्दल सांगितले व त्‍यावेळेला जाबदारचे वर्कशॉप मॅनेजर श्री जोशी यांनी आसिफ या मेकॅनिकला बोलावून सदर वाहनात इंजिन ऑईल गळती असलचे सांगितले व त्‍यावरुन सदर मेकॅनिकने सदर वाहन नेवून, धुवून पुसुन आणून, तक्रारदारास दिले व गाडी दुरुस्‍त झाली आहे असे सांगितले व त्‍यानंतर तक्रारदाराने पुन्‍हा ते वाहन आपल्‍या घरी नेवून पार्क केले असता पुन्‍हा तिला सदर वाहनाचे इंजिनमधून ऑईल गळती असल्‍याचे दिसून आले. तिस-यांदा पुन्‍हा दि.15/6/11 रोजी तिने ते वाहन जाबदारकडे नेले. त्‍यावेळेला जाबदारचे वर्कशॉप मॅनेजर यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिल्‍याचे नाकारले व तक्रारदाराने केलेला खर्च व मजूरी परत करण्‍याचे नाकारले. त्‍यानंतर तक्रारदाराने सदरचे वाहन जवळच असलेल्‍या श्री साजिद शेख मिस्‍त्री या खाजगी मेकॅनिककडे नेले व तेथे जाबदारचे वर्कशॉप मॅनेजर श्री जोशी व मेकॅनिक श्री आसिफ यांना बोलावून घेण्‍यात आले व त्‍यांच्‍या समोर सदर वाहनाचे इंजिन खोलले असता त्‍यातून हिरवट रंगाचे, पातळ, पाणी मिश्रीत, वापरलेले/खराब झालेले ऑईल बाहेर पडले व ते ऑईल पाहून वर्कशॉप मॅनेजर जोशी काही न बोलता तेथून निघून गेले आणि सदर साजिद शेख मिस्‍त्रीला वाहन गळतीचे कारण ऑईल सिल खराब झाले असल्‍याचे आढळून आले व तेथे ऑईल सिल बदलण्‍यात आले व त्‍यानंतर इंजिन दुरुस्‍ती करण्‍यात आले.



 

16.   तक्रारदाराने वरील कथनाचे पुष्‍ठयर्थ साजिद शेख या मिस्‍त्रीचे सरतपासाचे शपथपत्र या प्रकरणात सादर केले आहे व ते शपथपत्र नि.21 ला दाखल करण्‍यात आले आहे. सदर शपथपत्रामध्‍ये श्री साजिद शेख या मेकॅनिकने तक्रारदाराने सांगितलेली दि.15/6/11 ची संपूर्ण घटना शपथेवर सांगितली आहे. त्‍या संपूर्ण शपथपत्रास जाबदारतर्फे कोणतेही आव्‍हान देण्‍यात आलेले नाही. जाबदारांनी सदर साजिद शेख या मिस्‍त्रीचा उलटतपास देखील घेतलेला नाही. साजिद शेख यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे सदर इंजिन ऑईल गळतीचे कारण खरा‍ब ऑईल सील हे होते. तक्रारदार व साजिद शेख या दोघांनीही सदर वाहनाचे दुरुस्‍ती करीत असताना फोटो घेण्‍यात आले होते असे सांगितले आहे.  तक्रारदाराने त्‍या फोटोग्राफरला या कामी साक्षीदार म्‍हणून हजर केले असून फोटोग्राफरने काढलेले फोटो व त्‍याची काढलेली सी.डी. या प्रकरणात दाखल केली आहे. सदर फोटोग्राफर नितीन नारायण सामंत याचे सरतपासाचे शपथपत्र नि.26 ला दाखल केले आहे. सदर फोटोग्राफरचा देखील जाबदारने उलटतपास घेतलेला नाही. सदर फोटोग्राफ्स पाहिले असता आणि सदर फोटोची सीडी बघीतली असता हे स्‍पष्‍टपणे दिसते की, सदर वाहनाचे गिअर बॉक्‍समध्‍ये पाणी मिश्रीत खराब ऑईल होते व तो गिअर बॉक्‍स उघडल्‍यानंतर ते खराब पाणी मिश्रीत ऑईल बाहेर पडले. गिअर बॉक्‍स उघडण्‍याआधी गिअर बॉक्‍स आणि इंजिन कव्‍हर यामध्‍ये काळया रंगाचे ऑईल होते, ते ऑईल इंजिनच्‍या बॉडी आणि कव्‍हर यांचेमधील गॅपमधून खाली सांडत असण्‍याची शक्‍यता फोटोवरुन स्‍पष्‍टपणे दिसते. सदरचे वाहनाच्‍या इंजिनच्‍या एकूण बांधणीवरुन गिअर बॉक्‍स कव्‍हर आणि इंजिनचे मुख्‍य कव्‍हर यांचेमध्‍ये ऑईल असण्‍याची गरज नाही. तरीही इंजिन उघडलेल्‍या अवस्‍थेत सदर फोटोमध्‍ये ऑईल दिसते. इजिनच्‍या त्‍या भागात ऑईल असण्‍याची एकच जागा असते, ती म्‍हणजे त्‍यात असलेले गिअर बॉक्‍स. त्‍या गिअर बॉक्‍सच्‍या झाकणात एक ऑईल सिल असल्‍याचे दिसून येते. ऑईल सिल हा रबरी पार्ट असून तो वापराअंती खराब होतो आणि कालांतराने त्‍यातून ऑईलचे गळती होती हे सर्वश्रुत आहे. जर दि.13/6/11 रोजी सदरचे वाहन जाबदारचे वर्कशॉपमध्‍ये दुरुस्‍तीकरिता देण्‍यात आलेले होते, तर जाबदारांनी ऑईल गळतीचे कारण शोधून काढण्‍याकरिता इंजिनचे कव्‍हर काढणे, गिअर बॉक्‍स तपासणे, त्‍याचे ऑईल सील तपासणे इ. गोष्‍टी करणे आवश्‍यक होत्‍या. जाबदारचे मेकॅनिकने दि.13/6/11 ला सदरचे वाहन दुरुस्‍तीकरिता आणले असता ऑईल गळती काढण्‍याकरिता नेमके काय केले याबद्दलचा कोणताही स्‍पष्‍ट पुरावा जाबदारांनी या मंचासमोर आणलेला नाही. ज्‍या मेकॅनिककडे म्‍हणजे श्री आसिफ मेकॅनिककडे सदरचे वाहन दुरुस्‍तीकरिता दि.13/6/11 रोजी सोपविण्‍यात आले होते त्‍या मेकॅनिकला जाबदारतर्फे साक्षीदार म्‍हणून तपासण्‍यात आलेले नाही. त्‍यांनी दि.13/6/11 रोजी नेमके सदर वाहनात काय केले याचा कोणताही पुरावा जाबदारांनी मंचासमोर आणलेला नाही. हे जरुर आहे की, दि.13/6/11 च्‍या जॉब कार्डमध्‍ये सदर वाहनाचे गॅस्‍केट बदलले असल्‍याचे नमूद केले आहे. हे गॅस्‍केट नेमके कुठले गॅस्‍केट होते याचा कोणताही स्‍पष्‍ट उल्‍लेख जॉब‍ कार्डमध्‍ये नाही किंवा तसा कोणताही स्‍पष्‍ट पुरावा या मंचासमोर नाही. इंजिनचे संपूर्ण इंजिन कव्‍हर आणि इंजिनची बॉडी यामध्‍ये एखादे गॅस्‍केट असू शकते आणि ते इंजिनचे कव्‍हर काढले नंतर खराब होवून बदलावे लागण्‍याची शक्‍यता असते. परंतु ज्‍याठिकाणी हे गॅस्‍केट बसते, त्‍या ठिकाणी इंजिनमध्‍ये ऑईलचा संचय नसतो किंवा ऑईल भरले जात नाही, त्‍यामुळे तेथून ऑईल गळती होण्‍याची शक्‍यता नाही. तसेही जर ते गॅस्‍केट बदलले असेल तर त्‍याकरिता इंजिन कव्‍हर हे काढावेच लागले असेल आणि ते काढले असते तर गिअर बॉक्‍समधून त्‍याठिकाणी होणारी ऑईलची गळती ही ताबडतोब नजरेला आली असती. ज्‍याअर्थी दि.16/6/11 ला सदर इंजिनचे कव्‍हरमध्‍ये जळालेल्‍या ऑईलची काजळी, घाण आणि ऑईलचे थेंब दिसून येतात, त्‍याअर्थी दि.13/6/11 रोजी सदर वाहनाचे इंजिनचे सदर कव्‍हर काढलेले नव्‍हते हे स्‍पष्‍ट होते. नि.4 या फेरिस्‍त सोबत जोडलेल्‍या अनुक्रम 5 या फोटोग्राफमध्‍ये सदर बाब ही स्‍पष्‍टपणे दिसून येते. जर दि.13/6/11 रोजी इंजिन कव्‍हर काढले असते तर गिअर बॉक्‍सचे ऑईल सीलमधून बाहेर येणारे ऑईल हे स्‍पष्‍टपणे दिसले असते आणि ते ऑईल सिल दुरुस्‍त करण्‍याची योग्‍य ती कार्यवाही संबंधीत मेकॅनिकने केली असती. ज्‍याअर्थी जाबदारचे संबंधीत मेकॅनिकने यापैकी काहीच केलेले नाही, त्‍याअर्थी सदर मेकॅनिकने दि.13/6/11 रोजी सदर वाहनाचे इंजिन कव्‍हर उघडून देखील बघीतलेले नाही हे स्‍पष्‍ट आहे.



 

17.   नि.4 या फेरिस्‍त सोबत जोडलेले अनुक्रम 6 या फोटोग्राफमध्‍ये सदर वाहनाचे इंजिनमधील गिअर बॉक्‍सचे कव्‍हर काढलेले दिसत असून त्‍यातून निघत असलेले ऑईल दिसत आहे. सदरचे ऑईल हे पूर्णतया खराब झालेले असून पाणी मिश्रीत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसते. त्‍याचे खाली नि.4/7 ला असलेल्‍या फोटोग्राफमध्‍ये सदर गिअर बॉक्‍स कव्‍हरवर असलेल्‍या ऑईल सीलचे फोटो आपणास पहावयास मिळतात. सदरचे ऑईल सील खराब असल्‍याबद्दल तक्रारदाराचे साक्षीदाराने शपथपत्रात सांगितले आहे. गिअर बॉक्‍समध्‍ये असलेल्‍या ऑईलचे एवढे नुकसान होण्‍याचे एकच कारण ते म्‍हणजे त्‍यात गेलेले पाणी. हे पाणी वाहनाचे सर्व्हिसिंग करताना वापरण्‍यात आलेल्‍या जोराच्‍या फवा-याने जाणे शक्‍य असते. असे दूषित पाणी मिश्रीत ऑईल हे ऑईल सील खराब करु शकते आणि खराब ऑईल सिलमधून ऑईल बाहेर निघू शकते. जर जाबदारचे आसिफ या नावाच्‍या मेकॅनिकने दि.13/6/11 रोजी सदर वाहनाची काळजीपूर्वक दुरुस्‍ती कली असती तर या सर्व गोष्‍टी टाळता आल्‍या असत्‍या. याचा स्‍पष्‍ट अर्थ असा आहे की, जाबदारचे आसिफ या नावाचे मेकॅनिकने सदर वाहनाची दुरुस्‍ती दि.13/6/11 रोजी ही योग्‍यरित्‍या व काळजीपूर्वक केली नाही आणि केवळ वरवर दुरुस्‍ती केल्‍याचा देखावा केला.



 

18.   जाबदारचे विद्वान वकील श्री कोपर्डे यांनी वारंवार जाबदार ही कशी प्रतिथयश व्‍यापारी प्रतिष्‍ठाण आहे, त्‍याची बाजारात काय पत आहे याचा उल्‍लेख केला आणि अशा प्रतिथयश प्रतिष्‍ठाणाकडून तक्रारदार म्‍हणतात तसा हलगर्जीपणा किंवा सदोष सेवा देण्‍याची शक्‍यता नाही असे हिरीरीने प्रतिपादन केले. जाबदारांचे विद्वान वकीलांचे हे कथन आजिबात मान्‍य करता येत नाही. नामांकित प्रतिष्‍ठाणातील कर्मचारी वर्ग हा चुका करणारच नाही किंवा बेजबाबदारीने वागणारच नाही असे म्‍हणता येत नाही. जाबदारांनी सदर आसिफ नावाच्‍या मेकॅनिकला या मंचासमोर उभे करुन त्‍याचा पुरावा का घेतला नाही याचे कोणतेही स्‍पष्‍टीकरण जाबदारकडून आलेले नाही. दि.13/6/11 रोजी सदर वाहनाची दुरुस्‍ती करताना नेमके काय काय करण्‍यात आले याबद्दल संबंधीत मेकॅनिकच सांगू शकला असता. मेकॅनिकवर देखरेख करणारा सुपरवायझर किंवा वर्कशॉप मॅनेजर किंवा जाबदार प्रोप्रायटर हे काही प्रत्‍यक्ष मेकॅनिक काम करीत असताना तेथे उभे राहून आपल्‍या देखरेखीखाली वाहनाची दुरुस्‍ती करुन घेत नाहीत. वाहनाची दुरुस्‍ती करीत असताना ग्राहकांनाही तेथे उभे राहू दिले जात नाही हे सर्वश्रुत आहे. त्‍यामुळे दि.13/6/11 रोजी नेमके काय घडले हे सांगणारा एकमेव साक्षीदार हा जाबदारचा मेकॅनिक आसिफ हा होता व तो पुरावा जाबदारांनी या मंचापासून दूर ठेवलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर तक्रारदारांनी दाखल केलेला संपूर्ण पुरावा हा विश्‍वासार्ह वाटतो आणि त्‍यावरुन एक बाब ही स्‍पष्‍टपणे शाबीत होते की, दि.13/6/11 रोजी तक्रारदाराने आपले वाहन जाबदारकडे दुरुस्‍तीकरिता नेले असताना जाबदारतर्फे सदर वाहनाच्‍या दुरुस्‍तीचा निव्‍वळ देखावा करण्‍यात आला आणि तक्रारदारास सदर वाहन दुरुस्‍त झाले असे भासविण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला.  ही स्‍पष्‍टपणे जाबदाराने दिलेली दूषित सेवा आहे. सबब दि.13/6/11 ला जाबदारांनी तक्रारदारास दूषित सेवा दिली या निष्‍कर्षास हे मंच आले आहे म्‍हणून आम्‍ही वर नमूद केलेल्‍या मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.



 

 


 

मुद्दा क्र.3 व 4


 

 


 

19.   तक्रारदाराने जाबदारकडून दि.13/6/11 ला दिलेल्‍या रु.813/- च्‍या बिलाची रक्‍कम तसेच श्री साजिद शेख मिस्‍त्री याचेकडे सदर वाहनाची दुरुस्‍ती करुन घेण्‍याकरिता आलेला खर्च रु.217/- व्‍याजासह तसेच दाव्‍याचा खर्च रु.2,000/-, अर्जदाराचे झालेल्‍या व्‍यावसायिक नुकसानीची भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.30,000/- व झालेल्‍या मा‍नसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.20,000/- अशी एकूण रक्‍कम रु.50,000/- व्‍याजासह वसूल करुन मागितले आहेत. आपल्‍या युक्तिवादाच्‍या दरम्‍यान तक्रारदार यांनी हे स्‍पष्‍टपणे या मंचासमोर कबूल केले आहे की, सदर वाहन नादुरुस्‍त झाल्‍याने त्‍यांचे काय व्‍यावसायिक नुकसान झाले व किती प्रमाणात झाले याबद्दल कोणताही पुरावा त्‍यांनी या प्रकरणात सादर केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची रक्‍कम रु.30,000/- या नुकसान भरपाईची मागणी विचारात घेता येत नाही व ती नामंजूर करावी लागेल. दि.13/6/11 रोजी तक्रारदाराकडून एकूण रक्‍क्‍म रु.813/- वसूल करुन घेण्‍यात आले व ती रक्‍कम तक्रारदाराने जाबदारांना दिली याबद्दल जाबदारांचा कोणताही उजर नाही. तक्रारदारांनी श्री साजिद शेख यांचेकडे वाहन दुरुस्‍तीस आलेला खर्च म्‍हणून रक्‍कम रु.217/- याबद्दल श्री साजिद शेख यांचा पुरावा व त्‍यांनी दिलेले बिल व ऑईल सील काढल्‍याबद्दलचे प्रशांत अॅटो स्‍पेअर्स चे एस्टिमेट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. प्रस्‍तुत प्रकरणाचा साकल्‍याने विचार करता सदर पुरावा हा ग्राहय धरण्‍यास काहीही हरकत नाही. जाबदारांनी तक्रारदाराचे वाहनाचे दुरुस्‍तीचा केवळ देखावा करुन त्‍याचेकडून रु.813/- वसूल केले ही बाब प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये स्‍पष्‍टपणे शाबीत झाली आहे. जाबदारास सदरची रक्‍कम आपल्‍या ताब्‍यात ठेवण्‍याचा कोणताही अधिकार नाही. सबब ती रक्‍कम जाबदारकडून वसूल होवून मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत. जाबदारांनी दिलेल्‍या दूषित सेवेबद्दल तक्रारदारास आपले वाहन दुस-या मिस्‍त्रीकरुन दुरुस्‍त करुन घ्‍यावे लागले व जास्‍तीचा खर्च करावा लागला हेही या प्रकरणात सिध्‍द झाले आहे. त्‍यामुळे सदरचा जास्‍तीचा खर्च देखील जाबदारकडून वसूल करुन घेण्‍यास तक्रारदार पात्र आहेत असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे. सबब रक्‍कम रु.217/- ही जाबदारकडून वसूल होवून मिळण्‍याचा तक्रारदारास अधिकार आहे व ती रक्‍कम वसूल करुन मिळण्‍यास ती पात्र आहे असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.



 

20.   जाबदार ही टी.व्‍ही.एस. मोपेड कंपनीचे सांगली जिल्‍हयातील अधिकृत डिलर आहेत याबद्दल कोणताही वाद नाही. जाबदार हे सदर वाहनाचे अधिकृत दुरुस्‍ती केंद्र आहे याबद्दल देखील कोणताही वाद नाही. अशा प्रतिष्‍ठाणाकडून आपल्‍या नावलौकीकाला साजेशी सेवा ग्राहकांना मिळणे अपेक्षित आहे. जर जाबदारांनी केवळ सेवा देण्‍याचा देखावा केला असेल तर आणि त्‍यायोगे ग्राहकाला त्रास सहन करुन आपले वाहन इतर मेकॅनिककडून दुरुस्‍त करुन घ्‍यावे लागले असेल तर अशा ग्राहकाला शारिरिक व मानसिक त्रास होणे अत्‍यंत साहजिक आहे. या प्रकरणी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रु.5,000/- देणे योग्‍य राहील असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.  सबब आम्‍ही वर नमूद केलेल्‍या मुद्दा क्र.3 चे उत्‍तर वरीलप्रमाणे दिले आहे. 


 

 


 

21.   वरील सर्व विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदाराची तक्रार ही अंशतः मंजूर करणे आवश्‍यक आहे. तक्रारदाराने प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.2,000/- ची मागणी केली आहे. ती मागणी पूर्णतया मंजूर करणे योग्‍य राहणार नाही असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे. दाव्‍याचा खर्च व तक्रारदारास मंजूर करण्‍यात आलेली नुकसान भरपाईची रक्‍कम यामध्‍ये काहीतरी समन्‍वय असावा असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे. सबब खालील आदेश हा न्‍यायहितार्थ राहील असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.


 

 


 

आदेश


 

 


 

1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येत आहेत.


 

 


 

2.  जाबदारांनी तक्रारदारास, दि.13/6/11 रोजी दिलेल्‍या बिलाची रक्‍कम रु.813/- ही त्‍यावर


 

    द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह तक्रार दाखल केले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हातात


 

    देईपर्यंत द्यावी.


 

 


 

3. जाबदारांनी तक्रारदारास रक्‍कम रु.217/- तक्रार दाखल केले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष


 

    हातात देईपर्यंत द.सा.द.शे. 6 टके दराने व्‍याजासह द्यावी.



 

4. जाबदारांनी तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम


 

    रु.5,000/- द्यावी.


 

 


 

5. सदरच्‍या रकमा निकालाच्‍या तारखेपासून 30 दिवसांचे आत तक्रारदारास द्याव्‍यात.



 

6. नुकसान भरपाईची रक्‍कम रु.5,000/- सदर कालावधीत न दिल्‍यास तक्रारदारास त्‍यावर,


 

    द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने तक्रार दाखल केले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हातात देईपर्यंत


 

    व्‍याज देण्‍याची जबाबदारी जाबदारांवर राहील.


 

 


 

7. तक्रारअर्जाच्‍या खर्चाची म्‍हणून रक्‍कम रु.500/- जाबदारांनी तक्रारदारास वरील कालावधीत


 

    द्यावी.


 

 


 

8. वर नमूद केलेल्‍या सर्व रकमा विहीत मुदतीत न दिल्‍यास तक्रारदार सदर रकमा वसूल


 

    करण्‍याकरिता जाबदार विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 वा 27 मधील


 

    तरतूदींनुसार दाद मागू शकतील.


 

 


 

 


 

सांगली


 

दि. 18/12/2013                        


 

   


 

( सौ मनिषा कुलकर्णी )       ( सौ वर्षा नं. शिंदे )          ( ए.व्‍ही.देशपांडे )


 

       सदस्‍या                     सदस्‍या                   अध्‍यक्ष
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ Smt.V.N.Shinde]
MEMBER
 
[ Smt.M.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.