::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06/04/2016 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने ऑल्टो एमएच 28 व्ही 1315, एजंट सुधीर पांडे कडुन दि. 16/4/2014 रोजी विकत घेतली व रु. 50,000/- विसार दिला, सदरहु सौदा रु. 2,11,000/- मध्ये ठरला होता व उर्वरित रु. 1,40,000/-चे कर्ज एजंट सुधीर पांडे ह्यांनी मिळवून दिले. तक्रारकर्त्याने सदर कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरले असतांना दि. 1/9/2015 रोजी विरुध्दपक्षाचे अधिकारी तक्रारकर्त्याच्या घरी आले व सदर वाहन जप्त करुन नेले. त्यावेळी तक्रारकर्त्याच्या कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडे उर्वरित कर्जाची अशंत: परतफेड करण्यासाठी रु. 20,000/- गेला असता, त्यावेळी सदरहू वाहन कोठे आहे, या बाबत कोणतीही माहीती दिली नाही व हप्त्यांचे पैसे भरा, गाडी गोडावून मध्ये राहु द्यावी, असे सांगितले. तक्रारकर्त्याने गाडी घेतली त्यावेळी तो नोकरीवर होता परंतु दुर्देवाने त्याची नोकरी दि. 1/12/2014 रोजी गेली, त्यामुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. विरुध्दपक्षाने सदरहू वाहन जप्त केल्यामुळे तक्रारकर्त्यास आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की,विरुध्दपक्षाने तकारकर्त्याचे वाहन क्र.एमएच 28 व्ही/1315 सोडण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु. 1,00,000/- नुकसान भरपाई विरुध्दपक्षा- कडून मिळावी.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 15 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारीतील बहुतांश आरोप नाकबुल करुन अधिकचे कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचासमक्ष आलेला नाही. वादातील वाहन विकत घेण्यासाठी तक्रारकर्त्याने श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस कंपनी यांचेकडून कर्ज घेतले होते. विरुध्दपक्ष क्र. 1 हे श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांस सोबतचे केवळ रेव्हेन्यु शेअरींग पार्टनर असून तक्रारकर्ता, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस कंपनी व विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे दरम्यान त्रीपक्षीय करार तक्रारकर्त्याला कर्ज देतांना झालेला आहे. तक्रारकर्ता स्वत: कर्जाची परतफेड करण्यामध्ये अनियमित राहीला असून, कर्जाच्या किस्ती थकीत ठेवल्या. तक्रारकर्त्याने स्वत: लेखी पत्र देवून थकीत किस्ती न भरल्यास वाहन ताब्यात घेण्यास संमती दिली हेाती. त्यानंतर तक्रारकर्ता थकीत किस्ती भरु न शकल्यामुळे त्याने स्वत:च श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांसकडे वाहन सुपूर्त केले असून, त्याबाबतचा विक्री करण्याचा अधिकार, करारानुसार श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांसचा आहे व त्यामध्ये विरुध्दपक्ष क्र. 1 चा कोणत्याही प्रकारे सहभाग होवू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने या प्रकरणामध्ये श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस यांना विरुध्दपक्ष न केल्यामुळे तक्रार केवळ याच मुदयावर खारीज होण्यास पात्र आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने केवळ 12 किस्ती भरलेल्या आहेत, परंतु त्या देखील अनियमितपणे भरल्या असून उर्वरित किस्ती थकीत राहील्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 च्या खात्यामधून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस यांनी रक्कम वळती करुन घेतली आहे. तक्रारकर्त्याने घेतलेल्या वाहनाच्या आर. सी. बुकवर देखील, बोजा श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस यांचे नावानेच चढविण्यात आलेला आहे. तक्रारकर्त्याने स्वत: किस्ती थकीत राहील्याचे कबुल करुन थकीत किस्ती दि. 05/10/2015 पर्यंत भरण्याची हमी दिली होती व त्यानंतर वाहन विक्री करण्यास तक्रारकर्त्याने संमती दिलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारीतील बहुतांश आरोप नाकबुल करुन अधिकचे कथनात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा वादातील प्रकरणाशी कुठलाही संबंध नसून, तक्रारकर्ता स्वच्छ हाताने मंचासमक्ष आलेला नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 चा तक्रारीत नमुद वादाबद्दल कुठलाही संबंध नसल्यामुळे त्यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे व खर्चासहीत तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर विरुध्दपक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केला व न्यायनिवाडे दाखल केले, तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्ते यांनी स्वत: दाखल केलेली तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे, यांचे काळजीपर्वुक अवलेाकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून पारीत केला.
तक्रारकर्ते यांचा असा युक्तीवाद आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून वाहन, अल्टो दि. 16/3/2014 रोजी विकत घेतले. तक्रारकर्ते यांनी तेंव्हा रु. 50,000/- इसार रक्कम दिली व रु. 1,50,000/- चे कर्ज विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मिळवून दिले. त्या कर्जाच्या किस्त रकमेपोटी तक्रारकर्ते यांनी ऑगस्ट 2015 पर्यंन्त एकंदर रु. 70,000/- इतकी रक्कम भरली होती. परंतु दि. 1/9/2015 रोजी, कोणतीही पुर्व सुचना न देता विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मिळून, तक्रारकर्ते यांचे सदर वाहन जप्त केले व त्यावेळेस कोऱ्या कागदावर तक्रारकर्त्याच्या सह्या घेऊन, गाडी विकुन टाकण्याची धमकी दिली. विरुध्दपक्षाचे हे कृत्य बेकायदेशिर आहे. त्यामुळे सदर वाहन परत मिळण्याची व नुकसान भरपाई मिळण्याची प्रार्थना तक्रारकर्त्याने केली आहे.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्ते यांनी वाहन विकत घेण्यासाठी जे कर्ज घेतले, ते श्रीराम फायनान्स कंपनीकडून घेतले, विरुध्दपक्ष क्र. 1 हे केवळ श्रीराम फायनांन्सचे रेव्हेन्यु शेअरींग पार्टनर आहेत. त्यामुळे कर्ज किस्त स्विकारण्याच्या पावत्या विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दिल्या आहेत, परंतु तक्रारकर्त्याने श्रीराम फायनान्स यांना जाणीवपुर्वक या प्रकरणात पक्ष केले नाही, त्यामुळे हे प्रकरण प्रतिपालनिय नाही. तक्रारकर्ता कर्जाची परतफेड न करु शकल्यामुळे, त्याने वाहन स्वखुशीने सुपुर्द केले आहे व त्यानंतरही कर्ज किस्त भरली नाही. म्हणून तक्रारकर्त्याच्या अंतरिम अर्जासह मुख्य तक्रार खारीज करावी.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद व दाखल दस्त तपासले असता, असे दिसते की, तक्रारकर्त्याने सदर वाहन विकत घेतांना, विरुध्दपक्ष क्र. 2 मार्फत कर्ज सुविधा प्राप्त करुन घेतली होती व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले दस्त, करारनामा व तक्रारकर्त्याने पेज नं. 17 वर दाखल केलेले दस्त, यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याला सदर वाहन घेण्यासाठी कर्ज पुरवठा हा श्रीराम फायनान्स कंपनीने, तसा करार करुन दिला होता. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा श्रीराम फायनान्स कंपनी सोबत जो करार झाला होता, त्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 1 हे श्रीराम फायनान्स कंपनीचे ORSP ( Other Revenue Sharing Party ) आहेत व करारातील अटीनुसार विरुध्दपक्ष क्र. 1 ची जबाबदारी ही कर्जादाराकडून थकीत कर्ज रक्कम किस्त स्विकारणे, तशी पावती देणे, शिवाय अनियमितपणे कर्ज किस्त भरणाऱ्या ग्राहकाचे वाहन जप्त करणे ई. आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचा वाद विरुध्दपक्ष क्र. 1 च्या जबाबदाराशीच निगडीत आहे म्हणून सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने जरी श्रीराम फायनान्स कंपनीला पक्ष केले नाही, तरी सदर तक्रार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द प्रतिपालनीय आहे, असे मंचाचे मत आहे.
प्रकरण दाखल करतांना तक्रारकर्त्याने ते स्वत: दाखल केले होते व सोबत अंतरिम अर्ज दाखल केला होता, त्यावर मंचाने दि. 20/11/2015 रोजी, विरुध्दपक्षाने निवेदन सादर करावे व तो पर्यंत तक्रारकर्त्याच्या वाहनाची विक्री करु नये असा आदेश पारीत केला होता. विरुध्दपक्ष क्र. 1 ने दाखल केलेला दि. 5/9/2015 रोजीचा तक्रारकर्त्याचा अर्ज पाहता असे दिसते की, तक्रारकर्त्याने सदर वाहन स्वत:हून विरुध्दपक्ष क्र. 1 कडे सुपूर्द केले व अशी कबुली दिली होती की, दि. 5/10/2015 पर्यंत थकीत किस्त रक्कम भरु शकलो नाही तर गाडी विकण्याचा अधिकार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ला राहील. म्हणजे तक्रारकर्त्याने देखील वाहन विरुध्दपक्ष क्र. 1 कडेच सुपूर्द केले होते, श्रीराम फायनान्सकडे नाही. परंतु तक्रारकर्त्याने एकंदर 12 किस्त भरल्या आहेत, हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने दखील जबाबात कबुल केले व तशा पावत्या रेकॉर्डवर दाखल आहेत. त्यानुसार ऑगस्ट 2015 पर्यंत तक्रारकर्त्याने जरी अनियमित कर्ज किस्त रक्कम भरलेली आहे तरी काही महिन्यात एकदम 2 किंवा 3 किस्तींची रक्कम भरण्यात आली आहे. शिवाय कर्ज किस्त रक्कम भरण्याचा कालावधी हा 20/7/2017 पर्यंत चालु राहणार आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याकडून रु. 50,000/- ( रुपये पन्नास हजार ) एकरकमी रक्कम स्विकारुन, त्यानंतर तक्रारकर्त्याचे वाहन सोडावे, शिवाय वाहन ज्या कालावधीपर्यंत विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 च्या ताब्यात राहील तो पर्यंतच्या कालावधीतील कर्ज किस्त रकमेवार, व्याज, दंडनिय व्याज, लावू नये, तसेच तक्रारकर्त्याने देखील त्यानंतरची उर्वरित कर्ज किस्त रक्कम नियमित भरावी, असे आदेश पारीत केल्यास ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे. मात्र तक्रारकर्ता अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून कोणतीही नुकसान भरपाई अगर प्रकरणाचा न्यायीक खर्च मिळण्यास पात्र नाही, विरुध्दपक्षातर्फे दाखल न्यायनिवाड्यातील तथ्ये हातातील प्रकरणाला जसेच्या तसे लागु होत नाही, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याकडून थकीत कर्ज किस्त पोटी एकरकमी रक्कम रु. 50,000/- ( रुपये पन्नास हजार ) स्विकारल्यानंतर, तक्रारकर्त्याचे वाहन क्र. एमएच 28 व्ही 1315 सोडून द्यावे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर वाहन ताब्यात असललेल्या कालावधीकरिता कर्ज किस्त रकमेवर व्याज किंवा दंडनिय व्याज आकारु नये. तसेच त्यानंतरची कर्ज किस्त रक्कम तक्रारकर्त्याने नियमीतपणे भरावी.
- तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या फेटाळण्यात येत आहेत.
सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.