ग्राहक तक्रार क्र. 82/2014
दाखल तारीख : 21/04/2014
निकाल तारीख : 10/06/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 19 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. नंदकिशोर सुर्यकांत बिराजदार,
वय - 32 वर्षे, धंदा – वकिली,
रा.न्यायालयासमोर उमरगा,
ता.उमरगा, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. तुलसी मोबाईल अँड लॅपटॉप मल्टी ब्रँड शोरुम,
विश्व कॉम्प्लेक्स, पोलिस स्टेशनसमोर मेन रोड,
उमरगा ता. उमरगा जि.उस्मानाबाद.
2. जाकीर मोबाईल्स,
दुकान क्र.5, बैतुल अमन कॉम्प्लेक्स,
किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटलसमोर,
सोलापूर,
3. व्यवस्थापक,
इन्टेक्स टेक्नोलॉजीज( इंडिया) लि.,
डी-18/2, ओखिया इंड., एरिया फेस,
नवी दिल्ली-110020. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. डी.पी.वडगांवकर.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.जे.आर. खान.
विरुध्द पक्षकार क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
विरुध्द पक्षकार क्र.3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा.सदस्या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा.
अ) 1. तक्रारकर्ता (तक) हा मौजे उमरगा येथील रहिवाशी असून विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 यांच्याकडून विप क्र. 3 यांनी उत्पादित केलेला इन्टेक्स अॅक्वा वंडर हा मोबाईल हँडसेट खरेदी केला. विप क्र.1 यांनी त्याबाबतची पावती क्र.810 रु.9200/- ची तक्रारदारास दिली. सदर हँन्डसेटचा आय.एम.ई.आय.क्र.911302250834743, 911302250436746 व बँटरी क्र.06396 असा आहे. सदर हँन्डसेट पाच महिन्यातच वापरात अडथळा येऊ लागला म्हणून विप क्र.1 यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी विप क्र. 2 यांच्याकडे जाण्यास सांगितले त्याप्रमाणे तक यांनी विप क्र.2 यांच्याकडे गेले असता त्यांनी दि.10/10/2013 रोजी पावती क्र.4132 नुसार हँडसेट ठेऊन घेतला मात्र सदर हँडसेट विप क्र. 2 यांनी तक यांनी पाठपूरावा करुन देखील परत केला नाही. सदर हँडसेट बाबत विचारणा केली असता विप क्र. 2 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व सदर हँन्डसेट परत केला नाही. म्हणून तक यांनी सदर तक्रार दाखल केली असून सदर हॅंन्डसेट दुरुस्त अथवा बदलून द्यावा तसेच झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.35,000/-, प्रकरणाच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
ब) सदर प्रकरणात मा. मंचाने विप क्र.1 यांना नोटीस दिली असता त्यांनी आपले म्हणणे दि.21/07/2014 रोजी दाखल केले असून ते खालीलप्रमाणे..
1. तक्रारदाराची तक्रार कबूल व मंजूर नाही. तक्रादार विप क्र. 2, 3 यांच्याशी निगडीत असून विप क्र. 1 यांचा त्यात काही संबंध नाही. विप यांनी सेवेत कोणततीही त्रुटी केली नाही. तक्रारदार यांनी व्यवसायिक हेतुने मोबाईल खरेदी केला असल्याने तक विप चा ग्राहक होऊ शकत नाही. सदर प्रकरण दिवाणी न्यायालयामध्ये चालण्यास पात्र आहे. सदर हँन्डसेट मध्ये काही दोष निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्यास विप क्र.1 कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. तक यांनी सदर हँन्डसेट मध्ये नेमका कोणत्या प्रकारचा अडथळा येऊ लागला याबाबत जाणीवपुर्वक टाळाटाळ केल्याचे दिसते. मोबाईल दुरुस्तीमध्ये दिलेल्या पावतीमध्ये Mobile Problem : Water damage असे स्पष्ट नमूद केलेले आहे म्हणजेच तक्रारदार हे स्वच्छ हाताने मंचासमोर आपली तक्रार घेऊन आलेले नाहीत. तक्रारदार यांनी विप क्र.1 यांनी सेवेत त्रुटी केल्याचा कोणताही सबळ पुरावा दिला नाही म्हणून तक्रारदार यांची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. कलम 1986 चे 26 अन्वये तक्रारदार यांच्याकडून विरुध्द पक्षकार क्र.1 यांना रु.10,000/- खर्च वसूल होऊन मिळावा असे नमूद केले आहे.
क) विप क्र.2 यांना सदरबाबत नोटीस बजावणी होऊनही व अनेकदा संधी देऊन आपले म्हणणे दाखल न केल्याने त्यांचे विरुध्द दि.06/05/2014 रोजी एकतर्फा आदेश पारीत झाले.
ड) विप क्र.3 यांना सदर प्रकरणाबाबत नोटीस बजावणी होऊनही व अनेकदा संधी देऊनही आपले म्हणणे दाखल न केल्याने त्यांचे विरुध्द दि.06/05/2014 रोजी एकतर्फा आदेश पारीत झाले.
इ) तक ने तक्रारीसोबत हॅन्डसेट खरेदीची पावती, विप क्र. 2 यांनी तक यांचा हॅन्डसेट दुरुस्तीकरीता ठेऊन घेतलेबाबत दिलेली पावती 4132 इ. कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले. आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदाराच्या हॅन्डसेटमध्ये दोष होता हे सिध्द होते का ? होय.
2) अर्जदाराला सदोष हॅन्डसेट देऊन विप ने सेवेत त्रुटी केली का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.1
1) अर्जदाराने विप कडून हॅन्डसेट घेतला हे विवादीत नाही पण विप क्र.1 ने जो हॅन्डसेट अर्जदारास दिलेला आहे तो सदोष आहे. कारण अर्जदाराने तो दि.08/05/2013 रोजी खरेदी केला आणि वॉरंटी कालावधीतच तो खराब झाला आणि विप क्र.2 कडे तो दुरुस्तीला दिला. दुरुस्ती नंतर ते अर्जदारास परत केला नाही त्यामुळे अर्जदाराला फोनवर संपर्क साधने अडचणीचे झाले. विप क्र.1 व 2 यांनी अर्जदाराचा मोबाईल दुरुस्त करुन अर्जदाराला देऊन तशी पोच देणे गरजेचे होते परंतू विप ने तसे काही केलेले दिसुन येत नाही ही सेवेतील त्रुटी आहे.
2) वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की अर्जदाराने मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र.1, 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1, 2 व 3 यांनी अर्जदारास नवीन हँन्डसेट इन्टेक्स अॅक्वा वंडर किंवा हॅन्डसेंटची किंमत रक्कम रु.9,200/- (रुपये नऊ हजार दोनशे फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावा.
3) विप क्र.1, 2 व 3 यांनी संयुक्तपणे व एकत्रितरित्या अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावेत.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.