(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 26 फेब्रुवारी, 2021)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विरुध्द दोषपूर्ण सेवे बद्दल तसेच ईतर अनुषंगीक कारणांसाठी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचा व्यवसाय असून तो वल्लभाश्रय ट्रेडींग कंपनी भंडारा या फर्मचा प्रोप्रायटर आहे. त्याचे बॅंकेचे खाते विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या भंडारा येथील शाखे मध्ये असून त्याचा खाते क्रं-007002100000392 असा आहे. त्याच बरोबर तक्रारकर्त्याचे बॅंक ऑफ इंडीया, शाखा राजीव गांधी चौक भंडारा येथील शाखेत सुध्दा क्रेडीट खाते असून त्या खात्याचा क्रमांक-922630110000041 असा आहे. त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या खात्यामध्ये दिनांक-25.02.2019 रोजी एकूण रक्कम रुपये-8,00,000/- जमा होती, त्याच दिवशी त्याने त्याचे बॅंक ऑफ इंडीया शाखा राजीव गांधी चौक, शाखा भंडारा येथील उपरोक्त नमुद खात्यामध्ये धनादेश क्रं-642646 व्दारा आर.टी.जी.एस. व्दारे रक्कम रुपये-8,00,000/- जमा केली होती. सदर आर.टी.जी.एस.ची पावती सोबत जोडत असल्याचे नमुद केले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेतील शाखेतून, त्याचे अन्य बॅंके मध्ये खाते असलेल्या बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खात्यात आर.टी.जी.एस.व्दारा जमा केलेली रक्कम रुपये-8,00,000/- जमा न झाल्यामुळे त्याने दिनांक-02 मार्च, 2019 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक, भंडारा शाखा यांचेकडे लेखी तक्रार दिली असता वि.प.क्रं 1 बॅंकेच्या अधिका-यांच्या लक्षात आले की, सदर रक्कम ही बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खाते क्रं-92261011000041 मध्ये एका अंकाच्या फरकामुळे अन्य खातेदाराच्या बचतखात्यात चुकीने जमा झाल्याचे निदर्शनास आले म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक भंडारा येथील शाखेच्या अधिका-यांनी बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथे संपर्क साधला असता दिनांक-08 मार्च, 2019 ला रुपये-8,00,000/- पैकी फक्त रक्कम रुपये-6,40,000/- तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा झालेली आहे परंतु उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी जमा करावयाची शिल्लक ठेवली म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेमध्ये उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- जमा करण्या करीता लेखी तक्रार केली. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या खात्यात फक्त फक्त रुपये-6,40,000/- एवढया रकमेची नोंद खाते उता-यामध्ये आहे. उर्वरीत जमा व्हावयाची रक्कम मोठी असल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी सदर रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत जाऊन मौखीक तक्रारी केल्या असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आलीत. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी तक्रारकर्त्याचे खात्यात उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- जमा केलेली नाही व ती रक्कम गहाळ करण्याचा उद्देश्य वि.प.क्रं 1 बॅंकेचा आहे. या बाबत तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने दिनांक-20 मार्च, 2019 रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे तक्रार नोंदविली होती तसेच दिनांक-24.06.2019 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेला कायदेशीर नोटीस पाठविली होती परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही वा लेखी उत्तर सुध्दा दिले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेनी त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याने त्यास शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके विरुध्द दाखल करुन त्याव्दारे खालील प्रकारच्या मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास रक्कम रुपये-1,60,000/- व त्यावर 12 टक्के व्याज देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्हणून रुपये-25,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 बॅंके तर्फे एकत्रीत लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या शाखेतून आर.टी.जी.एस.व्दारे रुपये-8,00,000/- ट्रान्सफर केल्याची बाब मान्य केली परंतु सदर रक्कम त्याचे बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथे जमा झालेली नाही ही बाब मान्य केली. या बाबत नमुद करण्यात येते की, तक्रारकर्ता/त्याचा प्रतिनिधी याने स्लिप भरुन देताना त्याचा बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खाते क्रमांक चुकीचा नमुद केला होता आणि त्यामुळे सदरची रक्कम त्याचे बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खात्यात जमा झालेली नव्हती. असे दिसून आले की, सदरची रक्कम रुपये-8,00,000/- ही खाते क्रमांक-922610110000041 मध्ये जमा झालेली असून सदर खाते क्रमांक हा श्री मुकेश रामक्रिष्ण मेश्राम, भंडारा याचा आहे. सदर चुकी बद्दल तक्रारकर्ता वा त्याचा प्रतिनिधी हेच जबाबदार आहे आणि त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक जबाबदार नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंक उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- परत करण्यास जबाबदार नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी त्वरीत वेळेत कार्यवाही केल्यामुळे रक्कम रुपये-6,40,000/- तक्रारकर्त्याचे खात्यात जमा झालेली आहे. विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्दपक्ष बॅंकेची या प्रकारा मध्ये कोणतीही चुक नाही. यामध्ये तक्रारकर्ता अथवा त्याचा प्रतिनिधी याने आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. अर्ज भरुन देताना चुकीचा क्रमांक नमुद केला होता आणि त्यामुळे विरुध्दपक्ष बॅंकेची कोणतीही जबाबदारी येत नाही. तक्रारकर्ताने केलेला सदर रकमेचा व्यवहार हा व्यवसायासाठी केलेला असल्याने ग्राहक संरक्षण कायदयाचे तरतुदी प्रमाणे तो ग्राहक या सज्ञेत मोडत नाही. तसेच तक्रारकर्त्याने बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा यांना या तक्रारी मध्ये प्रतिपक्ष केलेले नाही तसेच ज्या व्यक्तीचे खात्यात चुकीने रक्कम जमा झाली होती त्या व्यक्तीला सुध्दा प्रतिपक्ष केलेले नाही, जे कायदेशीररित्या योग्य नाही. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष बॅंकेत असलेले खाते हे वल्लभाश्रय ट्रेडींग कंपनी जी एक व्यवसायीक फर्म असल्याने तक्रारकर्ता हा ग्राहक या सज्ञेत मोडत नाही, त्यामुळे तक्रार खर्चासहखारीज करण्याची विनंती केली.
04. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री एम.डी.खोब्रागडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 बॅंके तर्फे व्यवस्थापक श्री ज्ञानेश पांडूरंग वंजारी यांनी त्यांनी दाखल केलेल्या लेखी युक्तीवादालाच मौखीक युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली. प्रकरणातील दाखल दस्तऐवज, साक्षी पुरावे, लेखी व मौखीक युक्तीवाद याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेचा ग्राहक होतो काय | -होय- |
02 | विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
03 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं-1 व 2
05. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत खाते असून त्या खात्यामध्ये त्याची जमा रक्कम असते आणि त्या जमा रकमेच्या मोबदल्यात विरुध्दपक्ष बॅंक त्याला व्याज देते व सेवा देते. विरुध्दपक्ष बॅंकेचा असा आक्षेप आहे की, तक्रारकर्त्याचे बॅंकेचे खाते हे वल्लभाश्रय या फर्मचे नावाने असून सदर खात्यामधील व्यवहार हा व्यवसाया करीता करतो. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा व्यवसायिक कारणासाठी सदर खात्याचा उपयोग करीत असल्याने तो ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे “ग्राहक” या सज्ञेत मोडत नाही. या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे स्पष्ट करण्यात येते की, ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे बॅंक आणि विमा कंपनी याव्दारे सेवा पुरविण्यात येत असल्याने बॅंक आणि विमा कंपनीशी संबधित व्यवहार हे व्यावसायीक या प्रकारात मोडत नाही. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष बॅंक यांच्या मध्ये “ग्राहक आणि सेवा देणारे” असे संबध प्रस्थापित होत असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष बॅंकेचा ग्राहक होतो त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 01 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं-2
06. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक शाखा भंडारा येथे बचत खाते क्रं-007002100000392 आहे, त्याच बरोबर त्याचे बॅंक ऑफ इंडीया भंडारा येथील शाखेत क्रेडीट खाते असून त्याचा खाते क्रमांक-922630110000041 असा आहे या बाबी या प्रकरणा मध्ये उभय पक्षां मध्ये विवादास्पद नाहीत व प्रकरणात उपलब्ध बॅंकेच्या खाते उता-यांवरुन ही बाब सिध्द होते.
07. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने दिनांक-25.02.2019 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक गोंदीया शाखा भंडारा येथून त्याचे बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील क्रेडीट खात्यात आर.टी.जी.एस.व्दारे एकूण रक्कम रुपये-8,00,000/- जमा केली होती परंतु ती रक्कम बॅंक ऑफ इंडीया शाखेत जमा न झाल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांकडे तक्रार केली असता, सदरची रुपये-8,00,000/- रक्कम श्री मुकेश रामक्रिष्ण मेश्राम, भंडारा यांच्या खात्या मध्ये जमा झाली असल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याचे तक्रारी नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील अधिका-यांकडे तक्रार केली आणि त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक शाखा भंडारा यांना रक्कम परत केली आणि त्यानंतर तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंके मधील असलेले बचत खाते क्रं-007002100000392 मध्ये दि-08.03.2019 रोजी फक्त रुपये-6,40,000/- एवढी रक्कम जमा केली. वस्तुतः तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेतून आर.टी.जी.एस.व्दारे एकूण रुपये-8,00,000/- पाठविले असताना व या बाबत तक्रार केल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेनी फक्त रुपये-6,40,000/- एवढीच रक्कम त्याचे खात्यात परत केली परंतु उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- अदयाप पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी त्याला परत केलेली नाही.
08 या संदर्भात विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक शाखा भंडारा यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता अथवा त्याचे प्रतिनिधीने विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक शाखा भंडारा येथून आर.टी.जी.एस.व्दारे रक्कम रुपये-8,00,000/- तक्रारकर्त्याचे बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथे असलेल्या क्रेडीट खात्यामध्ये ट्रान्सफर करताना योग्य ती स्लीप भरुन दिलेली नाही आणि सदर स्लिप भरुन देताना खाते क्रमांक चुकीचा नमुद केला होता त्यामुळे ती रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा झाली. तक्रारकर्त्याची तक्रार आल्या नंतर त्यांनी त्वरीत वेळेच्या आत पाऊले उचलल्यामुळे रुपये-8,00,000/- पैकी रुपये-6,40,000/- एवढी रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यात जमा केली. परंतु उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- जमा न होण्या मध्ये तक्रारकर्त्याचीच चुक आहे आणि त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेला जबाबदार धरता येणार नाही.
09. या संदर्भात विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक शाखा भंडारा येथे तक्रारकर्त्याव्दारे दिनांक-25.02.2019 रोजी आर.टी.जी.एस.व्दारे त्याचे बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथे रक्कम रुपये-8,00,000/- ट्रान्सफर करताना जी स्लीप भरुन दिली होती, त्या स्लीपची प्रत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी अभिलेखावर पान क्रं 38 वर दाखल केली, त्या स्लिपचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे सुक्ष्म अवलोकन केले असता असे दिसून येते की, वल्लाभाश्रय कंपनीचे बॅंक ऑफ इंडीया येथील भंडारा शाखेत दिनांक-25.02.2019 रोजी आर.टी.जी.एस.व्दारे रुपये-8,00,000/- जमा केले होते, त्या स्लिप मध्ये 3.एकीकडे बॅंक ऑफ इंडीयाचा Account No.-922610110000041 असा नमुद केलेला असून त्याच स्लीप मध्ये दुसरीकडे Reconfirm A/C No-922630110000041 असा खाते क्रमांक नमुद केलेला दिसून येते. अशाप्रकारे एकाच स्लिपमध्ये अनावधानाने चुकीने दोन वेगवेगळे खाते क्रमांक नमुद केल्याचे दिसून येते. वस्तुतः तक्रारकर्त्याचे बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील क्रेडीट खात्याचा खाते क्रमांक-922630110000041 असा आहे. याचाच अर्थ असा होतो की, एकाच स्लिप मध्ये तक्रारकर्त्याच्या खात्याचे दोन वेगवेगळे खाते क्रमांक नमुद केलेले असून त्यामधील Reconfirm A/C No-922630110000041 योग्य नमुद केलेला आहे. परिणामी रक्कम रुपये-8,00,000/- ही बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खाते क्रमांक-922610110000041 असलेल्या मुकेश रामक्रिष्ण मेश्राम, भंडारा या अन्य व्यक्तीचे खात्यात चुकीने जमा झाली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंके मध्ये तक्रार केली असता त्यांनी त्वरीत बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा यांचेशी संपर्क साधला आणि त्यानंतर झालेली चुक लक्षात आल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक शाखा भंडारा येथील बचत खाते क्रं-007002100000392 मध्ये दिनांक-08.03.2019 रोजी फक्त रुपये-6,40,000/- एवढी रक्कम परत करण्यात आली परंतु उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- अदयापही तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेच्या शाखेत जमा झालेली नाही.
10. उपरोक्त नमुद संपूर्ण प्रकार पाहता यामध्ये तक्रारकर्त्याची सुध्दा चुक दिसून येते कारण की आर.टी.जी.एस. व्यवहार करताना भरुन दिलेल्या स्लीप मध्ये दोन वेगवेगळे खाते क्रमांक नमुद केलेले आहे आणि त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेने बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खाते क्रमांक-922610110000041 असलेल्या मुकेश रामक्रिष्ण मेश्राम, भंडारा या अन्य व्यक्तीचे खात्यात चुकीने रक्कम जमा केली. यामध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेची सुध्दा चुक दिसून येते कारण एकाच स्लीप मध्ये तक्रारकर्त्याने दोन वेगवेगळे खाते क्रमांक नमुद केलेले आहे आणि एवढी मोठी रक्कम अन्य खात्यामध्ये ट्रान्सफर करताना संबधित बॅंकेच्या कर्मचा-याने देखील स्लीप मधील दोन्ही नमुद खाते क्रमांकाचा मेळ तपासून पाहणे आवश्यक होते परंतु तसे या प्रकरणात घडलेले दिसून येत नाही. या प्रकरणा मध्ये सदर चुक होण्या मध्ये तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक हे दोन्ही सारखेच जबाबदार आहेत, असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
11. दुसरी बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याने सुध्दा तक्रारी मध्ये बॅंक ऑफ इंडीयाला प्रतिपक्ष केलेले नाही त्यामुळे नेमकी काय वस्तुस्थिती आहे याची स्पष्ट कल्पना जिल्हा ग्राहक आयोगास येत नाही. तक्रारकर्त्याची वादातीत रक्कम रुपये-8,00,000/- चा व्यवहार दिनांक-25.02.2019 रोजी घडलेला आहे आणि तक्रारकर्त्याने तक्रार केल्या नंतर रुपये-8,00,000/- पैकी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक शाखा भंडारा येथील बचत खाते क्रं-007002100000392 मध्ये दिनांक-08.03.2019 रोजी फक्त रुपये-6,40,000/- एवढी रक्कम जमा केली आणि अदयापही उर्वरीत रुपये-1,60,000/- एवढी रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यात जमा झालेली नाही, उर्वरीत रक्कम जमा का झाली नाही या बाबत कोणतेही खुलासेवार स्पष्टीकरण विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेनी आपले लेखी उत्तरात नमुद केलेले नाही. जर तक्रारकर्त्याची वादातीत व्यवहाराची एकूण रुपये-8,00,000/- रक्कम चुकीने दिनांक-25.02.2019 रोजी बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खाते क्रमांक-922610110000041 असलेला अन्य खातेदार मुकेश रामक्रिष्ण मेश्राम, भंडारा यांचे खात्यात जमा झाली होती व त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेने बॅंक ऑफ इंडीयाशी संपर्क साधून दिनांक-08.03.2019 रोजी वादातील रक्कम रुपये-8,00,000/- पैकी फक्त रुपये-6,40,000/- एवढी रक्कम तक्रारकर्त्याचे बचतखात्यात कशी काय जमा केली. बॅंक ऑफ इंडीया कडून तक्रारकर्त्याची संपूर्ण वादातील व्यवहाराची रक्कम रुपये-8,00,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंकेला परत करण्यात आलेली असेल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे कारण बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा यांचे कडून फक्त रुपये-6,40,000/- एवढीच रक्कम परत करण्यात आली होती असे विरुध्दपक्ष क्रं 1 जनता सहकारी बॅंक यांचे म्हणणे नाही किंवा बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा यांनी परत केलेल्या रकमे बाबत कोणताही पुरावा विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी या प्रकरणात दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यास त्याचे वादातील व्यवहार रक्कम रुपये-8,00,000/- पैकी परत मिळावयाची उर्वरीत रक्कम रक्कम रुपये-1,60,000/- वादातील व्यवहार दिनांक-25.02.2019 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्के व्याज दरासह विरुध्दपक्ष जनता सहकारी बॅंके कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या वादातील प्रकरणा मध्ये तक्रारकर्त्याची सुध्दा चुक दिसून येत असल्याने त्यास शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मंजूर करता येणार नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12 उपरोक्त नमुद विवेचना वरुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) जनता सहकारी बॅंक लिमिटेड गोंदीया, शाखा –भंडारा तर्फे व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं-2 जनता सहकारी बॅंक लिमिटेड, गोंदीया, तालुका-जिल्हा-गोंदीया तर्फे अध्यक्ष यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-1) जनता सहकारी बॅंक लिमिटेड गोंदीया, शाखा –भंडारा तर्फे व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं-2) जनता सहकारी बॅंक लिमिटेड, गोंदीया, तालुका-जिल्हा-गोंदीया तर्फे अध्यक्ष यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास वादातील दिनांक-25.02.2019 रोजीच्या आर.टी.जी.एस. व्यवहारातील उर्वरीत रक्कम रुपये-1,60,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष साठ हजार फक्त) एवढी रक्कम अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-25.02.2019 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज दयावे.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1) व क्रं-2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तीकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास सदर रक्कम रुपये-1,60,000/- आणि त्यावर दिनांक-25.02.2019 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.7 टक्के दराने दंडनीय व्याज यासही येणारी रक्कम तक्रारकर्त्यास देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं-2 हे जबाबदार राहतील.
- तक्रारकर्त्याच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येत आहेत.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
- उभय पक्षांनी दाखल केलेले अतिरिक्त संच त्यांना पुरवावेत.