तक्रारदार : स्वतः
सामनेवाले : वकील श्री.एस.बी. प्रभावळकर.
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 18/06/2016 रोजी घोषीत )
1. तक्रारदारांनी जिम व योगा करीता सामनेवाले क्र 1 यांची सुविधा घेतली होती. परंतू, सदस्यत्व शुल्काबाबत वाद झाल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीसोबत काही कागदपत्रे दाखल केली. तक्रारदारानी ही तक्रार सामनेवाले व त्यांचे पदाधिकारी यांचेविरूध्द दाखल केली आहे. सामनेवाले क्र 5 उपस्थित न झाल्यामूळे त्यांचे विरूध्द एकतर्फा प्रकरण चालविण्यात आले. सामनेवाले क्र 1 ते 4 यांनी लेखीकैफियत दाखल करून, त्यांची बाजू कथन केली व काही कागदपत्रे दाखल केली.
2. तक्रारदारानूसार ते व त्यांची पत्नी सामनेवाले क्र 1 कडे गेले असता, सामनेवाले क्र 5 यांनी ते पुरवित असलेल्या, सेवेबद्दल माहिती दिली. तसेच, त्यांचे छापील कॅटलॉग बुक दाखविले. सामनेवाले क्र 1 हे जिम तसेच हॉटयोगाची सेवा देत असल्याबाबत सांगण्यात आले. सुरूवातीला सामनेवाले क्र 5 यांनी एका सदस्यासाठी एका वर्षाचे शुल्क रू 1,75,000/-,असे सांगीतले. तक्रारदारानी त्याबाबत संमत्ती न दर्शविल्यामुळे सामनेवाले क्र 5 यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिका-याशी वेळोवेळी चर्चा करून, ही रक्कम रू. 50,000/-,व पहिल्या महिन्याकरीता त्यांना रू. 6,000/-,भरावे लागतील व जर त्यांना सदस्यत्व चालू ठेवायचे असल्यास, त्यांना एक महिन्याच्या आंत उर्वरीत रक्कम म्हणजे रू. 19,000/-, भरावी. त्याप्रमाणे करारपत्र करण्यात आले. व तक्रारदारानी रू. 6,000/-, दि. 28/10/2009 ला भरले व त्याची रितसर पावती देण्यात आली.
3. तक्रारदारानी पहिल्या महिन्यापैकी 8 ते 10 दिवस वगळता सामनेवाले यांच्या जिमची सुविधा उपभोगली. परंतू, हॉटयोगामूळे त्यांना पोटाचा त्रास जाणवला. महिना संपण्यापुर्वी तक्रारदारानी सदस्यत्व चालू ठेवण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे रू. 19,000/-, दि. 31/12/2009 ला भरले. त्याची सुध्दा रितसर पावती देण्यात आली. तक्रारदारानी ओळखपत्रासाठी विनती केली असता, त्यांना आणखी रू. 5,000/-, भरण्यास सांगण्यात आले. उभयपक्षामध्ये सहा महिन्याचे शुल्क रू. 25,000/-, आहे की, रू. 30,000/-,आहे याबाबत वाद निर्माण झाला व तक्रारदारानी भरलेले रू. 19,000/-,परत मिळणेसाठी विनंती केली व सामनेवाले क्र 1 यांच्या वरिष्ठ अधिका-यांशी भेटण्याची इच्छा प्रकट केली. परंतू, ती मान्य करण्यात आली नाही. तक्रारदाराप्रमाणे करारपत्राप्रमाणे त्यांनी रू. 24,000/-,भरणे आवश्यक होते व ते रू. 1,000/-, परत मिळणेस पात्र होते. तक्रारदार यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी सामनेवाले यांना ई-मेल द्वारे कळविले. परंतू काही जबाब प्राप्त झाला नाही. ते स्वतः सामनेवाले यांना भेटले परंतू योग्य प्रगती झाली नाही. सामनेवाले क्र 5 जे मध्यंतरी सामनेवाले क्र 1 ची नोकरी सोडून गेले होते, ते पुन्हा रूजू झाल्यानंतर, त्यांनी सुध्दा मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतू, मार्ग निघू शकला नाही. शेवटी तक्रारदारांनी ही तक्रार दाखल करून अदा केलेले रू. 19,000/-, 18 टक्के व्याजासह, रू. 4,000/-, 18 टक्के व्याजासह, सामनेवाले यांचा नियम- 9 रद्द करण्याबाबत, मानसिक त्रासासाठी रू. 3,00,000/-,तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/-,अशा मागण्या केलेल्या आहेत.
4. सामनेवाले क्र 1 ते 4 नुसार तक्रारदारानी फक्त पैशाची मागणी केल्यामुळे ही तक्रार या मंचात चालू शकत नाही व सामनेवाले यांचे कलम-9 या बाबत घोषणा करण्याचा अधिकार या मंचास नाही. तक्रारदारानी कराराच्या विपरीत कथन कले आहे. सामनेवाले यांनी सद्भवाने हेतू तक्रारदार यांना रू. 28,000/-, परत करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतू तक्रारदारानी तो नाकारला. तक्रारदारानी आवश्यक असलेल्या पक्षाला संम्मेलीत केले नाही व आवश्यक नसलेल्या पक्षांना संम्मेलीत केलेले आहे. सामनेवाले क्र 2 ते 5 यांच्या कंपनीचे पूर्ण नाव ट्रु फिटनेस इंडिया प्रा.लि. असे आहे. परंतू या व्यक्तीला तक्रारीमध्ये पक्ष म्हणून संम्मेलीत केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराची ही तक्रार चालू शकत नाही. तक्रारदार जिममध्ये नियमीतपणे येत नव्हते व त्यांना “ ऐन-केन प्रकारेन” भरलेले शुल्क परत प्राप्त करायचे आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराना पाठविलेला ई-मेल प्राप्त नाही व तक्रारदारांनी सुध्दा त्याच्या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदारांची तक्रार नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी.
5. उभयपक्षांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला. प्रकरण तोंडीयुक्तीवादासाठी नेमण्यात आले असता, कोणताही पक्ष मंचासमक्ष उपस्थित झाला नाही. त्यामुळे उभयपक्षांच्या प्लिडींग्स व लेखीयुक्तीवाद विचारात घेऊन, हे जुने प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
6. उपरोक्त बाबी लक्षात घेता, खालील बाबी हया मान्य आहेत.
तक्रारदारानी आधी रू. 6,000/-,व नंतर रू. 19,000/-,भरले. तक्रारदार यांच्या सदस्यत्वाबाबत करारपत्र करण्यात आले.
7. उपरोक्त बाबींवरून ही तक्रार निकाली काढण्या करीता खालील मुद्दे महत्वाचे ठरतात.
अ) सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केला व अनुचित व्यापार पध्दत अवलंबीली हे सिध्द होते का ?
अ.1) तक्रारदारांनी दि. 28/10/2009 चे करारपत्र क्र. 003862 दाखल केले आहे. त्यावरून असे दिसून येते की, तक्रारदारानी त्यादिवशी रू. 6,000/-,भरले व ही रक्कम नंतर भरण्यात येणारे शुल्क रू. 24,000/- किंवा रू. 50,000/-, मध्ये समायोजीत होणार होती. तक्रारदारानी कराराप्रमाणे एक महिन्याच्या आत उर्वरीत रक्कम रू. 19,000/-,दि. 31/12/2009 ला भरले. तक्रारदारानी दि. 31/12/2009 चे करारपत्र क्र. 004547 हे दाखल केले आहे. त्यामध्ये पुर्ण रक्कम रू. 30,000/-,दाखविण्यात आलेली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, पहिल्या करारामध्ये रक्कम रू. 24,000/-,दाखविण्यात आली व त्याच कराराच्या अनुषंगाने नंतर केलेल्या करारामध्ये ती रक्कम वाढवून रू. 30,000/-,दाखविण्यात आलेली आहे. आमच्या मते जेव्हा एकदा ती रक्कम रू. 25,000/-,अशी ठरविण्यात आली होती, तर ती सामनेवाले एकतर्फा वाढवून रू. 30,000/-,करू शकत नाही. करारामध्ये बदल करण्याकरिता दुस-या पक्षाची संमत्ती आवश्यक असते. जर सामनेवाले यांना रू. 24,000/-, / रू. 25,000/-, ही रक्कम मान्य नव्हती, तर त्यांनी तक्रारदारांकडून रू. 19,000/-,ही रक्कम स्विकारायला नको होती. परंतू सामनेवाले यांनी रू. 19,000/-,ची रक्कम स्विकारली व तक्रारदारांना एकुण रू. 30,000/-, भरण्यासाठी एकप्रकारे दबाव टाकू लागले हे सर्वथा प्रचलित व्यापारी पध्दती प्रमाणे नाही. सबब, आमच्या मते सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केला तसेच, अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली.
ब.) तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मोबदला प्राप्त करण्यास पात्र आहेत का ?
ब.1) वर नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले क्र 1 ही कंपनी आहे व सामनेवाले क्र 2 ते 5 हे त्यांचे पदाधिकारी आहेत. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या लेखी कैफियतीच्या परिच्छेद क्र 1 व 8 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांच्या कंपनीचे नाव ट्रु फिटनेस इंडिया प्रा.लि. आहे. परंतू, तक्रारदारांनी ही तक्रार ट्रु फिटनेस विरूध्द दाखल केलेली आहे. त्यामुळे ही तक्रार नॉन जॉंईंडर व मिसजॉंईंडर ऑफ पॉर्टीज करीता डिस्मीस्ड करण्यात यावी. सामनेवाले यांनी लेखी कैफियती सोबत पंजीकरण प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्यावरूनही सामनेवाले क्र 2 ते 5 यांच्या कंपनीचे पूर्ण नाव स्पष्टपणे नमूद आहे. तक्रारदारानी याबाबतची दखल घेतलेली दिसून येत नाही. तक्रारदारांनी सामनेवाले क्र 1 यांच्या नावामध्ये कोणतीही दुरूस्ती केल्याचे दिसून येत नाही. तक्रारदार यांना देण्यात आलेल्या रू. 6,000/-, व रू. 19,000/-, च्या पावत्यांवर सुध्दा सामनेवाले क्र 2 ते 5 यांच्या कंपनीचे नाव स्पष्टपणे व ठळकपणे लिहीलेले नाही. तसेच हे नाव करारपत्रावर सुध्दा खाली नमूद आहे. परंतू, ते बारीक अक्षरांमध्ये आहे. अशा अवस्थेमध्ये आमच्या मते सामनेवाले क्र 1 ट्रु फिटनेस च्या विरूध्द आदेश पारित केल्यास, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती विरूध्द आदेश पारीत करण्या सम होईल. तसे केल्यास, गुंतागुंत व प्रदीर्घ चालणारे प्रकरणे उद्भवतील. ज्या व्यक्तीशी करार झाला त्याला पक्ष म्हणून संम्मेलीत करण्यात आलेले नाही व ज्या व्यक्ती विरूध्द तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तिच्या अस्तीत्वाबाबत शंका निर्माण होते. सबब, आमच्या मते तक्रारदार हे सामनेवाले क्र 1 विरूध्द आदेश प्राप्त करून घेण्यास पात्र नाहीत. सामनेवाले क्र 2 ते 5 हे पदाधिकारी असल्यामूळे ते व्यक्तीशः जबाबदार होणार नाही. शिवाय, त्यांची कंपनी पक्ष म्हणून संम्मेलीत करण्यात आलेली नाही. हे प्रकरण मिस जॉईंडर व नॉन जॉईंडर ऑफ पॉर्टीज दर्शविते.
8. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
9. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 692/2010 खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयतांना विनामुल्य पाठविण्यात/देण्यात
पाठविण्यात याव्या.
4. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करावे.
5. तक्रारदारांनी दि. 08/10/2013 ला दाखल केलेला अर्ज तक्रार खारीज केल्यामुळे नस्ती करण्यात येते.
npk/-